संगमनेर

महाराष्ट्र हे सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध व संपन्न असे राज्य! अनेक कलांपैकी चित्रपट या क्षेत्राशी संबंधित आधुनिक कला महाराष्ट्रातच निर्माण झाल्या, जोपासल्या गेल्या व समृद्ध झाल्या. सुमारे १०० वर्षांहून अधिक काळ लोटलेल्या मराठी चित्रपटसृष्टीला कलेचा देदिप्यमान असा वारसा आहे. अनेक कला व कलाकारांनी समृद्ध असलेल्या महाराष्ट्रामध्येच चित्रपटसृष्टीची निर्मिती व्हावी, हे अहोभाग्य मराठी माणसाला मिळावे यामागे अनेकांचे अथक परिश्रम, संशोधन, कलासक्त मन व देशाभिमान होता. या समृद्ध आणि संपन्न परंपरेचा स्तर कायम ठेवत पुढील काळात - आत्तापर्यंत - चित्रपट क्षेत्रातील कलाकारांनी मराठी चित्रपटांची आणि महाराष्ट्राची शान कायमच वाढवत नेली आहे.

प्रयोगातून निर्मिती -
पाश्चात्य देशांत १९ व्या शतकात चित्रपट निर्मिती होत होती. आपल्या येथे त्याच दरम्यान १८८५ च्या काळात ‘शांबरिका खरोलिका’ (मॅजिक लँटर्न) चा अद्भूत प्रयोग श्री. महादेव गोपाळ पटवर्धन यांनी केला. अगदी अस्सल देशी, मराठी पद्धतीने पटवर्धनांनी केलेला त्या काळातील प्रयत्न वादातीत होता. हाताने १० सें. मी. च्या काचपट्टीवर ५ सें. मी. हून लहान अशा मानवी आकृतींचे हावभावांसहित रेखाटन करून ती चित्रे भव्य पडद्यावर चलतपटाच्या स्वरूपात (आजच्या अॅनिमेशनप्रमाणे) ते दाखवित असत. त्यासाठी हजारो स्लाईडस्‌ तयार करून चित्रांमध्ये सातत्य ठेवण्यात त्यांनी यश मिळविले होते. हिंदुस्थानभर त्यांचे प्रयोग झाले व ब्रिटीश सरकारकडून त्यांना राजमान्यताही मिळाली.
मुंबईचे हरिश्र्चंद्र सखाराम भाटवडेकर उर्फ सावेदादा यांनी १८९८ मध्ये ‘कुस्तीचा लघुपट’ तयार केला. नंतर १९०१ मधे त्यांनी रँग्लर र. पु. परांजपे यांचा सत्कार चित्रबद्ध केला. १९०९ मधे ‘पुंडलिक’ या नाटकाचे चित्रपटात रूपांतर करून तो १८ मे, १९१२ रोजी प्रदर्शित करणारे श्री. रामचंद्र गोपाल उर्फ दादासाहेब तोरणे यांनी इतिहास घडविला.

थिएटरमधील (चित्रपटगृहातील) प्रथम प्रदर्शन :
महाराष्ट्रातील नाशिकचे धुंडिराज गोविंद उर्फ दादासाहेब फाळके आर्थिक संकटांवर मात करून जिद्दीने इंग्लंडला गेले. तेथे त्यांनी चित्रपट निर्मिती संबंधात सर्व माहिती घेतली.पुढे त्यांनी तेथून सर्व यंत्रसामग्री मागविली. चित्रपटाची जुळवाजुळव करून, अपार कष्ट घेऊन त्यांनी ‘राजा हरिश्र्चंद्र’ हा चित्रपट बनवून पूर्ण केला. ३ मे, १९१३ रोजी दादासाहेब फाळके यांनी ‘राजा हरिश्र्चंद्र’ हा मुंबईच्या ‘कॉरोनेशन’ चित्रपटगृहात प्रदर्शित केला. ‘राजा हरिश्र्चंद्र’ हाच भारतातील पहिला निर्माण व प्रदर्शित झालेला चित्रपट मानला जातो आणि दादासाहेब फाळके यांनाच भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक म्हटले जाते. म्हणूनच भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च मानाचा पुरस्कार दादासाहेब फाळके यांच्या नावे केंद्र शासनाच्या वतीने देण्यात येतो.


त्या काळातच १९१३ ते १९२६ पर्यंत मुंबईच्या श्री. ना. पाटणकर यांनी नॅशनल फिल्म अंतर्गत ३६ चित्रपट निर्माण केले, पण चांगल्या वितरण व्यवस्थेअभावी ते लोकांपर्यंत पोहोचले नाहीत. पण त्यांची दखल घेणे इष्ट ठरेल.

कलामहर्षी बाबुराव पेंटर :
कोल्हापूर हे कलेचे माहेरघर. तेथील कलावंत मंडळी स्वस्थ कशी बसतील? आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वत: प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर प्रिंटिंग मशीन, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर, १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली. स्त्रीपात्रे असलेला पहिलाच चित्रपट त्यांनी निर्माण केला, तो म्हणजे ‘सैरंध्री’. पुण्यातील ‘आर्यन’ थिएटरमधे तो ७ फेब्रुवारी, १९२० रोजी दाखविला गेला. यातील भीम व कीचक यांच्या द्वंद्वयुद्धाचे दृश्य पाहून प्रेक्षक बेशुद्ध पडले होते, इतके ते दृश्य-कोणतेही ट्रिक सीन्स नसतांनाही-जिवंत चित्रित झाले होते. यावरूनच ब्रिटिश सरकारने सेन्सॉर पद्धत सुरू केली, जी आजही सुरू आहे. महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या माध्यमातून बाबुराव पेंटर यांनी फ्लॅशबॅक पद्धत प्रथमच वापरून १९२५ साली ‘सावकारी पाश’ हा सामाजिक मूकपट तयार केला. परदेशात चित्रपट प्रदर्शनात पाठविलेला हा भारतातील पहिला चित्रपट ठरला. चित्रपटाचे तंत्र, मंत्र व मर्म जाणणारे बाबुराव पेंटर हे एकमेवाद्वितीय दिग्दर्शक होते. त्यांच्या कंपनीमधून मद्रासचे एच. एम. रेड्डी, नागी रेड्डी, व महाराष्ट्रातील व्ही. शांताराम, दामले, फत्तेलाल, धायबर, बाबुराव पेंढारकर, मा. विनायक, नानासाहेब सरपोतदार यांसारखे कलाकार तयार झाले. मूकपटांतून रुबी मायर्स, मा. विठ्ठल, पृथ्वीराज कपूर, झेबुन्निसा, ललिता पवार असे कलावंत तयार झाले. कल्पकता, कलात्मकता, वास्तववाद आणि सामाजिक प्रबोधन ही गुणवैशिष्ट्ये बाबुरावांसारख्या श्रेष्ठ गुरूने भारतीय चित्रपटसृष्टीला दिली. त्यांनी १९२० ते १९२८ या कालावधीत १७ मूकपट निर्माण केले.

आर्यन फिल्म कंपनी :
बाबुराव पेंटरांबरोबर काम केलेले नानासाहेब सरपोतदार यांनी पुण्यात १९२७ नंतर आर्यन फिल्म कंपनीची स्थापना केली. त्या काळातील ज्वलंत सामाजिक विषयावरील त्यांचा ‘महाराची पोर’ हा चित्रपट खूप गाजला. महात्मा गांधी व डॉ. सरोजिनी नायडू वगैरे मोठ्या नेत्यांनी हा चित्रपट पाहून नानासाहेबांचे खूप कौतुक केले. नानासाहेबांनी काही चित्रपटांचे दिग्दर्शनही केले व एकूण २४ मूकपट प्रदर्शित केले. त्या काळी मूकपट हे मारामारीचे, कट-कारस्थानाचे असत. थिएटरमधे तबला, हार्मोनियम, सारंगी वाजविणारे वादक त्या त्या प्रसंगानुरूप वाद्ये वाजवून प्रसंग उठावदार करीत असत.

बोलपटांचे युग :
बोलपटांची चाहूल येथील निर्मात्यांना लागू लागली होती. दादासाहेब तोरणे स्वत: ध्वनिमुद्रण शिकले होते. मुव्ही कॅमेरा कंपनी त्यांनी सुरू केली. त्या अंतर्गत मुंबईच्या आर्देशीर इराणींबरोबर तोरणेंनी ‘आलम आरा’ (हिंदी) हा मा. विठ्ठल व झुबेदा या द्वयीचा पहिला बोलपट १४ मार्च, १९३१ रोजी प्रदर्शित केला. त्या काळात संपूर्ण लांबीच्या, गाणार्‍या, नाचणार्‍या आणि बोलणार्‍या अशा बोलपटांच्या पडद्यामागे कित्येक प्रेक्षक डोकावत आणि मागे माणसे (वादक वगैरे) नसल्याची खात्री करून घेत. पुढे दादासाहेब तोरणेंचा ‘शामसुंदर’ हा बोलपट भालजी पेंढारकरांनी दिग्दर्शित केला. तो लोकप्रिय झाला. त्यातूनच पुढे शांता आपटे व शाहू मोडक ही अनुरूप जोडी मराठी चित्रसृष्टीला मिळाली.


सुवर्णयुग

प्रभात फिल्म कंपनी व काही वैशिष्ट्ये :
बाबुराव पेंटर यांचे शिष्य असलेल्या व्ही. शांताराम, धायबर, दामलेर्-फत्तेलाल ह्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. त्यांनी स्वतंत्रपणे ‘प्रभात फिल्म कंपनीची’ स्थापना दिनांक १ जून, १९२९ रोजी कोल्हापुरात केली व ‘अयोध्येचा राजा’ ची निर्मिती केली. त्यास अमाप लोकप्रियता मिळाली. काही काळानंतर प्रभातचे पुण्यात स्थलांतर झाले. त्यांनी सैरंध्री ह्या मूकपटाचे रंगीत बोलपटात रूपांतर केले. भारतीय चित्रपटांच्या ध्वनिमुद्रिका सुरू झाल्या. पुढील काळात ‘अमृत मंथन’ ची निर्मिती झाली. अगदी जवळून चित्रीकरण केलेला पहिला ‘क्लोजअप’ यामध्ये होता. प्रभातच्या ‘धर्मात्मा’ मधून संत एकनाथंच्या भूमिकेत बालगंधर्व प्रथमच रूपेरी पडद्यावर झळकले. १९३६ मध्ये प्रदर्शित झालेला ‘संत तुकाराम’ हा व्हेनिस येथील आंतरराष्ट्रीय चित्रमहोत्सवात दाखल झालेला पहिला मराठी चित्रपट, जो सर्वोत्तम तीन चित्रपटांमध्येही होता. रंगभूमीवरील स्त्रीपार्टी नट विष्णुपंत पागनीस व गौरी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ह्या चित्रपटास सुवर्णमहोत्सवी यश मिळाले. ‘संत तुकाराम’ ही केवळ प्रभातचीच सर्वोत्कृष्ट निर्मिती नाही, तर सार्वकालिक, जागतिक स्तरावर, उत्कृष्ट चित्रपटांमध्येही याचा क्रमांक वरचा आहे. या चित्रपटामुळे महाराष्ट्रात ‘तुकाराममय आध्यात्मिक लाटच’ निर्माण झाली. विष्णुपंत पागनीस तुकारामांच्या भूमिकेशी एवढे समरस झाले की, त्यांचे पुढचे वैयक्तिक आयुष्यच बदलून गेले. विष्णुपंत म्हणजेच ‘संत तुकाराम’ अशी ठळक प्रतिमा अवघ्या महाराष्ट्राच्या मनावर ठसली. हे प्रभातचे सुयश होते. पुढे कुंकू, गोपाळकृष्ण, माझा मुलगा, माणूस, शेजारी अशा अप्रतिम चित्रपटांची निर्मिती प्रभातने केली. प्रभातचा ‘कुंकू’ त्या वेळेसच्या सामाजिक परंपरेला छेद देणारा होता. जरठ-बाला विवाह ही प्रथा कशी चुकीची आहे हा प्रश्र्न समाजमर्यादेचे पालन करीत समाजापुढे मांडण्यात हा चित्रपट यशस्वी झाला. प्रभातच्या व्ही. शांताराम यांनी उत्तम हिंदी चित्रपटही निर्माण केले.


प्रथम कोल्हापुरात काही चित्रपट निर्माण केल्यानंतर ‘प्रभात’ चे काम पुणे येथे सुरू झाले. पुण्यात १९३३ साली आशिया खंडातील सुसज्ज व भव्य अशा प्रभात स्टुडिओची स्थापना झाली. तेथे १९३४ मध्ये ‘अमृतमंथन’ हा बोलपट प्रदर्शित झाला. फत्तेलाल मामांनी पहाटेच्या मंगलसमयीची किरणे व नवचैतन्याने एक स्त्री तुतारी वाजवत आहे असे चित्र रेखाटले व तेच चित्र पुढे प्रभातचे सुप्रसिद्ध असे बोधचिन्ह झाले. १९२९ ते १९३१ या काळात प्रभातने सहा मूकपट निर्माण केले. पार्श्र्वसंगीत केशवराव भोळे व मा. कृष्णराव यांचे असे. प्रभातच्या नंतर आलेल्या ‘माणूस’ च्या यशात दिग्दर्शन, संगीत, अभिनय व अनंत काणेकरांचे संवाद यांचा मोठा वाटा आहे. माणूसने प्रभातला व शांताराम बापूंना अलोट यश मिळवून दिले. चित्रपट हे माध्यमच असे आहे की ज्याचा प्रभाव समाजावर सर्वदूर व सखोल होतो. प्रभातकारांनी हे मर्म ओळखूनच चित्रपट निर्मिती केली.

प्रभातमधील पडझड :
पुण्यात प्रभातचे युग सुरू झाले होते. कडक शिस्तीत काम चालत असे. कालांतराने भागीदारीतील आचारसंहिता पाळली न गेल्याने मनस्वी स्वभावाचे शांतारामबापू बाहेर पडले. ५ जुलै, १९४५ रोजी विष्णुपंत दामलेंचे निधन झाले. प्रभात संस्था मोडकळीस आली. ‘रामशास्त्री’ चे यशही प्रभातला वाचवू शकले नाही. एस. फत्तेलाल यांना हा मोठा धक्का होता. हळूहळू प्रभातचा डोलारा १९५२ साली कोसळला १९६० साली भारत सरकारने प्रभात स्टुडिओ विकत घेऊन त्या जागी फिल्म इन्स्टिट्यूट’ (FTII) ची स्थापना केली. आजही पुण्यातील ‘त्या’ जागेवर फिल्म इन्स्टिट्यूट दिमाखात उभी असून कलाकारांना घडवत आहे. या संस्थेकडे (पूर्वीची प्रभात) जाणार्‍या रस्त्याचे नावही ‘प्रभात रस्ता’ असेच आहे.

प्रभातचे सर्वच चित्रपट सर्वांगीण सुंदर असत. विश्राम बेडेकर, केशवराव भोळे, मा. कृष्णराव, वसंत देसाई, राजा नेने, दत्ता धर्माधिकारी, अनंत माने यांसारखे पटकथाकार - संगीतकार-दिग्दर्शक आणि शांता हुबळीकर, हंसा वाडकर, जयश्री, शांता आपटे, बेबी शकुंतला, देव आनंद, शाहू मोडक, अनंत मराठे, राम मराठे, गजानन जहागीरदार असे अनेक कलाकार-तंत्रज्ञ प्रभातने निर्माण केले. त्या वेळेसच्या सामाजिक समस्यांना चित्रपटांतून मांडण्याची परंपरा प्रभातने सुरू केली व मनोरंजनाबरोबरच समाजप्रबोधनपर चित्रनिर्मिती केली. म्हणूनच प्रभातच्या अस्तानंतरही प्रभातच्या स्मृती पुसल्या गेल्या नाहीत. लोकांच्या मनावर अद्यापही प्रभात चित्रे अधिराज्य करीत आहेत.
किमयागार व्ही. शांताराम :
चित्रपट सृष्टीच्या पहिल्या काळात अत्याधुनिक सोयी जवळ नसतांना, तंत्र फारसे विकसित झालेले नसताना प्रभातचा पहिला बोलपट ‘अयोध्येचा राजा’ व रंगीत सैरंध्री निर्माण करण्यात शांताराम बापूंची जिद्द व कल्पकता दिसून येते. मूळची बुद्धिमत्ता, नावीन्याचा शोध घेण्याची वृत्ती, शिस्तबद्ध काम या जोरावर त्यांनी शेकडो कलाकार व तंत्रज्ञ निर्माण केले. प्रभातनंतर शांताराम बापूंनी ‘राजकमल’ स्टुडिओच्या माध्यमातून चित्रपटनिर्मिती सुरू ठेवली.

मानवी (व्यक्तिरेखांच्या) भावभावनांच्या उत्कट पैलूंना प्रभावीतपणे स्पर्श करण्याचे सामर्थ्य चित्रपटांमध्ये आहे. या सामर्थ्याचा पुरेपूर उपयोग व्ही. शांतारामांनी ‘माणूस’ व ‘शेजारी’ मध्ये केला. अभिजात कलाकृती म्हणून हे चित्रपट गणले जातात. शकुंतला, झनक झनक पायल बाजे, दो आँखे बारह हाथ आदी ४० च्या वर चित्रपट (मराठी, हिंदी) त्यांनी निर्माण व दिग्दर्शित केले. १९६५ मध्ये ‘इये मराठीचीये नगरी’ हा मराठीतील रंगीत (इस्टमनकलर) चित्रपट तयार केला. त्यांच्या ‘दो ऑखे बारह हाथ’ या चित्रपटाला बर्लिन चित्रपट महोत्सवात खास पुरस्कारही मिळाला. त्यांच्या चित्रपटांत अपार मेहनतीने विविध भूमिका साकारून संध्या ह्या अभिनेत्रीने नायिकांना एक वेगळीच उंची दिली. संध्या यांचे योगदान ‘राजकमल’ च्या कारकीर्दीत महत्त्वाचे आहे. १९८५ मध्ये दादासाहेब फाळके या सर्वोच्च सन्मानाने शांताराम बापूंना गौरविण्यात आले. ६० वर्षांहून अधिक काळ हिंदी-मराठी चित्रपट क्षेत्रावर स्वत:चा ठसा स्वतंत्रपणे उमटविणार्‍या शांताराम बापूंना यथोचितपणे संबोधले जाते ते ‘चित्रपती’ म्हणूनच. शिस्तप्रिय, कठोर व्यावसायिक अशा या व्यक्तिमत्त्वास व अलौकिक दिग्दर्शकास चित्रपटसृष्टी मुकली ते साल होते १९९०.


अन्य माहिती

इतर चित्रपटनिर्मिती संस्था :
कोल्हापुरात शालिनी सिनेटोन, कोल्हापूर सिनेटोन या संस्थांच्या माध्यमातून चित्रपटांची निर्मिती सुरू राहिली. पुणे येथे हंस पिक्चर्स, सरस्वती सिनेटोन या संस्था कार्यरत झाल्या. त्या वेळी १९३३ - ३४ च्या दरम्यान सांगली संस्थानात मा. दीनानाथ मंगेशकर व चिंतामणराव कोल्हटकरांनी ‘बलवंत पिक्चर्स’ तर्फे ‘कृष्णार्जुन युद्ध’ हा बोलपट काढला. कोल्हापूर दरबाराच्या राजाश्रयाने बाबुराव पेंढारकरांनी आचार्य प्र. के. अत्रे, वि. स. खांडेकर यांसार‘या मातब्बरांबरोबर हंस पिक्चर्सतर्फे ज्वाला, ब‘ह्मचारी, ब्रॅन्डीची बाटली,ध्रुव इत्यादी चित्रांची निर्मिती केली.

पुढे हंस पिक्चर्सचे रूपांतर नवयुग चित्र मधे झाले. मराठीतील विनोदी चित्रपट समृद्ध व उच्च दर्जाचे असल्याचे आचार्य अत्रे व मा. विनायक ह्या जोडीने दाखवून दिले. ब्रम्हचारी, अर्धांगी, ब्रॅन्डीची बाटली, सुखाचा शोध, देवता आदी चित्रपटांतून विनोदी चित्रांना प्रतिष्ठा व प्रसिद्धी मिळवून दिली. या चित्रपटांपासूनच संपूर्ण विनोदी चित्रपटांची सुरुवात मराठी चित्रसृष्टीत झाली. पुण्यात सरस्वती सिनेटोन व प्रभातने वेगवेगळ्या विषयांवरील चित्रपट दिले. त्यामध्ये ऐतिहासिक, पौराणिक चित्रपट, संतपट असत. इतर संस्थांचे ठकीचे लग्न, सत्याचे प्रयोग, नेताजी पालकर इत्यादी चित्रपटही चांगले होते. दादासाहेब तोरणेंनी सरस्वती सिनेटोनची निर्मिती थांबवली, तोपर्यंत त्यांनी १४ ते १५ चित्रपट निर्माण केले होते. मराठी बोलपटांची प्रतिष्ठा दिल्लीपर्यंत नेणारे दादासाहेब तोरणे हे दादासाहेब फाळके यांच्या तोडीचे; मराठी चित्रपटांचे अध्वर्यूच ठरले.

बाबुराव पेंटर यांच्या महाराष्ट्र फिल्म कंपनीच्या स्थापनेपासून दामले फत्तेलाल हे दर्दी चित्रकार, केशवराव धायबर व व्ही. शांताराम हे अभिनेते १० वर्षे कंपनीत होते. हे दोघेही पुढे दिग्दर्शन शिकले, तसेच धायबर छायालेखनातही तज्ज्ञ झाले. या मंडळींनी अपार कष्ट करत व पडेल ते काम करत चित्रपट क्षेत्रातील प्रत्येक अंगाची माहिती करून घेतली. शांताराम बापू व धायबरांनी परिश्रमाने तयार केलेला ‘नेताजी पालकर’ हा मूकपट खूप गाजला. दामलेर्-फत्तेलाल जोडीने बनविलेला ‘महारथी कर्ण’ हा भव्य मूकपटही गाजला.

इतर काही चांगले चित्रपट व कलावंत :
थोरातांची कमळा, शेजारी, भरतभेट, रामराज्य या चित्रपटांतून चंद्रकांत मांडरे या रुबाबदार व देखण्या व्यक्तिमत्त्वाचे मराठी चित्रपटात आगमन झाले. खानदानी व सुशिक्षित घरांतून आलेल्या दुर्गा खोटे, शोभना समर्थ व शाहू मोडक हे समकालीन कलावंत होते. भालजी पेंढारकर व मा. विनायक यांनी सामाजिक प्रबोधनपर चित्रपट तयार केले. ‘राम जोशी’ ह्या १९४७ मध्ये आलेल्या चित्रपटाचे निर्माता व्ही. शांताराम होते, तर दिग्दर्शक होते बाबुराव पेंटर. जयराम शिलेदार, हंसा वाडकर, ग. दि. माडगूळकर, संगीतकार वसंत देसाई अशा कलाकारांची मांदियाळी असलेला हा चित्रपट अतिशय सुरेख झाला होता.

राम गबाले दिग्दर्शित ‘वंदे मातरम’ हा चित्रपट १९४८ साली आला. यात पु.ल. देशपांडे व सुनीता देशपांडे यांनी काम केले होते. कथा, पटकथा, संवाद ग.दि. माडगूळकर यांचे होते.

संगीत, पटकथा, संवाद पु.ल.देशपांडे यांचे व दिग्दर्शन राम गबाले यांचे असा ‘देवबाप्पा’ हा छोट्यांसाठीचा नितांत सुंदर चित्रपट प्रदर्शित झाला अन्‌ मोठ्यांनाही भावून गेला. ‘नाच रे मोरा’, ‘इवल्या इवल्याश्या टिकल्या टिकल्यांचे’ ह्या गाण्यांसाठीही हा चित्रपट खूप गाजला. याच काळात स्वत: पु. ल. देशपांडे यांनी दिग्दर्शित, अभिनित - कथा, पटकथा, संवाद सर्व काही पु. ल. च असलेला ‘गुळाचा गणपती’ हा चित्रपट आला. हा प्रयोग म्हणजे `सबकुछ पुलं' होता. संगीत, दिग्दर्शनही पुलंचेच होते. यांतील ‘इंद्रायणी काठी’ हे पं. भीमसेन जोशींनी गायलेले भक्तिगीत आजही लोकप्रिय आहे. ही कुणी छेडीली तार, इथेच टाका तंबू यांसारखी अवीट गोडी असलेली गाणी हे या चित्रपटाचे वैशिष्ट्य. पु.ल. देशपांडे यांच्या निरागस, नैसर्गिक व सहजसुंदर अभिनयाने नटलेल्या या चित्रपटातील साध्या-सरळ मनाच्या पु.लं. चे दर्शन लोकांच्या हृदयाला हात घालणारे होते. पुढील काळात मराठी चित्रपट सृष्टीत पु. ल. देशपांडे यांचे प्रत्यक्ष (वळीशलीं) योगदान कमी राहिले.

१९४९-५० या काळात सुमारे १३ चित्रपट तयार झाले. दिनकर द. पाटलांच्या ‘राम राम पाव्हणं’ यास लता मंगेशकरांनी प्रथमच संगीत दिले. लतादीदींच्या ‘सुरेल चित्र’ संस्थेने वादळ, कांचनगंगा, शिकलेली बायको, कन्यादान, लक्ष्मी आली घरा इत्यादी उत्तम चित्रपट निर्माण केले. या चित्रपटांचे दिग्दर्शक माधव शिंदे यांना सर्वोच्च राष्ट्रपती पदकही मिळाले. १९५० ते ६० या दशकात अनेक सामाजिक, ऐतिहासिक, स्त्रीप्रधान चित्रपट तयार झाले.

प्रभातमधून बाहेर पडलेल्या दत्ता धर्माधिकारी, अनंत माने, इ. महंमद वगैरेंनी ‘आल्हाद चित्र’ संस्था स्थापन केली. १९५१ मध्ये ‘बाळा जो जो रे’ चित्रीत झाला व त्याने अमाप यश मिळविले. यांतील सूर्यकांत व उषा किरण या जोडीने पुढे १२ चित्रपट एकत्र केले. ‘आल्हाद चित्र’ ने स्त्रीप्रधान चित्रपट बनविले. त्यांची आर्थिक बाजू भक्कम झाली होती. ‘महात्मा’ हा हिंदी चित्रपट दत्ता धर्माधिकारींनी भव्य प्रमाणात बनवला व तो साफ कोसळला. परिणामी आल्हाद चित्र संस्था बंद करावी लागली. याच काळात १९५१ मध्ये व्ही. शांताराम यांनी निर्माण व दिग्दर्शित केलेला ‘अमर भूपाळी’ (कवी होनाजीबाळा) कान्स महोत्सवात झळकला व त्यास उत्कृष्ट ध्वनिमुद्रणासाठी पॅरिस येथील संस्थेकडून पारितोषिक मिळाले.

‘मी तुळस तुझ्या अंगणी’ हा राजा ठाकूर, ग. दि. माडगूळकर, सुधीर फडके ह्या त्रयीचा चित्रपट १९५५ चे राष्ट्रपती रौप्यपदक विजेता होता. यातील पं. भीमसेन जोशींनी गायलेली गाणी शास्त्रीय संगीतावर आधारीत होती. ज्येष्ठ लेखक व कथाकथनकार व्यंकटेश माडगूळकरांनी यात भूमिका केली होती हे विशेष. नंतर १९५७ साली आलेल्या ‘गृहदेवता’ ह्या लता मंगेशकरांच्या ‘सुरेल चित्र’ च्या चित्रपटासही राष्ट्रपतींचे रौप्यपदक मिळाले. ताश्कंद चित्रपट महोत्सवात (रशिया) दाखल झालेला हा पहिला मराठी चित्रपट ठरला. सुप्रसिद्ध गायक हेमंत कुमार यांनी दिग्दर्शित केलेला ‘नायकिणीचा सज्जा’ हा याच काळातील विशेष चित्रपट होय.

चित्रपटांतील नवी लहर :
हिंदी चित्रपटांच्या आक्रमणामुळे मराठी चित्रपट चित्रपटगृहांत १/२ आठवड्यांवर तग धरीत नसत. पण १९५९ साली आलेल्या अनंत माने दिग्दर्शित ‘सांगत्ये एका’ ने सर्व विक्रम मोडले. पुण्यात विजयानंद थिएटरमध्ये हा चित्रपट १३१ आठवडे चालू होता. या चित्रपटामुळे मराठी चित्रसृष्टीत एक नवी प्रेरणा निर्माण झाली. ‘एक गाव बारा भानगडी’, ‘केला इशारा जाता जाता’ यांसारख्या ठसकेबाज, तमाशाप्रधान ग्रामीण चित्रपटांची नवी लहर अनंत माने यांनी निर्माण केली. त्यांचे चित्रपट यशस्वी ठरत होते. याच काळात माधव शिंदे, राजा परांजपे, अनंत माने यांनी उत्तम चित्रपटनिर्मिती केली. उदा. जगाच्या पाठीवर, मानिनी, एक धागा सुखाचा, प्रपंच, रंगल्या रात्री अशा हे राज्य पुरस्काराचे मानकरी असलेले तत्कालीन चित्रपट... मानिनीमध्ये बहिणाबाईंच्या गाण्यांचा प्रथमच वापर करण्यात आला. `मोहित्यांची मंजुळा' या चित्रपटास लता मंगेशकरांनी ‘आनंदघन’ या टोपण नावाने संगीत दिले.

काशीनाथ घाणेकर व भावना यांचा अप्रतिम अभिनय असलेला ‘पाठलाग’ हा १९६४ साली प्रथम महाराष्ट्र राज्य चित्रपट मंचाचा पुरस्कर विजेता ठरला. या काळात तमाशापट अधिक संख्येने आले. त्यातच ‘साधी माणसं’ ह्या भालजी पेंढारकरांनी तयार केलेल्या चित्रपटातून साध्या सरळ मनाच्या माणसाचे मराठमोळे दर्शन परत एकदा झाले. त्या काळात जयश्री गडकर, राजा गोसावी, रमेश देव, सीमा देव, चंद्रकांत, सूर्यकांत, सुलोचना हे सर्व कलाकार यशाच्या शिखरावर होते.


दिग्दर्शक राजदत्त यांनी काशीनाथ घाणेकरांना बरोबर घेऊन ‘मधुचंद्र’ हा यशस्वी चित्रपट दिला. राजदत्त यांचे चित्रपट कौटुंबिक असत. १९६९ मध्ये राजा परांजपेंच्या ‘अपराध’ या चित्रपटास महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवाचे सर्वोत्कृष्ट चित्राचे पारितोषिक मिळाले. भालजी पेंढारकरांचा ‘तांबडी माती’ हा या काळात आलेला दादा कोंडकेंचा पहिला चित्रपट होय. १९७० मध्ये आलेल्या ‘घरकुल’ या चित्रपटातील गाणी खूप गाजली. संगीतकार होते सी. रामचंद्र.

आर्थिक यशासाठी मराठी सिनेमा धडपडत असताना १९७१ साली दादा कोंडके यांच्या ‘सोंगाड्या’ ने ग्रामीण व शहरी प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे खेचून आणले. याच वेळी (१९७२) व्ही. शांताराम यांचा ‘पिंजरा’ हा चित्रपट आला. डॉ. श्रीराम लागू व संध्या यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाने इतिहास घडवला. प्रभावी पटकथा, उत्कृष्ट अभिनय, परिणामकारक गीते आणि अद्वितीय संगीत ही याची वैशिष्ट्ये. संगीतकार राम कदम यांनी या चित्रपटाच्या संगीतावर खूप कष्ट घेतले. रसिकांनी या संगीताचा आनंद लुटला आणि त्याचे फळ कदम यांनाही मिळाले.

करपरतीची योजना :
१९७५ मध्ये महाराष्ट्र सरकारने करपरतीची (टॅक्स फ्री ) योजना सुरू केली. चित्रपटांची संख्या वाढू लागली. १९८१ ते १९९१ ह्या दहा वर्षांच्या कालखंडात अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, रंजना, आशा काळे, निळू फुले, उषा चव्हाण, उषा नाईक, दादा कोंडके, रवींद्र महाजनी या कलाकारांचे चित्रपट आले व विनोदी चित्रपटांची एक जबरदस्त लाटच निर्माण झाली. या काळात काही दर्जेदार प्रयत्न यशस्वी ठरले. पण चित्रपटसृष्टी बहरली नाही, प्रेक्षकांनी मराठी चित्रपटांकडे व चित्रपटगृहांकडे पाठच फिरवली.

वेगळ्या वाटेवरचे प्रवासी :
या सर्व चित्रपटांच्या गर्दीत जब्बार पटेल यांनी विजय तेंडुलकर लिखित ‘सामना’ हा मराठी चित्रपट दिग्दर्शित केला. हा पटेल यांचा पहिलाच चित्रपट, तसेच बर्लिन महोत्सवात गेलेला हा पहिला मराठी चित्रपट होय. या चित्रपटाने प्रेक्षकांना (व समीक्षकांना) एक वेगळा, समृद्ध अनुभव दिला. १९७७ मध्ये आलेला शांताराम बापूंचा (आरती प्रभूंच्या कथेवर आधारलेला) ‘चानी’, एफ.टी.आय.आय. च्या विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘घाशीराम कोतवाल’, तसेच जब्बार पटेल दिग्दर्शित व हृदयनाथांचे संगीत असलेला ‘जैत रे जैत’ हे अनेक चांगले चित्रपट आले. १९७९ मध्ये आलेल्या ‘२२ जून १८९७’ ह्या नचिकेत व जयू पटवर्धन यांच्या राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त चित्रपटाची दखल घ्यावीच लागेल.चापेकर बंधूंच्या जीवनावर व त्यांच्या बलिदानावर आधारलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांना आकर्षित करतो. १९७९ मध्येच चि. वि. जोशींची कथा व पु. ल. देशपांडे यांचे निवेदन हा योग ‘चिमणराव गुंड्याभाऊ’ ह्या चित्रपटात जुळून आला. राजा बारगीर, वसंत पेंटर, कमलाकर तोरणे, वसंतराव जोगळेकर, दत्ता माने हे नव्या दमाचे दिग्दर्शक पुढे आले.

१९८१ साली अमोल पालेकर दिग्दर्शित ‘आक्रित’ हा चित्रपट आला. ‘झाकोळ’ हा श्रीराम लागूंनी दिग्दर्शित केलेला पहिला चित्रपट आला. अभिनेत्री तनुजाचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. १९८१ मध्ये बर्‍याच कालावधीनंतर आलेल्या भालजी पेंढारकर लिखित ‘बाल शिवाजी’ ला आंतरराष्ट्रीय नवयुवा चित्रमहोत्सवात सर्वोत्कृष्ट दुसर्‍या क‘मांकाचे पारितोषिक मिळाले. याचे दिग्दर्शक होते प्रभाकर पेंढारकर. याच वर्षी ‘बाजीरावाचा बेटा’ हा पारिजात चित्रचा राजा ठाकूर दिग्दर्शित अमोल पालेकरांचा प्रथम चित्रपट आला. ‘दोन्ही घरचा पाहुणा’ हा गीतविरहीत असा चित्रपट अशोक सर्रोंचा पहिला व हिंदीतील अभिनेता संजीवकुमारचा पहिला मराठी चित्रपट होता. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळाने निर्माण केलेला पहिला मराठी चित्रपट ‘अत्याचार’ हा दया पवारांच्या ‘बलुतं’ ह्या आत्मकथनावर आधारीत होता. भास्कर चंदावरकरांनी दिग्दर्शित केलेला पहिलाच चित्रपट व अभिनेता सतीश पुळेकरांचाही हा पहिलाच चित्रपट होता, साल होते १९८२. पण दुर्दैवाने हा चित्रपट प्रदर्शित झाला नाही.


दादा कोंडकेंचे एकापाठोपाठ एक चित्रपट यशस्वी झाले. सोंगाड्या, एकटा जीव सदाशिव, पांडू हवालदार, तुमचं आमचं जमलं, राम राम गंगाराम, बोट लावीन तिथं गुदगुल्या, ह्योच नवरा पाहिजे, आली अंगावर इत्यादी चित्रपटांनी महाराष्ट्रात अक्षरश: धुमाकूळ घातला. जवळजवळ सर्वच चित्रपटांत दादांच्या आईच्या भूमिकेत ‘रत्नमाला’ होत्या, तर नायिकेच्या भूमिकेत ‘उषा चव्हाण’ होत्या. चित्रपटांच्या यशात या दोघींचाही वाटा होता. यानंतर सचिन पिळगांवकर व महेश कोठारे यांनी निर्भेळ मनोरंजन करणारे चित्रपट दिले.



नव्याने स्वागत : (१९८० नंतर....)
१९८५ मध्ये आलेला ‘गड जेजुरी जेजुरी’ हा चित्रपट सुप्रसिद्ध संगीतकार राम कदम यांनी प्रथम दिग्दर्शित केलेला चित्रपट होय. हाच नाना पाटेकरांचा पहिला मराठी चित्रपट. यातील ग. दि. माडगूळकर व पी. सावळाराम यांची पदे गाजली.


१९८८ च्या दरम्यान प्रदर्शित झालेले, नवरी मिळे नवर्‍याला, गम्मत जम्मत, अशी ही बनवाबनवी हे शहरी पार्श्र्वभूमीचे चित्रपट लोकांना आवडले व सुवर्ण महोत्सवी ठरले. महेश कोठारेंचे थरथराट, धुमधडाका, दे दणादण असे प्रसंगनिष्ठ विनोदी (पंचाक्षरी नावाचे) चित्रपट ग्रामीण व शहरी दोन्ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले. थरथराटने उत्पन्नाचे प्रचंड विक‘म केले. सचिन पिळगावकर दिग्दर्शित व नीलकांती पाटेकर अभिनित ‘आत्मविश्र्वास’ ने चार पारितोषिके मिळवली. ‘कळत-नकळत’ हा स्मिता तळवलकर निर्मित सकस चित्रपटही अनेक पारितोषिकांचा विजेता ठरला. याच साली आलेला महेश सातोस्कर दिग्दर्शित व हृदयनाथ मंगेशकरांचे संगीत असलेला ‘निवडुंग’ हा उत्कृष्ट चित्रपट होता. यामध्ये कलाकाराचे जीवन वेगळ्या धाटणीने चित्रीत केले होते. १९८९ मध्ये ‘सूर्योदय’ व ‘हमाल दे धमाल’ हे दोन्ही चित्रपट अनेक पारितोषिके मिळवून गेले. १९९० मध्ये आलेल्या ‘आघात’ ने २८ व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट महोत्सवामध्ये नऊ पारितोषिके मिळवली. नाट्यक्षेत्रातून चित्रपटांत आलेले संजय सूरकर (दिग्दर्शक) व वेगळी उद्दिष्टे समोर ठेवून निर्माती बनलेल्या स्मिता तळवलकर या जोडीने १९९१ मध्ये ‘चौकट राजा’ हा मतिमंद व्यक्तीच्या भावजीवनाचा वेध घेणारा चित्रपट दिला. यातील दिलीप प्रभावळकरांचा अभिनयही गाजला. १९९२ साली आलेले आपली माणसं व एक होता विदुषक हे दोन्ही उत्तम चित्रपट होते. दिग्दर्शक जब्बार पटेल; पटकथा, संवाद लेखन पु.ल. देशपांडे; संगीतकार आनंद मोडक व गीतकार ना. धों. महानोर अशी ‘एक होता विदुषक’ ची दर्जेदार टीम होती. आपली माणसं हा ‘सुयोग च्या सुधीर भट यांचा चित्रपट संजय सूरकरांनी दिग्दर्शित केला होता. यामध्ये कौटुंबिक पार्श्र्वभूमीवर, मानवी स्वभाव वैशिष्ट्यांचा, स्वार्थी मानसिकतेचा प्रखरतेने, टोकदारपणे वेध घेतलेला आहे.

१९९३ ते ९८ मध्ये आलेले चांगले कथानक असलेले काही चित्रपट म्हणजे वजीर, मुक्ता, दोघी, रावसाहेब, बनगरवाडी हे होत. तसेच १९९८ मधील दिग्दर्शक यशवंत भालकरांचा ‘पैज लग्नाची’, स्मिता तळवलकरांचा ‘तू तिथं मी’, एफ. डी. सी. चा ‘गाभारा’ हे काही उत्तम चित्रपट. हिंदीतील नायिका तब्बूचा पहिलाच मराठी चित्रपट व सचिन खेडेकर, नम्रता शिरोडकर, स्मिता जयकर, रवींद्र मंकणी अभिनित आणि महेश मांजरेकर यांची कथा-पटकथा व दिग्दर्शन असलेला ‘अस्तित्व’ प्रेक्षकांना खूपच भावला. २००० मध्ये आलेला अमोल पालेकरांचा ‘ध्यासपर्व’ वेगळ्या विषयावरील उत्तम चित्रपट होता. ‘ध्यासपर्व’ मधून पालेकरांनी रघुनाथ धोंडो कर्वे या द्रष्ट्या समाजसुधारकाचे जीवन व विचार दर्शन घडवले. २००२ मध्ये सुमित्रा भावे, सुनील सुकथनकरांचे दोन अप्रतिम सिनेमे आले. ‘१० वी फ’ आणि ‘वास्तुपुरुष’. ‘१० वी फ’ या शालेय विद्यार्थ्यांवर आधारीत चित्रपटाचे सर्व स्तरांत चांगले स्वागत झाले. महाराष्ट्रातील अनेक शाळांमधेही ह्या चित्रपटाचे प्रयोग झाले.

वाढती आशयघनता, तंत्रशुद्ध निर्मिती व व्यावसायिकतेने वितरण :
चित्रपट पाहतांना प्रेक्षकांना त्यांतील पात्रांशी, कथेशी एकरूप व्हायला आवडते. गजेन्द्र अहिरे यांनी स्वत: दिग्दर्शन केलेल्या ‘नॉट ओन्ली मिसेस राऊत’, ‘पांढर’ सार‘या चित्रपटांची कथा-पटकथा अहिरे यांनीच स्वत: लिहिली आहे. २००२ मधे दीपक सावंत दिग्दर्शित ‘श्वास’ ने बर्‍याच कालावधीनंतर मराठी चित्रपटाला राष्ट्रपती ‘सुवर्ण कमळ’ मिळवून दिले. विषयातील नावीन्य व नैसर्गिक अभिनय असलेला हा चित्रपट ऑस्करपर्यंत धडक मारून आला. या चित्रपटाने मराठी चित्रपटसृष्टीला उत्साहाचा, चैतन्याचा नवा ‘श्र्वास’ दिला.

अलीकडे नवे विषय, नव्या दमाचे कलाकार, उच्च निर्मिती मूल्ये, सुंदर चित्र-चौकटी, तंत्रातील सर्वांगीण सुधारणा, परदेशात चित्रीकरणे, धाडसी प्रयोगशीलता ही मराठी चित्रपटाची वैशिष्ट्ये प्रचलित होत आहेत. आर्थिक उलाढालीही वाढत असून पूर्वीच्या तुलनेत आता कलाकाराची मिळकत वाढते आहे. ग्लोबल वातावरणात, शहरीकरणाच्या जमान्यात, तारांकित चित्रपट गृहांमध्येही मराठी चित्रपट आता दिमाखाने व्यवसाय करत आहेत.

‘पक पक पकाक’ (नाना पाटेकर, सक्षम कुलकर्णी); ‘नवरा माझा नवसाचा’ (सचिन व सुप्रिया); ‘डोंबिवली फास्ट’ (संदीप कुलकर्णी); देवराई (अतुल कुलकर्णी); उत्तरायण (शिवाजी साटम, नीना कुलकर्णी) इत्यादी... हे अलीकडचे चित्रपट उल्लेखनीय होत. या चित्रपटांनी उत्तम व्यवसायही साधला आणि ते प्रेक्षकांच्या व समीक्षकांच्याही पसंतीला उतरले.

२००६ मध्ये एकूण सुमारे ४२ चित्रपट प्रदर्शित झाले. त्यांतील सुमित्रा भावेंचा ‘नितळ’ हृदयस्पर्शी होता. अनेक वर्षांनी आलेला जयू व नचिकेत पटवर्धनचा ‘लिमिटेड माणुसकी’, अजय फणसेकरांचा ‘रात्र आरंभ’ हे वेगळ्या धर्तीचे चित्रपट होते. नुकत्याच आलेल्या ‘वळू’ व ‘टिंग्या’ची घोडदोड वेगाने सुरू आहे. ‘दे धक्का’, ‘कायद्याचं बोला’, ‘घरोघरी मातीच्या चुली’, ‘जत्रा’, ‘नामदार मुख्यमंत्री गणप्या गावडे... आदी चित्रपटांचाही उल्लेख करणे इष्ट ठरेल. आता चित्रपट तांत्रिक दृष्ट्या अधिकाधिक प्रगत होत आहेत. करपरतीच्या शासनाच्या धोरणामुळे प्रेक्षकही खूष आहेत. मराठी चित्रपट क्षेत्राच्या पंचाहत्तरीत सर्वच पातळीवर प्रगती झाली आहे. जागतिक दर्जाची कथानके आपल्याकडे आहेत. त्यांवर दर्जेदार चित्रपटनिर्मिती होऊन कान्स, बर्लिनसार‘या प्रथितयश महोत्सवांमधून मराठी चित्रपट आता दाखविले गेले पाहिजेत, अशी प्रेरणा नव्या दमाच्या कलाकारांमध्ये मूळ धरत आहे.

मराठी चित्रपट महामंडळ :
१९६२ साली महाराष्ट्र सरकारने मराठी चित्रपटांना पारितोषिके देण्याची योजना सुरू केली. दिनांक २३ मार्च, १९६५ रोजी मराठी चित्रपट महामंडळाची स्थापना झाली. १९ फेब्रुवारी, १९७५ रोजी करपरतीची (टॅक्स फ्री) योजना सरकारने सुरू केली व इतर अनेक मागण्यांसाठी निर्माते व शासन यांच्यात संवाद सुरू झाला. पुढे १९८४ मध्ये महेश कोठारे, रामदास फुटाणे, विजय कोंडके, बाळासाहेब सरपोतदार आदी नवीन मंडळींनी (निर्मात्यांनी) अखिल भारतीय मराठी चित्रपट मंडळाची स्थापना केली. केंद्र सरकारशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी `फिल्म फेडरेशन ऑफ इंडिया’ या सर्वभाषिक सर्वोच्च संघटनेचे सभासदत्व मिळवले व आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांसाठी मराठी चित्रपटांना योग्य ते स्थान मिळाले.


दिग्गज कलाकार
आज सुमारे ७५ वर्षानंतर मराठी सिनेमा ज्या उंचीवर येऊन स्थिरावला आहे, त्यासाठी अनेक प्रभृतींनी आपले योगदान दिले. त्यांची योग्यता जाणून घेतल्यावर मराठी चित्रपटांची खोली व उंची आपल्या लक्षात येईल.

भालजी पेंढारकर एक वटवृक्ष :
१९४८ मध्ये गांधीजींची हत्या झाल्यानंतरच्या दंगलीमध्ये भालजींचा ‘जयप्रभा’ स्टुडिओ (कोल्हापूर) जाळला गेला. नुकताच तयार झालेला ‘मीठभाकर’ व बाळ गजबरांचा ‘मेरे लाल’ हे चित्रपट आगीत भक्षस्थानी पडले. दीडशे ते दोनशे कामगार बेकार झाले. भालजींनी पुन्हा लाखो रुपये खर्चून ‘जयप्रभा’ स परत उभे केले. जिद्दीतून ‘मीठभाकर’ व ‘मेरे लाल’ ची पुनर्निर्मिती केली. मीठभाकरने चांगला व्यवसाय केला. भालजींनी कोल्हापुरात मराठी चित्रनिर्मितीस वेग मिळवून दिला.

भारताला स्वातंत्र्य मिळाले होते. गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त झाल्याच्या भावनेचा व स्वातंत्र्याचा दिव्य संदेश भालजींनी आपल्या चित्रपटांतून दिला. बहिर्जी नाईक, नेताजी पालकर, मोहित्यांची मंजुळा यांतून दुबळेपणा व लाचारीविरुद्ध शाद्बिक आसूड संवादातून ओढले. स्वातंत्र्य मिळाले तरी सुराज्य निर्माण करण्यासाठी त्याग, निष्ठा, औदार्य व संयमी असा खंबीरपणा आणि आत्मविश्र्वास असलेली तरुण पिढी तयार व्हावी यासाठी त्यांनी चित्रनिर्मिती केली. अशा समृद्ध आशयासह कला व तंत्र या दोन्ही दृष्टीकोनातून उत्कृष्ट असे चित्रपट भालजींनी महाराष्ट्राला दिले. भालजींचे चित्रपट किंवा त्यांची निर्मिती संस्था म्हणजे कलाकार व तंत्रज्ञ घडवणारी एक मोठी कार्यशाळाच होती. तसेच त्यांचा ‘संच’ म्हणजे ‘कुटुंबच होते. शिस्तबद्धता, वेळापत्रकानुसार काम, कामांचे नेटके वाटप, स्तोत्रपठण, प्रार्थना, रेखीव दिनक्रम... या माध्यमातून भालजींनी सुलोचनादीदी, मांडरे बंधू, जयश्री गडकर असे असंख्य कलाकार घडवले. ‘शिवकाळ’ आणि त्या काळातील व्यक्तिरेखा व प्रसंग ही भालजींच्या चित्रपटांची प्रमुख वैशिष्ट्ये होती. त्यांच्या युगप्रवर्तक अशा कारकीर्दीमुळे भालजींना यथार्थतेने ‘चित्रतपस्वी’ असे म्हटले जाते.

असामान्य राजा परांजपे :
१९४८ मध्ये आलेल्या मंगल पिक्चर्सतर्फे ‘जिवाचा सखा’ या चित्रपटाने रौप्यमहोत्सव साजरा केला. राजा परांजपे, सुधीर फडके व ग. दि. माडगूळकर (सुप्रसिद्ध त्रिकूट) यांनी मिळून चित्रपट सृष्टीत अत्यंत मोलाची भर घातली व १९४८ ते १९६९ पर्यंतच्या मराठी बोलपटांच्या सुवर्णकाळात महत्त्वाची भूमिका बजावली. राजा परांजपेंच्या ‘पुढचं पाऊल’ मध्ये स्वत: राजाभाऊ, हंसा वाडकर, पु. ल. देशपांडे, ग.दि. माडगूळकर, द.स. अंबपकर अशी नामवंत मंडळी एकत्र आली होती. पेडगांवचे शहाणे, लाखाची गोष्ट, ऊन पाऊस, जगाच्या पाठीवर, सुवासिनी, हा माझा मार्ग एकला, पाठलाग, पडछाया इत्यादी अप्रतिम चित्रपटांची राजाभाऊंनी निर्मिती केली. त्यांची बुद्धिमत्ता व प्रतिभा अष्टपैलू होती. अभिनय, संगीत, साहित्य(लेखन), दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रांची त्यांना चांगलीच जाण होती. ९ फेब्रुवारी, १९७९ मध्ये त्यांचे निधन झाले.

आचार्य अत्रे :
नाट्य, पत्रकारिता, साहित्य आदी क्षेत्रांत यशस्वी वाटचाल करणार्‍या प्र. के. अत्रे यांनी चित्रपट क्षेत्रातही आपला ठसा उमटवला. १९५३ मध्ये निर्मिती, दिग्दर्शन, पटकथा प्र.के. अत्रे यांची असलेल्या, साने गुरुजींच्या कादंबरीवर आधारीत ‘श्यामची आई’ ह्या चित्रपटास राष्ट्रपतींच्या हस्ते सर्वोत्कृष्ट चित्रपटाचे सुवर्णपदक मिळाले. राष्ट्रपती पदक देण्यास सुरुवात झाल्यानंतर पहिल्याच वर्षी या चित्रपटास हे पदक मिळाले. म्हणजेच ‘श्यामची आई’ हा पहिले सुवर्णपदक विजेता आणि पदक विजेता पहिला मराठी चित्रपट ठरला. ‘आई म्हणुनी कोणी आईस हाक मारी’ सारखी गाणी संगीतकार म्हणून वसंत देसाईंनी दिली. वनमाला, माधव वझे, दामुअण्णा मालवणकर, प्रबोधनकार ठाकरे आदींच्या यात भूमिका होत्या. पुढच्याच वर्षी निर्माता, दिग्दर्शक आचार्य अत्रे असलेल्या ‘महात्मा फुले’ ह्या चित्रपटासही राष्ट्रपतीपदक मिळाले. यातील बाबूराव पेंढारकर, सुलोचना, बापूराव माने इत्यादींच्या भूमिका खूप गाजल्या होत्या. अत्रे यांनी आपल्या चित्रपटनिर्मिती संस्थांच्या माध्यमातून ‘श्यामची आई’ सह, ब्रह्मचारी, ब्रॅडीची बाटली, वसंतसेना इत्यादी लोकप्रिय चित्रपट निर्माण केले.

काही लेखक :
मराठीत दर्जेदार साहित्यनिर्मिती नेहमीच होत आली आहे. उत्कृष्ट कथा-कादंबर्‍या-नाटकांचे चित्रपट क्षेत्रातील निर्माता-दिग्दर्शकांना नेहमीच आकर्षण वाटत आले आहे. त्याचा परिणाम पूर्वीपासून काही चित्रपटांमध्ये दिसतो. १९२३ साली बाबुराव पेंटर स्वत: शिवाजीच्या भूमिकेत व २० वर्षाचे शांतारामबापू ऐंशी वर्षाच्या शेलारमामाच्या भूमिकेत एका चित्रपटात चमकले. तो ह. ना. आपटे यांच्या ‘गड आला पण सिंह गेला’ या कादंबरीवरून घेतलेला मूकपट होता. हंस पिक्चर्सच्या ‘छाया’स गोहर गोल्ड कमिटीचे १९२६ सालच्या सर्वोत्तम चित्रकथेसाठीचे बोलपटातले पहिले सुवर्णपदक मिळाले. वि.स.खांडेकर यांना ते ‘हंस’ ने अर्पण केले होते. ना. ह. आपटेंच्या ‘न पटणारी गोष्ट’ वरून बेतलेला प्रभातचा ‘कुंकू’ सर्वश्रृत आहे. साहित्यप्रेमी मा. विनायकांनी आचार्य अत्रेंकडून ब्रह्मचारी, अर्धांगी हे चित्रपट लिहून घेतले. वि.वि. बोकीलांच्या ‘मंगळागौरीच्या रात्री’ या कादंबरीवरून ‘पहिली मंगळागौर’ हा चित्रपटही लिहून घेतला. स्नेहप्रभा प्रधान व शाहू मोडक या देखण्या व सुयोग्य जोडीचा हा चित्रपट खूप गाजला. नाथ माधव यांच्या ‘डॉक्टर’ या कादंबरीवरचा ‘शिकलेली बायको’ हा चित्रपट उषा किरणच्या सुंदर अभिनयाने व वसंत प्रभूंच्या संगीतामुळे रौप्यमहोत्सवी झाला. गो. नी. दांडेकर लिखित ‘पवनाकाठचा धोंडी’, ‘जैत रे जैत’ या कादंबर्‍यांवरील चित्रपट उत्कृष्ट ठरले.

ग. दि. माडगूळकरांनी उमेदवारीच्या काळात मा. विनायकांकडे कोल्हापुरात हंस पिक्चर्समधे बिनपगारी नोकरी केली. प्रथमच ‘पहिला पाळणा’ मधील गीते लिहिली. ‘रामजोशी’ या चित्रपटात शांताराम बापूंबरोबर कथा,पटकथा,संवाद, गीते, अभिनय या सर्वच विभागांत काम केले. ‘माया बाजार’, ‘वंशाचा दिवा’, ‘जीवाचा सखा’, ‘मानाचं पान’ इत्यादी पुढचे चित्रपट सकस कथानकांसह त्यांच्या प्रतिभेची साक्ष देतात. स्वातंत्र्यपूर्व काळात आचार्य अत्रे, वि.स.खांडेकर, विश्राम बेडेकर हे श्रेष्ठ लेखक चित्रपट क्षेत्रांसाठी लिहीत होते. परंतु त्या काळी दिग्दर्शकांची छाप अधिक असे. अशा काळात गदिमांनी लेखनास प्रतिष्ठा व यश मिळवून दिले. गदिमा प्रतिभासंपन्न होते. भजन, भूपाळी, पोवाडा, लावणी, भावगीत, इतकेच नव्हे तर बालगोपाळांसाठीही गदिमांनी गाणी लिहिली. त्यांचा चित्रपटात वापर झाला.


यशस्वी पटकथा लेखकांमधे व्यंकटेश माडगूळकर, अण्णा देऊळगांवकर, दिनकर द. पाटील, चि. य. मराठे, य. गो. जोशीं, पं. महादेवशास्त्री जोशी यांचे योगदान आहे. शिवाय शाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या कादंबर्‍यांवरील चित्रपटही गाजले. ग.ल. ठोकळ व शंकर पाटलांच्या ग्रामीण कथा, द. मा. मिरासदारांच्या विनोदी कथा व वसंत सबनीस यांच्या काही कथा - यांवर आधारीत चित्रपटही प्रदर्शित झाले.

जब्बार पटेल यांनी अरुण साधूंच्या ‘मुंबई दिनांक’ व ‘सिंहासन’ या दोन्ही कादंबर्‍यांचा मिर्लों करून राजकारणाचे भेदक चित्रण करणार्‍या ‘सिंहासन’ ची निर्मिती केली. मूकपटांच्या कथा लिहिणार्‍या मामा वरेरकरांपासून ते पु. ल. देशपांडे, वसंत कानेटकर इत्यादी लेखकांच्या पटकथांनी चित्रपट सृष्टी समृद्ध झालेली आहे. कथा-पटकथा म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. मराठीत अशा लेखकांना उदंड लोकप्रियता मिळाली आहे.

‘१० वी फ’ हा सुमित्रा भावेंचीच कथा असलेला सुंदर चित्रपट होता. ‘ध्यासपर्व’ ची कथा-पटकथा चित्रा पालेकरांची होती. पूर्वीच्या स्त्री लेखिकांमधील सुमती क्षेत्रमाडेंच्या ‘वृंदा’ वर आधारीत ‘सुखाची सावली’, शकुंतला गोगटेंच्या ‘चांदणे शिंपीत जा’ वरून केलेला राजा परांजपे दिग्दर्शित ‘आधार’ व ‘शून्याची व्यथा’ वरील ‘कळत नकळत’ हे चित्रपट यशस्वी ठरले. रोहिणी कुलकर्णींच्या ‘भेट’ वर आधारीत त्याच नावाचा चित्रपट रसिकांना भावला.

प्रतिभावंत कवी -
कवितांच्या दालनात अगदी सुरुवातीस, १९३१ - ३२ च्या काळात रेव्हरंड टिळकांच्या ‘पाखरा येशील कधी परतून’ या कवितेचे विडंबन केलेले प्र. के. अत्रे पडद्यावर दिसले. १९३५ मध्ये मा. विनायकांनी ‘विलासी ईश्र्वर’ मध्ये गोविंदाग‘जांची सुप्रसिद्ध ‘ही एक आस मनी’ कविता चित्रीत केली. माधव ज्युलियनांची ‘प्रेमस्वरूप आई’ ही कविता विश्राम बेडेकरांनी ‘माझं बाळ’ मध्ये कुशलतेने वापरली. ‘शामची आई’ मधील कवी यशवंत यांची गाजलेली कविता ‘आई म्हणोनी कोणी’ आशाताईंनी गायली होती. बा. भ. बोरकरांची अजरामर कविता ‘दिव्यत्वाची जेथे प्रचिती’ ही ‘पुत्र व्हावा ऐसा’ ह्या चित्रपटात चित्रबद्ध केली गेली. ‘अमर भूपाळी’ मधील लता मंगेशकर व पंडितराव नगरकरांच्या आवाजांतील वसंत देसाईंनी स्वरबद्ध केलेली ‘घन:श्याम सुंदरा श्रीधरा’ ही भूपाळी अमर ठरली. कवी यशवंत, भा. रा. तांबे, राजा बढे, पी. सावळाराम, मो. ग. रांगणेकर, अनंत काणेकर, फडके - खांडेकर, अत्रे-वरेरकर ही द्वयी या सर्वांचेच योगदान प्रचंड आहे.

१९५० च्या ‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटापासून पुढे सुरेख प्रसंगानुरूप गाणी लिहिणार्‍या कवयित्री शांताबाई शेळके यांच्या गीतांनी संपूर्ण महाराष्ट्राला जणू वेड लावले. राम कदम यांच्या संगीतासाठी जास्तीत जास्त गीते देणारे जगदीश खेबूडकर हेदेखील प्रतिभावान कवी होते. ‘पिंजरा’ ह्या शांताराम बापूंच्या चित्रपटासाठी त्यांनी नऊ गाण्यांना अंतिम स्वरूप देण्यासाठी - शांताराम बापूंचे समाधान होईपर्यंत - तब्बल १२० गाणी लिहिली.चित्रपटांच्या माध्यमातून सादर झालेल्या अशा अनेक गीतांचा आस्वाद आपण घेत असतो. कवी ग्रेस, सुरेश भट यांसारख्या कवी - साहित्यिकांची फार मोठी आहे.

गोविंदराव टेंबे -
प्रभातच्या बोधचिन्हाच्या तुतारीची स्वरावली ‘देसकार’ रागांत ज्यांनी बांधली, ते अत्यंत यशस्वी नाट्यसंगीत दिग्दर्शक, नाटककार, नाटक कंपनीचे मालक म्हणजे गोविंदराव टेंबे होत. बोलपटांच्या युगाच्या गाण्यांची नांदी त्यांनी केली. ३ मिनिटांमध्ये चित्रपटात गाणे बसविण्याचा प्रयोग प्रथमच त्यांनी केला व प्रभातच्या पहिल्या तीन चित्रपटांनी नाट्यजगतात व रसिकांत खळबळ उडवून दिली. त्यांनी १० मराठी व १२ हिंदी चित्रपटांना संगीत दिले. ते कवीसुद्धा होते. ते स्वत: भूमिका करून गाणीही संगीतबद्ध करीत असत. अभिजात संगीताची पार्श्र्वभूमी त्यांनी मराठी चित्रपटांसाठी तयार करून ठेवली.

केशवराव भोळे -
गोड गळ्याची देणगी असलेले केशवराव भोळे १९२६ मध्ये पुण्यात आले. काव्यगायन, भावगीत गायन करीत असतांना चाली देणे सुरू झाले. १९३१ पासून बोलपट युग सुरू झाले. विविध वाद्यांचा वापर हा प्रसंग, पात्ररचना यांस अनुरूप व्हायला हवा आणि स्वररचनेमुळे प्रसंग उठावदार झाला पाहिजे याकडे त्यांनी लक्ष दिले. पार्श्र्वगायनाचा पहिला प्रयोग त्यांनी ‘कृष्णावतार’ मध्ये केला. प्रभातमध्ये असताना त्यांनी अमृतमंथन, माझा मुलगा, संत तुकाराम, कुंकू इत्यादी चित्रपटांना संगीत दिले. १९३२ साली ते ज्योत्स्ना-बाईंशी विवाहबद्ध झाले. पुढे आकाशवाणी केंद्रावरील, सुगम संगीतातील त्यांची कारकीर्द प्रिसिद्धी मिळवून गेली.

मा. कृष्णराव -
मा. कृष्णराव फुलंब्रीकर हे गाण्याच्या जलशांचे कार्यक्रम भारतभर करीत असत. ते मागील पिढीतील तपस्वी ‘यालगायक होत. वेगवेगळ्या प्रांतांमधील रचनांचा त्यांनी उत्तम अभ्यास केला. वेदाध्ययन करणार्‍या मराठमोळ्या घरात जन्म झाल्याने संस्कारीत मन होते. ‘अमरज्योती’ या चित्रपटापासून पुढे, संगीत देण्याच्या शास्त्रीय प्रथेत थोडा बदल करून त्यांनी गोपाळकृष्ण, माणूस, शेजारी, वसंतसेना इत्यादी चित्रपटांना सुगम संगीताचा बाज दिला. कमीत कमी स्वरांचा वापर करून दिलेले ‘आता कशाला उद्याची बात’, ‘हासत वसंत ये वनी’ सारखी लोकप्रिय गीते त्यांनी दिली. त्यांनी दिलेली ‘वंदेमातरम’ ची झिंझोटी रागातील चाल आज सर्वत्र सामुदायिकरीत्या म्हटली जाते.

दत्ता डावजेकर -
६० वर्षांहून अधिक काळ संगीतकाराच्या भूमिकेतून महाराष्ट्रावर संगीताची बरसात करणारे दत्ता डावजेकर हे पुण्याच्या सरस्वती सिनेटोनमधून व सुरेशबाबू माने यांच्या हाताखाली काम करून तयार झाले. मा. विनायकांच्या ‘सरकारी पाहुणे’ साठी त्यांनी प्रथम संगीत दिले. नंतर कोल्हापूरला माझे बाळ, चिमुकला संसार, गजाभाऊ असे तीन चित्रपट त्यांनी केले. मराठी चित्रपटसंगीत क्षेत्रात लतादीदी, आशाताई यांना पार्श्र्वगायनाची पहिली संधी डावजेकरांनीच दिली. स्वतंत्र संगीत दिलेले, त्यांचे ‘पेडगांवचे शहाणे’, ‘रंगल्या रात्री अशा’, ‘पाठलाग’, ‘पडछाया’ आदी अनेक चित्रपट गाजले. इतर अनेक पुरस्कारांबरोबरच १९९५ च्या महाराष्ट्र शासनाच्या लता मंगेशकर पुरस्काराने त्यांचा गौरव झाला. यंग इंडिया ग्रामोफोन व एच. एम. व्ही. मध्येही त्यांनी काव्य लिहिणे व अनेक गीतांना चाली देणे असे काम केले. शेकडो चित्रपटांना संगीत देऊन १००० च्या वर गीतांना चाली दिलेले दत्ता डावजेकर खरोखर अद्वितिय संगीतकार होत.

मा. दीनानाथ मंगेशकर, अण्णासाहेब माईणकर, सुरेशबाबू माने, दत्तोपंत कोरगांवकर, सी. बाळाजी, सदाशिवराव नेवरेकर, श्रीधर पार्सेकर, सी. रामचंद्र या कलाकारांचा उल्लेख सुरुवातीचे संगीतकार म्हणून करावा लागेल. यांनी अनेक प्रयोग करून, चित्रपटमाध्यमाशी जुळवून घेत, अपुर्‍या तंत्रज्ञानातसुद्धा लोकप्रिय संगीत दिले.

वसंत प्रभू -
शास्त्रीय संगीताची बैठक असलेली सुमधूर व साधी-सोपी गाणी वसंत प्रभू यांनी दिली. लतादीदी, पी. सावळाराम व वसंत प्रभू या त्रिकुटाने पुढे भावगीतांच्या व चित्रपट गीतांच्या विश्र्वात गजानन वाटवे यांच्यानंतर कमालीचे यश मिळविले.

वसंत प्रभू लहानपणी कथ्थक शिकले. त्यांना तालासुरांची उत्तम जाण होती. उंचेपुरे, देखणे असणार्‍या वसंतरावांना सिनेमात हिरो व्हायचे होते. त्यासाठी पुणे, कोल्हापूरला प्रयत्न केले. शेवटी ते मुंबई येथे पोहोचले व प्रयत्नांती एच. एम. व्हीचे ते संगीतकार झाले.


‘राम राम पाव्हणं’ या चित्रपटात संगीत (काही गीते) व नृत्य दोन्हीचे दिग्दर्शन वसंत प्रभूंनी केले होते. लतादीदींच्या ‘सुरेल चित्र’ च्या बॅनरखाली बनलेल्या ‘वादळ’ ह्या चित्रपटात प्रभूंनी संगीत दिलेल्या एका ठुमरीला लतादीदींचा आवाज होता. ही ठुमरी एवढी लोकप्रिय झाली होती की (नागपुरात) लोक वन्समोअर देत व परत गाणं दाखवा नाहीतर थिएटर शाबूत रहाणार नाही, असा दम देत. त्या ठुमरीची वेगळी फिल्म बनवण्यात येऊन, तो तेवढाच रीळ दाखवून वन्समोअरची मागणी पुरी केली जाई. सिनेजगतातला असा चमत्कार अजबच म्हणावा लागेल.

दिनकर द. पाटलांच्या ‘तारका’ ह्या चित्रपटासाठी वसंतरावांनी खूप मेहनत घेऊन अभिनेत्री सुलोचनांकडून नृत्ये तयार करून घेतली. सुलोचना बाईंना अजिबात नृत्य येत नसतांना ह्या चित्रपटांतील त्यांच्या नृत्यांना प्रेक्षकांचा भरपूर प्रतिसाद मिळाला व सुलोचनाबाई नृत्यपारंगत झाल्या.

(पी. सावळारामांच्या गीतांमध्ये वात्सल्य, उदात्तता, भावपूर्णता असे. ‘घट डोईवर, घट कमरेवर’, ‘जो आवडतो सर्वांना’ ही त्यांची गाणी खूप गाजली.) ‘कन्यादान’ मुळे वसंत प्रभू, पी. सावळाराम, लता मंगेशकर हे जनमानसांत प्रचंड लोकप्रिय झाले. दिनकर पाटलांचा महत्त्वाकांक्षी चित्रपट ‘भैरवी’ यात वसंतरावांनी पं. फिरोज दस्तूर व दशरथ पुजारी यांच्याकडून काही गाणी करून घेतली. पंडितजींच्या बरोबर रागदारीतील गाणी करणे ही अद्वितीय गोष्ट वसंतरावांनी केली. ‘पुत्र व्हावा ऐसा’ या चित्रपटासाठी वसंत प्रभूंनी हिंदीतील तलत मेहमूदच्या आवाजात प्रथमच मराठीमधे दोन गाणी गाऊन घेतली. लताबाईंना ते फार मानीत असत. त्यांच्या आवाजाला ते ‘स्वर्गीय देणे’ म्हणत असत. १९५० ते १९७५ या काळात असंख्य चित्रपट गीतांना त्यांनी संगीतबद्ध केले.

व्हरांड्यात रात्री पडल्यानंतर त्यांना चाली सुचत व दुसर्‍या दिवशी स्नेही मारुती कीर यांच्याकडे जाऊन हार्मोनियमवर ते त्या चाली बांधत असत. ते फार स्वाभिमानी होते. कोणाकडे कामासाठी स्वत:हून जात नसत. जास्त व्यवहारीही नव्हते. सरळ, निष्पाप मनाचे होते. कडक शिस्तीचे, वेळेचे महत्त्व पाळणारे वसंतराव तापट व कडक होते. संगीताची जाण उपजतच होती. गाण्यांमध्ये व्हायोलिनचा सुंदर वापर त्यांच्यासारखा कोणी केला नाही. त्यांच्या रेकॉर्डस्‌चा विक्रमी खप झाला. ‘तुझ्या गळा माझ्या गळा’, ‘कोकीळा गा’, `प्रेम स्वरूप आई', `मधुमागसी माझ्या', `जन पळभर म्हणतील' यांसारखी अप्रतिम गाणी रसिकांच्या कायम स्मरणात राहतील. वसंत प्रभूंवरील श्री. मधू पोतदार यांनी लिहिलेले-‘मानसीचा चित्रकार तो’, हे - सुंदर पुस्तक वसंतरावांना अधिक जाणून घेण्यासाठी मुळातूनच वाचायला हवे.

वसंत देसाई -
वसंत देसाईंचे बालपण कोकणात गेले. काही तरी वेगळे करण्याची उर्मी त्यांना कोल्हापुरात घेऊन आली. कोल्हापुरात प्रभातमध्ये असतांना पडेल ते काम करीत असत. त्यांचे आयुष्य घडण्याला येथेच सुरुवात झाली. देवल क्लबमधे असतांना अल्लादियां खॉं व मंजी खॉं यांसारख्याचे गाणे ऐकून त्यांचे कान तयार झाले. ‘अयोध्येचा राजा’ तील पहिली नांदी ही नाटकातल्या नांदीप्रमाणे होती. या नांदीमध्ये वसंत देसाईंचा आवाज होता. म्हणजेच बोलपटांची सुरुवात देसाईंच्या आवाजाने झाली असे म्हणता येईल. त्यांनी सुरुवातीला अनेक हिंदी चित्रपटांमध्ये गीते गायली.

प्रभातमध्ये संगीत, पार्श्र्वसंगीत देण्यास सुरुवात झाली होती. संत ज्ञानेश्र्वरमधील गाडीवानाची भूमिका, संगीतासाठी बैलांचे खूर व बैलगाडीचा आवाज, विविध पक्ष्यांचे आवाज, ग्रामीण वाद्यांचा सुयोग्य वापर... वसंतरावांच्या कारकीर्दीतील अशा अनेक गोष्टी सांगता येतील. केशवराव भोळे, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव हे प्रभातचे सुरुवातीचे संगीत दिग्दर्शक. त्यांच्या हाताखाली वसंतराव तयार झाले. पुढे ते शांतारामबापूंबरोबर राजकमलमध्ये आले.

त्यांच्या पहिला स्वतंत्रपणे संगीत दिलेला चित्रपट होता नायिका जयश्रीचा ‘शकुंतला’(हिंदी). राजकमलच्या ह्या शकुंतलाने उत्पन्नांचे सर्व रेकॉर्डस्‌ मोडले.

पहिला तमाशाप्रधान चित्रपट ‘राम जोशी’ मधील ग. दि. माडगूळकरांनी लिहिलेल्या लावण्यांना वसंतरावांनी फक्कड चाली दिल्या. कवी होनाजी बाळा यांच्या जीवनावर काढलेल्या `अमरभूपाळी' ह्या चित्रपटातील ‘घन:श्याम सुंदरा’ ही भूपाळी अप्रतिम स्वररचनेमुळे खरोखरच अमर झाली आहे.

अभिजाततनेने ओतप्रोत भरलेल्या नृत्यांवर आधारित ‘झनक झनक पायल बाजे’ चे संगीत वसंत देसाईंनी अजरामर केले आहे. त्यांनी त्यासाठी भारतांतील वेगवेगळ्या प्रांतांमधे प्रवास करून तेथील वैशिष्ट्यपूर्ण वाद्यांचा अभ्यास केला. पं. शिवकुमार शर्मा, पं. सामताप्रसाद, सुदर्शन, गोपीकृष्ण व मृदुंगवादक रामदास या सर्वांना त्यांनी राजकमलमध्ये पाचारण केले. झनक झनकने अफाट यश संपादन केले. त्यांची कीर्ती सगळीकडे झाली. आचार्य अत्रे यांनी १९५६ मध्ये काढलेल्या ‘श्यामची आई’ या चित्रपटाचे संगीत वसंत देसाईंचे होते. कवी यशवंत यांची ‘आई’ ही अतिशय भावूक, करुण कविता त्यांनी स्वरबद्ध केली. ‘श्यामची आई’ मध्ये ६ गाणी होती. मराठमोळे वातावरण निर्माण करणारे अप्रतिम पार्श्र्वसंगीत त्यांनी या चित्रपटास दिले. म्हणूनच या चित्रपटाच्या यशातील मोठा वाटा वसंतरावांकडे जातो.

वसंत देसाईंनी एकूण २० मराठी चित्रपटांना संगीत दिले. ‘छोटा जवान’ मधील ‘माणुसकीच्या शत्रुसंगे युद्ध आमुचे सुरू, जिंकू किंवा मरू’ हे गाणे किंवा ‘मोलकरीण’ मधील ‘देव जरी मज’, ‘दैव जाणिले कुणी’ ही गाणी सर्वश्रृत आहेत. ‘इये मराठीचिये नगरीतील’ गीतांसाठीचे संगीतही प्रसंगानुरूप होते. १९४२ ते १९७६ या कालावधीत वसंत देसाई यांनी एकूण ४६ चित्रपटांना उत्कृष्ट संगीत दिले.

अनेक मानसन्मान वसंत देसाई यांना बहाल करण्यात आले. १९६७ मध्ये डॉ. राधाकृष्णन यांच्या हस्ते ‘पद्मश्री’ हा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला. त्यांनी काही चित्रपटांत भूमिकाही केल्या होत्या. हिंदी व मराठी चित्रपटांमधे स्वत: गायलेली उत्तम गाणी त्यांनी दिली. १९६० ते १९७५ मध्ये संगीत नाटकांचे पुनरुज्जीवन करून त्यांना संगीत दिले. त्यांनी १३ लघुपटांनाही संगीत दिले. विशेष म्हणजे पाठ्यपुस्तकांतील कवितांना- या बाई या, देवा तुझे किती, माझ्या मामाची रंगीत गाडी, लेझिम चाले जोरात, घाल घाल पिंगा वार्‍या, आनंदी आनंद गडे इत्यादी कवितांना - सोप्या, सुंदर चाली दिल्या. शास्त्रीय रागांवर आधारीत असंख्य गाणी त्यांनी हिंदी -मराठीतून दिली. शास्त्रीय संगीत क्षेत्रातील दिग्गजांना त्यांनी चित्रपट माध्यमात आणले. महाराष्ट्रातील शाळा-शाळांमध्ये त्यांनी केलेले समूहगानाचे प्रयोग - ‘एक सूर, एक ताल’ कार्यक्रम - हे वसंतरावांचे मोठे योगदान होय. लाखो विद्यार्थ्यांना त्यांनी राष्ट्रभक्तीपर, सामाजिक आशयाची स्फूर्तीगीते शिकवली. पंडित नेहरू यांच्या प्रेरणेतून, महाराष्ट्र शासनाच्या सहकार्याने देसाई यांनी हा उपक्रम यशस्वी केला.


गाण्यातील रसनिर्मितीचा त्यांचा विचार, भारतीय वाद्यांचा त्यांनी केलेला परिपूर्ण वापर, आपल्या संगीताचा देशाला व समाजाला करून दिलेला उपयोग हे सर्व पाहता ह्या मनस्वी संगीतकाराचे कर्तृत्व फार मोठे होते हे लक्षात येते.

वसंत पवार -
अवघे ४५ वर्षे आयुष्य जगलेले वसंत पवार उत्कृष्ट सतार वादन करीत असत. १९५० मधील ‘केतकीच्या बनात’ हा त्यांचा संगीतकार म्हणून पहिला चित्रपट. बाळा जो जो रे, चिमणी पाखरं, स्त्री जन्मा ही तुझी कहाणी, महात्मा इत्यादी चित्रपट त्यांच्या सुंदर संगीताने गाजले. ते स्वत: पार्श्र्वगायन करीत असत. ‘सुखाचा सोबती’ मधील ‘एका तळ्यात होती’ हे गीत अद्याप लोकप्रिय आहे. ‘अरे खोप्यामधी खोपा’ सारखी ज्येष्ठ कवयित्री बहिणाबाईंची गाणी चित्रपटांसाठी त्यांनी प्रथमच संगीतबद्ध केली. ‘मल्हारी मार्तंड’ या चित्रपटातील सुलोचना चव्हाणांच्या आवाजातील फंड सांभाळ तुर्‍याला ग आला, तुझ्या उसाला लागल कोल्हा’, ‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’ ह्या दोन लावण्या म्हणजे वसंतरावांच्या संगीत कारकीर्दीचा कळसच होय. अलौकिक प्रतिभा लाभलेल्या ह्या संगीतकाराला योग्य तो मान व धन दोन्ही न मिळाल्याची खंत रसिकांना कायमच राहील.

झिलकारी व लावण्यांचे बादशहा राम कदम
राम कदमांचे बालपण फार कष्टात व वणवण करण्यात गेले. संत गाडगेबाबांच्या सहवासात राहण्याचा त्यांना योग आला. प्रथम मिरजेत बॅन्डमध्ये ते क्लॅरोनेट वाजवीत. ते ऐकून लोक खूश होऊन नोटांच्या माळा त्यांच्या गळ्यात घालीत असत. संगीतरत्न अब्दुल करीम खॉंसाहेब यांच्याबरोबर मिरजेत काही वर्षे राहून, त्यांनी निष्ठेने शास्त्रीय संगीताची माहिती करून घेतली.

पुढे प्रभातमध्ये ऑफिसबॉयचे काम करत, एकवेळचे जेवण घेऊन त्यांनी उमेदवारी केली. पठ्ठे बापूरावांची भेट झाल्यावर लावणी जाणून घेतली, नंतर सुधीर फडके यांचेकडे संगीत साहाय्यक म्हणून काम केले. ‘मीठ भाकर’ हा भालजींचा चित्रपट त्यांनी प्रथम स्वतंत्र संगीतकार म्हणून दिला. ९ वर्षे प्रभातमध्ये काम करून ते बाहेर पडले. प्रभातबद्दल त्यांच्या मनात फार कृतज्ञता होती. पुढे काही वर्षे त्यांनी पुणे आकाशवाणी केंद्रावर नोकरी केली.

१९५७ मध्ये ‘सांगत्ये ऐका’ ह्या अनंत मानेंच्या चित्रपटातील ‘बुगडी माझी सांडली गं’ (ह्या गेली कैक वर्षे मराठी माणसाला भुरळ पाडणार्‍या) लावणीची निर्मिती झाली. ‘सांगत्ये एका’ च्या अभूतपूर्व यशात राम कदम यांच्या संगीताचा सर्वाधिक मोठा वाटा होता असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. १९५१ च्या ‘गावगुंड’ पासून १९७३ च्या ‘पिंजरा’ पर्यंत अक्षरश: शेकडो गीतांना त्यांनी स्वरबद्ध केले. त्यांची असंख्य गाणी आजही महाराष्ट्र ‘वेड्यासारखा’ ऐकतो. अनेक चित्रपटांना त्यांच्या संगीतामुळे लोकप्रियता व प्रसिद्धी मिळाली. अनेक मानसन्मान व गौरवांना ते पात्र ठरले.

सर्व वाद्यांची त्यांना चांगली समज होती. लावणी हे त्यांचे बलस्थान होते, पण कोणत्याही ढंगाच्या गीतप्रकाराला रामभाऊ बिनतोड संगीत देत. गाणे हातात आल्यावर तत्क्षणी चाल बांधण्याची त्यांची हातोटी विलक्षण होती. रेकॉर्डिंग स्टुडिओत गेल्यानंतर कितीही तास, काहीही न खातापिता ते सलग १५ ते १६ गाण्यांची रेकॉर्डिंग्ज करीत असत, हे विशेष. ‘पिंजरा’ चित्रपटासाठी काम चालू असताना शांतारामबापू सर्व गाणी चाल पसंत पडेपर्यंत ऐकत. रामभाऊंना अनेक चाली देण्यास सांगत. त्यांतील ‘दे रे कान्हा’ या गाण्यासाठी रामभाऊंनी तब्बल ३९ चाली लावल्या होत्या. यावरून त्यांचे कष्ट व परिपूर्णतेचा ध्यास यांची कल्पना येते.

सुमारे ६० वर्षे चित्रपट सृष्टीत कार्यरत राहिलेले ज्येष्ठ व श्रेष्ठ संगीतकार म्हणून आजही राम कदम यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांनी स्वत: गायलेली गाणी म्हणजे ‘धनगराची मेंढरं’ , ‘बाजीराव नाना, ‘दाजीबाच्या वाड्यात गडबड झाली’ इत्यादी होत.


‘नर्तकी’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’ सारख्या १८ नाटकांनाही त्यांनी संगीत दिले. सुमारे ११५ गायक-गायिकांकडून त्यांनी गाणी म्हणून घेतली हा एक प्रकारचा विक्रमच होय. त्यांनी गड जेजुरी जेरुरी, पवळा असे काही चित्रपट काढले.

राम कदम, अनंत माने व जगदीश खेबुडकर यांनी ‘केला इशारा जाता जाता’ नंतर तमाशापटांचे युग सुरू केले. अनेक प्रकारच्या लोकसंगीतांपासून ते सुगम संगीतापर्यंत सर्वच प्रांतांत ते लीलया वावरत होते. सांसारिक ओढग्रस्तीतही त्यांच्यातील माणूसपण कायम होते. राजकारण व स्वार्थ न समजणारे, साध्या मनाचे, कुणालाही न दुखवणारे, सर्व सहकलाकारांवर अतिशय माया करणारे रामभाऊ कलाकार म्हणून खूप मृदू अंत:करणाचे होते. पुण्यातील संजीवन हॉस्पीटलमध्ये १९ ऑक्टोबर, १९९७ रोजी त्यांना देवाज्ञा झाली.

राम कदम यांच्या चरित्रात्मक ‘छिन्नी हातोड्याचा घाव’ ह्या पुस्तकात लेखक श्री. मधू पोतदार म्हणतात, ‘रामाभाऊ हे अस्सल मराठमोळे आणि श्रेष्ठ संगीतकार आहेत.’ मराठी लावणीचे लावण्य खुलवून रामभाऊंनी तिला एका उंचीवर नेऊन ठेवलं. जुन्या झिलला उजाळा दिला, नवं रूप दिलं. मायबाप रसिकांनी दिलेली ‘लावणी सम्राट’ ही बिरुदावली त्यांनी अभिमानाने मिरवली.

स्वरगंधर्व सुधीर फडके -
‘गीतरामायणा’ च्या माध्यमातून अजरामर झालेले सुधीर फडके (बाबूजी) हे चित्रपट - संगीतकार म्हणूनही तेवढेच श्रेष्ठ होते.


प्रभातमधील १९४६ च्या `गोकूळ' पासून सुरू झालेला त्यांचा जवळजवळ १५० चित्रपटांचा प्रवास विलक्षण आहे. ‘जोहार मायबाप’ मधील संत चोखामेळा यांच्या अभंगातून बाबुजींनी स्वत:चे खडतर आयुष्यातून आलेले दु:ख व वणवण जणू गायली आहे असे वाटते. १९४८ ते १९८८ पर्यंत वंदेमातरम्‌, सीतास्वयंवर, माया बाजार, पुढचं पाऊल, सुवासिनी, जगाच्या पाठीवर यांसारखे एकापेक्षा एक सरस चित्रपट त्यांच्या संगीताने गाजले.


रागांच्या मर्यादेतील, साध्या व सोप्या (वाटणार्‍या), पण अवीट गोडीच्या अशा त्यांच्या चाली असत. स्वत:च गायक असल्याने स्वररचनेस त्यांनी नेहमीच उत्तम न्याय दिला. स्वच्छ, स्पष्ट शब्दोच्चारांवर त्यांचा विशेष भर होता. त्यामुळे त्यांची गाणी चांगलाच परिणाम साधत असत.

हृदयनाथ मंगेशकर -
१९५९ च्या भालजी पेंढारकरांच्या ‘आकाशगंगा’ या चित्रपटास हृदयनाथ यांनी पहिले संगीत दिले. पं. हुस्नलाल भगत हे त्यांचे गुरू होत. १९६६ साली ‘पवनाकाडचा धोंडी’, १९६८ मध्ये ‘धर्मकन्या’, नंतर आलेले ‘चानी’, ‘जैत रे जैत’, जानकी, सिंहासन, उंबरठा या सर्वच चित्रपटांतून त्यांच्या संगीताचा दर्जा लक्षात येतो.

लोकसंगीत व शास्त्रीय संगीताचा बुद्धिमतापूर्ण व प्रतिभासंपन्न वापर, ऐकताना सोप्या वाटणार्‍या पण म्हणण्यास अवघड अशा चाली, आणि मोजक्याच वाद्यांतून सुरेख साधलेला स्वरमेळ हे त्यांच्या स्वररचनांचे वैशिष्ट्य होय. शास्त्रीय संगीत सोपेपणाने सामान्यांपर्यंत पोहोचविणारी त्यांची काही गाणी - उदा. स्वरगंगेच्या काठावरती, तिन्ही सांजा सखे मिळाल्या, चांदणे शिंपीत जाशी, ती गेली तेव्हा... इत्यादी - आजही रसिकांवर अधिराज्य करीत आहेत.

दशरथ पुजारी, दादा चांदेकर, यशवंत देव, श्रीनिवास खळे या दिग्गजांचे चित्रपट संगीत क्षेत्रातील योगदानही उल्लेखनीय आहे. श्रीधर फडके, अशोक पत्की, आनंद मोडक, अजय-अतुल, सलील कुलकर्णी हे संगीतकार सध्याचा काळ गाजवत आहेत.

उल्लेखनीय अभिनेते - अभिनेत्री
‘अयोध्येचा राजा’ मध्ये दुर्गाबाई खोटे, गोविंदराव टेंबे यांनी स्वत: भूमिका करून गीते म्हटली होती. त्यापूर्वी पहिल्या स्त्री कलावंत कमलाबाई गोखल यांनी दादासाहेब फाळकेंच्या ‘मोहिनी भस्मासूर’ मध्ये भूमिका केली होती. तेव्हापासून ते अगदी आत्तापर्यंतच्या कलाकारांची नोंद घ्यायची ठरवले, तर यादी खूप मोठी आहे. विस्तारभयास्तव या ठिकाणी अधिकाधिक कलाकारांच्या नावांचा केवळ उल्लेख करत आहोत. पुढील (व आणखी असंख्य ज्ञात-अज्ञात) कलाकारांनी आपापल्या परीने आपले योगदान मराठी चित्रपटसृष्टीला दिले आहे.

निवडक कलाकारांची (अभिनेते-अभिनेत्री) सूची पुढीलप्रमाणे -
लीला चंद्रगिरी, मा. विनायक, बाबुराव पेंढारकर, ज्योत्स्ना भोळे, सुरेशबाबू माने, केशवराव दाते, नलीनी तर्खड, बालगंधर्व, मा. अविनाश, शोभना समर्थ, विष्णुपंत पागनीस, रत्नप्रभा, लीला चिटणीस, अनंत मराठे, शांता आपटे, दादा साळवी, मीनाक्षी, विष्णुपंत जोग, शांता हुबळीकर, शाहू मोडक, गजानन जागीरदार, हंसा वाडकर, जयश्री, मा. कृष्णराव, बेबी शकुंतला, ललिता पवार इत्यादी... ही सर्व प्रभातमधील कलावंत मंडळी होत.

इतर संस्थांमधील मा. विठ्ठल, चंद्रकांत, सुलोचना, सूर्यकांत, जयश्री गडकर, भालजी पेंढारकर, राजा परांजपे, चंद्रकांत गोखले, रेखा, चित्रा, राजा गोसावी, सीमा देव, रमेश देव, उषा किरण, जयराम शिलेदार, पु. ल. देशपांडे, भालचंद्र पेंढारकर, पंडितराव नगरकर, संध्या, नलिनी जयवंत, रंजना, उमा, अरुण सरनाईक, निळू फुले, आशा काळे, लीला गांधी ही समर्थ अभिनय करणारी मंडळी मराठी रसिकांना सुपरिचित आहेत.

सुलभा देशपांडे, दादा कोंडके, उषा चव्हाण, डॉ. श्रीराम लागू, गणपत पाटील, विक्रम गोखले, डॉ. काशीनाथ घाणेकर, अशोक सर्रों, रवींद्र महाजनी, रंजना, स्मिता पाटील, यशवंत दत्त, दिलीप प्रभावळकर, अमोल पालेकर, सचिन, सुप्रिया, लक्ष्मीकांत बेर्डे, महेश कोठारे, नाना पाटेकर, अश्र्विनी भावे, वर्षा उसगांवकर, उषा नाईक, अलका कुबल, अजिंक्य देव, स्मिता तळवलकर आदी कलाकारांचा उल्लेखही करावाच लागेल.

विनोदी भूमिकांमधे चमकलेली श्रेष्ठ मंडळी म्हणजे दिनकर ढेरे (कामण्णा), दामुअण्णा मालवणकर, वसंत शिंदे, धुमाळ, मधु आपटे, शरद तळवलकर , राजा गोसावी, दादा कोंडके, गणपत पाटील, राजा मयेकर इत्यादी... विनोदाची जोड देत-देत कारुण्याची झालरही देणारे व चित्रपट हमखास यशस्वी करणारे हे हुकूमी एक्के होते. वसंत शिंदे हे मूकपटांपासून चित्रपट क्षेत्रात (१९२४ ते १९९४ पर्यंत) कार्यरत होते. सुमारे १८५ चित्रपट, १०५ नाटके व ५७ लोकनाट्यांत काम केलेला हा हरहुन्नरी, निष्ठावान कलाकार चित्रपटसृष्टीचा चालता बोलता इतिहासाच होता. (श्री. मधू पोतदारांचे ‘विनोद वृक्ष’ हे पुस्तक त्यांच्या आयुष्याचे कथन परिणामकारकरीत्या करते.)

अलीकडच्या काळातील केदार शिंदे (दिग्दर्शक), भरत जाधव, मकरंद अनासपुरे, अंकुश चौधरी, संदीप कुलकर्णी, संजय नार्वेकर, अजय-अतुल(संगीतकार) आदी अनेक कलाकारांचा उल्लेख करणे उचित ठरेल.

चित्रपटांच्या विकासामध्ये तंत्रज्ञानात्मक कौशल्य, सर्जनशील बुद्धिमत्ता, प्रयोगशीलता याचा अंतर्भाव होतो. चित्रपटनिर्मितीमधील इतर तंत्रे म्हणजे कला, ध्वनी, संकलन, छाया इत्यादी. प्रथमपासून या क्षेत्रांत सूज्ञपणाने काम करणार्‍या काही तंत्रकुशल कलाकारांची नावे पुढे देत आहेत.

ध्वनी - विष्णुपंत दामले, कुलकर्णी-लोणकर, शंकरराव दामले, एस. के. काळे, गोविंदराव दामले, रुबेन मोझेस, दादासाहेब तोरणे इत्यादी.

छाया - व्ही. अवधूत, केशवराव धायबर, पांडुरंग नाईक, इ. महम्मद, बाळ बापट, वसंत शिंदे, दत्ता गोर्ले, अण्णासाहेब साळुंखे, व्ही. बारगीर, अरविंद लाड, एस. जे. पटेल, के. व्ही. माचवे, पांडुरंग नाईक इत्यादी.

संकलन - बाळ कोरडे, माधव कांबळे, ए. आर. शेख, राजा ठाकूर, माधव शिंदे, अनंत माने इत्यादी.

कला - साहेबमामा फत्तेलाल, वसंत पेंटर, म.द. ठाकूर, वसंत ठेंगडी, श्रीपतराव मेस्त्री, बाळ गजबर, ज.द.गोंधळेकर, एस. के. काळे, कनू देसाई इत्यादी.

स्वातंत्र्यपूर्व काळात ‘स्वातंत्र्य’ मूल्याचा प्रसार करण्यामध्ये आणि स्वातंत्र्यानंतर आपल्या देशाच्या पुनर्बांधणीमधे (राजकीय, सामाजिक क्षेत्रांत) कलेचे क्षेत्र हे अतिशय परिणामकारक ठरले. त्या काळची संगीत नाटके, मेळे, भावगीत गायन कार्यक्रम हे देखील मनोरंजनाचे साधन होतेच. परंतु कलात्मकतेला धक्का न लावता, राष्ट्राच्या पुनर्निर्मितीसाठी हातभार लावणारे चित्रपट हे सर्वाधिक प्रभावी जनमाध्यम ठरले. त्याचा दादासाहेब फाळके, बाबुराव पेंटर, भालजी पेंढारकर, दादासाहेब तोरणे, व्ही.शांताराम, प्र. के. अत्रे आदी प्रभृतींनी उत्तम उपयोग करून क्रांती घडविली. अनेक अभिजात कलाकृतींनी महाराष्ट्रातील (व भारतातील) चित्रपट रसिकांच्या अपेक्षांच्या व अभिरुचीच्या कक्षा रुंदावत गेल्या. आजही कलाकार व रसिक या दोन्ही घटकांनी ही परंपरा कायम राखली आहे.


सध्याचे काही सिनेमे हे बदललेल्या अभिरुचीचे द्योतक आहेत. जगाच्या कॅनव्हासवरील वेगवेगळ्या मानव समूहांच्या विविधांगी जीवनाचे रंग टिपणार्‍या ‘सिनेमाचे’ आणि त्या रंगांची उधळण करणार्‍या चित्रपट क्षेत्रातील कलाकारांचे आपण सदैव ऋणी राहू!
 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district