नेवासा

महाराष्ट्रातील थंड हवेची ठिकाणे -

महाबळेश्वर -
सातारा जिल्ह्यातील हे थंड हवेचे ठिकाण आहे. समुद्रसपाटीपासून सुमारे ४५०० फूट उंचीवरील थंड हवेचे हे ठिकाण म्हणजे आरोग्य रक्षणाची इंग्रजांची सोय असलेले ठिकाण होते.

सातार्‍याचे महाराज प्रतापसिंह यांनी १८१८ ते १८३० दरम्यान महाबळेश्र्वर हे आरोग्यवृद्धीसाठी विकसित करण्याचे ठरवले. जॉन माल्कम हे तेव्हाचे गव्हर्नर १८२८ मध्ये महाबळेश्वरला भेट देऊन गेले. तत्कालीन ब्रिटिश अधिकारी लॉडविक यांनी या स्थानाचा ‘थंड हवेचे ठिकाण’ म्हणून नियोजित विकास केला. त्याआधी सर चार्लस्, मॅलेट हेदेखील महाबळेश्र्वरला येऊन गेले होते असे उल्लेख आढळतात.

महाबळेश्वर पाहताना बॉम्बे पॉइंट, ऑर्थर सीट, केटस् पॉईंट, लॉडविक - विल्सन, एलफिस्टन पॉईंट्स, वेण्णा लेक, लिंगमळा धबधबा, तापोळा, जवळचे श्रीक्षेत्र महाबळेश्वर, येथील महादेवाचे मंदिर ही ठिकाणे महत्त्वाची! श्री क्षेत्र महाबळेश्वर येथूनच कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री व गायत्री या पाच नद्या उगम पावतात. या स्थानाला पंचगंगा असेही म्हटले जाते.

उत्तम रस्ते, दाट झाडी, बागा, फुला-फळांच्या रोपवाटिका यामुळे महाबळेश्र्वर अनेकांचे आवडीचे थंड हवेचे ठिकाण आहे. जॅम-जेली, सरबते, मध, चणे, स्ट्रॉबेरी यांसाठीही महाबळेश्र्वर प्रसिद्ध आहे. राहण्याच्या सोयी, विविध प्रकारच्या- स्तरांच्या हॉटेल्सची मुबलक सोय यामुळे उन्हाळ्यात आणि सुट्टीत महाबळेश्वर गजबजून जाते.

इ. स. १८३४ ते १८६४ या दरम्यान महाबळेश्वरमध्ये चीनी-मलाई कैदी तुरुंग होता. सुमारे १२० कैद्यांसाठीचा तुरुंग येथे होता. स्ट्रॉबेरी लागवड, बांबूचे विणकाम, मुळ्याची - गाजराची लागवड अशी कामे कैद्यांकडून करून घेतली जात. कैदी कधी कधी तुरुंगातून सुटल्यावर परत न जाता महाबळेश्र्वर मध्येच राहू लागले, असेही झाले.

उंच कडे, खोल दर्‍या, दाट जंगले, थंड-स्वच्छ हवा आणि नीरव शांतता यांचा सुंदर अनुभव सह्याद्रीच्या रांगेतील या स्थानामध्ये मिळतो. परिसरातल्या एका गावाचे ग्रामदैवत महाबळी आहे. या महाबळीचे मंदिर यादवकाळात यादव राजांनी बांधले. छत्रपती शिवाजी महाराजांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याची नोंद इतिहासात आढळते. या ग्रामदैवतावरूनच या भागाला महाबळेश्वर असे नाव देण्यात आले, असे म्हटले जाते. अनेक वैशिष्ट्यांमुळे केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील पर्यटक महाबळेश्वरला वारंवार भेट देतात.

पाचगणी -
पाच डोंगरांवर वसलेले म्हणून पाचगणी असे नाव असलेले हे थंड हवेचे ठिकाण सातारा जिल्ह्यात (महाबळेश्र्वरपासून केवळ २० कि. मी. अंतरावर) आहे. हे ठिकाण सुमारे १३७२ मीटर उंचीवर आहे. पाचगणी आणि महाबळेश्र्वर ही दोन्ही ठिकाणे अनेक प्रेक्षणीय दृश्यांसाठी प्रसिद्ध आहेत. डोंगरकडे, दाट झाडी, चिंचोळे मार्ग, पर्यटनाचे ठिकाण म्हणून मुद्दाम तयार केलेले उत्तर रस्ते हे पाचगणीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल.

स्ट्रॉबेरी, तुती, केशरी गाजरे, मध, या सोबतच जॅम - जेली, सरबते तयार करणार्‍या कंपनीच्या उत्तम बागा हेदेखील पाचगणीचे आकर्षण आहे. रोपवाटिकांमधून मिळणार्‍या विविध फुला-फळांच्या रोपांची रेलचेल, यामुळे पाचगणीच्या निसर्गरम्य वातावरणात भर पडली आहे.

अनेक निवासी शाळा पाचगणीमध्ये गेली बरीच वर्षे कार्यरत आहेत.

महाबळेश्र्वर - पाचगणी जवळच छत्रपती शिवाजी महाराज - अफजलखान यांची भेट झाली. या भेटीत महाराजांनी खानाला यमसदनास पाठवले. त्या ऐतिहासिक प्रसंगाची साक्ष देणारा प्रतापगड आजही दिमाखाने उभा आहे. सातारा जिल्ह्यातच येथून जवळच सज्जनगड हा समर्थ रामदास स्वामींचे समाधिस्थान असलेला गड आहे.
लोणावळा - खंडाळा -
पुणे जिल्ह्यात अनेक प्रेक्षणीय ठिकाणे, ऐतिहासिक महत्त्वाची स्थळे आहेत. थंड हवेच्या ठिकाणांत विशेष प्रसिद्ध असलेले लोणावळा - खंडाळा हे एक ठिकाण आहे. सुमारे ६२५ मीटर उंचीवर असलेले हे ठिकाण पावसाळ्यात धबधब्यांमुळे अधिकच आकर्षक वाटते. लोणावळा व खंडाळा ही परस्परांच्या जवळ असलेली गावे आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पुणे व मुंबई या दोन महानगरांच्या मध्ये ही ठिकाणे आहेत. पुणे-मुंबई महामार्ग (रस्ता) व पुणे-मुंबई लोहमार्ग या दोन्ही मार्गांवर ही ठिकाणे आहेत. अतिशय सोयीचा प्रवास, निसर्गरम्यता, अनेक सोयी सुविधा, गर्दी व अशांततेपासून सुटकेची खात्री यांमुळे पुण्या-मुंबईतील पर्यटकांबरोबरच संपूर्ण भारतातील पर्यटक येथे गर्दी करतात.

पावसाळ्यात हौशी पर्यटक लोणावळा-खंडाळा भागात पावसात भिजत, चालत फिरतात. कार्ल्याची व भाजे येथील लेणी, एकवीरा देवीचे स्थान, राजमाची व लोहगड किल्ले ही ठिकाणेही येथून जवळ आहेत. तसेच भुशी धरण, वळवण धरण ही धरणेसुद्धा येथून जवळ आहेत.

माथेरान -
रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात सह्याद्रीच्या पश्र्चिम घाटात ८०० मी. उंचीवर हे थंड हवेचे ठिकाण आहे. दाट जंगले, डोंगर-दर्‍या, वळणा-वळणांचे घाटांचे रस्ते यांबरोबरच येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. वाहनांना प्रवेश नसल्यामुळे माथेरानमध्ये चालत, घोड्यावरून किंवा डोलीतून भटकंती करावी लागते. प्रदूषणापासूनची मुक्ती अनुभवण्यासाठी आणि खरोखरच निसर्गाशी मैत्री करण्यासाठी हे योग्य ठिकाण आहे.

लाल माती, नागमोडी रस्ते, टेकड्या, धबधबे, पठार, मोठेच्या मोठे गोल्फ कोर्स आणि नेरळ-माथेरान नॅरोगेज रेल्वे अशी येथील अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथे एकूण २५ ठिकाणे (पाईंट्स) पाहण्यासारखी आहेत. माथेरानला येताना पुणे-मुंबई महामार्गावरून, कर्जतकडून येताना आपण सुंदर प्रवासाचाही आनंद लुटू शकतो.

येथे पर्यटकांच्या निवासाची सोय आहे आणि वेगवेगळ्या स्तरांतील भरपूर हॉटेल्स आहेत.

ब्रिटिशांनी माथेरान ही मुंबईजवळची जागा थंड हवेचे ठिकाण म्हणून हवाबदलासाठी मुद्दाम विकसित केली. इ. स. १८५० मध्ये लॉर्ड एलफिन्स्टन (मुंबई गव्हर्नर) व ह्यूज मॅलेट (ठाणे कलेक्टर) यांनी माथेरान शोधले. या अवघड ठिकाणी रस्त्याची सोय करणेही जिकिरीचे काम होते. पण त्यातही रेल्वेची सोय करणे आश्चर्यकारक आहे. १८५४ मध्ये मुंबई गव्हर्नरने बंगला बांधल्याने माथेरानचे महत्त्व वाढत गेले.

जून ते सप्टेंबर या काळात भरपूर पाऊस असल्याने रेल्वे बंद असते. ऑक्टोबर ते डिसेंबर आणि मार्च ते मे या कालावधीत सतत पर्यटकांची वर्दळ सुरूच असते. कातकरी, ठाकर, धनगर यांची वस्ती असलेल्या या गावात ९० वर्षांची परंपरा असलेली नगरपालिका आहे.

माथेरान हे प्रामुख्याने मुंबईकरांचे लाडके ठिकाण आहे. पर्यटन आणि हवाबदल या उद्देशाने येणार्‍या पर्यटकांच्या सहली, अविस्मरणीय आठवणी येथून जाताना बरोबर घेऊन जातात हे मात्र निश्चित!

तत्कालीन उद्योजक सर आदमजी पीरभॉय व त्यांचे पुत्र अब्दुल हुसेन पीरभॉय या पितापुत्रांचाही माथेरानच्या उभारणीमध्ये मोठा वाटा आहे. सर आदमजी यांनी माथेरानच्या विकासासाठी आपली सुमारे ५० एकर जमीन उपलब्ध करून दिली. या पितापुत्रांनी माथेरान स्टीम लाईट ट्राम वे ही कंपनी स्थापन केली व त्या माध्यमातून टॉयट्रेन सुरू केली. अब्दुल हुसेन यांच्या पुढाकाराने सुरू झालेला प्रकल्प केवळ दीड वर्षात पूर्ण झाला, यासाठी त्याकाळी सुमारे १६ लाख रुपये खर्च आला होता. १९०७ मध्ये ही रेल्वे ट्रॅकवर धावू लागली. माथेरानमध्ये विजेचे दिवेही पीरभॉय यांनीच लावले. पीरभॉय पितापुत्रांमुळेच माथेरानचा प्रवास सोपा झाला व एकूण विकास झाला.

तोरणमाळ -
नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी तालुक्यात सातपुडा पर्वताच्या रांगांत सुमारे ११४३ मीटर उंचीवर थंड हवेचे ठिकाण आहे, ते तोरणमाळ म्हणून प्रसिद्ध आहे. आदिवासी जमातीचे लोक बहुसंख्येने राहत असलेल्या अक्राणी तालुक्यात हे हिरवेगार असे ठिकाण आहे. पूर्वीच्या मांडू घराण्याच्या राजांचे हे राजधानीचे ठिकाण. महाराष्ट्रातले पर्यटक हळूहळू वेगवेगळ्या ठिकाणांकडे जाऊ लागले आहेत. त्यामुळे राज्याच्या उत्तरेकडील भागात असलेल्या तोरणमाळमध्येही अलीकडच्या काळात गर्दी वाढते आहे. (नंदुरबार जिल्ह्याच्या माहितीमध्ये या स्थानाविषयी तपशीलवार माहिती दिलेली आहे.)
चिखलदरा -
सातपुडा पर्वतराजीतील अमरावती जिल्ह्यातील हे एक सुमारे १११८ मीटर उंचीवरचे थंड हवेचे ठिकाण आहे. महाभारतातील पांडव हे या विभागात वास्तव्याला होते. भीमाने कीचकाचा वध केला आणि येथील दरीत फेकून दिले. तेव्हा या भागाचे नाव किचकदरा आणि नंतर (अपभ्रंशाने) चिखलदरा असे झाले. महाराष्ट्रात चिखलदर्‍याच्या आसपास कॉफीचे उत्पादन घेतले जाते. येथून जवळच मेळघाट हा व्याघ्र प्रकल्प असलेले अभयारण्य व गाविलगडचा किल्ला आहे. साग, बांबू, मोह यासारखी भरपूर झाडे असलेले दाट जंगल आणि घाटांच्या नागमोडी वळणांचा रस्ता असलेले हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेलगतच आहे.

या ठिकाणी कोरकू, गोंड, माडिया इत्यादी जमातींचे लोक मोठ्या संख्येने राहतात. भीमकुंड, आदिवासी वस्तु संग्रहालय, शक्कर तलाव, शिवमंदिर या प्रेक्षणीय ठिकाणांचा, तसेच येथील आदिवासी संस्कृतीचा, त्यांच्या विशिष्ट उत्सवांचा आनंद पर्यटक घेऊ शकतात. हे विदर्भातील दुर्मीळ गिरीस्थान आहे, याला ‘विदर्भाचे नंदनवन’ म्हणतात.

आंबोली -
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक थंड हवेचे निसर्गरम्य ठिकाण म्हणून आंबोली प्रसिद्ध आहे. सावंतवाडी तालुक्यामधील हिरण्यकेशी नदीच्या उगमाचे आंबोली हे स्थान सह्याद्रीच्या रांगांमध्ये आहे. डोंगर-दर्‍या, जंगल, धबधबे, समुद्र दिसण्याचे उंच ठिकाण यांचा आनंद आपण येथे घेऊ शकतो.

सुमारे ७०० मीटर उंचीवरील आंबोली येथे महादेवगड पॉईंट, मलईचे जंगल, सनसेट पॉईंट, शिरगावकर - परीक्षित पॉईंट्स, कावळे प्रसादचा कडा, नारायण गड, महादेव गड, नांगरकासा धबधबा - अशी अनेक ठिकाणे प्रेक्षणीय आहेत. येथील अनेक ठिकाणांहून सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद आपण घेऊ शकतो.
भंडारदरा -
अहमदनगर जिल्ह्यात, अकोले तालुक्यात प्रवरा नदीच्या परिसरात हे निसर्गरम्य ठिकाण आहे.

प्रवरा नदीचा उगम, भंडारदरा धरण, ऑर्थर तलाव, रंधा धबधबा, अंबरेला धबधबा, अगस्ती ऋषींचा आश्रम, अनेक नैसर्गिक धबधबे - अशी अनेक ठिकाणे येथे पाहण्यासारखी आहेत. ‘कळसूबाई’ हे राज्यातील सर्वांत उंच शिखर याच डोंगररांगेत आहे. प्रवरेवरील भंडारदारा हे धरण भारतातील सर्वांत उंचावरील धरणांपैकी एक असून, देशातील सर्वांत जुन्या (१९१०) धरणांपैकीही एक आहे.

जव्हार -
हे ठाणे जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. भौगोलिकदृष्ट्या जव्हार कोकणात असूनही, उंचावरील स्थान असल्यामुळे येथील हवा दमट नसून थंड व आल्हाददायक आहे. येथील डोंगर-दर्‍या, नैसर्गिक धबधबे, जुना (पण सुस्थितीत असलेला) राजवाडा, सूर्यास्त अनुभवण्याचे स्थान (सनसेट पॉईंट) - अशी अनेक ठिकाणे पाहण्यास मिळतात. आदिवासी बहुल असलेल्या या भागात आपण आदिवासी संस्कृतीचा अनुभव घेऊ शकतो. आदिवासींचे ‘तारपा नृत्य’ व जगप्रसिद्ध अशी ‘वारली चित्रकला’ या कलांचे जतन प्रामु‘याने या तालुक्यात केले जाते. या कलांचाही आस्वाद आपण घेऊ शकतो. जव्हारला येथील हवामानामुळे यथार्थतेने ‘ठाणे जिल्ह्याचे महाबळेश्वर’ म्हटले जाते.

कोयनानगर -
सातारा जिल्ह्यात असलेल्या या ठिकाणी कोयना धरण आणि शिवाजीसागर जलाशय आहे. कृष्णा-कोयना या मोठ्या नद्या कर्‍हाडजवळ परस्परांना मिळतात. कोयना धरणामुळे वीजनिर्मितीचे काम गेली ४० वर्षे होत आहे. जलाशयाखालून चार कि. मी. चा बोगदा तयार करून त्यातून पाण्याचा प्रवाह नेऊन वीज निर्मिती केली जाते. विस्तीर्ण जलाशय, नेहरू स्मारक उद्यान, आसपास हिरवीगार दाट झाडी यामुळे हा परिसर अतिशय आकर्षक झाला आहे. कासपठार, ठोसेघर धबधबा अशी जवळची ठिकाणे सहलींसाठी प्रसिद्ध आहेत.

समुद्रकिनारे, बंदरे :

मुंबई - महाराष्ट्राची राजधानी मुंबई हे तर समुद्रकिनार्‍यावरच वसलेले शहर आहे. समुद्रमार्गे, हवाईमार्गे आणि रेल्वेमार्गाने संपूर्ण भारताशी जोडले गेलेले हे शहर महाराष्ट्रातील राजकीय, व्यापारी, शैक्षणिक, औद्योगिक दृष्टीने महत्त्वाचे असे केंद्र आहे. भारताचे प्रवेशद्वार म्हणतात ते गेट वे ऑफ इंडिया हे ठिकाण मुंबईत समुद्रकिनारी उभारलेले आहे. अनेक गगनचुंबी व शिल्पकलायुक्त इमारती, प्रमुख शासकीय कार्यालये, विधानभवन, मंत्रालय, नेहरु विज्ञान केंद्र (तारांगण), डॉ. आंबेडकरांचे स्मारक (चैत्यभूमी, दादर), स्वातंत्र्यवीर सावरकारांचे स्मारक, मत्स्यालय, मुंबई विद्यापीठ, छत्रपती शिवाजी रेल्वे स्थानक, मुंबई महापालिका भवन अशी महत्त्वाची ठिकाणे मुंबईत आहेत.

रायगड जिल्ह्यातील समुद्र किनारे -
रायगड जिल्ह्यात समुद्रामुळे अनेक प्रेक्षणीय किनारे आहेत. अलिबाग, आक्षी-नागाव, किहीम हे किनारे विशेष प्रसिद्ध आहेत. अलिबागचा किल्ला , उंदेरी-खांदेरी हे समुद्री किल्ले, पर्यटकांचे आकर्षण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळातही तत्कालीन आरमार कसे सज्जतेने, सतर्कपणे समुद्री सीमांचे रक्षण करत असे हे समुद्रातील किल्ले पाहिल्यावर लक्षात येते. अलिबाग जवळच कनकेश्र्वर नावाचे टेकडीवरील शिवमंदिर प्रसिद्ध आहे. (घारापुरी लेणी (एलिफंटा केव्हज्) या लेणी समुद्रमार्गे मुंबईहून जवळ आहेत, पण प्रशासकीय दृष्ट्या या रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात आहेत.)

रेवदंडा (जि. रायगड) -
इ. स. १४७२ च्या सुमाराला समुद्र मार्गाने भारताला भेट देणारा पहिला रशियन प्रवासी अफनासी निकितान हा होता. त्याने रेवदंडा बंदरात जहाज आणले होते. त्याचे स्मारक रेवदंडा येथे उभारले आहे. या सुमारे ५३५ वर्षांपूर्वीच्या ऐतिहासिक घटनेचे महत्त्व फार मोठे आहे. त्याने भारताच्या तत्कालीन राजकीय व सामाजिक परिस्थितीचे सविस्तर वर्णन केले आहे. या ठिकाणी समुद्रकिनारा, स्मारक व आगरकोट हा भुईकोट किल्ला - ही ठिकाणे प्रेक्षणीय आहेत.

रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन, हरिहरेश्र्वर, मुरूड-जंजिरा आदी समुद्रकिनार्‍यांची माहिती अन्य विभागंत दिलेली आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर, वेळणेश्र्वर, मालगुंड, गणपतीमुळे, कशेळी, खुद्द रत्नागिरी, हर्णे, हेदवी अशी अनेक समुद्र किनार्‍याची ठिकाणे पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत.

तसेच सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड, मालवण, तारकर्ली, सिंधुदुर्ग-विजयदुर्ग किल्ले, वेंगुर्ले आदी किनारे प्रसिद्ध आहेत.



महाराष्ट्रातील अभयारण्ये - संरक्षित वने :

ताडोबा राष्ट्रीय उद्यान, चंद्रपूर - (ताडोबा - अंधारी प्रकल्प)
ताडोबा येथील दाट जंगल १९५५ मध्ये संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित केले गेले आहे. चंद्रपूर जिल्ह्याच्या पश्र्चिम भागात ते आहे. नागपूरपासून १५४ कि. मी. अंतरावर असलेल्या ताडोबाच्या जंगलात अगदी मध्यभागी ताडोरा नावाचा तलाव आहे. साग, मोह, निलगिरी अशी झाडे या सुमारे ११६ चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या जंगलात आहेत. तर वाघ, लांडगे, कोल्हे, रानकुत्रे, रान मांजरे, अस्वल, चारसिंगा, रान डुक्कर, चिंकारा, चितळ, सांबर हे प्राणी आणि अनेक सरपटणारे प्राणीही या जंगलात आढळतात. येथे सुमारे २५० प्रकारचे पक्षीही आढळतात. येथील ‘मगर पालन’ केंद्र हे आशिया खंडातील उल्लेखनीय केंद्र आहे. सुंदर झोपडीतील वन्यप्राणी संग्रहालय, तेथील प्राण्यांचे सांगाडे, पक्षांची घरटी हे सुद्धा पर्यटकांचे आकर्षण केंद्र आहे.

ताडोबा राष्ट्रीय उद्यान व जोडूनच असलेले अंधारी वन्यजीव अभयारण्य या दोन्ही प्रकल्पांना एकत्रितपणे ताडोबा-अंधारी व्याघ‘ प्रकल्प असे म्हटले जाते. स्थानिक आदिवासी देव तारू किंवा तारोबा यावरून ताडोबा हे नाव रूढ झाले, अन्‌ जंगलातून अंधारी नदी वाहते त्यावरून अभयारण्यास नाव देण्यात आले. या राष्ट्रीय उद्यानास ‘विदर्भाचे रत्न’ असे म्हटले जाते.

पेंच प्रकल्प, नागपूर -
नागपूरपासून उत्तरेला सुमारे ८० कि. मी. अंतरावर पेंच भाग येतो. महाराष्ट्र व मध्य प्रदेशाच्या सीमेलगतचा हा भाग आहे. पेंच अभयारण्याचा मोठा भाग मध्य प्रदेशात मोडतो. महाराष्ट्र शासनाने १९७५ मध्ये या भागास राष्ट्रीय उद्यानाचा दर्जा दिला, तसेच १९९९ मध्ये या प्रकल्पास ‘व्याघ्र प्रकल्पाचा’ दर्जा देण्यात आला. कालिदासाच्या मेघदूत व शाकुंतल या काव्यांत या निसर्गसुंदर भागाचे वर्णन आढळते. या जंगलात ३३ सस्तन प्राणी प्रजाती, ३० प्रकारचे सरपटणारे प्राणी, १६४ प्रजातींचे पक्षी, ५० जातींचे मासे व १० प्रकारचे उभयचर प्राणी वास्तव्यास आहेत.

पेंच नावाच्या नदीमुळे या भागाला पेंच नाव पडले असावे. वाघ, बिबळ्या, अस्वल, सांबर, चितळ, चारसिंगा, निलगाय, माकड, इ. प्राणी या अभयारण्यात आढळतात. भरपूर सागाची झाडे असलेले हे जंगल असून पेंच अभयारण्य सुमारे २५० चौ. कि. मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. ऑक्टोबर ते जून या कालावधीतच अभयारण्यात खुला प्रवेश असतो. जुलै ते सप्टेंबर या अति पावसाच्या काळात येथे प्रवेश दिला जात नाही.

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली, मुंबई. -
मुंबई उपनगर जिल्ह्यात बोरिवली येथील परिसरात - मुंबई व ठाणे शहरांसाठी जणू फुफुसांचे काम करणारे - हे राष्ट्रीय उद्यान / अभयारण्य आहे. या भागाला कृष्णगिरी उद्यान असेही म्हटले जाते. १९७४ मध्ये हे ‘अभयारण्य’ घोषित करण्यात आले.

येथील दाट जंगलात कान्हेरी गुंफामध्ये बौद्ध लेणी कोरलेली आढळतात. जंगलची सफर घडवणारी रेल्वे येथे असून त्यातून आपण वनजीवनाचा आनंद घेऊ शकतो. सुमारे १०४ चौ. कि.मी. क्षेत्रफळ असलेल्या या अभयारण्यात चितळ, भेकर, सांबर हे प्राणी आढळतात, तसेच सुमारे २५० जातींचे पक्षीही येथे आढळतात. मुंबईपासून जवळ असल्यामुळे या अभयारण्यात पर्यटकांची कायम गर्दी असते.

नवेगाव राष्ट्रीय उद्यान, गोंदिया -
२२ नोव्हेंबर, १९७५ या दिवशी अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले हे घनदाट जंगल महाराष्ट्रातील गोंदिया जिल्ह्याच्या दक्षिणेला आहे. नवेगाव तलावाभोवती लहान टेकड्यानी हे राष्ट्रीय उद्यान वेढलेले आहे. वाघ, बिबळ्या, सांबर, हरीण, चितळ, नीलगाय, अस्वल असे प्राणी येथील जंगलात दिसतात. तर पक्षीही भरपूर दिसतात. तलावामुळे पाण्याजवळ असणारे निरनिराळे पक्षी नेहमी येतात.

येथील पक्षी अभयारण्यास डॉ. सलीम अली पक्षी अभरायण्य असे म्हटले जाते. राज्यातील एकूण पक्षांच्या प्रजातींपैकी सुमारे ६०% प्रजाती आपणास येथे पाहण्यास मिळू शकतात. हे राष्ट्रीय उद्यान गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यात असून सुमारे १४० चौ. कि. मी. परिसरात पसरलेले आहे. खुद्द नवेगाव बांध हा जिल्ह्यातील सर्वांत मोठा तलाव असून त्याचे क्षेत्र सुमारे ११ चौ. कि. मी. आहे. या तलावाच्या मध्यभागी प्रेक्षणीय असे ‘मालडोंगरी’ बेट आहे.

नागझिरा अभयारण्य, गोंदिया -
१९७०-७१ मध्ये घोषित केलेले हे अभयारण्य गोंदिया जिल्ह्यात गोरेगाव तालुक्याच्या परिसरात आहे. मोठे वृक्ष, वेली, वनौषधी या जंगलात सापडतात. वाघ, लांडगा, रानमांजर, उदमांजर, चिंकारा, रानडुक्कर, सांबर, बिबळ्या, चिंकारा, रानकुत्रे (जंगली कुत्री) तरस असे एकूण ३५ प्रजातींचे प्राणी या जंगलात आहेत. तसेच येथे सरपटणारे प्राणी (३४ प्रजाती) आणि विविध पक्षीही (१६६ प्रजाती) आढळतात. साग, साल, आवळा, बाभूळ, तेंदू, सालई. खैर, आंबा, बांबू, बेहडा, धावडा, मोह, हिवर, उंबर, कुसुंब असे महाराष्ट्रातील महत्त्वाचे सर्व वृक्ष या जंगलात बघायला मिळतात. पर्यावरणविषयक जागृती करणारे वस्तुसंग्रहालय देखील येथे पाहण्यास मिळते. तसेच वन्यजीवांचे अवशेष व संबंधित माहितीपटही आपण येथे पाहू शकतो. विदर्भातील हे एक लक्षणीय पर्यटन स्थळ असून याच जिल्ह्यातील नवेगाव राष्ट्रीय उद्यान येथून जवळच आहे.

मेळघाट व्याघ्र प्रकल्प, अमरावती -
१९६७ साली संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित झालेले मेळघाटचे जंगल १९७४ सालापासून व्याघ‘ प्रकल्पातील जंगल असे घोषित केले गेले आहे. गुगामल राष्ट्रीय उद्यान हे या प्रकल्पाचा एक भाग आहे. अमरावती जिल्ह्यात येणार्‍या या भागाला सातपुडा पर्वतरांगा, गाविलगड टेकड्या यांनी वेढले आहे. साग, बांबू, महुआ, ऑर्किडस्, हत्ती लपू शकतील एवढे उंच वाढलेले गवत, अशी वनसंपत्ती येथे आढळते. वाघ, गौर(गवा), नीलगाय, चितळ, संबर, डुक्कर, माकड, शेकरू यांसाठी हे जंगल प्रसिद्ध आहे. पट्टेरी वाघांसाठी हे विशेष प्रसिद्ध असून, सुमारे ६० वाघ येथे असण्याची शक्यता आहे. सातपुड्याची डोंगररांग व तापी आणि तिच्या उपनद्यांचे खोरे या परिसरात सुमारे १६७७ चौ. कि. मी. क्षेत्रावर हा प्रकल्प पसरलेला आहे. येथे ७०० प्रजातींची झाडे, २५० प्रजातींचे पक्षी, १६० प्रकारचे सरपटणारे प्राणी, २४ प्रकारचे मासे व ४१ प्रजातींचे सस्तन प्राणी आढळतात.

यावल अभयारण्य, जळगाव. -
मार्च, १९६९ मध्ये हे संरक्षित जंगल म्हणून घोषित झाले आहे. जळगाव जिल्ह्यातील यावल रावेरजवळचे हे जंगल मध्य प्रदेशच्या सीमेजवळ आहे. दाट वाढलेले बांबू, तसेच ऐन, बेल, बाभूळ, आवळा, जांभूळ, साग, तिवस, खैर, चारोळी, जांभूळ, तेंदू, धावडा, शिसम, पळस अशी वनसंपदा या जंगलात आहे.

वाघ, लांडगा, कोल्हा, रानडुक्कर, शेकरू, सांबर, नीलगाय, रानमांजर, हरीण व मोर हे प्राणी-पक्षी येथे आढळतात. सातपुड्याची उत्तरेकडील रांग व अनेर नदीचे खोरे - यांच्या परिसरात हे जंगल पसरलेले आहे. सुखी किंवा सुकी नावाची नदीही या अभयारण्यातून वाहते. या परिसरात तडवी व पावरा जमातीचे अदिवासी राहतात. यावल तालुक्यातील या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे १७७ चौ. कि. मी. आहे. येथून जवळच पाल हे सातपुड्याच्या रांगेतील थंड हवेचे ठिकाण आहे.

तानसा अभयारण्य, ठाणे -
फेब्रुवारी, १९७० मध्ये ठाणे जिल्ह्यातील हे जंगल संरक्षित वन म्हणून घोषित केले गेले. शहापूर, खर्डी, वैतरणा, वाडा या वनक्षेत्रातील तानसा तलावाजवळचा भाग म्हणजे हे जंगल होय. मोखाडा, जव्हार, वाडा, शहापूर तालुक्यांनी वेढलेले हे जंगल सुमारे ३२० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेले आहे. या जंगलात साग, खैर, हेड, कदंब, बाबूं, बिब्बा हे वृक्ष भरपूर आढळतात. या क्षेत्रात ५० प्रजातींचे प्राणी आणि २०० जातींचे पक्षी आहेत.

हरीण, तरस, रानडुक्कर, चित्ता, लांडगा, कोल्हा, चितळ, सांबर, ससे, माकडे, चारसिंगा असे प्राणी या अभयारण्यात पाहायला मिळतात. बगळे, खंड्या, गरूड, घार, कोकीळ, बुलबुल आदी पक्षी आढळतात.

मुंबईपासून ९५ कि. मी. अंतरावर असलेल्या या भागात माहूली, सूर्यमाळ हे पठार प्रसिद्ध आहे. जून ते मार्च हा काळ अभयारण्य पाहायला मुद्दाम जाण्यासारखा आहे.

राधानगरी अभयारण्य, कोल्हापूर -
डिसेंबर, १९५८ मध्ये जंगली जनावरांची हत्या थांबावी या दृष्टीने हे राधानगरीचे जंगल अभयारण्य म्हणून घोषित केले. कोल्हापूर जिल्ह्यात असलेले महाराष्ट्र राज्यातील अगदी सुरुवातीच्या काळात घोषित झालेले हे अभयारण्य आहे. राजर्षी शाहू सागर, लक्ष्मी सागर हे मोठे जलाशय, पश्चिम घाटातील सह्याद्रीची रांग यांच्या सान्निध्यात असलेले हे अभयारण्य अनेक नद्यांनी वेढलेले आहे. भोगावती, दूधगंगा, तुळशी, कळमा, दिर्बा या नद्या अभयारण्यातूनच वाहतात. नंतर कृष्णेला हे सर्व प्रवाह मिळतात.

अंजन, जांभूळ, हिरडा, आवळा, पिसा, ऐन, किंजळ, आंबा, कुंभ, कटक, उंबर, गेळा, बिब्बा असे वृक्ष या जंगलात आहेत. बिबळ्या, अस्वल, रानडुक्कर, चितळ, सांबर, मोठी खार, जंगली कुत्रे, हरीण असे प्राणी बघायला या जंगलात जंगलप्रेमी गर्दी करतात. हे अभयारण्य खास गव्यांसाठी संरक्षित व प्रसिद्ध आहे.

कारवी, शिकेकाई, गारंबी, धायटी, मुरुडशेंग, करवंद, बेगाटी, रानमिरी, नरक्या अशा काही वेली, झुडूपांसह औषधी वनस्पतींची या जंगलात भरपूर गर्दी आहे. भोगावती नदीवरील राधानगरी धरणाच्या परिसरातील या जंगलास दाजीपूर अभयारण्य असे म्हटले जाते. कोल्हापूरपासून सुमारे ५५ कि.मी. अंतरावर असलेल्या अभयारण्याचे क्षेत्रफळ सुमारे ३५१ चौ. कि.मी. आहे.

भीमाशंकर अभयारण्य, पुणे.
पुणे, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यात पसरलेले हे अभयारण्य १९८५ साली संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित झाले आहे. १३० चौ. कि.मी. क्षेत्रावर पसरलेल्या या अभयारण्याचे प्रमुख क्षेत्र पुणे जिल्ह्यातील खेड व आंबेगाव या तालुक्यांत येते. समुद्रसपाटीपासून हे स्थान सुमारे २५०० फूट उंचीवर आहे.

१२ ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या महादेवाच्या पवित्र ठिकाणाजवळ हे जंगल आहे. भीमा व घोडनदी या नद्यांचा उगम येथूनच होतो. सह्याद्रीच्या पर्वत रांगांमधे असलेल्या दाट झाडीत अनेक वन्य जीवांसोबत कीटक, पक्षीही आढळतात. आदिवासी लोकही या ठिकाणी वास्तव्याला आहेत. प्रामुख्याने महादेव कोळी हे आदिवासी भीमाशंकरजवळ राहतात.

महाराष्ट्रात दुर्मीळ असलेली व महाराष्ट्राचा राज्य प्राणी असलेली उडणारी खार ‘शेकरू’ येथे आढळते. असंख्य जातीची फुलपाखरे, कीटक, तसेच अनेक पक्षीही बघायला येणारे निसर्गप्रेमी भीमाशंकरला येतात. नागफणी कडा, बॉंबे पॉईंट, हनुमान टँक व गुप्त भीमाशंकर आदी ठिकाणांचा आनंद या जंगलात येणारे पर्यटक घेतात.

आंबा, जांभूळ, बांबू, पळस, बाभूळ, अंजन, बेहेडा, बेल, हिवर, साग, सालई असे वृक्ष जंगलात आहेत. वनौषधी, गवत, नेचाही भरपूर प्रमाणात आहे. या अभयारण्यात हरीण, रानडुक्कर, बिबळ्या, माकड, तरस, सांबर हे वन्यजीव तसेच हॉर्नबील, गरुड इत्यादी प्राणी-पक्षी आढळतात.

उपरोक्त अभयारण्यांसह कर्नाळा पक्षी अभयारण्य (रायगड जिल्हा); रेहेकुरी काळवीट अभयारण्य (अहमदनगर जिल्हा); माळढोक अभयारण्य (अहमदनगर व सोलापूर जिल्हा); नांदूर - मधमेश्र्वर अभयारण्य (नाशिक जिल्हा); किनवट अभयारण्य (नांदेड व यवतमाळ जिल्हा); सागरेश्र्वर अभयारण्य (सांगली जिल्हा); बोर अभयारण्य (वर्धा जिल्हा); गवताळा अभयारण्य (औरंगाबाद जिल्हा) व चांदोली अभयारण्य (सातारा, सांगली, कोल्हापूर व रत्नागिरी जिल्हा) - आदी अभयारण्ये महाराष्ट्रात आहेत. दरवर्षी लाखो पर्यटक या वनसंपत्तीचा तेथील पशू-पक्षांचा, प्रदूषणमुक्त हवेचा आनंद मनमुराद लुटत असतात.

ही अभयारण्ये आहेत, त्या प्रत्येक ठिकाणी महाराष्ट्र सरकारच्या वनखात्याची, पर्यटन खात्याची विश्रामगृहांची सोय आहे. काही ठिकाणी पर्यटन आणि वनखात्यानी तयार केलेली संग्रहालयेही आहेत. प्रत्येक ठिकाणी मार्गदर्शक, माहिती पुस्तिकाही उपलब्ध करून दिली जाते.

वनखात्याने वन्यजीवांना सुरक्षितता मिळावी, त्यांची संख्या वाढावी, तसेच त्यांचा मानवाला व मानवाचा त्यांना उपद्रवही होऊ नये म्हणून त्यांना सुरक्षित क्षेत्र आखून दिले आहे. संबंधित नियम पाळून सरकारला साहाय्य केले जावे म्हणून जंगलात जाणार्‍यांसाठी नियमावलीही तयार केली आहे. पर्यटकांना, जंगल प्रेमींना, अभ्यासकांना उपयुक्त अशी माहिती सर्वत्र उपलब्ध आहे. त्यामुळे अभयारण्यांची घोषणा ही फारच उपयुक्त असल्याचे लक्षात येते. वृक्षतोडीला आळा घालण्यामुळे नैसर्गिक साधन संपत्तीचीही जपणूक होत आहे. पर्यावरणाचा समतोल राखला जावा असाही उद्देश साध्य होत आहे. जागरूक नागरिक म्हणून आपलेही सहकार्य व योगदान अपेक्षित आहेच!
महाराष्ट्रातील किल्ले -
प्रस्तावना :
‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’
या शब्दांत सह्याद्रीच्या डोंगर-दर्‍यात वसलेल्या महाराष्ट्राचे यथार्थ वर्णन गोविंदाग्रजांनी केलेले आहे. आहे.

महाराष्ट्राला सह्याद्रीच्या रांगांमध्ये घनदाट जंगलांची निसर्गसंपत्ती लाभलेली आहे. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा इतिहास ह्या दर्‍या-खोर्‍यांशी, डोंगरांशी जोडलेला आहे. या डोंगर रांगांतील किल्ले हा इतिहास आपणासमोर आजही बोलका करतात. या किल्ल्यांवरच इतिहास जन्माला आला आणि यांच्या साहाय्याने स्वराज्य स्थापन झाले. हे किल्ले इतिहासाची साक्ष तर देताताच तसेच गिर्यारोहण व पर्यटन यादृष्टीनेही हे किल्ले महत्त्वपूर्ण आहेत.

महाराष्ट्रातील काही प्रमुख किल्ल्यांविषयीची माहिती पुढीलप्रमाणे -

महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांची सूची
जिल्हा किल्ल्याचे नाव
रायगड रायगड, कर्नाळा, लिंगाणा, द्रोणागिरी, सुधागड, अवचितगड, सरसगड, तळे, घोसाळे इत्यादी. तसेच सागरी किल्ल्यांमध्ये खांदेरी-उंदेरी, कासा व मुरुड-जंजिरा
पुणे सिंहगड, पुरंदर, शिवनेरी, राजगड, तोरणा, लोहगड इत्यादी
सातारा प्रतापगड, सज्जनगड, कमळगड, मकरंदगड, वसंतगड, केंजळगड, अजिंक्यतारा इत्यादी.
कोल्हापूर पन्हाळा, विशाळगड, गगनगड, भूदरगड इत्यादी.
ठाणे वसईचा भुईकोट किल्ला, अर्नाळा (सागरी), गोरखगड इत्यादी.
सिंधुदुर्ग सिंधुदुर्ग व विजयदुर्ग (सागरी), देवगड इत्यादी.
रत्नागिरी सुवर्णदुर्ग (सागरी), रत्नगड, जयगड, प्रचितगड इत्यादी.
अहमदनगर हरिश्चंद्रगड, रतनगड व अहमदनगरचा भुईकोट किल्ला.
औरंगाबाद देवगिरी (दौलताबाद) किल्ला.
नाशिक ब्रह्मगिरी, साल्हेर - मुल्हेर इत्यादी.
वरीलपैकी काही वैशिष्ट्यपूर्ण किल्ल्यांची तपशीलवार माहिती पुढे देत आहोत.
रायगड -
‘रायगड’ हा शिवकालातील महत्त्वपूर्ण किल्ला होय. छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६६४ मध्ये हा गड बांधून घेतला. शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची राजधानी म्हणजे रायगड! छत्रपती शिवाजी महाराज यांचा शके १५९७, आनंदनाम संवत्सर, जेष्ठ शु. त्रयोदशी, शनिवार (६ जून, १६७४) रोजी जो राज्याभिषेक झाला, तो याच रायगडावर. छत्रपती शिवाजी महाराजांचे देहावसन रायगडावरच झाले. म्हणून या गडाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. रायगड (कुलाबा) जिल्ह्यातील महाड तालुक्यात असणार्‍या या गडाच्या सभोवताली दाट जंगले आहेत. त्यामुळे लांबून गडाचे दर्शन अतिशय विलोभनीय दिसते.

छत्रपती शिवाजी राजांची समाधी रायगडावर असून गडावर अनेक इतर ऐतिहासिक वास्तू आहेत. त्यात विशेष करून महाराजांची सदर, दरबाराची जागा, हिरकणी बुरूज, भवानी टोक, छत्रपतींच्या वाड्याचा चौथरा, बाजारपेठेचे अवशेष इ. महत्त्वाच्या वास्तू आहेत. गडाला सुमारे १४०० पायर्‍या आहेत. ज्या शिवभक्तांना गडावर चालत जाणे शक्य नाही, अशांसाठी आता ‘रायगडावर’ रोपवेची सोय करण्यात आली आहे. गडावर राहण्याची व भोजनाची उत्तम प्रकारे सोय आहे. गडाच्या पायथ्याशी पाचडला मातोश्री जिजाबाईंची समाधी आहे. महाडपासून २७ कि. मी. अंतरावर असणार्‍या रायगडावर जाण्यासाठी महाडपासून गाड्यांची सोय आहे. श्रेष्ठ समाजसुधारक महात्मा जोतिबा फुले यांनी शिवरायांच्या समाधीचा जिर्णोद्धार केला, तसेच लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक शिवजयंती उत्सवाची येथूनच सुरुवात केली.

राजगड -
गडांचा राजा म्हणजे ‘राजगड’ होय. छत्रपती शिवाजी महाराजांचा आवडता किल्ला म्हणजे ‘राजगड’. स्वत: महाराजांनी या गडाची उभारणी केली असून इ. स. १६४५ ते १६७२ जवळजवळ २७ वर्षांचा कालखंड महाराजांनी गडावर घालविला होता. महाराजांची काही काळासाठी ‘राजगड’ ही राजधानी होती.

अतिशय दुर्गम किल्ला म्हणून आजही जागतिक स्तरावर ‘राजगडचा’ गौरव केला जातो. गडावर, संजीवनी माची, बालेकिल्ला, पद्मावती देऊळ, राजवाडा, मारुती मंदिर आदी महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. गडावरून निसर्गाच्या अकराळ-विकराळ पण तरीही सुंदर अशा स्वरूपाचे दर्शन होते. अतिशय देखणा पण चढण्यास अवघड असा हा किल्ला आहे. छत्रपती शिवाजीराजांनी मिर्झाराजे जयसिंगाशी जो तह केला होता, त्यामध्ये राजांनी २३ किल्ले मुघलांच्या स्वाधीन केले होते. त्या वेळी स्वराज्यात राहिलेल्या १२ किल्ल्यापैकी एक म्हणजे ‘राजगड’ हा प्रसिद्ध किल्ला होय. पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. पुणे जिल्ह्यातील वेल्हा तालुक्यात हा डोंगरी किल्ला असून, पुणे, भोर येथून गडावर जाण्यासाठी गाड्या उपलब्ध आहेत.

शिवनेरी -
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मामुळे ‘शिवनेरी’ किल्ल्यास महाराष्ट्राच्या इतिहासात एक वेगळेच अन् अढळ स्थान आहे. शिवनेरी किल्ला सुमारे १०७० मीटर उंच असून दक्षिण - उत्तर दीड किलोमीटर पसरलेला आहे. किल्ल्याचा दक्षिणेकडील भाग अर्धगोलाकृती आहे, तर उत्तरेकडे तो निमुळता होत गेला आहे.

शिवनेरी किल्ल्यावर शिवरायांचा जन्म झाला ती वास्तू, शिवाई मंदिर, हत्ती दरवाजा, शिवबाई दरवाजा, बदामी तलाव इत्यादी ऐतिहासिक ठिकाणे आहेत. गडावरील शिवाई देवीच्या नावावरूनच जिजाऊंनी छत्रपतींचे नाव ‘शिवाजी’ ठेवले, असे म्हटले जाते. याचबरोबर गंगा-जमुना नावाच्या गार पाण्याच्या दोन मोठ्या ‘टाक्या’ आहेत. किल्ल्याच्या आसपास बौद्ध लेणी असलेल्या तीन डोंगराच्या रांगा आहेत.

अलीकडेच महाराष्ट्र शासनाने किल्ल्यावर एक भव्य मंडप बांधला असून त्यास ‘शिवकुंज’ असे नाव दिले आहे. त्यामध्ये सिंहारूढ असलेल्या ‘मातोश्री जिजाबाई’ व तलवार घेऊन बसलेले बाल शिवाजी यांची पंचधातूची सुंदर मूर्ती स्थापित केली आहे. शिवनेरी हा किल्ला पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात असून पुण्याहून ९४ कि. मी. एवढ्या अंतरावर आहे. गडावर भोजन व निवासाची व्यवस्था आहे.

सिंहगड -
नरवीर तानाजी मालुसरे यांच्या पराक्रमाने पावन झालेला हा सिंहगड किल्ला पुण्यापासून फक्त २४ कि. मी. अंतरावर आहे. सिंहगडाचे पूर्वीचे नाव ‘कोंढाणा’ होते. इ. स. १६७० मध्ये नरवीर तानाजी मालुसरे यांनी स्वत:चे बलिदान देऊन हा किल्ला स्वराज्यात दाखल केला. त्या वेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी तानाजीबद्दल ‘गड आला पण सिंह गेला’ असे उद्गार काढले. तेव्हापासून कोंढाण्याचे नाव सिंहगड झाले.

समुद्रसपाटीपासून सुमारे ८०० मी. उंचीवर हा किल्ला आहे. गडावर नरवीर तानाजींची समाधी, कल्याण दरवाजा, राजारामांची समाधी, अमृतेश्वर मंदिर इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. त्याचबरोबर लोकमान्य टिळकांचा बंगलाही गडावर आहे. पेशवाईच्या काळात कैद्यांना ठेवण्यासाठी या गडाचा उपयोग केला जात असे. लोकमान्य टिळक चिंतन-मनन, अभ्यास व लेखनासाठी, तसेच विश्रांतीसाठी सिंहगडावर वारंवार येत असत. शिवकाळ - पेशवाई - स्वातंत्र्य लढा या तिन्ही काळात हा महत्त्वाचा होता. गडावरून खडकवासला धरण, राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे (नॅशनल डिफेन्स अॅकॅडमीचे) दृश्य पाहावयास मिळते. पुणे शहराच्या अगदी जवळ असा हा किल्ला असल्यामुळे येथे पर्यटक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात.

प्रतापगड -
शाहीर तुळशीदास यांनी म्हटल्याप्रमाणे ‘राजगड राजाचा, प्रतापगड जिजाईचा!’ राजमाता जिजाबाईंचा सर्वांत आवडता किल्ला म्हणजे प्रतापगड. प्रतापगडाचे बांधकाम इ.स. १६५६ ते १६५८ या २ वर्षाच्या कालावधीत पूर्ण झाले. मोरोपंत पिंगळे यांच्या देखरेखीखाली हा गड बांधला गेला. सह्याद्री पर्वत रांगेत व जावळीच्या खोर्‍यात घाटमाथ्यावरती हा गड आहे. आजुबाजुला घनदाट जंगल आहे.

स्वराज्यावर चालून आलेल्या अफजलखानाचा वध महाराजांनी याच ठिकाणी केला. या वेळी झालेल्या घनघोर लढाईत, खानाच्या प्रचंड सेनेचा सामना करताना महाराजांनी गनिमी कावा तंत्राचा अतिशय हुशारीने वापर केला. प्रतापगडावर अनेक शिवकालीन मंदिरे आहेत. भवानी मातेचे मंदिर, छत्रपतींचा पुतळा ही स्थाने या ठिकाणी आहेत. जवळच महाबळेश्र्वर, पाचगणी ही थंड हवेची ठिकाणे आहेत. प्रतापगड हा सातारा जिल्ह्यात असून पुण्यापासून १३७ कि. मी. अंतरावर आहे. पुण्याहून बसेसची सोय आहे. गडाच्या पायथ्याशी जेवणाची व राहण्याची उत्तम व्यवस्था आहे.

पुरंदर -
पुरंदर पाहिला की, काही गोष्टी डोळ्यासमोर येतात. धर्मवीर संभाजी महाराजांचा जन्म, सवाई माधवराव यांचा जन्म, दिलेरखानानी किल्ल्याभोवती दिलेला वेढा, मुरारबाजींची शर्थीची लढाई इ. प्रसंग आठवतात. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मी. इतकी आहे. १६६५ साली दिलेरखानानी किल्ल्याला वेढा दिला होता. त्या वेळी केवळ ७०० मावळे हाताशी घेऊन मुरारबाजींनी प्रयत्नांची पराकाष्ठा करून स्वराज्यासाठी बलिदान दिले. पुरंदर ही अगदी सुरुवातीच्या काळात पेशव्यांची राजधानी होती.

पुरंदर गडावर केदारेश्वर, रामेश्वर, पेशव्यांचा वाडा, खांदकडा इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. तसेच गडावरील शेंड्या बुरूज, हत्ती बुरूज, मुरवी तलाव, राजाळे तलाव, मुरारबाजीचा पुतळा ही स्थानेही इतिहास जिवंत करतात. पुरंदर गडावरून आजुबाजुला नजर टाकली की, वज्रगड, सिंहगड, राजगड, विचित्रगड या किल्ल्यांचे मनोहारी दृश्य पाहावयास मिळते.

सध्या पुरंदर हा किल्ला राष्ट्रीय छात्रसेना प्रबोधिनीच्या ताब्यात असून तेथे प्रशिक्षण कार्यक्रम होतात. नीरा व कर्‍हा या नद्यांच्या मध्ये वसलेल्या पुरंदर किल्ल्याला जाण्यासाठी पुण्याहून एस.टी. ची सोय आहे. पुण्यापासून ३८ कि. मी. अंतरावर सासवड (पुरंदर) तालुक्यात हा किल्ला आहे. किल्ल्याच्या पायथ्याशी केतकावळे या गावी `प्रतिबालाजी' हे सुंदर मंदिर आहे.

सिंधुदुर्ग -
मुरुड-जंजिर्‍याच्या विजयाचे प्रयत्न निष्फळ ठरल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी मालवणच्या शेजारी भव्य व अजिंक्य जलदुर्ग बांधला तोच सिंधुदुर्ग होय. १६६४ ते १६६७ च्या दरम्यान हा किल्ला बांधण्यात आला. ४८ एकराचा किल्ल्याचा परिसर असून, किल्ल्याला ४२ बुरुज आहेत. मोठे दगड व सुमारे ७२,५७६ कि. गॅ‍. लोखंड वापरून याच्या भिंती बांधल्या आहेत. मराठ्यांचा हा महत्त्वपूर्ण किल्ला होय. किल्ल्याच्या बांधकामासाठी गोव्याहून अनेक पोर्तुगीज तज्ज्ञांना बोलावण्यात आले होते. सुमारे ३०० कामगार यासाठी सतत ३ वर्षे अहोरात्र झटत होते. किल्ला बांधण्यासाठी प्रचंड खर्च करण्यात आला होता.

किल्ल्याच्या चारही बाजूंनी समुद्र असल्यामुळे किल्ला अगदी उठून दिसतो. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा, शिवाजी महाराजांच्या हाताचे व पायाचे ठसे, आणि छत्रपतींचे मंदिर ही या किल्ल्याची वैशिष्ट्ये आहेत. किल्ल्यात महाराजांचा वाडा, ध्वजस्तंभ, मारुती व भवानी मंदिर इ. महत्त्वाची ऐतिहासिक ठिकाणे आहेत. किल्ल्यात जाण्यासाठी मालवणहून बोटीच्या साहाय्याने जाता येते.

पन्हाळा -
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा हा शिवाजी महाराजांच्या अनेक किल्ल्यांपैकी महत्त्वपूर्ण किल्ला. महाराजांनी इ. स. १६५९ रोजी हा किल्ला जिंकला. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून महाराज मोजक्या सहकार्‍यांबरोबर बाहेर पडून पन्हाळ्याहून विशाळगडावर पोहोचले. या ऐतिहासिक घटनेचा साक्षीदार - पन्हाळा!

पन्हाळ्याची उंची साधारणत: ८५० मी. आहे व घेर ८-९ कि. मी. आहे. वाघ दरवाजा, तीन दरवाजा, चार दरवाजा असे दरवाजे गडावर आहेत. गडावर मोठमोठी धान्याची कोठारे आहेत. त्यात गंगा व सज्जा कोठी ही महत्त्वाची धान्याची कोठारे आहेत. कविवर्य मोरोपंताचे जन्मस्थान, रामचंद्रपंत अमात्यांची समाधी, बाजीप्रभू देशपांडे यांचा भव्य पुतळा तसेच शिवा काशीद यांचाही पुतळा इत्यादी महत्त्वाची ठिकाणे गडावर आहेत. पन्हाळ्याच्या पायथ्याशी नेवापूर येथे शिवा काशीद यांची समाधी आहे. छत्रपतींना सिद्धीच्या वेढ्यातून सोडवताना शिवा काशीद यांनी दिलेले बलिदान तसेच महाराज विशाळगडावर पोहोचेपर्यंत बाजीप्रभूंनी केलेली पराक्रमाची शर्थ हा इतिहास महाराष्ट्राला ज्ञात आहेच. महाराणी ताराबाई यांनी काही काळ कोल्हापूर गादीची राजधानी म्हणून पन्हाळा येथून कारभार पाहिला.

कोल्हापूर शहरापासून २० कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. जवळच जोतिबाचे मंदिर (जोतिबाचा डोंगर) आहे. निसर्गसंपन्नतेने नटलेल्या या किल्ल्यावर अगदी शेवटच्या टोकापर्यंत गाडी जाते. किल्ल्यावर राहण्याची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. अनेक हॉटेल्स, लॉजेस गडावर आहेत. गडावर जणू एक गावच वसलेले आहे. विशेष बाब म्हणून शासनाने येथे गिरीस्थान नगरपरिषद स्थापन केलेली आहे.

तोरणा -
छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला सर्वप्रथम जिंकून आपल्या स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली.

या गडाची समुद्रसपाटीपासूनची उंची सुमारे १४०४ मी. आहे. गडावर जाण्याकरिता अतिशय अरुंद, अवघड अशी वाट आहे, आजही सरळ-सोपी, पायर्‍या-पायर्‍यांची वाट नाही. काही लोखंडी गज मार्गावर रोवलेले आहेत. त्या गजांचा आधार घेत गड चढावा लागतो. ह्या गडाची चढण गिर्यारोहणाचा आनंद देते. गडाच्या आजुबाजुला असलेल्या गर्द झाडीमुळे गड अतिशय सुंदर दिसतो. एका इंग्रज अभ्यासकाने, ‘‘सिंहगड ही सिंहाची गुहा अन् तोरणा हे गरूड पक्षाचे घरटे आहे’’, असे उद्गार या गडाबद्दल काढले आहेत. या किल्ल्यावर बांधकाम करत असताना छत्रपतींना प्रचंड धन सापडले, ज्याचा उपयोग पुढे स्वराज्यासाठी झाला.

तोरण गडावर श्री तोरणाजाई मंदिर, बिनी दरवाजा, गंगाजाई मंदिर, झुंजारमाची टकमक बुरुज, बालेकिल्ला, कोकण दरवाजा, हनुमान बुरुज, वेताळ इ. महत्त्वाच्या ऐतिहासिक वास्तू आहेत. बालेकिल्ल्यावरून पूर्वेस पाहिले की, सिंहगड, पुरंदर, खडकवासला धरण, रायरेश्वर इ. भाग दिसतो, तर पश्चिमेकडील बाजूस, प्रतापगड, मकरंद गड व लांबवरचा रायगडही दिसतो.

भोर संस्थानातर्फे अश्विन महिन्यात नवरात्रीच्या कालावधीत गडावर मोठा उत्सव भरतो. तोरणा किल्ला हा पुणे जिल्ह्यातील वेल्हे या तालुक्यात आहे. पुण्यापासून वेल्ह्याला जाण्यासाठी सतत गाड्या आहेत.

विशाळगड -
विशाळगडाचे नाव ऐकताच समोर येतो तो बाजीप्रभू देशपांडे यांचा घोडखिंडीतील पराक्रम. सिद्धी जोहरच्या वेढ्यातून निसटून छत्रपती शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचून तेथील तोफेचा आवाज कानी येईपर्यंत बाजीप्रभूंनी घोडखिंडीत शौर्याने शत्रुला रोखले. शेवटी त्यांच्या हौतात्म्याने घोडखिंडीची ‘पावनखिंड’ झाली.

कोल्हापूर जिल्ह्यातील विशाळगड हा १३४४ फूट उंचीवर असून गडाचे आवार सुमारे ३ कि. मी. लांब व १ कि. मी. रुंद आहे. गडावर महादेवाचे देऊळ, फुलाजी व बाजीप्रभु यांच्या समाधी, राजाराम महाराजांच्या पत्नी आहिल्याबाईंचे (अंबिका) स्मारक, सरकारवाडा, पिराचा दर्गा, भोपाळ तळे इ. ऐतिहासिक वास्तू आहेत. गडावर जाण्यासाठी पाऊलवाट आहे. पावसाळ्यात गडावरून आजुबाजुचे निसर्ग सौंदर्य हे अधिकच चांगले दिसते. विशाळगड हा पन्हाळ्यापासून सुमारे ४९ कि. मी. अंतरावर आहे. पावसाळा वगळता गडाच्या पायथ्यापर्यंत एस.टी. जातात. जवळच गजापुरची पावनखिंड आहे. पर्यटकांसाठी गडाच्या पायथ्याशी असलेल्या ‘गजापूर’ या गावात मुक्कामाची सोय होऊ शकते. अनेक गिर्यारोहक या गडाला भेट देतात. शिवकाळातील इतिहासाची, बाजीप्रभूंच्या पराक्रमाची आठवण म्हणून आजही असंख्य तरुण, इतिहासप्रेमी, गिर्यारोहक पन्हाळा - ते - विशाळगड असा प्रवास करतात.

दौलताबाद (देवगिरी) -
यादवांनी बांधलेल्या देवगिरी किल्ल्यासारखा संपूर्ण महाराष्ट्रात किल्ला नाही. महम्मद तुघलकने या देवगिरीचे ‘दौलताबाद’ नाव केले. १५२६ पर्यंत इथे बहामनी सत्ता होती. त्यानंतर औरंगजेबच्या मृत्यूपर्यंत (१७०७) हा किल्ला ‘मुघलांकडे’ होता. सुमारे २०० मी. उंचीवर हा किल्ला आहे. किल्ल्याला ७ वेशी असून २ कि.मी. लांबीचा अभेद्य तट आहे. किल्ल्यावर एक उंच स्तंभ आहे, त्याचबरोबर हत्ती हौद, भारतमातेचे मंदिर, चिनी महाल, मीठ अंधेरी मार्ग, खंदक इ अनेक ऐतिहासिक वास्तू या किल्ल्यात आहेत. दिल्लीच्या कुतुबमिनारची आठवण करून देणारा निरीक्षणासाठीचा मनोरा हे एक वैशिष्ट्य येथे बघता येते. संत एकनाथ यांचे गुरू जनार्दन स्वामी यांची समाधी याच किल्ल्यावर आहे. या किल्ल्याचे वैशिष्ट्य म्हणजे एवढ्या वर्षात कोणाही स्वारी करणार्‍या राजाला तो लढून जिंकता आला नाही.

औरंगाबादपासून फक्त १३ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. औरंगाबादपासून वाहनांची व्यवस्था उत्तम प्रकारे आहे. जवळच अजिंठा-वेरुळच्या लेणी, घृष्णेश्र्वर मंदिर ही ठिकाणे आहेत.

सज्जनगड -
समर्थ रामदास स्वामींच्या वास्तव्यामुळे पावन झालेल्या या सज्जनगडाला महाराष्ट्राच्या इतिहासात विशेष महत्त्व आहे. समर्थांनी या गडावर बराच काळ घालविला व शेवटी याच गडावर त्यांनी समाधी घेतली. इ.स. १६७३ मध्ये शिवाजी महाराजांनी गड ताब्यात घेतला. पूर्वी या गडाचे नाव परळी होते. समर्थांच्या वास्तव्यामुळे परळीचे नाव सज्जनगड झाले.

किल्ल्याला प्रमुख दोन दरवाजे आहेत. गडावर श्रीराम मंदिर, श्रीसमर्थांची समाधी, श्रीधरस्वामींची कुटी, अंगलाईचे देऊळ, त्याचबरोबर समर्थांनी वापरलेल्या काही वस्तूही गडावर पाहावयास मिळतात. गडावर गेल्यावर अगदी प्रसन्न व पवित्र वातावरण अनुभवण्यास मिळते. ‘श्रीराम नवमीचा’ उत्सव गडावर मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. गडावर भाविकांकरिता निवासासाठी खोल्या बांधल्या आहेत. तेथे भाविकांना भोजनाचीही सोय करण्यात येते. निसर्गाने नटलेल्या परिसरात सज्जनगड हा अधिकच उठून दिसतो. सातार्‍यापासून केवळ १२ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे.

मुरुड- जंजिरा -
कोकणातील समुद्र किनार्‍यावरचा मजबूत, अजिंक्य व बलाढ्य जलदुर्ग म्हणून ‘मुरुड -जंजिरा’ हा ओळखला जातो. बुर्‍हानखान या हबशी सरदाराने इ. स. १५६७ ते १५७१ या काळात हा किल्ला बांधला, अशी नोंद इतिहासात आढळते. प्रथम या किल्ल्याचे नाव ‘जंझिरे-मेहरूब’ होते. ‘झंझिरा’ (अरबी शब्द) म्हणजे बेट व मेहरूब म्हणजे चंद्रकोर. इ.स. १६१७ मध्ये सिद्धी घराण्याचा मूळ पुरुष सिद्धी अंबर याने मुरुड-जंजिरा येथील जहागिरी मिळवली. पुढील सुमारे ३२५ वर्षे हा किल्ला सिद्धी घराण्याच्या ताब्यातच होता. चहुबाजुंनी पाणी असलेला हा किल्ला वास्तूशिल्पाचा उत्कृष्ट नमुना आहे. छत्रपती शिवाजी महाराज, संभाजीराजे, नाना फडणीस, इत्यादींनी हा जलदुर्ग जिंकण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्या सर्वांना अपयश आले. हा किल्ला शेवटपर्यंत सिद्दींच्याच ताब्यात राहिला.

किल्ल्यामध्ये अनेक प्राण्यांची चित्रे कोरली आहेत. अरबी लिपीतील शिलालेख, ‘पंचायतन पीर’, बालेकिल्ल्यावरील वाडा, व अनेक तोफा तसेच अनेक ऐतिहासिक वास्तू किल्ल्यावर पाहावयास मिळतात. या किल्ल्यावरून संभाजीराजांनी बांधलेला पद्यदुर्ग किल्ला दिसतो. किल्ल्यात जाण्यासाठी होडीचा वापर केला जातो. ४५० वर्षानंतरही ह्या किल्ल्याची स्थिती अगदी मजबूत आहे. जवळच मुरुड या गावी नवाबाचा प्रचंड वाडा आहे. रायगड जिल्ह्यातील हा जलदुर्ग अलिबागपासून सुमारे ४५ कि. मी. अंतरावर हा किल्ला आहे. किल्ल्यात लोकवस्ती नाही. पण मुरुडला निवासाची सोय आहे.


लोहगड -
पुण्यापासून जवळच असलेला लोहगड हा किल्ला अनेक पर्यटकांचे आकर्षण बनला आहे. लोहगड हा भक्कम किल्ला आहे. गडाची उंची समुद्रसपाटीपासून साधारणत: १०२४ मी. आहे. गडावर प्रसन्न वातावरण आहे. गडावर असणार्‍या दाट जंगलामुळे येथील वातावरण खूपच थंड असते.

गडाची रचना ही प्राचीन असावी असे वाटते. इ.स. १६४८ मध्ये शिवाजी महाराजांनी हा गड जिंकून घेतला. पण पुरंदरच्या तहाच्या वेळी हा किल्ला परत मोगलांकडे गेला. शेवटी १६७० मध्ये हा किल्ला पुन्हा मराठ्यांनी जिंकला.

लोहगडावर अनेक ऐतिहासिक वास्तू पाहण्यासारख्या आहेत. तसेच गडावरून अनेक निसर्गरम्य ठिकाणे पाहण्यास मिळतात. गडाच्या पायथ्याशीच प्रसिद्ध अशा कार्ले लेणी आहेत. मळवली स्टेशनपासून विसापूर व लोहगड हे दोन किल्ले दिसतात. राजा रविवर्मांनी सुरू केलेली भारतातील पहिली ‘लिथोप्रेस’ ही गडापासून जवळच आहे. कार्ला येथे पर्यटक निवास आहे.



शनिवारवाडा -
पुण्याच्या मध्यवर्ती भागात असलेला शनिवारवाडा हे पेशव्यांच्या राजधानीचे ठिकाण होते. एके काळी संपूर्ण भारतातील राजकारणाचे केंद्र म्हणजे ही वास्तू होती. पहिले बाजीराव पेशवे यांनी १० जानेवारी, १७३० साली वाड्याची पायाभरणी केली. बाजीरावांच्या उत्तराधिकार्‍यांनी वाड्याचे बुरुज व दरवाजे बांधले, वाड्याचे बांधकाम पूर्ण केले. वाड्यात दिल्ली दरवाजा, खिडकी दरवाजा, नारायण दरवाजा इ. महत्त्वाचे दरवाजे आहेत. आरसे महाल, श्रीमंत पेशव्यांची बैठक, पाण्याचा हौद, सदाशिव भाऊंचे निवासस्थान, हजारी कारंजे, दिवाणखाना, पागा कार्यालय, रंगमहाल आदींचे अवशेष, इमारतींचे जोते (पायाची रचना) आज पाहण्यास मिळतात. वाड्यात असणार्‍या रंग महालाच्या काही खांबांवर सुंदर नक्षीकाम केलेले आहे.

वाड्यात एक सात मजली, सात खणी इमारत होती. परंतु २७ फेब्रुवारी, १८२८ साली वाड्याला भीषण आग लागली व यात या सर्व वास्तू जळून खाक झाल्या. ही आग सतत सात दिवसांपर्यंत चालू होती. असे म्हणतात की, वाड्यात असणार्‍या सात मजली इमारतीच्या छतावरून आळंदीच्या श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराचा कळस दिसत असे. १७५८ मध्ये या वाड्यात सुमारे १०० लोक राहत होते. थोरल्या बाजीरावांपासून नाना फडणवीसांपर्यंत अनेक राज्यकर्त्यांचा अनुभव या वाड्याने घेतला. नोव्हेंबर, १८१७ मध्ये शनिवारवाडा इंग्रजांच्या ताब्यात गेला.

सध्या वाड्यात मुख्य दरवाजा व बुरुजांच्या भिंती अस्तित्वात आहेत. वाड्याच्या आतमध्ये गतकालीन वैभवाचे अतिशय कमी अवशेष आहेत. शनिवारवाड्याच्या मुख्य दरवाज्याबाहेर, समोर बाजीराव पेशव्यांचा भव्य पुतळा आहे. स्वातंत्र्य चळवळ, पुण्यातील समाजसुधारणा चळवळ व संयुक्त महाराष्ट्र आंदोलन अशा अनेक चळवळींचा शनिवारवाडा अतिशय जवळचा साक्षीदार आहे.

अन्य महत्वाची ठीकाने...........

लेणी -
अजिंठा :
इ. स. पूर्व २०० ते इ. स. ६५० या काळात अजिंठा ( व वेरूळ) येथील लेणी कोरली गेल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे. रंगीत भित्ती चित्रे आणि लेणी यासाठी औरंगाबादेतील सोयगाव तालुक्यात असलेली अजिंठ्याची लेणी जगभरात प्रसिद्ध आहेत. येथे एकूण ३० लेणी बौद्धकालीन आहेत. बौद्धमंदिरे, गुंफा, गौतम बुद्धांच्या जीवनावर कोरलेले प्रसंग खडकांमध्ये कोरले आहेत. इंग्रज लष्करातील अधिकार्‍यांनी १८१९ साली ही लेणी शोधून काढली. अजिंठा गावापासून लेणी सुमारे ११ कि. मी. अंतरावर आहेत.

लेणी व्यवस्थित बघता यावीत, पडझड होऊ नये यासाठी सरकारतर्फे प्रयत्न सुरू आहेत. लेण्यांवर, धूर, धुराळा, पेट्रोल-डिझेल, हवा, पाऊस यांचा परिणाम होऊन ती खराब होऊ नयेत असा प्रयत्न केला जात आहे. प्रदूषण विरहित बसेसमधून पर्यटकांना लेणींपर्यंत जाता येते. स्वत:ची वाहने ४ कि. मी. अलीकडेच थांबवावी लागतात. औरंगाबादपासून सुमारे १०६ कि. मी. अंतरावर ही लेणी आहेत.

येथे दरवर्षी पर्यटन-उत्सवाचे आयोजन केले जाते. संपूर्ण भारतासह इतर अनेक देशांतील पर्यटक, अभ्यासकही येथे ‘कलेचा आनंद’ लुटण्यासाठी मोठ्या संख्येने भेट देतात. येथील शिल्पांतून ‘तो’ काळ समोर उभा राहतो. हे प्रामुख्याने बौद्ध धर्माच्या महायान पंथाशी जोडलेले स्थान आहे.

वेरुळ :
खुल्ताबाद तालुक्यात वेरुळ येथे ३४ लेणी आहेत. त्यात १२ बौद्ध, १७ हिंदू, आणि ५ जैन धर्मीय लेणी आहेत. ‘कैलास लेणे’ हे म्हणजे एका डोंगरात कोरलेले शिल्प आहे. जगभरातील पर्यटक ते एक आश्चर्य म्हणून पाहायला वारंवार येतात. ही लेणी राष्ट्रकूट राजा कृष्ण याने खोदली असे अभ्यासक मानतात. वेरुळजवळच घृष्णेश्र्वर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक ठिकाण आहे.

धुमार लेणी, कैलास मंदिर, बुद्धांची प्रचंड आकराची मूर्ती, रामायण-महाभारतातील दृश्ये - आदी शिल्पाकृती येथे प्रेक्षणीय आहेत.

घारापुरी लेणी :
रायगड जिल्ह्यात उरण तालुक्यात घारापुरी या ठिकाणी लेणी आहेत. त्या लेण्यात एक प्रचंड मोठा हत्ती कोरलेला आहे. त्यावरून या लेणींना एलिफन्टा केव्हज् असे नाव पोर्तुगीजांनी दिले. या लेणी पाहण्यासाठी मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया येथून समुद्रातून लॉंचने जाता येते. येथील दगडात कोरलेले महादेवाचे मंदिर प्रेक्षणीय आहे.

उपरोक्त लेणींबरोबरच अतिशय प्राचीन अशी पितळखोरा लेणी (औरंगाबाद जिल्हा); कार्ले-भाजे व जुन्नर येथील लेणी (पुणे जिल्हा); उस्मानाबाद जिल्ह्यातील जैन लेणी, लातूर जिल्ह्यातील खरोसा लेणी व कान्हेरी गुंफा / लेणी (संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बोरिवली) ही महाराष्ट्रातील लेणी प्रेक्षणीय असून पर्यटनदृष्ट्या महत्त्वाची आहेत.


महाराष्ट्रातील संग्रहालये:
प्रस्तावना -
निरनिराळ्या पंचवार्षिक योजनांमधून सरकारची धोरणे मांडली जातात. तसेच एका पंचवार्षिक योजनेत वस्तुसंग्रहालये, पुरातत्त्व संशोधनाच्या जागा यांचे जतन करण्याचे धोरण सुस्पष्टपणे मांडले गेले होते. जिल्हा आणि विभाग स्तरावर महत्त्वाच्या वास्तू, जागा, संग्रहालये स्थापन केली जावीत असे त्यानुसार ठरले. त्यामुळे प्रादेशिक स्तरावर नागपूर, औरंगाबाद आणि नाशिक येथे संग्रहालये आहेत. कोल्हापूर, सिंदखेडराजा (बुलढाणा जिल्ह्यात), सातार्‍यात ३ कलादालने, उस्मानाबाद जिल्ह्यातील तेर, नांदेड जिल्ह्यात माहूर या ठिकाणी जिल्हास्तरीय संग्रहालये जतन करण्यात आली आहेत. यातील काही व्यक्तिगत संग्रहालये आहेत.

तसेच काही ऐतिहासिक महत्त्वाच्या स्थळांवर, महत्त्वाच्या व्यक्तींच्या नावे संग्रहालये व्हावीत असे सरकारचे धोरण प्रत्यक्षात राबवले जात आहे. त्यात छत्रपती राजर्षी शाहू, राम गणेश गडकरी, वीर सावरकर, आणि महात्मा फुले यांच्या स्मृती जतन करणारी संग्रहालये सुरूही झाली आहेत.

१९८४ मध्ये प्रसिद्ध सिनेनट श्री. चंद्रकांत मांढरे यांनी स्वत:चे घर आणि संग्रहात असलेली सर्व पोट्रेटस् व निसर्गचित्रे सरकारने संग्रहालयात जतन करावीत यासाठी दान केली आहेत. कोल्हापुरातील त्यांच्या संग्रहात जवळजवळ ३०० चित्रे आहेत. अनेक कलाप्रेमी मंडळी या संग्रहाचा आस्वाद आता घेऊ शकतात.

काही संग्रहालयांची सविस्तर माहिती पुढे दिली आहे.

रिझर्व बँकेचे चलनाचे संग्रहालय, मुंबई.
जानेवारी, २००५ मध्ये या संग्रहालयाची मुंबई येथे स्थापना झाली. हे भारतातील पहिलेच चलनांचे संग्रहालय आहे. तेव्हाचे देशाचे राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांनी त्याचे उद्घाटन केले.

चलन व्यवहारात कस-कसे बदल झाले, नाणी, नोटांचे बदलते आकार, रंग याची संग्रहालयामुळे कल्पना येते. निरनिराळे धातू, मिश्र धातू यांचा या संग्रहात समावेश आहे. इ. स. पूर्व ६ व्या शतकापासून ते आजतागायत चलनात झालेली स्थित्यंतरे त्यामुळे सर्वांसमोर येतात. नाणी, नोटा, धनादेश(चेक्स), हुंडी यांमध्ये निरनिराळ्या धातूंचा, कागदाचा उपयोग - चलनात कसा होत गेला हे यावरून समजते.

लहान मुलांसाठी माहिती देणारी दालने त्यात स्वतंत्रपणे मांडली आहेत. त्यातून नाण्यांचा इतिहास, माहिती ही खेळांमधून सांगितली आहे.

फिरोजशहा मेहता मार्गावर, फोर्ट भागात, अमर बिल्डिंग या ठिकाणी मुंबईत हे रिझर्व बँकेने सुरू केलेले संग्रहालय आहे.

नॅशनल मेरिटाईम म्युझियम, मुंबई
मुंबईत हे संग्रहालय आहे. भारतीय नौदलाने हे संग्रहालय तयार केले आहे. इतर देशातील मॉडेल्स घेऊन त्यावरून मुंबईत बांधण्यात आलेल्या बोटींचे नमुने त्यात आहेत. नौसेना किंवा नौदल याविषयी रस असणार्‍या पर्यटकांना व अभ्यासकांना हे प्रतिकृतींचे संग्रहालय एक वेगळाच आनंद देते.

डॉ. भाऊ दाजी लाड म्युझियम (व्हिक्टोरिया - अल्बर्ट म्युझियम), मुंबई .
मुंबईत भायखळा येथे या संग्रहालयात शस्त्रास्त्रे, चर्मकला, कुंभारकाम, हस्तीदंतावरील कोरीव काम, प्राचीन लिखित दस्तऐवज अशा विविध विषयांवरील माहिती व वस्तूंचा संग्रह आहे. हे मुंबईतील जिजामाता उद्यानात असून या संग्रहालयातून बॉंबे नॅचरल हिस्ट्री सोसायटी या महत्त्वपूर्ण संस्थेची स्थापना (१८८३) झाली.

दी बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी, मुंबई. (BNHS) :
निसर्ग रक्षण, संवर्धन यासाठी काम करणारी ही १२५ वर्षे जुनी सामाजिक संस्था आहे. या संस्थेत नैसर्गिक साधन-संपत्तीच्या शाश्वत, सशक्त समतोल विकासासाठी संशोधन व अभ्यास चालतो. फोर्ट भागात १८८३ मध्ये ६ ब्रिटिश आणि २ भारतीयांनी एकत्र येऊन या संस्थेची सुरुवात केली. सुप्रसिद्ध पक्षीतज्ज्ञ डॉ. सलीम अली यांनीही या संस्थेचे अध्यक्षपद भूषविले. डॉ. सलीम अली यांच्या बरोबरीनेच बी. एन. एच. एस. चे नाव घेतले जाऊ लागले एवढे भरीव काम त्यांनी केले आहे. डॉ. अली सुमारे ७८ वर्षे या संस्थेचे अध्यक्ष होते.

या संस्थेच्या संग्रहालयात असंख्य पक्षी-प्राणी यांची छायाचित्रे, माहिती आहे. तसेच विविध झाडे, फळे, फुले यांचीही तपशीलवार माहिती आहे. निसर्गाचा इतिहास, जैवविविधता विषयांवरील हे आशिया खंडातील सर्वांत मोठे संग्रहालय आहे. सुमारे २६००० पक्षी, २७५०० विविध प्राणी व ५०००० कीटक यांची माहिती आपल्याला येथे मिळते.

छत्रपती शिवाजी वस्तुसंग्रहालय, मुंबई.
प्रिन्स ऑफ वेल्स या नावाने पूर्वी प्रसिद्ध असलेले हे संग्रहालय मुंबईत, फोर्ट विभागात उभारलेले आहे. प्राचीन स्थापत्य, वास्तुशास्त्र, वास्तुकला जतन करण्याचा प्रयत्न येथे केलेला आहे. निरनिराळी पेंटिंग्ज, चित्रकलेचे नमुने इथे जतन केले आहेत.

हेराज इन्स्टिट्यूट ऑफ इंडियन हिस्ट्री अॅण्ड कल्चर (हेराज संग्रहालय), मुंबई.
मुंबईतील सेंट झेवियर्स महाविद्यालयाच्या परिसरात हे लहानसे संग्रहालय १९२६ साली सुरू झाले. स्पेनमधील रहिवासी हेन्री हेरास यांनी भारतात आल्यावर संस्कृती, परंपरा, पुरातत्त्व शास्त्र या दृष्टीने भारताचा अभ्यास व्हावा या हेतूने ही संस्था सुरू केली. या हेराज इन्स्टिट्यूटच्या अंतर्गत संग्रहालय स्थापन करण्यात आले आहे. मेसोपोटेमिया संस्कृतीतील काही वस्तू, मातीच्या वस्तू, नाणी, ख्रिश्चन-लाकडी कोरीवकामाचे नमुने, प्राचीन काळातील मातीची भांडी, हस्तीदंतावरील कोरीव काम, गंधर्व, मथुरा, गुप्त-काळातील दस्तऐवज, मेरी- येशू यांच्या मूर्ती या संग्रहालयात ठेवलेल्या आहेत.

भारत इतिहास संशोधन मंडळ, पुणे.
पुण्यात हे संशोधन केंद्र आणि संग्रहालय १९१० मध्ये सुरू झाले. इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांनी या संस्थेची स्थापना केली. इतिहासाचा अभ्यास आणि सांस्कृतिक वारसा जतन करणारे हे संग्रहालय-ग्रंथालय चित्रांचे दालन, दस्तऐवज यांनी सज्ज आहे. पुण्यात मध्यवर्ती वस्तीत हे संग्रहालय आहे.

राजा दिनकर केळकर संग्रहालय, पुणे.
२०,००० हून अधिक पेंटिंग्ज, असंख्य पुरातन वस्तूंचा संग्रह पुण्यातील या संग्रहालयात आहे. पुण्यात मध्यवर्ती भागात हे वस्तुसंग्रहालय आहे. गुजराथ, राजस्थान, कर्नाटक, केरळ अशा ठिकठिकाणच्या लाकडी, दगडी कोरीव कामाचे नमुने, दिवे, कुलपे, अडकित्ते, पेन-दौती, तसेच अनेक प्राचीन घरगुती वस्तूंचा संग्रह येथे पाहण्यास मिळतो. तसेच महिलांच्या संबंधी वस्तूंची स्वतंत्र विभागात मांडणी केलेली असून यातून सांस्कृतिक ठेवा, परंपरा यांचे जतन केले आहे. महाराष्ट्र सरकारच्या पुरातत्त्व खात्याकडे हे सोपवले आहे.

महात्मा फुले वस्तुसंग्रहालय , पुणे.
हस्तकला, हस्तोद्योग, काही शेती संबंधित आणि औद्योगिक उत्पादने या ठिकाणी आहेत. १८९० मध्ये लॉर्ड रेम्युझिअम म्युझियम नावाने ते सुरू झाले. हत्तीपासून ते सील माशापर्यंत प्रत्येक प्राण्याची शरीररचना बारकाईने पाहायची असेल, रचनेचा अभ्यास करायचा असेल, तर या ठिकाणी एकत्रितपणे ठेवलेल्या अनेक शरीररचनांचा उपयोग अभ्यासकांना होतो.

लोकमान्य टिळक संग्रहालय, पुणे.
‘केसरी’ दैनिकाचा छापखाना पुण्यात जिथे होता, तिथेच लोकमान्य टिळकांनी वापर केलेल्या वस्तू जतन केलेल्या आहेत. त्यातच मंडालेच्या तुरुंगात असताना टिळकांनी लिहिलेल्या ‘गीतारहस्य’ या ग्रंथाची एक प्रतही ठेवली आहे.

आदिवासी संग्रहालय, पुणे.
पुणे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या या संग्रहालयात भारतातील अनेक आदिवासी जमातींबद्दलची माहिती जमवलेली आहे. गोंडवन, सह्याद्री या रांगांमध्ये राहाणारे सर्व आदिवासी समजून घेण्यासाठी त्याचा उपयोग होतो. आदिवासींच्या वापरात असलेल्या वस्तू, त्यांच्या जीवनातील हुबेहुब उभे केले प्रसंग, छायाचित्रे, पुस्तके यांचा संग्रह येथे पाहण्यास मिळतो.

श्री भवानी संग्रहालय, औंध.
सातारा जिल्ह्यातील औंध येथे हे संग्रहालय आहे. जयपूर, कांगरा, मुघल, पंजाब, विजापूर, पहाडी आणि मराठा शैलीतील १५ व्या ते १९ व्या शतकातील चित्रकला - रंगकामाचे नमुने या ठिकाणी आहेत. औंधचे राजे भवनराव पंतप्रतिनिधी यांनी १९३८ मध्ये ते सुरू केले. हेन्री मूर यांनी केलेले माता व बालकाचे प्रसिद्ध शिल्प श्रीभवानी म्युझियम मध्ये आहे. अनेक पाश्चिमात्य चित्रकारांची चित्रे या संग्रहालयात आहेत. भवानराव पंतप्रतिनिधी यांनी स्वत: संग्रहित केलेला, जतन केलेला हा अनमोल ठेवा आहे.

इतर स्थाने :
महाड -
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर सावित्री नदीकाठी असलेले महाड हे गाव आहे. १९२७ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळी अस्पृश्य मानल्या गेलेल्या लोकांना पाणी मिळावे यासाठी केलेल्या आंदोलनामुळे या गावाला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले आहे. चवदार तळ्याचा सत्याग्रह म्हणून हे आंदोलन प्रसिद्ध आहे. आंदोलनाच्या आठवणीसाठी तेथे एक क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे.

चिपळूण -
वशिष्ठी नदीच्या काठावर वसलेले हे जुने शहर असून विंध्यवासिनी देवीचे व परशुरामाचे मंदिर येथे आहे. चिपळूण पासून १२ कि. मी. अंतरावर असलेल्या डेरवण या गावी ‘शिवसृष्टी’ उभी करण्यात आली आहे. श्री. वालावलकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ उभारलेल्या शिवसृष्टीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातील निवडक प्रसंग शिल्परूपात कोरलेले आहेत. हे अलीकडच्या काळात पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्धीस आले आहे. कोकण प्रवास करताना सर्व पर्यटक येथे हमखास भेट देतात.

तुळापूर -
पुणे जिल्ह्यात पुणे-नगर रस्त्यावर हे ठिकाण आहे. भीमा, भामा व इंद्रायणी या तीन नद्यांच्या संगमावरील पवित्र आणि ऐतिहासिक ठिकाण म्हणून तुळापूर परिचित आहे. संगमावर यादवकाळातील हेमाडपंती संगमेश्र्वर मंदिर आहे. औरंगजेबाने संभाजी महाराजांचा छळ करून, त्यांना क्रूरपणे ठार मारले, तेच हे ठिकाण. छत्रपती संभाजी महाराजांचे स्मृतिस्थान, त्यांचा पुतळा आणि एक कलादालनही येथे उभारण्यात आले आहे. निरगुडकर फाउंडेशनने हे ठिकाण गेल्या काही वर्षात विकसित केले आहे. संभाजी महाराजांच्या बलिदानामुळे तुळापूर हे एक प्रेरणास्थान म्हणून महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे.
 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district