कोपरगाव

अष्टविनायक :

श्री गणपतीची महाराष्ट्रातील प्रत्येक गावात एक-दोन मंदिरे हमखास पाहण्यास मिळतात. त्या मंदिरांतून श्री गणेशाची हजारो रूपे भाविक अनुभवतात. महाराष्ट्रातील ‘आठ’ ठिकाणच्या श्रीगणेश मंदिरांना, मूर्तींना विशेष महत्त्व आहे. या आठ ठिकाणच्या श्री गणपतीच्या मंदिरांस मिळून ‘अष्टविनायक’ म्हटले जाते. गणपतीच्या अनेक नावांपैकी एक नाव म्हणजे विनायक; म्हणूनच या मंदिरांचा संच म्हणजे अष्टविनायक! अष्टविनायकांची मंदिरे (स्थळे) महाराष्ट्रातच नव्हे, तर संपूर्ण भारतात प्रसिद्ध आहेत. गणपती ही विद्येची देवता असून तो, सुखकर्ता, दु:खहर्ता आणि रक्षणकर्ता आहे अशी गणेश भक्तांची भावना आहे.

श्री गणेशाच्या अनेक प्रतिमा (मूर्ती) तयार केल्या गेल्या परंतु दगडावर नक्षीकाम करून निर्माण केलेल्या प्राचीन मूर्तींचा शोध ज्या ठिकाणी लागला, तसेच जेथे ‘स्वयंभू’ प्राचीनतम मूर्ती सापडल्या अशा स्थळांना विशेष महत्त्व प्राप्त झाले. याच मंदिरांना अष्टविनायकांची मंदिरे समजले जाते. महाराष्ट्रातील असंख्य भाविक अष्टविनायकाची यात्रा करतात. अष्टविनायकाची सर्व मंदिरे ही अंतराच्या दृष्टीने परस्परांच्या जवळ आहेत. साधारणपणे दीड ते दोन दिवसांत ही अष्टविनायक यात्रा पूर्ण होऊ शकते. पुणे जिल्ह्यात पाच (मोरगाव, थेऊर, रांजणगाव, ओझर, लेण्याद्री), रायगड जिल्ह्यात दोन (महड, पाली) व अहमदनगर जिल्ह्यात एक (सिद्धटेक) या ठिकाणी ‘अष्टविनायक स्थाने’ आहेत. त्यांची सविस्तर माहिती पुढीलप्रमाणे -

१. मोरगांव -
अष्टविनायकांपैकी पहिला गणपती हा मोरगावचा मोरेश्र्वर. या गणपतीस श्री मयुरेश्वर असेही म्हणतात. थोर गणेशभक्त मोरया गोसावी यांनी येथील पूजेचा वसा घेतला होता. श्री मोरेश्वर गणेशाचे, हे स्वयंभू व आद्यस्थान आहे. प्रत्येक घरात म्हटली जाणारी ‘ सुखकर्ता दु:खहर्ता’ ही आरती श्री समर्थ रामदास स्वामींना याच मंदिरात स्फुरली, असे म्हटले जाते.

जवळच कर्‍हा ही नदी आहे. मंदिरावर अनेक प्रकारचे नक्षीकाम केलेले आहे. श्री मोरेश्र्वराच्या डोळ्यात व बेंबीत हिरे बसवलेले आहेत. या मंदिराच्या भोवती बुरूजसदृश दगडी बांधकाम प्राचीन काळापासून आहे. पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यात मोरगांव हे ठिकाण आहे. मोरगाव हे पुण्यापासून सुमारे ७० कि. मी. अंतरावर आहे. तर बारामतीपासून ३५ कि. मी. अंतरावर आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबा हा मोरगावपासून अगदी १७ कि. मी. अंतरावर आहे. या तीनही ठिकाणांपासून मोरगांवला जाण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीची सोय आहे.

२. थेऊर -
अष्टविनायकांपैकी थेऊरचा श्री चिंतामणी हा दुसरा गणपती आहे. थेऊरच्या कदंब वृक्षाखाली हे श्री गणेशाचे ठिकाण आहे. भक्तांच्या चिंतेचे हरण करणारा म्हणून याला चिंतामणी म्हणतात. या गणेशाला डाव्या बाजुला सोंड आहे.

पुण्यातील पेशव्यांच्या घरातील अनेक जण थेऊरला सतत येत असत. पेशवे घराणे खूप मोठे गणेशभक्त होते. थेऊरचा विस्तार हा माधवराव पेशवे यांनी केला. माधवराव पेशव्यांचे निधन थेऊरलाच झाले. यांच्याबरोबर सती गेलेल्या रमाबाई यांची समाधीदेखील या ठिकाणी आहे. मंदिराच्या आवारात निरगुडकर फाउंडेशन निर्मित थोरल्या माधवरावांची स्फूर्तिदायक कारकीर्द दाखवणारे कलात्मक दालन आहे.

थेऊर पुणे-सोलापूर महामार्गाला जोडलेल्या रस्त्यावर, हवेली तालुक्यात असून पुण्यापासून हे ३० कि. मी. अंतरावर आहे. पुण्यापासून बसेसची सोय आहे. (थेऊरपासून जवळच ऊरळीकांचनला महात्मा गांधींनी स्थापन केलेले निसर्गोपचार केंद्र आहे.)
३. सिद्धटेक -
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. अंतरावर आहे.

४. रांजणगाव -
अष्टविनायकापैकी हा चौथा गणपती. या गणपतीला महागणपती असे म्हणतात. हे महागणपतीचे स्वयंभू स्थान आहे. पुणे-नगर मार्गावर शिरूर तालुक्यात हे ठिकाण आहे.

या स्थानासंदर्भात एक दंतकथा आहे ती अशी की - त्रिपुरासूर या दैत्यास शिवशंकरांनी काही शक्ती प्रदान केल्या होत्या. या शक्तीचा दुरूपयोग करून त्रिपुरासूर स्वर्गलोक व पृथ्वीलोक येथील लोकांना त्रास देऊ लागला. शेवटी एक वेळ अशी आली की, शिवशंकराला श्री गणेशाचे नमन करून त्रिपुरासुराचा वध करावा लागला. म्हणून या गणेशाला ‘त्रिपुरारीवदे महागणपती’ असेही म्हटले जाते.

अष्टविनायकांपैकी सर्वाधिक शक्तिमान असे महागणपतीचे रूप आहे. श्री महागणपती उजव्या सोंडेचा असून गणेशाला कमळाचे आसन आहे. माधवराव पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचे इतिहासात आढळते. इंदूरचे सरदार किबे यांनीदेखील या मंदिराचे नूतनीकरण केल्याचा उल्लेख आढळतो.

हे श्री महागणपतीचे स्थान इ.स. १० व्या शतकातील आहे. श्री गणेशाला दहा हात आहेत आणि प्रसन्न व मनमोहक अशी श्रींची मूर्ती आहे.

५. ओझर-
अष्टविनायकांपैकी ओझरच्या विघ्नेश्र्वर हा पाचवा गणपती आहे. येथील श्रींची मूर्ती लांब रूंद असून अष्टविनायकापैकी सर्वात श्रीमंत गणपती म्हणून श्री विघ्नेश्र्वराला ओळखले जाते. श्रींच्या डोळ्यात माणिक असून, कपाळावर हिरा आहे. अशी प्रसन्न व मंगल मूर्ती असलेला श्रीगणेश विघ्नांचे हरण करतो, म्हणून या गणपतीला विघ्नेश्र्वर म्हणतात. ही गणेशाची स्वयंभू मूर्ती आहे.

मंदिराच्या चारही बाजूंना तटबंदी-बांधकाम असून, मध्यभागी गणेशाचे मंदिर आहे. कुकडी नदीच्या तीरावर असलेले हे मंदिर एक जागृत स्थान आहे. थोरल्या बाजीराव पेशव्यांचे बंधू चिमाजी अप्पा यांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो.

मंदिराच्या परिसरात भाविकांना राहण्यासाठी धर्मशाळेची उत्तम व्यवस्था आहे. जुन्नर तालुक्यातील हे स्थान लेण्याद्रीपासून १४ कि. मी. वर तर पुण्यापासून ८५ कि. मी. अंतरावर आहे. येथून जवळच आर्वी उपग्रह केंद्र व खोडद येथील आशिया खंडातील सर्वात मोठी दुर्बिण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थान असलेला शिवनेरी किल्ला हादेखील जवळच आहे.

६. लेण्याद्री -
अष्टविनायकापैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मक गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्‍या आहेत.

लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मक हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.

७. महड -
महडचा वरदविनायक हा अष्टविनायकांपैकी सातवा गणपती आहे. हे स्वयंभू स्थान असून त्याला मठ असेही म्हणतात. श्री वरदविनायकाचे मंदिर साधे, कौलारू असून मंदिराला घुमट आहे व त्याला सोनेरी कळस आहे. कळसावर नागाची नक्षी आहे.

या मंदिरासंदर्भात एक कथा प्रसिद्ध आहे. एका भक्ताला स्वप्नात देवळाच्या मागील तळ्यात पाण्यात पडलेली मूर्ती दिसली. त्याप्रमाणे त्या व्यक्तीने शोध घेतला व मूर्ती मिळाली. तीच या मंदिरातील प्रतिष्ठापना केलेली मूर्ती होय. मंदिरात दगडी महिरप असून गणेशाची मूर्ती सिंहासनारूढ आहे व उजव्या सोंडेची आहे. इ. स. १७२५ मध्ये पेशवे काळात हे मंदिर बांधले गेले.

रायगड जिल्ह्यातील महड हे पुणे - मुंबई राष्ट्रीय महामार्गावर खोपोली - खालापूरच्या दरम्यान आहे.

८. पाली -
पालीचा गणपती हा अष्टविनायकांपैकी आठवा गणपती आहे. या गणपतीला श्री बल्लाळेश्वर म्हणतात. बल्लाळेश्वर गणपतीचे हे स्वयंभू स्थान आहे. मंदिर पूर्वाभिमुख असून गणपतीची सोंड डाव्या बाजूला आहे. गणेशाचे कपाळ विशाल असून डोळ्यात हिरे आहेत. मंदिर चिरेबंदी आहे. मंदिरात प्रचंड घंटा असून ती चिमाजी अप्पांनी अर्पण केली आहे.

हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात असून, सुधागड या भव्य किल्ल्याची पार्श्वभूमी व अंबा नदीच्या निसर्गरम्य सान्निध्यात बल्लाळेश्वराचे मंदिर वसले आहे. पालीपासून जवळच उन्हेरचे गरम पाण्याचे झरे व सरसगड हा प्राचीन किल्ला आहे.

पाली खोपोलीपासून ३८ कि. मी. अंतरावर आहे तर पुण्यापासून १११ कि. मी. अंतरावर आहे. खोपोली - पेण रस्त्यावर पालीस जाण्यास रस्ता फुटतो, तर पनवेल - गोवा या राष्ट्रीय महामार्गावर वाकणपासून पालीस रस्ता जातो.

भाद्रपद महिन्यातील चतुर्थीला या आठही ठिकाणी यात्रा भरते. सर्व जाती-धर्माचे लोक या ठिकाणी येऊन श्रद्धापूर्वक दर्शन घेतात. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशी या काळात श्री गणेशाचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो.

अष्टविनायकाच्या आठही ठिकाणी भोजनाची व निवासाची उत्तम व्यवस्था आहे. अष्टविनायक दर्शनासाठी पुणे, अहमदनगर, रायगड या तीन जिल्ह्यांतून प्रवास होतो. निरनिराळ्या रूपांत श्री गणेशमूर्ती आहेत. त्याही कुठे डोंगरात, खडकात, कुठे नदीकाठी आहेत, त्यामुळे अष्टविनायकाची यात्रा करणार्‍या भाविकाला यात्रेबरोबरच पर्यटनाचाही अनुभव मिळतो. अशा या अष्टविनायकाची महती केवळ महाराष्ट्रापुरती नाही, तर संपूर्ण भारतभर पसरली आहे.

या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे -
( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.)
१. नागपूर - जि. नागपूर
२ अदासा - जि. नागपूर
३. रामटेक - जि. नागपूर
४. मेंढा - जि. नागपूर
५. पौनी - जि. नागपूर
६. केळझर - जि. वर्धा
७. कळंब - जि. यवतमाळ
८. चंद्रपूर - जि. चंद्रपूर.

ज्योतिर्लिंगे
अनेक धर्म व अनेक देवदेवता असणार्‍या भारत देशात अनेक देवदेवतांची तीर्थक्षेत्रे व तेथील यात्रा प्रसिद्ध आहेत. महादेवांच्या भारतातील प्रमुख १२ मंदिरांना १२ ज्योतिर्लिंगे म्हणतात. या १२ ज्योतिर्लिंगांपैकी महाराष्ट्रात ५ ज्योतिर्लिंगे आहेत. त्यांची माहिती पुढे दिली आहे.
१. त्र्यंबकेश्वर -
नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथील ज्योतिर्लिंग हे भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग आहे. या ज्योतिर्लिंगाचे वैशिष्ट्य म्हणजे शिवलिंगास ब्रम्हा, विष्णू, महेश या तिघांच्या प्रतिमा आहेत. मंदिर ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी असून मंदिर उत्कृष्ट शिल्प व स्थापत्य कलेसाठी प्रसिद्ध आहे.

या मंदिराचे बांधकाम इ. स. १७५५ साली पेशवे बाळाजी बाजीरावांनी केल्याचा उल्लेख आढळतो. दर १२ वर्षांनी नाशिकबरोबर त्र्यंबकेश्वरलाही कुंभमेळा भरतो. त्याचबरोबर निवृत्तीनाथांची यात्रा, त्र्यंबकेश्वराची रथयात्रा इ. महत्त्वाच्या यात्रा या ठिकाणी भरतात. त्रिपिंडी नारायण नागबळीचा विधी भारतात फक्त याच ठिकाणी होतो. जवळच ब्रम्हगिरी पर्वत असून या पर्वतावरून महाराष्ट्रातील सर्वार्थाने महत्त्वाची नदी गोदावरीचा उगम होतो. कुशावर्त तीर्थ, गंगाद्वार व मुक्ताई मंदिर, संत ज्ञानेश्वरांचे ज्येष्ठ बंधू निवृत्तीनाथ यांचे समाधी मंदिर इत्यादी महत्त्वाची स्थाने त्र्यंबकेश्वरपासून जवळच्या अंतरावर आहेत.

या ठिकाणी भाविकांसाठी निवासाची व भोजनाची उत्तम व्यवस्था आहे. इथला परिसर निसर्गाने नटलेला आहे. त्यामुळे भाविकांना त्र्यंबकेश्वराच्या दर्शनाबरोबरच पर्यटनाचाही अनुभव येतो. नाशिकपासून फक्त २८ कि. मी. अंतरावर त्र्यंबकेश्वर हे तीर्थक्षेत्र आहे.

२. औंढा नागनाथ -
पांडवांच्या १४ वर्षाच्या अज्ञातवासात धर्मराज युधिष्ठीर याने औंढा नागनाथाचे मंदिर बांधल्याचे, त्याने महादेवाची स्थापना केल्याचे म्हटले जाते. हेमाडपंती शैलीचे हे नागनाथाचे मंदिर असून याचा विस्तार ६०,००० चौ. फूट एवढा प्रचंड आहे. महादेवाच्या पिंडीसमोर नंदीची मूर्ती नाही, तर नंदिकेश्वराचे स्वतंत्र मंदिर बाजूला आहे हे येथील वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात १२ ज्योतिर्लिंगाची छोटी-छोटी मंदिरे असून, १०८ महादेवाची मंदिरे आणि आणखी ६८ महादेवाच्या पिंडी आहेत. याशिवाय वेदव्यासलिंग, भंडारेश्वर, नीलकंठेश्वर, गणपती, दत्तात्रय, मुरलीमनोहर, दशावतार यांचीदेखील मंदिरे आहेत.

मंदिरावर शिल्पकलेचे उत्कृष्ट काम केलेले आहे. परिसरात मोठे मैदान असून आठ खांबांचे मोठे दालन आहे. संत विठोबा खेचर हे इथलेच. संत नामदेव हे जवळच असलेल्या नरसीचे होते. असे समजले जाते, की, संत नामदेव जेव्हा कीर्तन करीत होते, त्या वेळी नागनाथ मंदिराने आपले तोंड त्या दिशेला फिरवले होते.

औंढा नागनाथच्या शेजारील राजापूर गावातील उत्खननात प्राचीन काळच्या सुंदर व रेखीव अशा मूर्ती सापडल्या आहेत. सिद्धेश्र्वर व येलदरी ही प्रसिद्ध धरणे व पर्यटनाची ठिकाणे येथून जवळच आहेत. औंढा-नागनाथला जाण्यासाठी परभणीहून ४०-४५ मिनिटे लागतात. नांदेड या शहरापासून ६४ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे. सध्याच्या हिंगोली जिल्ह्यात, औंढा नागनाथ तालुक्यात हे स्थान आहे.

३. घृष्णेश्वर -
बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्र्वराचे एक महत्त्वपूर्ण ज्योतिर्लिंग महाराष्ट्रात आहे. शिवशंकराच्या उपासकांसाठी पवित्रस्थान असलेल्या घृष्णेश्र्वर मंदिरात शिवभक्तांची खूप मोठी गर्दी होत असते. पुण्यश्लोक आहिल्याबाई होळकरांनी इ.स. १७६५ ते १७९५ दरम्यान घृष्णेश्र्वराचे संपुर्ण मंदिर बांधून त्यावर नक्षीकाम करून घेतले.

घृष्णेश्र्वराचे मंदिर औरंगाबाद जिल्ह्यात असून वेरूळपासून अगदी जवळ आहे. भाविक लोक दर्शनासाठी आल्यानंतर जगप्रसिद्ध असणार्‍या वेरूळच्या लेणी पाहिल्याशिवाय परत जात नाहीत.

या मंदिरापासून जवळच श्रीगणेशाचे २१ आद्यपीठापैकी एक लक्षविनायक मंदिर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराजे यांच्या घराचे अवशेषदेखील (जुना वाडा) मंदिराजवळ आहेत. औरंगाबादपासून ३० कि. मी. अंतरावर हे मंदिर आहे.

४. भीमाशंकर -
भीमानदीच्या उगमस्थानी असलेले बारा ज्योतिर्लिंगापैकी एक महत्त्वाचे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर आहे. मंदिराबाबत असे म्हणतात की, १८ व्या शतकात नाना फडणीसानी हे मंदिर बांधलेले आहे. मंदिर हेमाडपंती आहे. मंदिरावर उत्कृष्ट कलाकुसरीचे नमुने पाहवयास मिळतात. `भीमा' नदीचा उगम आणि श्री महादेवाचे - शंकराचे स्थान, म्हणून याला `भीमा-शंकर' असे म्हणतात.

भीमाशंकर हे एक थंड हवेचे ठिकाण असून मंदिराच्या आजुबाजुचा परिसर - डोंगरदर्‍यांनी युक्त, दाट जंगलांचा असा - निसर्गरम्य आहे.

हे जंगल अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. जवळच कोकणकडा व नागफणी हे दोन महत्त्वाचे कडे आहेत. या कड्यावरून कोकणाचे निसर्गसौंदर्य पाहावयास मिळते.

राजगुरूनगरपासून भीमाशंकर अवघ्या ९५ कि. मी. अंतरावर आहे. तर पुण्यापासून मंचर मार्गे १२८ कि.मी. अंतरावर आहे. भीमाशंकर हे आंबेगांव आणि राजगुरूनगर तालुक्यात विभागले गेले आहे. भीमा नदीचा उगम हा राजगुरूनगर तालुक्यात झालेला आहे. तर मंदिराच्या पायर्‍यांवरील गावाचा भाग हा आंबेगाव तालुक्यात आहे. श्रावण महिन्यात या ठिकाणी जास्त संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात.

५. परळी वैजनाथ -
भारतातील १२ ज्योतिर्लिंगापैकी परळीच्या वैजनाथ ज्योतिर्लिंगाचे स्थान जागृत आहे. पुण्यश्लोक राणी आहिल्याबाई होळकरांनी या मंदिराचा जिर्णोद्धार केला. हे मंदिर चिरेबंदी असून भव्य स्वरूपाचे आहे. मंदिराच्या परिसरात लांबलचक असलेल्या पायर्‍या व भव्य प्रवेशद्वार ही लक्ष वेधून घेण्यासारखी ठिकाणे आहेत. मंदिराचा गाभारा व सभामंडप हे एकाच पातळीवर असल्यामुळे सभामंडपातून ज्योतिर्लिंगाचे दर्शन होऊ शकते. इतरत्र कोठेही नाही, पण फक्त वैजनाथ इथे देवाला स्पर्श करून दर्शन घेता येते. मंदिराच्या परिसरात तीन मोठी कुंडे आहेत.

मंदिरापासून जवळच तीन कि. मी. अंतरावर ब्रह्मनदीच्या किनारी ३०० फूट उंचावरील जिरेवाडी येथे सोमेश्वर मंदिर आहे. जवळच अंबाजोगाईचे योगेश्वरी देवीचे मंदिर आहे. अंबाजोगाईपासून परळी वैजनाथ ५५ कि. मी. अंतरावर आहे. तर परभणीपासून ६१ कि. मी. अंतरावर हे ठकाण आहे. या ठिकाणापासून वाहनाची सतत सोय आहे. परळी वैजनाथ हे बीड जिल्ह्यात असून येथून जवळच औष्णिक विद्युत केंद्र आहे.

देवीची साडेतीन शक्तिपीठे

१. सप्तशृंगगड (वणी) -
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्ध्या पीठाचे महत्त्वाचे स्थान म्हणजे सप्तश्रृंगगड होय. सप्तशृंगीदेवीला महाकाली, महालक्ष्मी व महासरस्वतीचे ओंकाररूप समजण्यात येते. शुंभनिशुंभ व महिषासुर या पाशवी शक्तीच्या असुरांचा नाश केल्यावर तप-साधनेसाठी देवीने या गडावर वास्तव्य केले. सह्याद्रीच्या या उंच कड्यास सात शिखरे आहेत. त्यावरून या स्थानाचे नाव सप्तशृंगगड पडले. हे देवीचे मूळ पीठ मानले जाते. सुमारे पाचशे पायर्‍या, देऊळ, सभागृह, दर्शनाच्या रांगेची जागा असे सर्व बांधकाम येथे नव्याने केले आहे. देवीची मूर्ती अतिभव्य असून अठरा हातांची आहे. या ठिकाणी नवरात्रात तसेच चैत्र महिन्यात यात्रा भरते.

श्री जगदंबेची ५१ शक्तिपीठे भूतलावर आहेत. या शक्तिपीठांपैकी महाकाली, महालक्ष्मी, महासरस्वती या तिन्ही स्थानांचे त्रिगुणात्मक, साक्षात ब्रम्ह स्वरूपिणी धर्मपीठ, ओंकार स्वरूप अधिष्ठान म्हणजे सप्तशृंगगडावरील श्री सप्तशृंगी देवी होय. सप्तशृंगीचे पुराणकाळापासून माहात्म्य सांगीतले जाते. या स्थानाचा `नवनाथ कालावधी' स्पष्टपणे सांगता येतो. साबरी कवित्व अर्थात मंत्रशक्ती ही देवी सप्तशृंगीच्या आशीर्वादाने नाथांना प्राप्त झाली. उत्तर काळात संत निवृत्तीनाथ, संत ज्ञानेश्र्वर, पेशवे सरकार, दाभाडे, होळकर इत्यादी देवी भक्तांचा या पीठाशी जवळचा संबंध होता असे म्हटले जाते. या पवित्र मंदिराच्या आजुबाजुस दाट जंगल आहे.

सप्तशृंगीदेवीबरोबरच गडावर सूर्यकुंड, जलगुंफा, शिवतीर्थ, तांबुलतीर्थ, मार्कण्डेय ऋषींचा मठ, शितकडा इ. महत्त्वाची, पवित्र तीर्थस्थळे आहेत.

सप्तशृंगगडावर अनेक मंगल पवित्र उत्सव होत असतात. गडावर गुढीपाडवा, चैत्रोत्सव, गोकूळ अष्टमी, नवरात्रोत्सव, कोजागिरी, लक्ष्मीपूजन व हरिहर भेट इत्यादी महत्त्वपूर्ण उत्सव प्रतिवर्षी मोठ्या भक्तिभावाने संपन्न होत असतात. या उत्सवांसाठी भाविक लोक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.

सप्तशृंगीमाता ही निवृत्तीनाथांची कुलस्वामीनी होती. निवृत्तीनाथ समाधी घेण्यापूर्वी तीन दिवस गडावर ध्यानस्थ बसले होते. अशीही एक घटना या स्थानास जोडलेली आहे.

नाशिकपासून सुमारे ६५ कि.मी. अंतरावर सह्याद्री पर्वतरांगेच्या पश्र्चिम रांगेत ही देवी वसलेली आहे. महाराष्ट्राबरोबरच अन्य राज्यातूनदेखील या देवीच्या दर्शनासाठी लोक येतात.

देवीची मूर्ती ८ फूट उंचीची असून शेंदूराने लेपलेली आहे. कर्णफुले, नथ, मंगळसुत्र, कमरपट्टा, तोडे परिधान केलेली ही सप्तशृंगी देवी भक्ताच्या हाकेला धावून जाणारी आहे.

२. माहूर - (देवी रेणुकामाता)-
देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे.

देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरच्या गडावर रेणुकादेवीबरोबरच परशुराम मंदिर, दत्तात्रय मंदिर, अनसूया मंदिर, कालिका माता मंदिर इत्यादी धार्मिक स्थळेही आहेत. या ठिकाणीच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

माहूरच्या गडापासून जवळच ‘रामगड’ हा किल्ला असून, काही कोरीव कामे केलेल्या गुहा आहेत. हे स्थान नाशिक जिल्ह्यात, माहूर तालुक्यात आहे.
३. श्री क्षेत्र तुळजापूर (तुळजाभवानी)-
महाराष्ट्रातील साडेतीन शक्तिपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवीचे तुळजापूर क्षेत्र हे एक पूर्ण शक्तिपीठ आहे. ही देवी भगवती (भवानी) म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्र क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व स्वराज्य संस्थापक राजे श्री शिवछत्रपती यांची आराध्यदेवता, अशी ही तुळजापूरची भवानीदेवी महाराष्ट्राची कुलस्वामीनी आहे.

हे गाव बालाघाटच्या एका कड्यावर वसले आहे. मंदिराच्या काही भागाची धाटणी हेमाडपंती आहे. इतिहास व पुरातत्त्वदृष्ट्या हे मंदिर राष्ट्रकुट अथवा यादवकालीन मानले जाते. तर काहींच्या मते हे १७ व्या किंवा १८ व्या शतकातील मंदिर आहे.

स्कंद पुराणातील सह्याद्री खंडात श्री तुळजाभवानीची अवतार कथा आहे. कृतयुगात कर्दम ऋषीपत्नी अनुभूती तपस्येत असताना, कूकर या दैत्याने तिचे पावित्र्य भंग करण्याचा प्रयत्न केला. तपस्वी अनुभूतीने पावित्र्य रक्षणासाठी देवी भगवतीचा धावा केला. देवी भगवती साक्षात प्रगटली व कूकर या दैत्याशी युद्ध करून त्याचा वध केला. साध्वी अनुभूतीच्या विनवणीवरून देवी भगवतीने या पर्वतराईत वास्तव्य केले. भक्ताच्या हाकेला त्वरित धावून येणारी व मनोरथ पूर्ण करणारी म्हणून ही देवी त्वरिता-तुरजा-तुळजा (भवानी) या नावाने ओळखली जाते.

संपूर्ण भारतात कुलदेवता म्हणून या देवीला मान आहे. कृतयुगात -अनुभूतीसाठी, त्रेत्रायुगात - श्रीरामचंद्रासाठी, द्वापारयुगात - धर्मराजासाठी व कलियुगात-छत्रपती शिवरायांसाठी आशीर्वादरूप ठरलेली ही भवानी भक्ततारिणी, वरप्रसादिनी आहे. अनेक प्रदेशांतून विविध जाती-पंथांचे भाविक इथे येतात.

येथील मंदिराच्या दक्षिणेकडील दरवाजास ‘परमार’ दरवाजा म्हणतात. जगदेव परमार या महान देवीभक्ताने आपले मस्तक सात वेळा देवीला अर्पण केले, अशी श्लोकरचना या दरवाजावर कोरली आहे. सभामंडपात पश्र्चिम दिशेला गर्भगृह असून चांदीच्या सिंहासनात, पूर्वाभिमुख अशी श्री तुळजाभवानी देवीची रेखीव व प्रसन्न मूर्ती आहे. मूर्ती गंडकी शिळेची असून प्रमाणबद्ध आहे. अष्टभुजा महिषासुरमर्दिनी असे देवीचे मनोहर रूप आहे. देवी भवानीची ही स्थलांतर करता येणारी मूर्ती आहे. वर्षातून तीनवेळा ही मूर्ती मंचकी (पलंगावर) विसावते. असे इतरत्र कोठेही आढळत नाही. गर्भगृहाच्या भिंतीवर छोटी-छोटी आकर्षक शिल्पे आहेत. सभामंडपात उत्तरेस देवीचे शयनगृह असून इथे चांदीचा पलंग आहे.

या ऐतिहासिक शक्तिपीठाबरोबरच मंदिराच्या परिसरातील कल्लोळ तीर्थ, गोमुख तीर्थ, सिद्धिविनायक मंदिर, श्री भवानी शंकर मंदिर, होमकुंड, प्रांगणातील देवीदेवता, मातंगी मंदिर इ. धार्मिक स्थळे प्रसिद्ध आहेत.

हे स्थान उस्मानाबाद जिल्ह्यात असून उस्मानाबाद व सोलापूर ही जवळची रेल्वे स्थानके आहेत. उस्मानाबाद - तुळजापूर अंतर १९ कि.मी. आहे. सोलापूर, उस्मानाबाद, औरंगाबाद, जळगाव, मुंबई, पुणे, कोल्हापूर या ठिकाणांहून तुळजापूरला थेट बसची सोय आहे.

घारशीळ, भारती बुवांचा मठ, पापनाश तीर्थ, धाकटे तुळजापूर, तीर्थकुंड, रामवरदायिनी मंदिर इत्यादी पवित्र धार्मिक स्थळे तुळजापुरात आहेत.

४. कोल्हापूर (श्रीमहालक्ष्मी )-
साडेतीन शक्तिपीठांपैकी कोल्हापूरची श्रीमहालक्ष्मी प्रसिद्ध आहे. महालक्ष्मीचे देवालय कोणी बांधले याबाबतचे संशोधन परिपूर्ण नाही. हे देवालय शिलाहारापूर्वी करहारक (कर्‍हाड) येथील सिंदवंशी राजाने बांधले असावे असे काही संशोधक म्हणतात. कोल्हापूरचे शिलाहार देवीचे निस्सिम भक्त होते. आपणास देवीचा वरप्रसाद मिळाल्याचे त्यांनी अनेक लेखांत लिहून ठेवले आहे. सातव्या शतकात चालुक्य राजवटीत राजा कर्णदेव याने हे देवालय बांधल्याचा उल्लेखही काही ठिकाणी आढळतो.

बर्‍याच विद्वानांच्या मते हल्लीच्या देवळाचा जो अतिशय जुना भाग आहे, त्याचे बांधकाम चालुक्याच्या उत्तर काळात झाले. देवळाच्या मुख्य वास्तुचे मुख्य दोन मजले आहेत. त्यांची बांधणी कोल्हापूरच्या आजुबाजुला मिळणार्‍या काळ्या दगडात केलेली आहे. देवळाचे शिखर व घुमट संकेश्वर मठाचे अधिपती शंकराचार्य यांनी बांधले असे म्हणतात. देवालय आकाराने एखाद्या फुलीप्रमाणे आहे. हेमाडपंती वास्तुशिल्प पद्धतीने या देवळाची बांधणी दरजा न भरता, एकमेकावर ठेवलेल्या अशा मोठमोठ्या चौकोनी दगडात केलेली आहे. देऊळ पश्र्चिमाभिमुख असून प्रवेशद्वारावर नगरखाना आहे.

श्री महालक्ष्मीची मूर्ती १.२२ मीटर उंच असून ती एका ०.९१ मीटर उंच असलेल्या दगडी चौथर्‍यावर उभी करण्यात आलेली आहे. मंदिरात घाटी दरवाजा, गरूड मंडप अशी सुंदर नक्षीकाम केलेली ठिकाणे आहेत. शंकराचार्यांनी या देवळाचे जे वरचे बांधकाम केले, त्याला १ लाख रुपये खर्च आला असे म्हणतात. गरूड मंडप / सभा मंडप १८४४ ते १८६७ च्या दरम्यान बांधण्यात आला. अश्र्विन नवरात्रात महालक्ष्मीची चांदीची प्रतिमा त्या ठिकाणी तयार करण्यात आलेल्या दगडी चौथर्‍यावर ठेवून तिची पूजा करतात. देवळाच्या निरनिराळ्या ठिकाणी अनेक शिलालेख सापडले आहेत.

महालक्ष्मीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. मंदिराची आणि पूजेअर्चेची व्यवस्था ठेवण्यासाठी मंदिरात २० पुजारी आहेत. दर शुक्रवारी देवीच्या प्रतिमेची मिरवणूक काढण्यात येते. कार्तिक आणि माघ महिन्यात महालक्ष्मीच्या देवळाच्याबाबत एक अतिशय विलक्षण घटना अनुभवास येते. विशिष्ट दिवशी सूर्यकिरणे महाद्वारातून प्रवेश करून गाभार्‍यापर्यंत पोहोचतात आणि तेथून ती महालक्ष्मीच्या प्रतिमेवर परावर्तित होतात. ही किरणे पहिल्या प्रथम महालक्ष्मीच्या पायावर पोहोचतात व तेथून ती हळूहळू मस्तकापर्यंत पोहोचतात. हा चमत्कार सोहळा पाच मिनिटांपर्यंत चालतो. हा सोहळा पाहण्यासाठी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात. देवळाची बांधणीच अशा पद्धतीने करण्यात आलेली आहे की, वर्षातून केवळ दोन दिवशीच सूर्यकिरणे देवीच्या अंगावर पडतात.

साडेतीन शक्तिपीठांची दंतकथा
पूर्वी दक्षाने बृहस्पतीराव या नावाचा मोठा यज्ञ केला. या यज्ञात शंकराला न बोलावता सर्व देवांना बोलावले. शिवपत्नी सती या यज्ञाला आमंत्रण नसताना गेली. यज्ञात शिवाला हबीरभाग दिला गेला नाही, त्यामुळे सतीने रागाने यज्ञात उडी घेतली. शंकराला हे कळल्यानंतर त्याने यज्ञाचा विध्वंस केला. सतीचे कलेवर (देह) हातात घेऊन श्री शंकर त्रैलोक्यात हिंडू लागले. ही स्थिती पाहून विष्णूने सुदर्शन चक‘ सोडले व सतीच्या शरीराचे ५१ तुकडे ठिकठिकाणी पाडले. हे तुकडे ज्या ठिकाणी पडले, हीच ५१ शक्तिपीठे म्हणून गणली जाऊ लागली.

यांपैकी महाराष्ट्रात शक्तीची साडेतीन पीठे आहेत. कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजापूरची महासरस्वती (भवानी माता), माहुरची महाकाली आणि वणीची सप्तशृंगी देवी ही ती पीठे होत.

समर्थस्थापित मारुती
श्री मारुती ही बलाची, बुद्धीची व विद्येची देवता आहे. रामभक्त व हनुमानभक्त समर्थ रामदास स्वामींना हनुमंताचाच अवतार समजले जात होते. १२ वर्षे तपश्चर्या केल्यानंतर समर्थ रामदास स्वामींनी संपूर्ण भारतभर प्रवास केला. त्यामुळे त्याकाळच्या समाजस्थितीचे दर्शन त्यांना झाले. भारत भ्रमण करून झाल्यानंतर त्यांनी असे ठरविले की, आपल्याजवळ असणार्‍या ज्ञानाचा, अनुभवाचा, प्राप्त झालेल्या सिद्धींचा उपयोग जनतेची मने रामभक्तीकडे वळवण्यासाठी करावा, श्रीरामाचा दास मारुती याच्या अंगी असलेल्या बलाची उपासनादेखील लोकांना शिकवावी व यासाठी लोकजागृती करावी. संपूर्ण महाराष्ट्र भ्रमण करत कित्येक गावात त्यांनी स्वत: श्रीमारुतीची स्थापना केली. परंतु त्यांनी ११ ठिकाणी स्थापन केलेल्या मारुतींना विशेष महत्त्व आहे. हे ११ मारुती ही जागृत देवस्थाने मानली जातात. हे सर्व मारुती कृष्णानदीच्या तीरावर आहेत. लोकांना मारुतीच्या उपासनेला लावून समर्थांनी धैर्य आणि बलसंपादनाची ईर्षा लोकांमध्ये जागृत केली.

शहाजीराजे भोसले यांच्या जहागिरीच्या क्षेत्रातच हे विशेष महत्त्व असलेले अकरा मारुती आहेत, ही विचार करण्यासारखी बाब आहे. समर्थ रामदासांच्या शिष्य वेणास्वामी ह्यांच्या एका अभंगात अकरा मारुतींचा उल्लेख आहे. तो अभंग पुढीलप्रमाणे -

‘चाफळामाजीं दोन, उंब्रेजेसी येक।
परागांवी देख चौथा तो हा।।
पांचवा मसुरीं, शहापुरीं सहावा।
जाण तो सातवा शिराळ्यांत।।
सिंगणवाडीं आठवा, मनपाडळें नववा।
दहावा जाणावा माजगावीं।।
बाह्यांत अकरावा येणेरीती गावा।
सर्व मनोरथा पुरवील।।
वेणी म्हणे स्वामी समर्थ रामदास।
कीर्ती गगनांत न समावे।।’

समर्थांनी स्थापन केलेले अकरा मारुती सूची :
१. शहापूर -१ स्थापना शके १५६६ (इ. स. १६४४)
२. मसूर -१ स्थापना शके १५६७ (इ. स. १६४५)
३. चाफळ -२ स्थापना शके १५७० (इ.स. १६४८)
४. शिंगणवाडी -१ स्थापना शके १५७१ (इ. स. १६४९)
५. उंब्रज -१ स्थापना शके १५७१ (इ. स. १६४९)
६. माजगाव -१ स्थशपना शके १५७१ (इ. स. १६४९)
७. बहे बोरगाव -१ स्थापना शके १५७३ (इ. स. १६५१)
८. मनपाडळे -१ स्थापना शके १५७३ (इ. स. १६५१)
९. पारगाव -१ स्थापना शके १५७४ (इ. स. १६५२)
१०. शिराळे -१ स्थापना शके १५७६ (इ. स. १६५४)
ही सर्व मारुती मंदिरे सातारा सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांच्या परिसरात आहेत.

समर्थ स्थापित अकरा मारूती
१. श्रीक्षेत्र शहापूर -
शहापूरचा चुन्याचा मारुती म्हणजे समर्थ रामदासांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी पहिला मारुती आहे. अकरा मारुतींच्या स्थापनेच्या कालावधीबाबत अभ्यासकांमध्ये मतभेद आहेत, पण ‘पहिला मारुती शहापूरचाच’ याबाबत सर्वांचे एकमत असल्याचे आढळते. मूर्तीची उंची सुमारे ६ फूट असून मूर्तीचा चेहरा उग्र वाटणारा आहे. मारुतीच्या डोक्याला गोंड्याची टोपी आहे. मंदिर व मूर्ती ही पूर्वाभिमुख आहे. देवळाला तीन चौकटी आहेत. शहापूरकर कुलकर्णी यांच्या घराण्याकडे मूर्तीची व्यवस्था आहे. याठिकाणी चैत्र शु. १५ व्या तिथीला दरवर्षी मोठ्या प्रमाणात हनुमान जयंतीचा उत्सव साजरा केला जातो. मुख्य मूर्तीबरोबरच मंदिरात एक लहानशी पितळी उत्सवमूर्ती आहे. ही उत्सवमूर्ती चाफळच्या रामनवमीच्या उत्सवात, तेथील मंदिरात दरवर्षी आणलीच जाते.

शहापूरच्या मारुतीची स्थापना शके १५६६ साली केली गेली. कर्‍हाड - मसूर या रत्स्यावर कर्‍हाडपासून सुमारे १० कि. मी. अंतरावर शहापूरला जाण्यासाठी रस्ता आहे. मंदिर गावाच्या एका बाजूला असून कृष्णा नदीच्या तीरावर आहे.

२. श्रीक्षेत्र मसूर -
समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी मसूरचा ‘महारुद्र हनुमान’ हा एक महत्त्वाचा मारुती आहे. मूर्ती चुन्याची आहे. मूर्ती पूर्वाभिमुख असून मूर्तीची उंची साधारणत: ५ फूट आहे. अकरा मारुतींपैकी ही सर्वात देखणी व प्रसन्न मूर्ती आहे. डोक्यावर मुकुट, गळ्यातील माळा, हार, जानवे, लंगोटाचे काठ, हाताची बोटे इत्यादी सर्व गोष्टी अतिशय बारकाव्यांनी रंगविलेल्या आहेत. मूर्तीच्या डाव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराज तर उजव्या बाजूला समर्थ रामदासांची चित्रे काढलेली आहेत. इथे चैत्र शु. १५ ला हनुमानजयंतीचा उत्सव अगदी मोठ्या प्रमाणात साजरा होतो.

या मारुतीच्या स्थापनेनंतर इथे दरवर्षी रामनवमीचा उत्सव साजरा केला जात होता. एका वर्षी या उत्सवातच समर्थांना कल्याण नावाचा शिष्य मिळाला. तेच समर्थांचे आवडते शिष्य ‘कल्याणस्वामी’ होत.

सुमारे १३ फूट लांबी-रुंदीचा चौरस असलेल्या सभामंडपात सहा दगडी खांब आहेत. अलीकडच्या काळात या मंदिराचा जिर्णोद्धार सज्जनगडच्या श्रीरामदासस्वामी संस्थान या संस्थेने केला आहे. मंदिराजवळच श्री नारायण महाराजांचा मठ आहे.

श्रीक्षेत्र शहापूर या ठिकाणापासून मसूर फक्त ४-५ कि. मी. अंतरावर आहे. पुणे-मिरज या मार्गावर मसूर रेल्वे स्टेशन आहे.

३. चाफळचे दोन मारुती -
चाफळ आणि सज्जनगड ही समर्थांच्या जीवनातील दोन महत्त्वाची ठिकाणे. श्रीरामाने दिलेल्या दृष्टांताप्रमाणे अंगापूरच्या डोहातील श्री रामाची मूर्ती समर्थांनी बाहेर काढली व जवळच असलेल्या चाफळला आणून त्याची प्राणप्रतिष्ठापना केली. या मंदिराचे बांधकाम शके १५६९ पूर्ण झाले. समर्थांना ज्या वेळी श्रीरामाने दृष्टांत देऊन अंगापूरच्या डोहातील मूर्तीविषयी माहिती दिली, त्याच वेळेस मारुतीनेही समर्थांना दृष्टांत दिला की, ‘माझी मूर्ती श्रीरामाच्या समोर स्थापन कर.’ त्याप्रमाणे श्रीरामाच्या मंदिरात हात जोडून उभा असलेला दासमारुती आणि मंदिराच्या मागे प्रतापमारुती अशा दोन मूर्तींची स्थापना शके १५७० मध्ये समर्थांनी केली. (चाफळ येथील श्रीराम मंदिराच्या परिसरात समर्थ रामदास व छत्रपती शिवाजी महाराज यांची भेट झाल्याचे म्हटले जाते.)

अ. दासमारुती -
दोन्ही हात जोडून उभी असलेली नम्र मारुतीची मूर्ती म्हणजे अकरा मारुतींपैकी दासमारुती होय. ६ फूट उंच असलेल्या मारुतीच्या चेहर्‍यावर विनम्र असे भाव आहेत. समोरच उभ्या असलेल्या श्रीरामाच्या चरणांवर मारुतीची दृष्टी आहे. मूर्ती अत्यंत रेखीव आहे.

मंदिर अतिशय सुंदर असून आजुबाजुच्या परिसरात प्रसन्न वातावरण आहे. सुमारे ३६० वर्षांपूर्वी समर्थांनी बांधलेले दासमारुतीचे मंदिर आजतागायत चांगल्या स्थितीत आहे. मंदिर एवढे भक्कम आहे की, १९६७ साली झालेल्या भूकंपातही या मंदिरास एक तडाही गेला नाही.
ब. प्रतापमारुती -
अकरा मारुतींपैकी हा महत्त्वाचा मारुती आणि चाफळमधील हा दुसरा मारुती होय. भीममारुती, प्रतापमारुती किंवा वीर मारुती अशी तीन नावांनी हा मारुती ओळखला जातो. मूर्ती जवळजवळ आठ फूट उंच आहे. मारुती स्तोत्रात वर्णन केल्याप्रमाणे ही मूर्ती आहे. मूर्तीच्या मस्तकावर मुकुट असून कानात कुंडले आहेत. कंबरेभोवती सुवर्णाची कासोटी असून तिला छोट्या घंटा जोडलेल्या आहेत. (सुवर्ण कटि कासोटी, घंटा किणकिणी...) मूर्ती अतिशय तेजस्वी आहे. भक्तांच्या श्रद्धापूर्वक प्रार्थनेला पावणारा व दुष्टांचा संहार करणारा हा भीमरूपी मारुती एक जागृत देवस्थान आहे.

समर्थ रामदास जेव्हा या मठात राहत असत, तेव्हा या मंदिरातील मूर्तीपाशी बराच वेळ बसून राहत असे म्हटले जाते. चाफळ गावावरील कोणतेही संकट या मूर्तीच्या पूजेने दूर होते, अशी इथल्या भाविकांची श्रद्धा आहे. प्रत्येक वर्षी श्रावण महिन्यात ह्या मारुतीला महारुद्राभिषेक करण्यात येतो.

चाफळमधील या दोन्हीही प्रसिद्ध मारुतींच्या दर्शनासाठी जाण्यासाठी बसेसची सोय आहे. भाविकांना मंदिराच्या परिसरात उत्तम प्रकारची राहण्याची व भोजनाची व्यवस्था आहे.

४. श्रीक्षेत्र शिंगणवाडी -
चाफळपासून अर्धा ते एक कि. मी. अंतरावर नैऋत्य दिशेस शिंगणवाडी ही टेकडी आहे. या टेकडीवरील गुहेत समर्थ रामदास स्वामी जप, ध्यान-धारणा करीत असत. म्हणून आपल्या दैवताची-मारुतीची मूर्ती त्यांनी तेथे शके १५७१ मध्ये स्थापन केली. छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामींची ऐतिहासिक भेट ही इथल्या मठालगत असलेल्या वृक्षाखाली झाली असे काही अभ्यासकांचे मत आहे.

शिंगणवाडीच्या मारुतीस ‘खडीचा मारुती’ किंवा ‘बालमारुती’ असेही म्हणतात. सुमारे ६ फूट लांब-रुंद असणार्‍या गाभार्‍यात साडेतीन फूट उंचीची मूर्ती आहे. मूर्ती उत्तराभिमुख असून डाव्या हातात ध्वजा आहे. तर उजवा हात उगारलेला आहे. मंदिराच्या आजुबाजुचा परिसर हा आल्हाददायक व पवित्र वातावरणाचा आहे.

मंदिर उंचावर असून मंदिराला तांबडा रंग दिलेला आहे. मंदिर हे चाफळच्या परिसरातून कुठूनही दिसते. चाफळपासून हा मारुती थोड्या अंतरावर असल्यामुळे याला चाफळचा तिसरा मारुती असेही म्हणतात.

चाफळच्या श्रीराम देवस्थानकडून या मंदिराची पूजा केली जाते. चाफळच्या दोन मारुतींचे व श्रीरामाचे दर्शन घेतल्यावर या शिंगणवाडीच्या मारुतीचे दर्शन घेतल्याशिवाय भाविक परत जात नाहीत. ‘रामघळ’ हे समर्थांच्या साधनेचे ठिकाण येथून जवळच आहे.

५. श्रीक्षेत्र उंब्रज -
मसूरच्या पश्चिमेस चार किलोमीटर अंतरावर उंब्रज हे ठिकाण आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी वयाने लहान वाटणार्‍या या मारुतीस ‘बालमारुती’ म्हणतात. या मूर्तीची उंची सुमारे ६ फुट असून मूर्ती आकर्षक आहे. मूर्ती चुना, वाळू व ताग या तिन्हीच्या मिश्रणातून बनवलेली आहे. मूर्तीला चांदीचे डोळे आहेत. या मारुतीला ‘उंब्रजचा मारुती’ किंवा ‘मठातील मारुती’ असेही म्हणतात. मंदिर पूर्वाभिमुख असून मंदिराला कळस नाही.उंब्रजच्या मारुतीची स्थापना शके १५७१ मध्ये केली गेली.

‘विश्रामधाम’ या ग्रंथातील उल्लेखानुसार या मूर्तीच्या स्थापनेनंतर समर्थ रामदास स्वामींनी येथे सलग १३ दिवस कीर्तन केले. या मूर्तीच्या स्थापनेसंबंधी असेही म्हटले जाते की, चाफळहून समर्थ उंब्रजला स्नान करण्यासाठी येत असत, म्हणून या मारुतीची स्थापना केली असावी. मंदिराच्या जवळूनच कृष्णा नदी वाहते. परिसर अतिशय पवित्र व मंगलमय आहे. चैत्र शुद्ध १५ ला हनुमान जयंतीचा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होतो. हनुमान जयंतीच्या १ दिवस आधी इथे ‘सांप्रदायिक भिक्षेचा’ कार्यक्रम होतो.
६. श्रीक्षेत्र माजगाव
चाफळहून माजगांव हे सुमारे २ कि. मी. अंतरावर आहे. माजगावच्या मारुतीची उंची ५ फूट असून मूर्ती पश्चिममुखी आहे. चाफळच्या रामाकडे या मूर्तीचे तोंड आहे.

या मूर्तीच्या स्थापनेसंदर्भात असे म्हटले जाते की, या गावाच्या वेशीवरील एका दगडाला लोक मारुती समजत. समर्थांच्या हस्ते या मूर्तीची प्रतिष्ठापना व्हावी अशी इच्छा गावातील लोकांची होती. त्याप्रमाणे समर्थांनी स्वत: त्या दगडावर सुंदर मूर्तीकाम करून मारुतीची मूर्ती घडवली. शके १५७१ मध्ये या मारुतीची स्थापना करून तेथे एक देऊळही बांधले.

मूळ मंदिर आठ फूट लांबी-रुंदीचे असून ते कौलारू आहे. चाफळच्या श्रीराम देवस्थानकडे या मंदिराच्या व्यवस्थापनाचे काम आहे. सध्याचे मंदिर हे श्रीधर स्वामींनी बांधले आहे असे म्हटले जाते.

यात्रेकरूंसाठी या मंदिराच्या जवळपास म्हणावी अशी खास सोय नाही. परंतु मंदिराच्या समोर असलेल्या सभामंडपात निवासाची सोय होऊ शकते.

७. श्रीक्षेत्र बहे - बोरगाव
कृष्णा नदीच्या किनारी बोरगावजवळ बहे हे गाव आहे. त्यामुळे या ठिकाणाला बहे - बोरगाव म्हणतात. बहे-बोरगांवचा मारुती हे एक जागृत देवस्थान आहे. इथली मूर्ती ही भव्य असून मूर्तीच्या डोक्यावर उंच मुकुट आहे. कृष्णा नदीच्या प्रवाहात ‘रामलिंग’ नावाचे एक प्राचीन बेट आहे. या बेटावर राममंदिर आहे. या राममंदिराच्या पाठीमागेच मारुतीची स्थापना शके १५७३ मध्ये समर्थांनी केलेली आहे. मंदिर अतिशय प्रसन्न व निसर्गरम्य ठिकाणी आहे.

रावणवध करून परत येत असताना राम-लक्ष्मण यांनी बहे या गावी मुक्काम केला असे म्हटले जाते. भक्तिरसाने भरलेले भीमरूपी स्तोत्र समर्थांना याच मारुतीचे ध्यान करीत असताना सुचले असेही म्हटले जाते. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी निसर्गसृष्टीने बहरलेला व अगदी रम्य असा इथला परिसर आहे. मारुती मंदिराबरोबरच या कृष्णा नदीत अनेक लहान-लहान बेटे व अनेक समाधी इथे आहेत. कृष्ण-माहात्म्यात ‘बाहुक्षेत्र’ असा या स्थानाचा उल्लेख आढळतो. या बेटापासून ‘मच्छिंद्र’ गड जवळच आहे.

८. श्रीक्षेत्र मनपाडळे
समर्थस्थापित अकरा मारुतीपैकी मनपाडळे हा एक. नदीच्या काठी वसलेले हे मारुती मंदिर कौलारू आहे. मंदिराचा गाभारा ७ x ६ चौ. फूट असून याच्याभोवती २६ x १५ चौ. फुटांचा भव्य सभामंडप आहे. मूर्ती प्रसन्न असून नवसाला पावणारी आहे असे मानतात. मूर्ती उत्तराभिमुख आहे. मूर्ती सुमारे ५ फूट उंचीची असून मूर्तीजवळ कुबडी आहे.

ज्योतिबाचा डोंगर व पन्हाळगड ही ठिकाणे येथून अगदी जवळच्याच अंतरावर आहेत. अशा या पवित्र व रम्य परिसरात ह्या मूर्तीची स्थापना समर्थांनी शके १५७३ साली केली.

९. श्रीक्षेत्र पारगाव -
मनपाडळे या तीर्थक्षेत्रापासून सुमारे ५ कि. मी. अंतरावर पारगाव हे गाव आहे. या गावात समर्थांनी शके १५७४ मध्ये मारुतीची स्थापना केली. अकरा मारुतींपैकी हा ‘पारगावचा’ मारुती म्हणून ओळखला जातो. मूर्ती सपाट दगडावर कोरलेली आहे. मूर्ती डावीकडे तोंड करून धावत चालली असून, मारुतीने केसाची शेंडी बांधलेली आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या अकरा मारुतींपैकी ही मूर्ती सर्वात लहान असून फक्त दीड फूट उंचीची आहे.

या मंदिराचा मूळ घुमट हा ८ फूट लांबीरुंदीचा आहे. मंदिराला नव्यानेच सभामंडप बांधण्यात आला आहे. समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा शेवटचा मारुती असे समजले जाते.

पन्हाळ्यापासून काही अंतरावरच पारगाव हे ठिकाण आहे. या ठिकाणाबद्दल असे म्हटले जाते की, छत्रपती शिवाजी महाराज व समर्थ रामदास स्वामी हे स्वराज्याविषयी चर्चेसाठी या गावी येत असत. पन्हाळा व ज्योतिबा ही ठिकाणे या गावापासून अगदी जवळच आहेत.

१०. क्षेत्र शिराळे
समर्थांनी स्थापन केलेल्या ११ मारुतींपैकी हा एक महत्त्वपूर्ण मारुती होय. भक्ताच्या हाकेला धावून जाणारा व सर्वांच्या मनोकामना पूर्ण करणारा म्हणून हा मारुती ओळखला जातो. येथील मंदिर व मूर्ती ही उत्तरभिमुख आहे. या मारुतीला ‘वीरमारुती’ म्हणतात. मूर्तीची उंची सुमारे ७ फूट आहे. मूर्ती ही सुबक व रेखीव कोरलेली आहे. मूर्तीच्या डोक्यावरील झरोक्यांतून सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी मूर्तीवर प्रकाश पडतो. हे दृश्य अतिशय सुंदर दिसते.

मंदिरासमोर प्रशस्त असा सभामंडप आहे. अकरा मारुतींच्या देवळात हे मंदिर सर्वात सुंदर आहे असे भाविक म्हणतात. समर्थांनी मंदिराची स्थापना १५७६ मध्ये केली. मूर्ती स्थापनेनंतर समर्थशिष्य जयरामस्वामी यांनी कौलारू मंदिर बांधले. पुढील काळात एका भक्ताने दगडी मंदिर बांधून मंदिराचा जिर्णोद्धार केला. शिराळे हे गाव गारूड्यांच्या व नागांच्या खेळासाठी प्रसिद्ध आहे. मंदिर गावाच्या मध्यभागी असून बसस्थानकापासून जवळच आहे. हनुमान जयंतीला या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर उत्सव साजरा केला जातो.

अन्य महत्वाची स्थळे ........

जेजुरी :
पुणे जिल्ह्यातील खंडोबाचे हे देवस्थान आहे. हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून ‘जेजुरीचा खंडोबा’ या नावाने हे सर्वपरिचित आहे. उंच डोंगरावर असलेल्या कडेपठार या ठिकाणी जुने खंडोबाचे स्थान होते. परंतु आता जेजुरी या ठिकाणी नव्याने बांधलेले देऊळ आहे. तरी तेही आता तीन शतकांपूर्वीचे (इ.स.१७१२) देऊळ आहे. मोगलांच्या सैन्याने मंदिर उद्ध्वस्त केल्याचे इतिहास सांगतो. औरंगजेबाने १,२५,००० चांदीच्या मोहरा देऊन, या देवळातील उठलेल्या पोळ्यातील माशा शांत होण्यासाठी खंडोबालाच साकडे घातले, असाही उल्लेख सापडतो.

देवळासमोर दगडी दीपमाळा आहेत. सुमारे २०० पायर्‍या चढून वर गेल्यावरच मल्हारी मार्तंडाचे म्हणजेच खंडोबाचे दर्शन होते. ‘नवलाख पायरीचा (नऊ लाख पायर्‍या) डोंगर’ असेही या देवस्थानच्या डोंगरास म्हटले जाते. देऊळ अतिशय सुंदर आहे. सभामंडप आणि गाभारा असलेल्या या देवळात खंडोबाची मूर्ती आहे. म्हाळसा, मणिमाला आणि खंडोबा अशा तीन सुबक मूर्ती देवळात आहेत. देवळात तलवार, डमरू आणि परळ या पुरातन वस्तू जतन केलेल्या आहेत. अतिशय जड अशी पुरातन तलवार उचलण्याचा एक अवघड खेळ इथे दरवर्षी खेळला जातो. उंच धरून तलवार जास्तीत जास्त वेळ उचललेली ठेवणार्‍या व्यक्तीला बक्षिस देण्याची पद्धत आहे. दसर्‍याच्या दिवशी मोठी यात्रा इथे भरते.तसेच सोमवती अमावास्येलाही भाविक येथे दर्शनासाठी गर्दी करतात.

छत्रपती शिवाजी महाराज यांची या देवळातच आपले वडील शहाजीराजे यांच्याशी भेट झाली होती असा उल्लेख इतिहासात आढळतो. बरेच दिवस मोहीमांवर असल्याने दोघे परस्परांस भेटले नव्हते. त्यामुळे त्यांच्या या भेटीला व स्थानाला ऐतिहासिक महत्त्व आहे.

जेजुरीच्या मंदिराचे उत्कृष्ट कोरीव काम जरूर पाहण्याजोगे आहे. आसपासही जुन्या वास्तू पाहायला मिळतात. जेजुरी हा शिवकाळातील दक्षिणेकडचा एक मोठा किल्ला होता.

‘यळकोट यळकोट जयमल्हार’ असा जयघोष करत देवाच्या भेटीला भक्तगण, दर्शनार्थी येतात. दर्शनाला येताना लोक भंडारा (हळद) उधळतात व श्रद्धेने कपाळाला लावतात. लग्न झाल्यानंतर वधु-वरांनी जोडीने खंडोबाचे दर्शन घेण्याची परंपरा आहे. यानुसार संपूर्ण महाराष्ट्रातून येथे नवविवाहीत जोडपी दर्शनासाठी येतात.

जेजुरी पुण्यापासून ५० कि. मी. अंतरावर असून, अष्टविनायकाचे स्थान मोरगाव जेजुरीपासून अवघ्या १५ कि. मी. अंतरावर आहे.


पंढरपूर :
माझे माहेर पंढरी आहे भीवरेच्या तिरी,
माझी बहीण चंद्रभागा, करीत असे पाप भंगा।।
किंवा
जन्मासी येऊनी पहा रे पंढरी।।
किंवा
पंढरीचे सुख नाही त्रिभुवनी।।
अशा भावपूर्ण शब्दांत पंढरपूरचे वर्णन अनेक संतांनी केले आहे.

पंढरपूर हे सोलापूर जिल्ह्यात भीमा नदीच्या तीरावर वसलेले महाराष्ट्रातील प्रमुख तीर्थक्षेत्र आहे.
पंढरपूर म्हटले की डोळ्यासामेर येते विठ्ठलाचे सावळे, सुंदर, मनोहर रूप. पंढरपूरला दक्षिणेतील काशी असेही म्हटले जाते. एवढे मोठे पावित्र्य या तीर्थक्षेत्राला आहे. महाराष्ट्राला अनेक संतांचा वारसा लाभला आहे. या संतांच्या शिकवणीतूनच महाराष्ट्राची संस्कृती अधिक परिपूर्ण झाली आहे. या सर्व संतांचे आराध्य दैवत म्हणजे हा पंढरपूरचा पांडुरंग आणि त्यांचे माहेरघर म्हणजे पंढरी होय.

येथील विठ्ठलाच्या मूर्तीविषयी अशी कथा सांगितली जाते की, प्रत्यक्ष श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप घेऊन येथे प्रकटला. दानवांच्या लढाईत श्रीकृष्णाला मुचकुंद राजाने बरीच मदत केली. ते बघून श्रीकृष्णाने त्याला वर मागावयास सांगितला. तेव्हा राजा म्हणाला तुझे हेच रूप कायम माझ्या डोळ्यासमोर असेच उभे राहू दे. तेव्हा श्रीकृष्ण विठ्ठलाचे रूप घेऊन पंढरपूर येथे आपल्या भक्ताच्या भेटीला आले व राजा मुचकुंद यांनी भक्त पुंडलिकाच्या रूपात दुसरा जन्म घेतला.

पंढरपूर येथील मंदिरांचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पांडुरंगाचे व रुक्मिणीचे वेगळे मंदिर आहे. पांडुरंगाचे मंदिर म्हणजे शिल्पकलेचाही एक उत्तम नमुना आहे.

पंढरपूरला चार मुख्य यात्रा असतात. १) आषाढी २) कार्तिकी ३) माघी ४) चैत्री. यापैकी आषाढी एकादशीला महाराष्ट्रातून असंख्य भाविक, अनेक संतांच्या पालख्या घेऊन पायी चालत-वारीने-या पांडुरंगाच्या भेटीला येतात.

केवळ महाराष्ट्रातूनच नाही तर कर्नाटक, आंध‘, तामीळनाडू या राज्यांतूनही भाविक मोठ्या प्रमाणावर या विठ्ठलाच्या दर्शनाला येतात.

पंढरपूर ते सोलापूर हे अंतर ६७ कि. मी. आहे. तर पंढरपूर ते पुणे हे अंतर २१७ कि. मी. आहे. येथे भक्तांसाठी राहण्याच्या सोयीसाठी अनेक आश्रम, धर्मशाळा उपलब्ध आहेत.

आळंदी :
पुण्यापासून २५ कि.मी. अंतरावर आळंदी हे लहानसे गाव आहे. इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन समाधीचे हे ठिकाण! यामुळेच आळंदीला तीर्थक्षेत्राचे महत्त्व आले आहे. आषाढ महिन्यात संत ज्ञानेश्र्वरांची पालखी आळंदीहून पंढरपूरला जाते. त्यात असंख्य वारकरी सामील होतात. आळंदी ते पंढरपूर हे अंतर (सुमारे २०५ कि. मी.) भाविक विठू माउलीच्या नामाचा गजर करत, ‘ज्ञानोबा माऊली तुकाराम’ असा जयघोष करत, चालत पार करतात.

आळंदी गावात संजीवन समाधीसह, मुक्ताईचे मंदिर, विठोबा-रखुमाई मंदिर व कृष्णमंदिरही पाहण्याजोगे आहे.

आळंदी येथे अजानवृक्षाखाली संत ज्ञानेश्र्वर महाराजांनी जिवंत समाधी घेतली म्हणूनच या स्थानास संजीवन समाधी म्हटले जाते. कीर्तन-प्रवचन-वेदाभ्यास यासाठीचे महाविद्यालय येथे आहे. संस्कृत व अन्य धार्मिक ग्रंथांचा अभ्यास तेथे अविरत सुरू असतो.
देहू :
पुण्यापासून मुंबईकडे जाताना २५ कि. मी. वर देहू हे इंद्रायणी नदीच्या काठावर असलेले लहानसे गाव. वारकरी आणि भक्ती संप्रदायाचे एक मोठे संत - श्री तुकाराम देहू गावी राहत. गाथा आणि अनेक अभंगांच्या रूपात संत तुकाराम महाराज आजही आपल्याला भेटतात. श्री संत तुकाराम महाराज हे श्री विठोबाचे नि:स्सिम भक्त. त्यामुळे प्रत्येक आषाढी एकादशीला संत ज्ञानेश्र्वर महाराजांप्रमाणेच तुकाराम महाराजांचीही पालखी पंढरपूरला जात असते.

संत तुकाराम महराजांचे जन्मस्थान म्हणून हे प्रसिद्ध आहे. फाल्गुन वद्य द्वितीयेला (तुकारामबीज) येथे मोठी यात्रा भरते. त्याच दिवशी तुकाराम महाराजांनी सदेह वैकुंठगमन केले असे मानतात. विठ्ठल मंदिर, जुने शिवमंदिर, इंद्रायणीचा डोह ही देहूतील बघण्यासारखी ठिकाणे आहेत. जवळच रामचंद्र डोंगर, भंडारा डोंगर येथे कोरीव लेणीही आहेत. संत तुकाराम महाराज चिंतनासाठी, साधनेसाठी भंडारा डोंगरावर जात असत. प्रत्येक गुरुवारी व एकादशीच्या दिवशी मंदिरात कीर्तन होते. सध्या दिसणारे मंदिर इ. स. १७२३ मध्ये संत तुकारामांचा सर्वात लहान मुलगा नारायणबाबा यांनी बांधून घेतले अशी नोंद आढळते.

अक्कलकोट:
सोलापूर जिल्ह्यात हे लहानसे गाव आहे. स्वामी समर्थ महाराजांचे हे समाधी देवस्थान सोलापूरपासून फक्त ४५ कि. मी. अंतरावर असून असंख्य श्रद्धावानांचे पवित्र ठिकाण आहे. अक्कलकोटचे स्वामी समर्थ हे नाथ पंथीय घोर तप करणारे स्वामी. त्यांनी वेगवेगळे जन्म घेतले आणि ते समाधी घेऊन आजही वेगळ्या रूपात आहेत, असे भाविक मानतात. समाधी स्थळ, शिवपुरी आश्रम ही येथील प्रेक्षणीय ठिकाणे आहेत. शिवपुरी आश्रमात सातत्याने अग्नी तेवत ठेवण्याचे शास्त्र - अग्निहोत्र- जतन केले आहे.

शिर्डी:
१९ व्या शतकाच्या उत्तरार्धात शिर्डी येथे थोर संत श्री साईबाबा अनेक वर्षे राहिले. येथे राहूनच त्यांनी भक्तगणांना भक्तिमार्गाविषयी आपल्या कृतीतून मार्गदर्शन केले. श्रद्धा व सबुरी अशी दोन सुत्रे जगण्यासाठी देणार्‍या श्री साईबाबांनी २० व्या शतकाच्या सुरुवातीला शिर्डी येथे समाधी घेतली. पुढील काळात येथे प्रशस्त मंदिर बांधण्यात आले व श्री साईबाबांच्या मूर्तीची स्थापनाही करण्यात आली.१९२२ साली हे मंदिर बांधले आहे. गेल्या काही वर्षात भाविकांची संख्या वाढते आहे. शिर्डी संस्थानात भाविकांसाठी निवास, भोजन, प्रसाद अशा सोयी केल्या आहेत. उत्कृष्ट व्यवस्था होण्यासाठी अनेक इमारती बांधल्या आहेत.

इटालीयन संगमरवरातील श्री साईबाबांची सुंदर, विशाल मूर्ती हे भाविकांचे श्रद्धास्थान आहे. तसेच संगमरवरातील समाधीस्थानही अतिशय पवित्र, देखणे आहे. नागपूरच्या गोपाळराव बुटींनी मुरलीधराच्या मंदिरासाठी शिर्डीत बांधकाम करून घेतले. परंतु साईबाबाच तेथील मुरलीधर झाले असे म्हटले जाते.

शिर्डीमध्ये बालयोग्याच्या रूपात पोहोचलेले साईबाबा जेथे राहत, त्याला द्वारकामाई म्हणतात.ते ज्या कडुनिंबाच्या झाडाखाली प्रथम दिसले त्याला गुरुस्थान असे नाव आहे. ज्या ठिकाणी ते झोपत, त्या स्थानाला चावडी म्हटले जाते. श्री साईबाबांनी दररोज पाणी घालून तयार केलेली बाग लेंडीबाग म्हणून जतन केली आहे. तिथे कडूनिंबाच्या झाडाखाली बाबा रोज विश्रांती घेत असत. मंदिराच्या परिसरातच श्री साईबाबा ज्यावर नेहमी बसत, ती शिळाही दर्शनासाठी ठेवलेली आहे.

श्रीसाईबाबा ज्या वस्तू दररोज वापरत, त्या व्यवस्थित ठेवून एक संग्रहालय केले आहे. साईबाबांचा पाण्याचा डबा, पादूका, जाते, हुक्कादाणी, कफनी, खडावा या वस्तू पाहण्यास मिळतात. त्यांचे दुर्मीळ फोटोही इथे पाहायला मिळतात.
मुंबईहून ३०० कि. मी. तर पुण्याहून सुमारे २०० कि. मी. वर अहमदनगर जिल्ह्यात कोपरगावजवळ शिर्डी हे ठिकाण आहे. मनमाड जंक्शनपासून फक्त ६० कि. मी. वर शिर्डी आहे. त्यामुळे रेल्वेने येथे सहज पोहोचता येते. जगभरातून लाखो लोक श्री साईबाबांच्या दर्शनासाठी येथे येतात.

शेगांव:
बुलढाणा जिल्ह्यातील खामगावजवळचे हे ठिकाण संत गजानन महाराज यांच्यामुळेच प्रसिद्ध झाले आहे.

शेगावमध्ये इ. स. १८७८ साली गजानन महाराजांना प्रथम बंकटलाल आणि दामोदर यांनी पाहिले. ते समर्थ रामदासांचे अवतार मानले जातात. योगशास्त्र, वेदशास्त्रात ते पारंगत होते. तपश्चर्या केलेली असल्याने त्यांना काही सिद्धी प्राप्त होत्या. प्राणी, पक्ष्यांची भाषा त्यांना समजत असे. लोकांचे वैयक्तिक, प्रापंचिक प्रश्र्न सोडवत सोडवत त्यांनी लोकांना आध्यात्मिक मार्गदर्शन केले. ‘गण गण गणात बोते’ हा त्यांनी दिलेला मंत्र होय.

लोकमान्य टिळक, अण्णासाहेब पटवर्धन, दादासाहेब खापर्डे असे अनेक नामवंत त्यांचे भक्त होते. अंगावर कपडे नाहीत, कुठेही मिळेल ते अन्न घेणे, कुठेही आडवे होऊन झोपून जाणे, कोणतीही वस्तू संग्रही न ठेवणे अशा कृती करणारे ते अवालिया सत्पुरुष होते. पंढरपूरच्या पांडुरंगासमोर १९१० मध्ये त्यांनी हे जग सोडण्याचा निर्णन भक्तांना सांगितला. त्यापूर्वी १९०८ मध्ये त्यांनीच भक्तांना नोंदणीकृत न्यास स्थापन करावा असे सांगितले होते. भक्तांच्या सोयीसाठी हा ट्रस्ट करण्यात आला. १९१० मध्ये त्यांनी समाधी घेण्याची तारीख - वार - दिवस भक्तांना सांगितला, समाधीची जागाही निश्र्चित करून दाखवली. दिनांक ८ सप्टेंबर, १९१० मध्ये भाद्रपद शुद्ध पंचमीला, गुरुवारी त्यांनी सर्वांचा निरोप घेतला.

विदर्भातील अनेक पंडित, गुरू, आचार्य त्यांची भेट घेत. ते विष्णूचे अवतारही मानले जातात. म्हणूनच ‘विदर्भाचे पंढरपूर शेगाव’ असे याचे वर्णन करतात.

भक्तांना मार्गदर्शन करणे, योग्य मार्ग दाखवणे, आशीर्वाद देणे आणि स्वत: सातत्याने फक्त साधना करणे अशी त्यांची दैनंदिनी असे. गुरुवार हा वार असंख्य भाविकांचा शेगावच्या गजानन महाराजांचे दर्शन घेण्याचा दिवस ठरून गेला आहे. शेगावमधील श्री राममंदिर देखील चैत्र महिन्यात रामनवमी दिवशी, ऋषी पंचमी दिवशी भक्तांनी गजबलेले असते. शेगावच्या संत गजानन महाराज स्मारक संस्थानच्या प्रयत्नांमुळे तिथे बर्‍याच शैक्षणिक संस्था सुरू झाल्या आहेत. दर्शनाला येणार्‍या भाविकांसाठीही येथे अनेक सुविधा उपलब्ध आहेत.

मुंबईपासून ५५० कि. मी. अंतरावर, नागपूरपासून ३०० कि. मी. वर असलेले शेगाव हे बुलढाणा जिल्ह्यातील गाव आहे. मध्य रेल्वेच्या मुंबई-भुसावळ-नागपूर मार्गावर लागणारे हे स्टेशन आहे.

मांढरदेवी:
सातार्‍यातील वाईजवळ मांढरदेवी हे ठिकाण आहे. वाईपासून २५ कि. मी. अंतरावर टेकडीवर देवीचे देऊळ आहे. काळूबाई असे येथील देवीचे नाव असून, येथील काळुबाईची यात्रा प्रसिद्ध आहे.

पुण्यापासून सुमारे २०० कि. मी. अंतरावरचे हे ठिकाण १२०० मी. उंच टेकडीवर आहे. अरुंद वाटा असलेली चढण चढत जाऊन देवीचे दर्शन घ्यावे लागते.

शाकंभरी पौष पौर्णिमेला दरवर्षी हजारो भक्त येथे दर्शनाला येतात. मांगिरबाबांच्या देवळाशी नारळ फोडून, काळूबाईचे दर्शन घेणे आणि दीपमाळेत तेल घालणे अशा परंपरेसह भाविक दर्शन घेतात.

नांदेड - सुवर्णमंदिर:
महाराष्ट्रातील मराठवाड्यातील हा जिल्हा. एका बाजूने आंध्रप्रदेश या राज्याच्या सीमेलगतचा आहे.

नांदेड येथील गुरूद्वारा शीख लोकांचे अमृतसरसारखेच पवित्र ठिकाण मानले जाते. १७०८ साली तख्त सचखंड श्री हजुर अबचलनगर साहिब’ हे ठिकाण गोदावरी नदीच्या किनार्‍यावर नांदेडमध्ये स्थापित झाले. शिखांचे दहावे गुरू - गुरूगोविंद सिंह त्याठिकाणी कारभार पाहत असत. परंतु पुढे त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला तेच हे ठिकाण. त्यांच्या स्मरणार्थ येथे गुरूद्वारा उभारण्यात आला. ग्रंथसाहिब हा धर्मग्रंथ हाच आपला गुरू असे गुरूगोविंद सिंग यांनी येथे सांगीतले.

१८३० मध्ये पंजाब मधील कारागीर बोलवून सध्याचे तख्त साहिब हे ठिकाण महाराजा रणजीत सिंग यांनी बांधून घेतले. त्यात ‘बंगा मॉ भागोजी’ हे मोठ्या मोठ्या ऐतिहासिक शस्त्रांचे संग्रहालय आहे. दुसरे महत्त्वाचे पवित्र ठिकाण म्हणजे शीख धर्मीयांचा ‘गुरू ग्रंथसाहेब’ या ग्रंथाचे वाचन, पठण केले जाते ती जागा. दोन्हीही ठिकाणे त्याच आवारात आहेत.

विस्तीर्ण अशा जागेवर तख्त साहिब हे स्थान आहे. नुकताच २००८ मध्ये या स्थानाच्या स्थापनेस ३०० वर्षे पूर्ण झाल्याबद्दलचा सोहळा - ‘गुरू-ता-गद्दी सोहळा’ येथे संपन्न झाला. महाराष्ट्रातील शीख पंथाचे दुसरे महत्त्वाचे ठिकाण ‘गुरूद्वारा गुप्तसर साहिब’ हे मनमाडमध्ये आहे.

कोकणातील धार्मिक स्थाने - तीर्थक्षेत्रे
श्रीक्षेत्र गणपतीपुळे -
रत्नागिरी जिल्ह्यातील समुद्राकाठी असलेले, श्रीगणेशाची स्वयंभू मूर्ती जेथे आहे, असे हे ठिकाण. समुद्र किनारी असलेल्या देवळाच्या पार्श्र्वभूमीवरील डोंगरही जणू गणपतीच्या आकाराचा आहे. पुळणीवर प्रकट झालेला गणपती म्हणून गणपतीपुळे. ‘पुळ्याचा गणपती’ असाही शब्दप्रयोग वापरला जातो. हिंदुस्थानच्या आठ दिशांनी आठ द्वारदेवता आहेत. त्यापैकी पुळ्याच्या गणपती ही पश्र्चिमद्वार देवता मानतात.

छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्तो यांनी छपराच्या जागी घुमट बांधला, तर पेशव्यांचे सरदार बुंदेले यांनी सभामंडप बांधला. कोल्हापूर संस्थानचे कारभारी बर्वे यांनी नंतर सोन्याचा मुलामा दिलेला घुमटाकार कळस चढवला. नानासाहेब पेशवे यांनी नंदादीप दिला, तर चिमाजी अप्पांनी नगारखान्याची व्यस्था केली. माधवराव पेशवे व रमाबाईंनी दगडी धर्मशाळा बांधली आहे. - अशा अनेक नोंदी या मंदिराच्या इतिहासात आढळतात.

या गावातील स्थानिक लोक घरोघरी स्वतंत्र गणपती बसवत नाहीत. सर्व जण एकत्र येऊन स्वयंभू गणेशाची पूजाअर्चा करून गणेशोत्सव साजरा करतात.

ज्या डोंगराला श्रीगणेश मानले जाते त्याला प्रदक्षिणा घालण्यासाठी १५-२० मिनिटे लागतात. दरवर्षी २ ते ८ फेब्रुवारी आणि २ ते ८ नोव्हेंबर या दिवसात सूर्यास्ताची किरणे गणेशमूर्तीवर पडतात. अगदी समुद्र किनार्‍यावरच हे मंदिर असल्यामुळे लाटांचा घनगंभीर आवाज, अथांग सागर, नजरेच्या टप्प्यात न मावणारा किनारा, अतिशय सुबक, रेखीव असे मंदिर आणि स्वयंभू श्रीगणेश असा विलक्षण अनुभव येथे मिळतो. संपूर्ण डोंगराला प्रदक्षिणा घालताना सागराची रूपे, कोकणातला निसर्ग अनुभवता येतो.

हरिहरेश्र्वर : (जिल्हा रायगड)
हरिहरेश्र्वर येथील शंकराच्या मंदिराला कोकणात विशेष स्थान आहे. या ठिकाणी शिवलिंग असून श्री गणपती आणि मारुतीचेही मंदिर त्याच आवारात आहे. या ठिकाणाशी संबंधित एक पौराणिक कथा स्कंद पुराणात सापडते.

मुबंई-गोवा महामार्गावरील माणगावपासून ५३ कि. मी. वर श्रीवर्धन तालुक्यात हरिहरेश्र्वर हे ठिकाण आहे. कोकणी पद्धतीच्या कौलारू छपरामुळे हे मंदिर वेगळे उठून दिसते.

समुद्र, खाडी, जांभा दगड, वाळू यामुळे फारसे भक्कम नसलेलीही बांधकामे अजूनही टिकून आहेत. कारण पेशवेकाळात अनेक मंदिरांचा,तीर्थक्षेत्रांचा जिर्णोद्धार करण्याची पद्धत होती.

श्री हरिहरेश्र्वराच्या मंदिरात एक विहीर आहे. ती स्वत: ब्रम्हदेवाने खणली असे भाविक मानतात. २० फूट उंचीच्या दोन दगडी दीपमाळा या मंदिरात आहेत. हरिहरेश्र्वराच्या देवळात ब्रम्हा, विष्णू, महेश आणि पार्वतीच्या प्रतिमा आहेत.

महादेवाच्या प्रत्येक ठिकाणी नंदी असतोच. तसेच काळभैरवाचेही विशेष महत्त्व महादेवाच्या मंदिरात असते. दैत्यांपासून मुक्ती देणारा म्हणजे श्री कालभैरव असे मानतात. त्यामुळे महादेवाच्या मंदिरात भाविक काळभैरवाचेही दर्शन घेतात.

एका बाजूने सावित्री नदी, तर दुसरीकडे अथांग सागर असा हा परिसर.काही लोक लघुपरिक्रमा म्हणजे प्रदक्षिणा घालतात.त्याला पाऊण तास लागतो. टेकड्या चढणे - उतरणे, काळेभोर खडक ओलांडणे, पाण्यातून जाणे, लाटा पहाणे, अवघड वाट चालणे अशी मजा घेता येते.

श्रीमंत पेशवे यांच्या घराण्याचे हरिहरेश्र्वर हे कुलदैवत होते. छत्रपती शिवाजी महाराज या मंदिराला भेट देऊन गेल्याचा उल्लेख आढळतो. तसेच छत्रपती संभाजी महाराजही येऊन गेल्याचेही उल्लेख आढळतात. असे हे हरिहरेश्र्वर-तीर्थक्षेत्र आहे आणि निसर्गरम्य ठिकाणही आहे.

श्रीवर्धन -
श्रीवर्धन हे कोकणातील रायगड जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण असून तीर्थक्षेत्र म्हणून व समुद्रकिनारा लाभलेले निसर्गरम्य पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे.

श्रीवर्धन या नावाविषयी कथा सांगितली जाते. गावातील लक्ष्मीनारायणाच्या मंदिरातील विष्णूच्या हातात एका विशिष्ट क्रमाने पद्म, चक्र, गदा व शंख ही आयुधे आहेत. म्हणूनच या विष्णूला ‘श्रीधर’ म्हटले जाते.. त्या ‘श्री’ च्या अस्तित्वामुळे वधर्न (वाढ) झालेले गाव म्हणजे ‘श्रीवर्धन’.

या निसर्गरम्य गावाच्या उत्तरेस तांबडीचा डोंगर व पश्र्चिमेकडे समुद्र आहे. तर दक्षिणेस असलेल्या खाडीत हे गाव आखीव-रेखीव असे नटलेले आहे. श्रीवर्धन हे पेशव्यांचे मूळ गाव आहे.

अशा या निसर्गाने, समुद्राने नटलेल्या ऐतिहासिक गावात अनेक प्राचीन मंदिरे आहेत. त्यांची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे -

कुसुमादेवी मंदिर (श्रीवर्धन)
कुसुमादेवी ही श्रीवर्धनची ग्रामदेवता आहे. हे मंदिर गावापासून लांब, डोंगरात, झाडांच्या हिरव्या छायेत वसलेले आहे. मंदिर कौलारू असून भोवती मोठे पटांगण आहे. येथे चतुर्भुज महासरस्वती, अष्टभुजा महालक्ष्मी आणि चतुर्भुज महाकाली या तीनही शक्ती एकत्र येऊन ‘महाकुसुमादेवी’ हे स्थान निर्माण झाले आहे. या सर्व मूर्ती काळ्या पाषाणातील असून प्रत्येकीची उंची सुमारे दीड-दोन फूट आहे. कुसुम म्हणजे फूल. जंगलातील फुलांच्या सहवासातील देवता म्हणून याचे नाव ‘कुसुमादेवी’ असावे. हे स्थान पांडवकालीन असल्याचे म्हटले जाते.

लक्ष्मीनारायण मंदिर (श्रीवर्धन)
या मंदिरातील विष्णूची मूर्ती म्हणजे सुंदर शिल्पाकृती आहे. या मूर्तीची उंची दोन फूट असून ही काळ्या पाषाणात कोरलेली दक्षिण भारतीय शैलीची आहे. रेखीव व प्रमाणबद्ध अशी ही मूर्ती शिलाहार काळातील असावी. मूर्तीच्या उजव्या पायाशी गरुड तर डाव्या पायाशी लक्ष्मी आहे. प्रभावळीत दोन्ही बाजूस दशावतार कोरलेले आहेत. विष्णूसोबत लक्ष्मीपण आहे. त्यामुळे याला लक्ष्मी नारायण म्हटले जाते.

सोमजाई मंदिर (श्रीवर्धन)
हे स्थान प्राचीन आहे. अगस्ती मुनींनी सोमजाईची स्थापना केली असे मानले जाते. त्याचा जिर्णोद्धार पेशव्यांनी केलेला आहे. मंदिराच्या प्रवेशद्वारावर सुंदर कोरीव काम केलेले आहे. मूळ मंदिरास कोकणी पद्धतीने कौलारू छपराने आच्छादलेले आहे.

सोमजाई देवी शाळीग्राम स्वरूपातील असून शिव, भवानी, नंदी, वासुकी या चार शक्ती मिळून सोमजाई नावाने प्रसिद्ध आहेत.

सोमजाई व हरिहरेश्र्वराचे दर्शन एकाच दिवशी घेतल्यास दक्षिणकाशी पूर्ण केल्याचे पुण्य मिळते असे मानतात.

पेशवे मंदिर (श्रीवर्धन)
पेशव्यांचे हे मूळ गाव असल्यामुळे त्यांच्याच वास्तुत हे पेशवे मंदिर आहे. याच ठिकाणी श्रीमंत बाळाजी विश्र्वनाथ पेशवे यांचा पेशवाई पगडी व वस्त्र परीधान केलेला पूर्णाकृती सुंदर पुतळा आहे. उपरोक्त मंदिरांसह श्रीवर्धन येथे श्रीराममंदिर, आरवी -नारायण मंदिर, देवखोल -कुसुमेश्र्वर मंदिर, वाकळघर- गंगादेवी हीदेखील गावापासून थोडी लांब असलेली प्रेक्षणीय श्रद्धास्थाने आहेत.
शिल्पकलेचा उत्तम नमुना असलेली, लाकडी खांबांवर सुंदर नक्षीकाम असलेली, निसर्गाच्या कुशीतील, प्रसन्न शांततेतील ही सर्व मंदिरे इतिहास कथन करतात, तसेच सर्व पर्यटकांना निश्र्चितच खुणावतात.

दिवेआगर
अनेक ऐतिहासिक संदर्भांवरून हे गाव बरेच प्राचीन असल्याचे समजते. शिलाहार घराण्याची इ. स. ८०० ते १२६५ अशी सुमारे ४५० वर्षांची राजवट या भागावर होती. समुद्रमार्गे व्यापार चाले. त्यातूनच अरबी चाच्यांनी गाव लुटले, मंदिर उद्‌ध्वस्त केले असेही उल्लेख सापडतात. भट आणि बापट भावंडांनी दिवेआगरचा कायापालट सिद्दीच्या परवानगीने केला. मोडी लिपीत त्याविषयीची कागदपत्रे बापटांच्या वारसदाराकडे आजही ठेवलेली आहेत.

दिवेआगर गावाचे प्रथम दैवत म्हणून श्री सिद्धिविनायक मंदिर महत्त्वाचे आहे. शिलाहारांचे ते दैवत होते असे संदर्भ सापडतात. येथे श्री गजाननाची पाषाणमूर्ती आहे. शेजारी अन्नपूर्णा देवीची पितळी मूर्ती आहे. मराठी भाषेतील अतिशय प्राचीन असा (भाषेच्या अगदी सुरूवातीच्या अवस्थेतला) ताम्रपट येथे सापडला. हा इ.स. १०६० मधील ताम्रपट असल्याने मराठी भाषेच्या दृष्टीनेही दिवेआगर हे महत्त्वाचे स्थान आहे.

श्रीवर्धनमार्गे पुणे ते दिवेआगर हे अंतर १७१ कि. मी. आहे. पण म्हसळामार्गे ते १५६ कि. मी. आहे. रस्ता चांगला आहे. रेल्वेने यायचे असेल तर माणगाव स्टेशनवर उतरून खाजगी वाहन घेऊन रस्त्याने दिवेआगरला पोहोचता येते.

श्रीक्षेत्र कनकेश्र्वर
अलिबाग - रेवस रस्त्यावर अलिबागपासून १२ कि. मी. अंतरावर कनकेश्र्वर फाटा लागतो. टेकडीवर कनकेश्र्वर हे शिव मंदिर आहे. या टेकडीला कनकडोंगरी नावाने ओळखतात. भगवान परशुरामांनी ती निर्माण केली अशी श्रद्धा आहे. ७०० ते ७५० पायर्‍यांचा इ. स. १७६४ मध्ये बांधलेला रस्ता टेकडी चढण्यासाठी आहे. येथील श्री कनकेश्र्वरांच्या शिवलिंगातून सतत जलप्रवाह सुरू असतो. टेकडीवरील घनदाट जंगल, पवित्र शांतता यांमुळे पर्यटकांना व भाविकांना एक सुंदर अनुभव या ठिकाणी मिळतो.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजनीतीचे स्वरूप स्पष्ट करणारा ‘आज्ञापत्र’ हा ग्रंथ लिहिणारे रामचंद्र अमात्य हे कनकेश्र्वराला वास्तव्य करून होते. त्यांनी राजकारण संन्यास घेतला होता असे सांगतात.

कनकेश्र्वरला श्रीसिद्धिविनायक मंदिरही आहे. १७९८ मध्ये ते बांधले, कराडच्या लंबोदर स्वामींनी. बडोद्याच्या मैराळस्वामींनी गणेशाची मूर्ती दिली असून त्या मूर्तीची प्रतिष्ठापना मंदिरात केली आहे.

श्री कनकादित्य मंदिर, कशेळी
रत्नागिरी - आडीवरे - पूर्णगड या रस्त्यावरच कशेळी आहे. इ. स. १२९३ मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने सौराष्ट्रावर हल्ला केला. प्रभासपट्टण या श्रीकृष्णाच्या राहण्याच्या ठिकाणी सूर्यमंदिरात वेगवेगळ्या आसनांवर बसलेल्या बारा सूर्यमूर्ती होत्या. हल्ला होणार अशी कुणकुण लागल्याने पुजार्‍याने दक्षिणेकडे जाणार्‍या एका व्यापार्‍याच्या गलबतावर मूर्ती चढवल्या. काही मूर्ती घेऊन तो दक्षिणेकडे निघाला. ते गलबत कशेळीजवळ समुद्रकिनार्‍याजवळ अडकले. त्याने त्यातील एक मूर्ती गुहेत आणून ठेवली. नंतर जहाज पुढे गेले. गुहेतील ही मूर्ती लोकांनी किनार्‍यावरून गावात आणली. तेथे हे मंदिर उभे केले. तेच येथील कनकादित्य मंदिर होय.

मंदिरात सुबक कोरीव काम आहे. लाकडी प्रतिमा आहेत. कनकादित्याची काळ्या पाषाणाची मूर्ती आहे, चांदीचा रथ उत्सवाच्या वेळी पाहायला मिळतो. मंदिरात माघ शुद्ध सप्तमी ते माघ शुद्ध एकादशी असा पाच दिवस रथसप्तमी उत्सव असतो.

किनार्‍यावरील कड्यावर सुमारे १५ फूट उंचीवर, ४०० चौ. फुटांची नैसर्गिक गुहा आहे - तिथेच कनकादित्याची मूर्ती सापडली. या मंदिरात ८५० वर्षांपूर्वीचा एक ताम‘पट आहे. त्यावर संस्कृतमध्ये एक लेख कोरलेला आहे.

राजापूर
रत्नागिरी जिल्ह्यातील या ठिकाणी दर तीन वर्षांनी गंगा प्रकट होते, असे म्हणतात. कमीत कमी अकरा दिवस १४ कुंडांमधून ती वाहते. काही कुंडांत गरम पाणी असते. ही गंगा अचानक प्रकट होते तशीच अचानक लुप्तही होते
 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district