शेवगाव

प्रस्तावना :
आजच्या घडीला संपूर्ण भारतात हजारो छोट्या-मोठ्या लेणी आहेत. या सर्व लेणी मध्यप्रदेश, छत्तीसगढ, गुजरात, राजस्थान, आंध्रप्रदेश व महाराष्ट्र अशा विविध राज्यांत आहेत. लेणी हा एक शिल्पकलेचाच महत्त्वाचा भाग आहे. त्यात लेणींबरोबरच मंदिरे, स्तूप, स्तंभ, पुतळे यांचाही समावेश होतो. शिल्पकलेचा असा विस्तृत पद्धतीने विचार केला, तर भारताला शिल्पकलेचा मोठा वारसा लाभलेला आहे. या वारशामध्ये ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या महाराष्ट्राने काही मैलाचे दगड रचून हा वारसा समृद्ध केला आहे. आजमितीला महाराष्ट्रात सुमारे १०० लेणी आहेत. नाशिक, औरंगाबाद, पुणे, परभणी, मुंबई येथे या लेणी मोठ्या प्रमाणावर आहेत. याशिवाय औंढ्या नागनाथ (जि. हिंगोली), घृष्णेश्र्वर (जि. औरंगाबाद), काळाराम मंदिर (जि. नाशिक) व इतर ठिकाणची छोटी-मोठी मंदिरे, त्या मंदिरांवरील कोरीव कामदेखील डोळ्यात भरणारे आहे.

सुप्रसिद्ध लेणी व शिल्पे :

नाशिक येथे असणार्‍या पांडवलेण्यात ‘लेण’ हा शब्द प्रथम आलेला आहे. त्यापासूनच लेणी हा शब्द रूढ झाला. लेणी म्हणजे डोंगरातील दगडांवर केलेले कोरीव काम होय. लेणी निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा एकसंघ व कणखर स्वरूपाचा दगड महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे. याशिवाय प्राचीन काळापासून महाराष्ट्राने धार्मिक सहिष्णुतेचेच धोरण स्वीकारलेले दिसते. त्याचा परिणाम म्हणूनदेखील बौध्द, जैन, हिंदू या धर्मांच्या-पंथांच्या विविध लेणी एकत्र किंवा वेगवेगळ्या स्वरूपात बघायला मिळतात. केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात प्रसिद्ध असणार्‍या अजिंठा-वेरूळ येथील लेणी या महाराष्ट्रात आहेत. या लेण्या म्हणजे महाराष्ट्राचे वैभवच आहेत. इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. आठवे शतक या काळात औरंगाबादमधील अजिंठा आणि वेरुळ येथे या लेणी निर्माण करण्यात आल्या.

सह्याद्री पर्वताजवळ वसलेल्या अजिंठा गावाच्या वायव्येस एका डोंगरात अजिंठा लेणी कोरलेली आहे. या डोंगररांगेतील बेसॉल्ट जातीचा एकसंघ दगड या लेणी निर्माण करण्यासाठी खूप उपयोगी ठरला आहे. एकूण ३० गुहांचा समावेश असणार्‍या या लेणीत हीनयान व महायान अशा दोन बौध्दधर्मीय लेणींचा समावेश होतो. हीनयान पंथीय लेणींची निर्मिती इ.स.पू. दुसरे शतक ते इ.स. पहिले शतक या काळात झालेली आहे. त्यात लेणी क्रमांक ८,९,१०,१२,१३,१५ यांचा समावेश होतो. महायान पंथीय लेणींची निर्मिती इ.स. ४ थे शतक ते इ.स. ८ वे शतक या काळातील असल्याची शक्यता आहे. इ.स. ६०२ ते इ. स. ६६४ या काळात युऑन श्वॉंग हा चिनी प्रवासी बौद्ध धर्माचा अभ्यास करण्यासाठी भारतात आला होता. त्याने अजिंठ्याच्या लेणीला भेट दिल्याचा उल्लेख इतिहासात सापडत नसला, तरी त्याने या लेणींविषयी जे लिहून ठेवले आहे, त्यावरून या लेणींच्या तत्कालीन वैभवाची आपल्याला कल्पना करता येऊ शकते. तो असे लिहितो की, ‘या लेणींमधील गौतम बुद्धाची मूर्ती २० मीटर उंचीची असून, त्यावर एकावर एक या प्रमाणे दगडाची सात छत्रे आहेत. या छत्रांना कसलाच आधार नाही. डोंगराच्या दरडींमध्ये कोरलेली या लेणींची दालने आपल्या पाठीवर हे डोंगर तोलून धरत आहेत, असा पाहणार्‍याला भास होतो.’ मध्ययुगात या लेणींकडे कोणाचे फारसे लक्ष गेलेच नाही. १८१९ च्या एप्रिल महिन्यात स्मिथ नावाच्या एका ब्रिटिशाने या लेण्यांचा शोध लावला. काळाच्या ओघात या लेणींचा काही व्यक्तींनी, विविध राजवटींतील सत्ताधीशंनी-मुद्दाम, या लेण्यांचे महत्त्व न समजल्यामुळे - विध्वंस केला. मात्र तरीही आज या लेणींचे जे काही अवशेष बाकी आहेत, त्यावर या लेण्या जगप्रसिद्ध झाल्या आहेत. इतकेच नाही तर त्यांचा समावेश ‘जागतिक वारसा’ - World Heritage या स्थळांच्या यादीमध्ये देखील झाला आहे.

अजिंठा - वैशिष्ट्यपूर्ण लेणी :
अजिंठ्याच्या एकूण ३० लेणींपैकी काही लेणी खूपच अप्रतिम आहेत. त्या लेणींची माहिती पुढीलप्रमाणे-
क्रमांक १ च्या लेणीमध्ये गौतम बुद्धाची मूर्ती आहे. या लेणीच्या तुळईवर बुद्धजीवनातील प्रसंग, हत्तीच्या झुंजी, शिकार असे विविध विषय कोरले आहेत. या लेणीमधील अर्धस्तंभाच्या अगदी वर आकाशातून उडणारे गंधर्व दाखवले आहेत. हे गंधर्व पाहतांना त्यांनी जणू वरचे छत तोलून धरले आहे असा भास होतो. ही लेणी मुख्यत: आतील चित्रकामासाठी प्रसिद्ध आहे. या लेणीच्या मुख्य गर्भगृहात बुद्धाची एक भव्य अशी मूर्ती आहे. ही मूर्ती शांत व ध्यानमग्न दिसते. या मूर्तीचे वैशिष्ट्य म्हणजे या मूर्तीच्या चेहर्‍यावर समोरून उजेड टाकला, तर चेहरा ध्यानमग्न दिसतो. उजव्या बाजूने प्रकाश टाकला, तर ही मूर्ती स्मितहास्य करीत असल्याचा भास होतो. डाव्या बाजूने प्रकाश टाकला, तर मूर्तीच्या चेहर्‍यावर खिन्न, उदास भाव दिसतात. या लेणींमधील रंगकामाचे सुशोभीकरण आणि बोधप्रद कथा अशा दोन विभागात विभाजन करता येईल. सुशोभीकरणाच्या विभागात छत, स्तंभ, त्यावर असणारे हत्ती, वाघ, मोर, हंस, बदके, तसेच कलाकुसर यासाठी रंगकाम केलेले आहे.

उपदेशपर कथांच्या विभागात बौद्ध वाङ्मयातील कथांचे रेखाटन असले, तरी काही हिंदू पुराणातील कथांची रेखाटनेदेखील यात दिसतात. अलंकार व हाता-पायाच्या बोटांचे सूक्ष्म रेखाटन हे येथील शिल्पकलेचे वैशिष्ट्य होय. अत्यंत नाजूकपणे व सजीव वाटतील अशा पद्धतीने या शिल्पातील हाता-पायांच्या बोटांचे रेखाटन केलेले आहे. जातककथांमधील शंखपाल या जातकाची कथादेखील येथे पाहायला मिळते. त्यात नागराज शंखपाल मगधच्या संन्यासी राजासमोर बसून प्रवचन ऐकत असल्याचे दृश्य आहे. या दृश्यातच गुडघे मोडून एका हातावर आपल्या पूर्ण शरीराचा भार देऊन पाठमोरी बसलेल्या एका स्त्रीचे चित्र आहे. हे चित्र म्हणजे ‘मॉडेलिंगचा’ एक उत्कृष्ट नमुना आहे. याच लेणीमध्ये एका भिंतीवर ‘श्रावस्तीचे विश्र्वरूप’ या नावाने प्रसिद्ध असलेले चित्र आहे. ज्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला आपले विश्वरूप दाखवले होते, त्याप्रमाणे गौतम बुद्धानेदेखील काही विद्वान पंडितांना आपले विश्र्वरूप दाखवले. या चित्रात जे अनेक बुद्ध प्रगट झाले आहेत, त्या प्रत्येकाच्या वेशभूषा, रंग यांत फरक दाखवला आहे.

लेणी क्र.१ आणि २ यांच्या वास्तू आराखड्यात काहीच फरक नाही. मात्र दोहोंच्या शिल्पकृती, त्यांची शैली यात फरक आहे. या लेणीतील खांब उत्तमरीत्या सुशोभित केलेले आहेत. गाभार्‍यात असणार्‍या बुद्धमूर्तीच्या बाजूस हारिती आणि पाश्चिक या बौद्ध साहित्यातील पात्रांची चित्रे आहेत. या लेणीतील छतावरील चित्रे आजही चांगल्या स्थितीत आहेत. छत हे कमळाच्या चित्राने सजवलेले आहे. या लेणीत बुद्धजन्म व बौद्ध साहित्यातील इतर काही कथाप्रसंग रेखाटले आहेत.

लेणी क्र. ३ ते ५ चित्रशैलीच्या दृष्टीने विशेष महत्त्वाच्या नसल्या, तरी तेथील शिल्पकला बघण्यासारखी आहे. सहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये ‘श्रावस्तीचे विश्वरूप’ पुन्हा एकदा चित्रित केले आहे. गर्भगृहातदेखील बुद्धाची एक मूर्ती असून त्या मूर्तीच्या आजूबाजूस अनेक बुद्धमूर्ती रंगवल्या आहेत. सातवी गुहादेखील अशाच प्रकारची आहे. आठव्या गुहेची अवस्था आज अत्यंत वाईट आहे. नवव्या क्रमांकाची गुहा ही हीनयान पंथाची आहे. गुहेतील शिल्पे व चित्रे पाहून ती महायान पंथीयांनी वापरली असे दिसते. अजानबाहू बुद्धाच्या अनेक मूर्ती या गुहेत कोरलेल्या आहेत. ‘षडदंत’ नावाची जातककथा दहाव्या क्रमांकाच्या लेणीमध्ये कोरलेली आहे. त्यात दिसणारे हत्तींचे कळप आणि बेशुद्ध पडलेली राणी चुलसुभद्रा- ही दोन दृश्ये रसिकांच्या भावनेला हात घालणारी आहेत. सतराव्या क्रमांकाच्या लेणीत गौतम बुद्ध आणि त्यांचा मुलगा राहूल यांच्या भेटीचे चित्र आहे. त्यात राहूल आपल्या पित्याकडून आशीर्वादरूपी भिक्षेची मागणी करत आहे असे दृश्य चित्रित केले आहे. या चित्रातील पात्रांच्या चेहर्‍यावर ज्या भावभावना दाखवल्या आहेत, त्यामुळे हे शिल्प खूप प्रसिद्ध झाले आहे. याशिवाय या लेणीतच एके ठिकाणी आरशात पाहून शृंगार करणार्‍या तरुणीचे चित्र कोरलेले आहे. या चित्रातील पात्राच्या चेहर्‍यावरील भाव विलक्षण आकर्षक आहेत, आणि त्या पात्राच्या गळ्यातील मोत्याच्या हारावर प्रकाश टाकला, तर तो हार खराच आहे असे पाहणार्‍याला वाटते. १९ व्या क्रमांकाची महायान पंथीय लेणी म्हणजे चैत्यगृहाचा एक उत्कृष्ट नमुना आहे. २६ व्या लेणीमध्ये गौतम बुद्धाची शयन करत असलेली मूर्ती जवळपास सात मीटर लांबीची आहे. या मूर्तीच्या चेहर्‍यावर दिसणार्‍या शांत भावनादर्शनामुळे ही मूर्ती पर्यटकांना, अभ्यासकांना एक वेगळेच आध्यात्मिक, आत्मिक समाधान देऊन जाते.

या जगप्रसिद्ध अजिंठा लेणींचा अध्यात्म हा विषय असल्याचे एकदा मान्य केले की या लेणींमधून जाणवणारे दया, क्षमा, शांती हे गुण अधिकच भव्य-दिव्य भासतात. या लेणींमधील चित्रे काढण्यासाठी भिंतीवर प्रथम माती, शेण, तुस, भाताचा भुस्सा किंवा ताग यांच्या वस्त्रगाळ करून काढलेल्या मिश्रणाचा लेप चढवला गेला होता. त्यानंतर त्यावर चुना किंवा संदल यांचा चकचकीत पातळ थर चढवला गेला, आणि नंतर त्यावर गेरूने चित्रे काढून त्यात रंग भरले. यावरून तत्कालीन रसायनशास्त्र, चित्रकला, वास्तुकला यांचे ज्ञान किती प्रगत होते याची कल्पना करता येते. या लेणींमधील चित्रांसाठी पांढरा, काळा, पिवळा, हिरवा, तांबडा, निळा हे रंग वापरलेले आहेत. सध्या या लेणींचे वायू प्रदूषण व इतर गोष्टीपासून संरक्षण व्हावे म्हणून या लेणींच्या परिसरात केवळ नैसर्गिक वायुवर चालणार्‍या गाड्यांना प्रवेश दिला जातो. तसेच, जपानच्या सहकार्यानेदेखील या लेणींच्या सुरक्षिततेचे उपाय केले जात आहेत.
वेरूळ :
अजिंठा येथील लेणी ज्या चित्रकला व शिल्पकला यांमुळे जगप्रसिद्ध आहेत त्याच कारणांमुळे वेरूळ येथील लेणीदेखील प्रसिद्ध असून, त्यास मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळाली ती येथील ‘आधी कळस मग पाया’ ही नवी म्हण निर्माण करणार्‍या ‘कैलास मंदिरामुळे’. औरंगाबादपासून वायव्येस सुमारे २१ कि.मी. अंतरावर बालाघाटाच्या डोंगरात वेरूळच्या लेणी वसलेल्या आहेत. पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांनी या कैलास लेण्यांचा जिर्णोद्धार करून तेथील पूजाअर्चेसाठी वर्षासन बांधून दिले. महानुभव पंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामी यांचेदेखील काही काळ येथील लेणींमध्ये वास्तव्य होते असे उल्लेख इतिहासात आढळतात. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबादेखील वेरूळचे वतनदार-पाटील होते. ‘एलापूर’ असे नाव असलेल्या गावाचे काळाच्या ओघात अपभ्रंशित रूप म्हणजे वेरूळ होय, असा काही तज्ज्ञांचा अंदाज आहे. या लेणींमधील १७ लेणी हिंदुधर्मीय आहेत. १२ लेणी या बौद्ध धर्मातील महायान पंथाच्या असून पाच लेणी जैनधर्मीय आहेत.

वाकाटकांच्या राजवटीचा शेवट झाल्यावर चालुक्य आणि कलचुरी या राजवटींच्या संघर्षमय काळात या लेणींची निर्मिती झाली, असे काही तज्ज्ञ मानतात. या लेणींमधील कला, वास्तुरचना पाहून दोन कालखंडांत या लेणींच्या निर्मितीचा काळ विभागता येतो. पहिल्या कालखंडातील लेणी या चैत्य किंवा बौद्ध मंदिर यांच्या आकाराप्रमाणे तयार केलेल्या असून हा कालखंड इ. स. ५०० च्या आसपास सुरू झाला आहे. त्यातील सर्वात आधी रामेश्वर तर सर्वात शेवटी दशावतार हे लेणे तयार करण्यात आले. दशावतार या लेणींच्या निर्मितीचा काळ साधारणत: सातव्या शतकाचा उत्तरार्ध मानला जातो. १७ व १८ क्रमांकाच्या लेण्यांच्या निर्मितीपासून दुसरा कालखंड सुरू झाल्याचे मानले जाते. या कालखंडातील ‘धुमार लेणे’ हे सर्वात शेवटचे लेणे होय. नवव्या शतकाच्या आरंभी जैन लेणी (क्र. ३० ते ३४) निर्माण झाल्या. या लेणींमधील दहाव्या क्रमांकाची लेणी बौद्धधर्मीय महायान पंथीय असून ती वास्तुरचनेच्या दृष्टीने उत्तम आहे. या लेणीत प्राचीन काष्ठशिल्पे दिसत असल्यामुळे या ‘विश्वकर्मा’ नामक लेणीला ‘सुतार लेणे’ असेही म्हणतात. सिंहासनावर विराजमान झालेली बुद्धमूर्ती येथे बघायला मिळते. तसेच वज्रपाणी, अवलोकितेश्र्वर, तारादेवी यांच्याही मूर्ती पाहायला मिळतात.

बाराव्या क्रमांकाचे लेणे ‘तीनताला’ या नावाने प्रसिद्ध असून ते चैत्यगृह आणि विहार अशा दुहेरी स्वरूपाचे आहे. ३५ x१२.५ चौ. मी. क्षेत्रफळ असणार्‍या या लेणीत गर्भगृह, अंतराळ, सभामंडप समाविष्ट आहे. या लेणीनंतर हिंदुधर्मीय लेणी सुरू होतात.

हिंदुधर्मीय लेणींमधील १४ व्या क्रमांकाचे लेणे ‘रावण की खाई’ या नावाने प्रसिद्ध आहे. कैलास पर्वत उचलत असलेल्या रावणाच्या शिल्पामुळे हे लेणे जगप्रसिद्ध झाले आहे. याच लेण्यामध्ये कमलासनावर बसलेल्या विष्णुपत्नी लक्ष्मीचे शिल्प कोरलेले आहे. त्यात लक्ष्मीला आपल्या सोंडेने स्नान घालणारे हत्ती, तसेच कासव, मासे, कमळाची फुले, चतुर्भुज सेवक हेदेखील उत्तमरीत्या रेखाटलेले आहेत. त्यामुळे हे शिल्प आपल्याला सजीव असल्याचा भास होतो. १५ व्या क्रमांकाचे ‘दशावतार’ हे लेणेदेखील तसेच प्रसिद्ध आहे. यातील सर्व शिल्पकला भगवान विष्णुंनी घेतलेल्या दहा अवतारांच्या कथांना समोर ठेवून साकार केली आहे. या लेणींमधील भगवान नृसिंहाने केलेला हिरण्यकश्यपूचा वध हे शिल्प पाहण्यासारखे आहे. या शिल्पामध्ये भगवान नृसिंह जेवढे उग्र दाखवले आहेत, तेवढाच भयभीत झालेला हिरण्यकश्यपूदेखील दाखवलेला आहे.

१६ व्या क्रमांकाचे लेणे हे ‘कैलास लेणे’ या नावाने जगप्रसिद्ध आहे. कारण याच कैलास मंदिरामुळे ‘आधी कळस, मग पाया’ ही नवी म्हण निर्माण झाली आहे असे म्हणता येईल. कारण, कोणतीही वास्तू उभी करतांना त्या वास्तूचा पाया आधी तयार होतो व मग त्यावर सर्वांत शेवटी कळस चढवला जातो. पण हे कैलास मंदिर मात्र त्या तत्त्वाला अपवाद ठरले आहे. हे संपूर्ण मंदिर एकाच-एकसंघ अशा-दगडात कोरलेले आहे. या मंदिराभोवती दगडांची नैसर्गिक भिंत आहे. त्यावर विविध प्रकारची अर्धस्तंभांनी विभागलेली देवकोष्टे आहेत. ६०x३० चौ. मी. च्या पहाडातून अगदी मध्यभागी या मंदिराची निर्मिती करण्यात आलेली आहे. मंदिराची शिल्पशैली द्रविड पद्धतीची आहे. मंदिराच्या भोवती पाच लहान लहान मंदिरे असून समोर नंदीमंडप आहे. हे मंदिर एका उंच अशा जोत्यावर उभे असून त्या जोत्यावरच हत्ती, सिंह हे प्राणी कोरलेले आहेत. दूरून या मंदिराकडे पाहिले तर हे हत्ती, सिंह या मंदिराला आपल्या पाठीवर उचलून धरत आहेत असे वाटते. कैलास पर्वत उचलणार्‍या रावणाची बरीच शिल्पे या वेरूळच्या लेण्यांमध्ये आढळतात. पण या सर्वात कैलास मंदिरातील शिल्प उत्कृष्ट आहे. याशिवाय गंगा, यमुना, सारीपाट खेळणारे शिव-पार्वती, कार्तिकस्वामी, गणेश, नटराज यांचीही शिल्पे येथे पाहण्यास मिळतात. या हिंदू लेणींमध्ये शैव-वैष्णव असा भेदभाव फारसा दिसत नाही.

जैन लेणी -
३० ते ३५ क्रमांकाच्या लेणी जैन धर्माच्या म्हणून प्रसिद्ध आहेत. यातील क्रमांक तीसची लेणी ‘छोटा कैलास’ म्हणून प्रसिद्ध आहे. कारण त्यात कैलास मंदिराप्रमाणेच एक मंदिर तयार करण्यात आले असून तेथे महावीराची पद्मासनातील मूर्ती आहे. याशिवाय जैन धर्मातील २२ तीर्थांकरांच्या प्रतिमादेखील आहेत. याशिवाय ‘इंद्रसभा’, ‘जगन्नाथ सभा’ या नावाने ओळखल्या जाणार्‍या जैनधर्मीय लेणी आहेत.

अजिंठा - वेरूळमधील लेणींमधून काही प्रमाणात तोचतोचपणा जाणवत असला, तरी या लेणी पाहणार्‍या व्यक्तीला अभिजात कलेचा आनंद व एक आध्यात्मिक समाधान नक्कीच देऊन जातात. प्रामुख्याने अध्यात्म हाच या लेणींचा पिंड आहे. विशेष म्हणजे भारतासारख्या देशात तीन विविध धर्मांच्या लेणी शेजारी-शेजारी तयार केल्या जातात - त्याही अगदी जातिव्यवस्था बळकट असतांना-एवढेच नाही तर या तीनही धर्मांच्या लेणी आपआपल्या कौशल्यामुळे, ज्ञानामुळे जगप्रसिद्धदेखील होतात ही घटना विलक्षण ठरते. त्यामुळे ठरावीक जातींकडेच बुद्धिमत्ता व सौंदर्याभिरूची आहे हा गैरसमजही व्यर्थ ठरला. एकप्रकारे या लेणी भारतीय एकात्मतेचा संदेश देतात, हे लक्षात येते.

इतर लेणी -
अजिंठा - वेरूळ येथील लेणींनी जरी महाराष्ट्राचे, भारताचे नाव जगाच्या कानाकोपर्‍यात पसरवलेले असले, तरी महाराष्ट्रातील इतर छोट्या लेणींचे महत्त्वही काही कमी नाही. या छोट्या लेणीदेखील राज्य व राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध आहेत.

घारापुरी -
प्राचीनकाळी ‘श्रीहरी’ असे नाव असलेल्या सध्याच्या घारापुरी या बेटावर शैव संप्रदायाच्या लेणी आहेत. मुंबईपासून ११ कि.मी. अंतरावर समुद्रात घारापुरी या बेटावर या लेणी आहेत. इ.स. ३ ते इ.स. ७ या काळात या लेणींची निर्मिती झाली असे मानले जाते. या लेणींमधील अकरा हात उंचीची तीन मुखे असलेली शिवाची मूर्ती जगातील भव्य आणि सुंदर अशा शिल्पांपैकी एक समजली जाते. अर्धनारीनटेश्र्वराची मूर्तीदेखील या ठिकाणी बघायला मिळते. पूर्वी या बेटाच्या दक्षिणेला एक मोठा दगडी हत्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत असे. त्या हत्तीवरूनच या लेणींना ‘एलिफंटा केव्हज्’ हे नाव मिळाले. हा हत्ती सध्या मुंबईतीलच जिजामाता उद्यान (जुने नाव राणीची बाग) येथे आहे. या लेणींचादेखील ‘जागतिक वारसा’ च्या यादीमध्ये समावेश झाला आहे.

पांडव लेणी -
पांडव लेणी या नाशिकमध्ये ‘पांडवलेणी’ या नावानेच ओळखल्या जाणार्‍या डोंगरावर आहेत. याच लेणींमध्ये प्रथम ‘लेण’ हा शब्द आला व त्यापासून पुढे ‘लेणी’ हा शब्द तयार झाला. यामध्ये एकूण २४ लेण्या असून त्या सर्व हीनयान पंथीय (बौद्ध धर्मीय) आहेत. १२०० वर्षांपूर्वी यांची लेण्यांची निर्मिती झाली. या लेणी पूर्व दिशेला तोंड करून असल्यामुळे तेथून सूर्योदयाचे सुंदर दर्शन होते. या लेणींमधील ‘चैत्य’ ही लेणी खूप सुंदर आहे. या लेण्यांमध्ये असणार्‍या बोधिसत्व, गौतम बुद्ध यांच्या मूर्तींना स्थानिक जनता पाच पांडवांच्या मूर्ती समजते. त्यामुळे कदाचित या लेण्यांना पांडव लेणी म्हणत असावेत, असा अंदाज तज्ज्ञ व्यक्त करतात.

कान्हेरी -
बोरिवली येथे कान्हेरीच्या लेणी वसलेल्या आहेत. (बोरिवली मुंबईचे उपनगर असून ठाण्यापासूनही जवळ आहे.) इ.स. पू. १ ले शतक ते इ.स. ९ वे शतक या काळात या लेणींची निर्मिती झालेली आहे. यामध्ये १०९ छोट्या छोट्या लेणी आहेत. यातील प्रत्येक लेणीला दगडाच्या जोत्यावर उभे करण्यात आले आहे. या लेणींची एकंदर रचना पाहता येथे बर्‍याच बौद्ध भिक्षुंच्या राहण्याची व्यवस्था केली होती हे लक्षात येते. बेसॉल्ट खडकावर या लेणींची निर्मिती झालेली आहे. (बोरिवली येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या परिसरात या लेण्या आहेत. या लेणींच्या पायथ्याशी - सभोवताली दाट जंगल असल्याने येथील थंड हवा, शांतता, निसर्गरम्यता, प्राणिदर्शन आणि शिल्पकला या सर्वांचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येथे गर्दी करतात.)

कार्ला -
सध्याच्या मुंबई - पुणे द्रुतगती महामार्गावरील कार्ला येथे या लेणी आहेत. बौद्ध भिक्षुंनी या लेणी बांधल्या, कोरल्या. इ.स.पू. ३ रे व २ रे शतक या काळात थरवेदा या बौद्ध भिक्षुने लोणावळ्याजवळील या निसर्गरम्य भागात या लेणींची निर्मिती केली. भारतात ज्या काही मोजक्या दगड कापून तयार करण्यात आलेल्या लेणी आहेत, त्यात यांचा समावेश होतो.

याशिवाय महाराष्ट्रात भाजे (जि. पुणे), जिंतूर (जि. परभणी), बेडसे (जि. पुणे.), हरिश्चंद्र गडावरील केदारेश्र्वर या ठिकाणी देखील हिंदू, जैन, बौद्ध धर्मीय लेणी आहेत. इतिहासाचा मागोवा घेतला, तर असे लक्षात येते की तत्कालीन राज्यकर्त्यांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अमलात आणून त्याद्वारे शिल्पकलेच्या विकासाला चालना दिली. अशा या समृद्ध वारशाचे जतन करणे आपणा सर्वांचे कर्तव्य ठरते.

महाराष्ट्रातील इतर शिल्पे
महाराष्ट्रात केवळ लेणींचीच निर्मिती झाली असे नाही, तर विविध इमारती, पुतळे, मंदिरे यांचीही निर्मिती झालेली आहे. त्यातील काही वास्तू आजही पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू म्हणून कायम राहिलेल्या आहेत. अशाच काही मोजक्या शिल्पाकृतींची ही माहिती -

१) छत्रपती शिवाजी टर्मिनस -
मुंबईतील छत्रपती शिवाजी टर्मिनस ही प्रमुख रेल्वे स्थानकाची इमारत म्हणजे जगातील काही उत्तम अशा वास्तुंपैकी एक आहे. सध्या ही वास्तू मध्य रेल्वेचे मुख्यालय म्हणून परिचित असून मुंबईतील नव्हे भारतातील सर्वांत महत्त्वाचे असे ते रेल्वे स्थानक आहे. येथूनच कोकण, दिल्ली, कोलकाता, चेन्नई अशा विविध ठिकाणी रेल्वे जातात. या वास्तूचा निर्मिती-आराखडा फ्रेडरीक विल्यम स्टीव्हन्स यांनी १८८७-१८८८ या काळात निर्माण केला. प्रत्यक्षात कामाला सुरुवात १८८९ ला होऊन ते १८९७ ला पूर्ण झाले. ही वास्तू म्हणजे भारतीय शिल्पकला व गॅथोलिक शिल्पकला यांचा संगम आहे. या वास्तूवर कोरण्यात आलेली कलाकुसर, प्राणी हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. बाहेरून ही वास्तू पाहिली तर ती एखाद्या राजवाड्याप्रमाणे भासते. या वास्तूतील कलाकुसरीचे काही काम मुंबईच्या जे जे. स्कूल ऑफ आर्टस्च्या विद्यार्थ्यांनी केलेले आहे. १९९६ ला या इमारतीचे व्हिक्टोरीया टर्मिनस हे नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असे करण्यात आले. सर्वाधिक छायाचित्रे (फोटोग्राफ) काढण्यात आलेल्या वास्तूंमध्ये ताजमहालनंतर या इमारतीचाच क्रमांक लागतो. २००४ मध्ये जागतिक वारशांच्या यादीत या वास्तूचा युनेस्कोने समावेश केला.

२. औंढा नागनाथ मंदिर -
औंढा नागनाथ हे महादेवाचे मंदिर असून ते भारतातील बारा ज्योर्तिलिंगापैकी (व महाराष्ट्रातील ५ पैकी) एक आहे. ते सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात आहे.

३. घृष्णेश्र्वर मंदिर -
हे मंदिरदेखील बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असून ते वेरूळ लेण्यांच्या परिसरात वसलेले आहे.

उपरोक्त मंदिरांची शिल्पकलाही प्रेक्षणीय आहे.

४. पुणे येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा -
छत्रपती शिवाजी महाराजांचा साडेतेरा फूट उंच आणि आठ टन वजनाचा हा उल्लेखनीय पुतळा विनायक पांडुरंग करमरकर यांनी तयार केला आहे. विनायक करमरकर हे भारतातील सर्वोत्कृष्ट शिल्पकारांपैकी एक होत. सध्या हा पुतळा पुण्याच्या ‘मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल’ मध्ये उभारलेला आहे. बॉंझमध्ये तयार करण्यात आलेला हा पुतळा पूर्णपणे एकसंघ आहे. या पुतळ्याचे ओतकाम माझगाव डॉकयार्डमध्ये झाले होते. एवढा भव्य पुतळा रेल्वे वॅगनमधून पुण्याला आणण्यात आला होता. असा एकसंघ व भव्य पुतळा तयार करणारे विनायक करमकर हे तत्कालीन शिल्पकारांपैकी एकमेव शिल्पकार होते. १९२८ मध्ये या पुतळ्याची स्थापना झाली. या पुतळ्याच्या निर्मितीनंतर करमरकर हे एक उत्कृष्ट शिल्पकार म्हणून ओळखले जाऊ लागले.



महाराष्ट्रातील शिल्पकार :
जगप्रसिद्ध अजिंठा - वेरूळच्या लेण्या, छत्रपती शिवाजी टर्मिनससारखी देखणी वास्तू, विविध शिल्पे, विविध मंदिरे - अशी शिल्पकलेची महान परंपरा असणार्‍या महाराष्ट्रात जर तेवढेच महान शिल्पकार निर्माण झाले नसते, तर ते एक आश्र्चर्यच ठरले असते. महाराष्ट्रातील अशा काही मोजक्या शिल्पकारांचा परिचय पुढे देत आहोत.

विनायक करमरकर -
विनायक पांडुरंग करमरकर यांचा जन्म रायगड जिल्ह्यातील सासवणे येथे १८९१ साली झाला. त्यांचे वडील गणपतीच्या मूर्ती तयार करत असत. त्यामुळे चित्रे काढण्याचा छंद असलेल्या करमरकर यांना शिल्पकलेचे प्राथमिक धडे त्यांच्या घरी वडिलांकडूनच मिळाले. एक दिवस ऑटो रॉथफिल्ड या जिल्हाधिकार्‍यांनी करमरकर यांनी काढलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र बघून त्यांच्यातील कलागुण हेरले व त्यांना मुंबईच्या जे.जे.स्कूल ऑफ आर्ट्समध्ये प्रवेश मिळवून देण्यास मदत केली. पुढील काळात कोलकाता येथे त्यांनी स्वत:चा स्टुडिओदेखील सुरू केला होता. त्या काळातच त्यांनी महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर यांची शिल्पे तयार केली. शिल्पकलेचे आपले पुढील शिक्षण त्यांनी ‘लंडन रॉयल अकॅडमी’ मध्ये घेतले. पुण्यातील ‘मिलिटरी प्रिपरेटरी स्कूल’ मधील आठ टन वजनाचे व साडेतेरा फूट उंचीचे छत्रपती शिवाजी महाराजांचे शिल्प घडवण्याचे, कलात्मकदृष्ट्या महत्कार्य त्यांनी केले. गोपाळकृष्ण गोखले, आचार्य कृपलानी, मत्स्यगंधा अशी काही उत्कृष्ट शिल्पेही त्यांनी घडवली.

शिल्पकलेतील त्यांचे कसब पाहून त्यांना अमेरिकेच्या एका विद्यापीठात स्वत:च्या शिल्पकलेचे प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी १९४९ साली आमंत्रित करण्यात आले होते. कलाक्षेत्रात ‘नानासाहेब’ या नावाने परिचित असलेल्या करमरकरांचा भारत सरकारने १९६२ साली ‘पद्मश्री’ हा किताब देऊन गौरव केला. केवळ महाराष्ट्रातच नव्हे, तर भारतात एक ‘स्कूल’ म्हणून लौकिक असलेले हे महान शिल्पकार, १९६६ साली हे जग सोडून गेले . त्यांच्या सासवणे या गावी, त्यांच्या घरातील संग्रहालयात आपण त्यांनी घडवलेली शिल्पे पाहू शकतो; त्यांच्या कलेचा आनंद घेऊ शकतो.

रावबहादूर गणपतराव म्हात्रे (१८७६-१९४७)
आपल्या कलेमुळे ब्रिटिश राजसत्तेत सुद्धा सर्वपरिचीत असलेले गणपतराव म्हात्रे हे महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतीय शिल्पकलेच्या इतिहासात आपल्या शिल्पकलेमुळे अजरामर झाले आहेत. माती, धातू, ओतकाम व दगडावरील खोदकामामधून त्यांनी आपल्या कलाकृती सादर केल्या.

मार्च, १८७६ मध्ये जन्मलेल्या गणपतरावांना लहानपणापासूनच शिल्पकलेची आवड होती. जे. जे. स्कूल मधून १८९१ साली शिल्पकलेतील परीक्षा ते पहिल्या श्रेणीने उत्तीर्ण झाले. त्यांच्या कलेचे तंत्र पाश्चिमात्य होते, परंतु हाताळणी व सादरीकरण संपूर्णपणे भारतीय होते. भव्य आकाराच्या ब्रॉन्झच्या शिल्पाकृती बनविण्याची एक नवी परंपरा त्यांनी निर्माण केली.

‘मंदिर पथगामिनी’ हे म्हात्रे यांचे शिल्प एक परिपूर्ण कलाकृती आहे. एका सुंदर नवतरुणीचे रूप त्या शिल्पात साकारले आहे. ही शिल्पाकृती पाहिली असता म्हात्रे यांच्यात असलेल्या श्रेष्ठ कलागुणांचा प्रत्यय येतो. या शिल्पास १९०४च्या राष्ट्रीय प्रदर्शनात सुवर्णपदक मिळाले. तसेच बॉम्बे गॅझेटमध्ये या शिल्पाचा गौरव करण्यात आला होता.

रघुनाथ फडके -
रघुनाथ फडके यांचा जन्म १८८४ साली झाला. त्यांनी मूर्तिकला, चित्रकला यांपैकी कशाचेही शिक्षण शाळा किंवा कलाशाळेत जाऊन घेतलेले नव्हते. त्यामुळे त्यांचे या दोन कलांविषयी असलेले ज्ञान, माहिती व कौशल्ये हे सारे स्वकष्टातून आणि त्यातून आलेल्या अनुभवांच्या आधारे प्रगल्भ झालेले होते. दुर्दैवाने त्यांच्या या ज्ञानाकडे काही लोक शंकेखोर वृत्तीने पाहत असत. रघुनाथ फडके मात्र मूर्ती घडवण्याच्या कामात निपुण होते. याची साक्ष म्हणजे मुंबईच्या चौपाटीवर असलेला लोकमान्य टिळकांचा पुतळा होय. या पुतळ्यामधून त्यांचे ओतकामातील कौशल्य व इतर काही तांत्रिक बाबी लक्षात येतात. मध्यप्रदेशमधील धार संस्थानातही उदाजीरावांचा पुतळा त्यांनी तयार केलेला आहे. इतरही अनेक लहान-मोठे पुतळे त्यांनी तयार केलेले आहेत. महादेव धुरंधरांसारखे श्रेष्ठ चित्रकारदेखील त्यांना मानत होते. आर्थिक ओढाताण होऊन त्यांचे संपूर्ण आयुष्यच हालाखीच्या परिस्थितीत गेले. मात्र तरीही त्यांनी पोट भरण्यासाठी आपल्या कलेचा उपयोग केला नाही. शिल्पकलेसोबतच त्यांना संगीताचीदेखील आवड होती. ते स्वत: गायन-वादन शिकवीत असत. अभिजात भारतीय नाट्यसंगीताचे प्रवर्तक भास्करबुवा बखले यांनादेखील फडके यांनी तबल्याची साथ केली होती. मराठी नाट्यसंगीत व मराठी नाट्यप्रयोगावरील फडकेंची टीका प्रसिद्धच आहे. तत्कालीन ज्येष्ठ कलाकार गोविंदराव टेंबे आणि हिराबाई बडोदेकर यासारख्या कलाकारांनी आपला पुतळा फडके यांनीच तयार करावा असा आग्रह धरला होता, यातच फडकेंची शिल्पकलेतील महानता लक्षात येते. असा हा महान शिल्पकार १९७२ ला स्वत:च्या आठवणी पुतळ्यांच्या माध्यमातून ठेवून हे जग सोडून गेला.

बाबुराव पेंटर -
कोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम, लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वत:चे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वत:ची फौंड्री देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील मातीचे असो वा धातूचे ओतकाम असो, बाबुराव स्वत: ही कामे करत. महात्मा फुले, महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज यांची त्यांनी तयार केलेली शिल्पे कोल्हापूरमध्ये आजही पाहण्यास मिळतात.

‘कलामहर्षी’ या उपाधीने गौरवण्यात आलेल्या बाबुराव पेंटर यांचे १९५४ मध्ये निधन झाले.

हेमाड -
संपूर्ण महाराष्ट्रात आजही असंख्य हेमाडपंतीय मंदिरे आपल्याला पाहण्यास मिळतात. ही सर्व मंदिरे, त्यावरील शिल्पे यांपैकी बहुतांशी मंदिराची - शिल्पांची निर्मिती हेमाड या शिल्पकाराच्या मार्गदर्शनाखाली झालेली आहे. हेमाड हा देवगिरीच्या यादव राजवटीत मंत्री म्हणून कार्यरत होता, असा उल्लेख इतिहासात आढळतो.

विनायक मासोजी -
कोल्हापुरातील अनेक उत्तम चित्रकारांपैकी एक म्हणजे विनायक मासोजी होय. ख्रिस्ती कुटुंबात जन्माला आलेले असूनदेखील हिंदू चित्रकलेचा प्रभाव त्यांच्या चित्रकलेत जाणवतो. १९२१ च्या सुमारास विनायक मासोजी हे शांतीनिकेतन मध्ये दाखल झाले. सुरुवातीला त्यांना कुमार हळदार, नंदलाल बोस यांचे मार्गदर्शन लाभले.

व्यक्तिचित्र, निसर्गचित्र, रेखाचित्र व समूहचित्रात मासोजी कुशल होते. रजपुत, मोगल शैलीच्या चित्रांचा मासोजींनी सखोल अभ्यास केला होता. त्यांच्या चित्रशैलीवर जपानी पद्धतीचीही छाप आढळते. `शेतकर्‍यांचा आनंद' हे त्यांनी काढलेले चित्र पंडित नेहरू यांच्या संग्रही आहे. त्यांच्या काळात अनेक साहित्यिक, कलासक्त राजकीय नेते यांनी त्यांच्या कलेची प्रशंसा केल्याचे उल्लेख आढळतात.

विनायकराव मसोजी हे अबोल, चिंतनशील व ध्यानीवृत्तीचे कलावंत होते. बाह्य सौंदर्यापेक्षा आतील सौंदर्याचे दर्शन घेण्याकडे; दृश्य जगातील संगीत लहरींकडे कान देण्यापेक्षा अंतरगातून वाहणार्‍या संगीत लहरींकडे ध्यानपूर्वक कान देण्याकडे त्यांची प्रवृत्ती होती. विनायकराव जसे कलानिर्मितीत रममाण होणारे होते. तसेच ते क्रिडाविषयक चळवळीत सहभागी होणारेही होते.



महाराष्ट्राच्या शिल्पकलेचा आढावा घेतला, तर असे लक्षात येते की शिल्पकलेसाठीची, विशेषत: लेणी तयार करण्यासाठी आवश्यक असणारी अनुकूल भौगोलिक परिस्थिती डोंगरांमध्येच होती. सातवाहन, यादव यांच्या काळात महाराष्ट्र तसा स्थिर व शांत होता. म्हणून शिल्पकलेसारख्या कलांना व साहित्यकृतींच्या निर्मितीला प्रोत्साहन मिळत गेले. पुढे महाराष्ट्रावर परकीय आक्रमण वाढत गेले. हे आक्रमण परतवून लावण्यातच छत्रपती शिवाजी महाराज व पुढील राज्यकर्त्यांची कारकीर्द खर्ची पडली. म्हणून या काळात कला, साहित्य यांच्या निर्मितीला फारसे प्रोत्साहन मिळाले नाही. त्यानंतरच्या आधुनिक महाराष्ट्रात मात्र या कलांना उत्तेजन देणार्‍या अनेक संस्था निर्माण झाल्या. त्यात जे.जे. स्कूल ऑफ आर्ट्स या मुंबईतील संस्थेचे योगदान मोठे आहे. महाराष्ट्र शासनातर्फेदेखील ‘कला संचालनालय’ स्थापन करण्यात येऊन या कलांना प्रोत्साहन देण्यात येऊ लागले आहे.


 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district