राहता

महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीत (कंठसंगीत)
‘भारतरत्न’ पंडित भीमसेन जोशी :
महाराष्ट्र आणि शास्त्रीय संगीत असा विचार केला, तर पंडित भीमसेनजी जोशी हे महाराष्ट्राच्या घराघरात, मराठी माणसांच्या मनामनांत पोहोचलेलं, आणि शास्त्रीय संगीताचं विश्र्व (व महाराष्ट्र राज्याचं क्षेत्रही) व्यापून टाकणारं भव्य-दिव्य नाव सर्वांत प्रथम समोर येतं. नोव्हेंबर, २००८ मध्ये पंडित भीमसेनजींना भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार ‘भारतरत्न’ जाहीर झाला. फेब्रवारी, २००९ मध्ये त्यांना तो प्रदान करण्यात आला, शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील त्यांनी केलेल्या अतुलनीय अशा संगीतसेवेबद्दल व कार्याबद्दल हा बहुमान त्यांना जाहीर झाला आहे. शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील सच्चा ‘लोकगायक’ असे त्यांच्याबद्दल म्हणता येईल. त्यांना जाहीर झालेला ‘भारतरत्न’ हा केवळ शास्त्रीय संगीत क्षेत्राचाच नव्हे, तर महाराष्ट्राचा, प्रत्येक मराठी माणसाचाही बहुमान आहे. संगीत क्षेत्रातील त्यांच्या अखंडित, निष्ठापूर्वक अशा कार्याबद्दल; आणि त्यांचा पहाडी आवाज, अचाट रियाझ, अविश्र्वसनीय सातत्य व रसिकांचे कायमच मन तृप्त करणारे सादरीकरण - अशा सर्वच गोष्टींबद्दल पंडित भीमसेनजींना त्रिवार विनम्र अभिवादन!!!

प्रस्तावना :
महाराष्ट्रातील संगीताबद्दल केवळ विसाव्या शतकाचे अवलोकन करायचे म्हटले, तरी कितीतरी कलावंत, समीक्षक, रसिक, सौंदर्यप्रणाली, व संस्था महाराष्ट्राने घडविलेल्या आहेत आणि महाराष्ट्रात घडलेल्या आहेत हे लक्षात येते. महाराष्ट्रातील गायक-गायिकांकडून गायकीची उत्क्रांती, सौंदर्यप्रणाली यावर पुढील लेखात अधिक भर दिलेला आहे.
राग-संगीताच्या परंपरेत महाराष्ट्राने भरीव कामगिरी केली आहे आणि मोलाची भर टाकली आहे. याचे मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र बहुतेक बाबतीत नेहमीच सर्वमावेशक राहिलेला आहे. संगीत-कलाकारासाठी रसिक आणि धनिक यांनी महाराष्ट्रात उदार परंतु विलक्षण असे धोरण ठेवलेले आहे. कोणत्याही नवीन सौंदर्यप्रणालीचे स्वागत आपल्या विलक्षण बुद्धीला साक्ष ठेवून महाराष्ट्र आजवर अतिशय साक्षेपाने आणि उदारमतवादी धोरणाने करत राहिलेला आहे. त्यामुळे कलाकार बाहेरून शिकून आले किंवा महाराष्ट्राबाहेरचे असले, तरी त्यांच्या कलेचे संवर्धन आणि जतन-बर्‍याच प्रमाणात मुंबई, पुणे, कोल्हापूर, मिरज इत्यादी ठिकाणांहून-होत आले आहे. यात असंख्य गायक-वादक, समीक्षक, लेखक, संस्था यांचा सहभाग आहे.

राग-संगीतात ख्याल, ठुमरी, भावसंगीत, लावणी अशा असंख्य प्रकारांचा समावेश होतो. त्या सगळ्याचा परामर्श एका लेखात घेणे शक्य नाही. प्रत्येक प्रकार हा लेखाचाच काय, पण संशोधनाचाही विषय होऊ शकतो. त्यामुळे मुख्यत्वे ख्याल-ठुमरी आणि नाट्यसंगीताबद्दल काही ठळक विशेष, अशी मांडणी या लेखात केली आहे. आपल्याला माहीत असलेला राग-संगीतातील प्राचीन प्रकार म्हणजे धृपद. धृपदाचे मूळ स्वरूप, त्याची मैफलीतील मांडणी आणि सौंदर्यप्रणाली याची नेमकी कल्पना आज करणे तितकेसे सोपे नाही. आज प्रचलित आहे ते प्रामुख्याने ख्यालसंगीत. डागर घराण्यातील बरेच उस्ताद धृपद सादर करतात आणि आता डॉ. उदय भवाळकरांसारखे कलाकार, मुंबईतील काही गायिका, भोपाळचे गुंदेचा बंधू, छत्तीसगडच्या श्रीमती सोंबाला-कुमार, हे नव्याने धृपद शिकून सादर करीत आहेत. परंतु सच्चेपणाने परामर्श घेता येईल तो ख्याल आणि ठुमरी - गायकीचा. ख्याल याचा अर्थ खयाल, म्हणजे विचार अथवा कल्पना. कलाकाराच्या स्वत:च्या कल्पनेनुसार, सुसूत्रतेने बंदिशीतून एखाद्या रागाची मांडणी केली जाते. ठुमरीमध्येही स्वरसंकल्पनाच, पण वेगळ्या अंगाने मांडली जाते. ख्याल म्हणजेच शास्त्रीय, आणि ठुमरी उपशास्त्रीय अशा कल्पना उराशी बाळगल्याने आपलीच सांगीतिक उन्नती थांबते. ख्याल आणि ठुमरी सतत एकमेकांत आदानप्रदान करीत राहिलेले आहेत. ठुमरीतील शृंगाराने ख्यालाला सखोलतेबरोबर पूरक असे लालित्य दिले आणि ख्यालातील विचाराने ठुमरी सखोल झाली. कोठ्यावरून, तवायफ कलावंतांकडून आली, म्हणून ठुमरीला सुशिक्षित समाजाने आपलेसे केले नाही. पण सौंदर्य तर ख्यालइतकेच ठुमरीत-किंबहुना कोणत्याही स्वर-लयनिष्ठ संगीतात-भरून राहिलेले आहे.

पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर व पं. विष्णु दिगंबर पलुस्कर :
सामान्यपणे महाराष्ट्रातील ख्यालगायनाचे प्रवर्तक पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर मानले जातात. (यातही मतमतांतरे भरपूर आहेत. पण त्यात गुंतून न पडता आपण पुढे जाऊ.) बाळकृष्णबुवांचे गाणे ऐकलेल्या लोकांनी त्याचे केलेले वर्णन नोंदवण्यात आलेले आहे. त्यांची गायकी अत्यंत व्यामिश्र होती. त्यांची अवरोही तान गानमहर्षी अल्लादियांखॉंसाहेबही वाखाणीत असत. प्रामुख्याने एक गोष्ट नमूद करावीशी वाटते की बाळकृष्णबुवांनी आपल्या एका मैफलीत ख्यालाखेरीज ‘मौला, मै वारी रे वारी’ हा टप्पा, अष्टपदी आणि ‘राशनिकुंजे गुंजति नियतं भ्रमरशतं’ हे गीतही गायले होते. ही मैफल पुण्यातील डेक्कन जिमखान्याच्या सभागृहामध्ये साधारण १९२४ -२५ मध्ये झाली होती.

एकोणीसाव्या शतकाच्या अखेरीस कलावंतांना जरूर तो सन्मान-विशेषत: गायन करणार्‍या कलावंतांना मिळाला पाहिजे-हा विचार सुरू झाला होता. ‘गायनोत्तेजक मंडळी’, ‘ज्ञानप्रसारक मंडळी’, सारख्या संस्थाही स्थापन झाल्या होत्या. ब्रिटिश राजवट आणि काळाची पावले ओळखण्याची भारतीयांची तयारी या संयोगाचा फायदा संगीत-संस्कृतीलाही झालाच. कलावंताचे सामाजिक स्थान हा विचार आपल्याकडे ब्रिटिश प्रभावामुळे आला. दरम्यान बाळकृष्णबुवांनी संगीतावरील पहिले मासिक ‘संगीत दर्पण’ सुरू केले. बाळकृष्णबुवांच्या गायकीची आठवण करून देणारे मिरजेचे वामनराव चाफेकर हे त्यांचे एक शिष्य होते. पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांचे पट्टशिष्य म्हणजे पं. विष्णु दिगंबर पलुस्कर. विष्णु दिगंबर पलुस्करांचा आवाज गुरूंच्या तुलनेत मोठाच होता. चार तंबोर्‍यांबरोबर, माईकशिवाय (ध्वनिवर्धकांशिवाय) शेकडो लोकांपर्यंत तो आवाज पोहोचायचा, अशी आठवण त्या काळातील रसिक श्रोते सांगत. पलुस्करांनी गांधर्व महाविद्यालयाच्या माध्यमातून संगीताचे लोकशाहीकरण करणे आणि समाजाच्या सर्व स्तरांत संगीत पोहोचविणे हे महत्त्वाचे काम केले. मुख्य म्हणजे त्यांनी आपली गायकी हेतुपुरस्सर साधी व सोपी ठेवली. क्षमता असताना, पांडित्य न दाखविणे आणि कलेच्या प्रचार-प्रसाराचे ध्येय हाती घेऊन ते पार पाडणे हे फार मोठे कार्य पलुस्करांनी महाराष्ट्रातच नव्हे, तर देशभरात पार पाडले.(पं. वि. दि. पलुस्कर यांच्यावरिल स्वतंत्र लेख 'हयांनी घडवला महाराष्ट्‌' या विभागात आहे.) पं. बाळकृष्णबुवा इचलकरंजीकरांनंतर वि. दि. पलुस्कर, रामकृष्णबुवा वझे यांनी अत्यंत उत्कटतेने आणि तळमळीने ग्वाल्हेर परंपरेची गायकी पुढे नेली. अत्यंत भरदार आणि मोठा असा वझेबुवांचाही आवाज होता. अनेक बंदिशींचे भांडारच त्यांच्याकडे होते. तेही ख्यालाबरोबर ठसकेबाज दादरे, रंगेल ठुमर्‍या गात असत. जबड्याची तान होती, पण गाण्यावरच्या निखळ प्रेमामुळे त्यांचे गाणे वेगळी उंची गाठत असे. कै. शंकर पंडित, राजाभैया पूंछवाले, नारायणराव व्यास, विनायकबुवा पटवर्धन, शरच्चंद्र आरोळकर, बलवंतराव भट्ट, राम मराठे, व्ही. आर. आठवले, कमल तांबे, विद्याधर व्यास, मीता पंडित अशी अनेक नावे ग्वाल्हेर परंपरेतील घेता येतील. पं. ओंकारनाथ ठाकुरांनी आपला स्वतंत्र बाज या गायकीत निर्माण केला. या लोकांनी संस्थात्मक कार्य, नोटेशन्स, संगीताचा अभ्यासक्रम असे अनेक उपक्रम पार पाडून संगीत सामान्य माणसापर्यंत पोहोचविले. वि. दि. पलुस्करांचे चिरंजीव डी. व्ही पलुस्कर यांनी अत्यंत रसाळ, निर्मळ आवाजात ग्वाल्हेर गायकी पेश केली. गांधर्व महाविद्यालय चालवून शिक्षणाचे कामही केले. परंतु दुर्दैवाने ते अकाली कालवश झाले. आजही त्यांची ध्वनिमुद्रणे ऐकून त्यांच्या गायकीची कल्पना येते. पं. गजाननबुवा जोशी, यशवंतबुवा जोशी यांनीही आपल्या दमदार गायकीने ग्वाल्हेरची परंपरा पुढे नेली. गजाननबुवांचे शिष्य पं. उल्हास कशाळकर आज समर्थतेने ती परंपरा चालवीत आहेत आणि कोलकत्यातील संगीत संशोधन अकादमीत गुरू म्हणूनही भरीव काम करताहेत. शशांक मक्तेदारांसारखे गुणी शिष्य त्यांनी तयार केले आहेत. विदुषी मालिनी राजुरकरांचे नाव ग्वाल्हेरप्रणालीसंदर्भात विशेष करून घ्यावेच लागेल. त्यांनी आपल्या स्वतंत्र कल्पनेने ग्वाल्हेरच्या स्वरलगावात-मॉड्युलेशन्समुळे-विशेष चैतन्यमय गायकी घडविली. विदुषी वीणा सहस्रबुद्धे यांनीही आवाजाच्या विशिष्ट लगावातून ग्वाल्हेर गायकीत मोलाची भर घातली आहे. तराण्यावर संशोधनही केले आहे. नवीन बंदिशींचे त्यांचे पुस्तक आले आहे. तरुण पिढीतील मंजुषा पाटील-कुलकर्णी याही आपल्या दमदार आवाजात लयकारीचे समर्थ दर्शन घडवितात. नाट्यसंगीत, भजनेही त्या उत्तम गातात, आणि वयाच्या अवघ्या तिशीतच त्यांनी दोनशे-तीनशे मैफली केल्या आहेत.

किराणा घराणे :
एकोणीसाव्या शतकाच्या शेवटी १८७२ या एकाच साली पं. वि.दि.पलुस्कर व अब्दुल करीम खॉं जन्मले हा संयोगच म्हणावा लागेल. अब्दुल करीमखांनी आपली रसिली गायकी महाराष्ट्रात आणली. अनेक शिष्य तयार केले. स्वराच्या नुसत्या गुंजनानेच श्रोते मुग्ध व्हावेत असे सामर्ध्य त्यांच्या गायकीत होते. त्या गायकीस पुढे ‘किराणा घराणे’ असे म्हणण्यात येऊ लागले. सवाई गंधर्व, बाळकृष्णबुवा कपिलेश्र्वरी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, सुरेशबाबू माने, गंगुबाई हनगल, पंडित भीमसेन जोशी, बसवराज राजगुरू, संगमेश्वर गुरव, पं. फिरोझ दस्तुर, प्रभा अत्रे असे अनेक दिग्गज कलाकार त्यांच्या स्वरगुंजनाने आणि आवाजातील जादूने आपल्याला मंत्रमुग्ध करीत आले आहेत. हे कलाकार वेगवेगळ्या ठिकाणी वाढले. पण त्यांना दर्दी श्रोते महाराष्ट्रात मिळाले आणि खर्‍या अर्थाने त्यांची गायकी महाराष्ट्रातच घडली. बरेच पुण्या-मुंबईत स्थायिकही झाले. आजच्या पिढीत जयतीर्थ मेवुंडी अत्यंत नम्रतेने, पण प्रभावीपणे ही गायकी मांडतात. कैवल्यकुमार गुरवही आपल्या मधुर आवाजात वडिलांची परंपरा चालवितात. शिक्षणाचे कार्यही ते करतात. अब्दुल करीम खांनी एका हिंदू लग्नात मंगलाष्टके म्हटली असल्याचे उल्लेख आहेत. संगीत हे असे धर्मजातिभेद पार करून जाताना दिसते.

भास्करबुवा बखले :
आपले शिष्य भास्करबुवा बखले, निवर्तल्यावर (१९२२), अल्लादियाखांसाहेब डोळ्यात पाणी आणून म्हणाले होते की, ‘भास्कर गेला, आता मी कोणाला गाणे ऐकवू?’ ‘इथे गुरू-शिष्याचे सांगीतिक प्रेम आणि नाते धर्म-जातिभेदापलीकडे गेलेले असल्याचे आपल्या लक्षात येते. भास्करबुवा बखले हे एक अनोखे रसायन होते. आग्रा-जयपूर-ग्वाल्हेर या तीनही घराण्यांची संयुक्त गायकी आपल्या स्वतंत्र प्रतिभेने, रसाळ शैलीतून ते गात. त्यांच्या संभाषणातही सूर असायचा असे म्हणतात. ‘पंचकल्याणी घोडा अबलख’ ही लावणीही ते मैफलीत गात असत. मोठे कलाकार कधीच शास्त्रीय-उपशास्त्रीय असे भेद करीत नाहीत हे आपण वझेबुवांच्या उदाहरणावरूनही पाहिले.

काही गायिका :
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात उत्तरेकडे रसूलनबाई, बडी मोतीबाई, सिद्धेश्वरीदेवी, गिरिजादेवी या गायिका जेव्हा रसिली ठुमरी सादर करीत होत्या, तेव्हा महाराष्ट्रात विदुषी सुंदराबाई, मेहबूब जान ऑफ सोलापूर या अत्यंत रसिली आणि सखोल अभिव्यक्तीची ठुमरी गात होत्या. पण महाराष्ट्रावरील संगीताच्या प्रसिद्ध पुस्तकात यांचे उल्लेख अपवादानेच आढळतात. यांचे ख्याल आणि ठुमरीचे ध्वनिमुद्रण ऐकल्यावर, ही समृद्ध गायकी महाराष्ट्रात तितकी नावाजली गेली नाही आणि त्यामुळे रसिकजन त्यापासून वंचित राहिल्याचे दु:ख वाटल्यावाचून राहत नाही. मेनकाबाई शिरोडकरांची कमालीची सुंदर अदाकारी (ठुमरी आणि ख्याल) तर त्या सुमारे ९० वर्षांच्या असताना रसिकांनी ऐकली. नव्वदीत जर हे गाणे असेल, तर उमेदीच्या काळात ही गायकी काय असेल याची कल्पनाच केलेली बरी अशी रसिकांची भावना झाली. त्याचप्रमाणे ' भास्करबुवा बखल्यांचे गाणे पुढे नेऊ शकल्या असत्या ' (असे स्वत: भास्करबुवा म्हणत) अशा विदुषी ताराबाई शिरोडकरांचे नावही असेच पुसले गेले आहे. रामकृष्ण बाक्रे यांचे ‘बुजुर्ग’ हे पुस्तक त्यांच्या गायकीचे उत्तम वर्णन करते. आणखी एका इंग्रजी दैनिकात ’'Who was Tarabai Shirodkar?’ अशा मथळ्याचा श्री. मोहन नाडकर्णीं यांचा लेख, याखेरीज त्यांच्या गायकीचे वर्णन सापडत नाही.

जयपूर घराणे :
राग-संगीत हे सततच प्रवाही आणि बहुपेडी राहत आलं आहे. म्हणूनच त्यातील कलामूल्य उत्क्रांत होत राहिले, नाहीतर त्याला साचलेपणा येऊन, वाढ थांबते. रसिकांचे कान एकाच पद्धतीच्या सौंदर्याने तृप्त होत नसतात, तसेच कलेचे आणि कलाकाराचेही आहे. प्रतिभावान कलाकार सतत नावीन्याच्या मागे असतो. अब्दुल करीमखांनी जसे स्वरमाधुर्य जपले, त्यापेक्षा वेगळं रसायन घेऊन अल्लादियांखॉंसाहेब हे उनियारातून प्रथम कोल्हापूर आणि नंतर मुंबईत आले. त्यांनी वेगळी गायकी चोखाळण्याचा प्रयत्न केला. एरवी विलंबित ख्यालासाठी वापरतात ते ताल न योजता रूपक, झपताल यांची मध्यलय अथवा त्याहून थोडी संथ लय घेऊन, लयीच्या अंदाजाने आलापचारी करून एक वेगळी सौंदर्यप्रणाली रुजवण्यासाठी त्यांचा प्रयास राहिला.

रसिकमन अर्थातच कोणताही बदल अथवा नवविचार सावकाशीने पचवू शकते. त्याला अन्य सामाजिक- सांस्कृतिक घटकही कामास येतात. त्यामुळे ही व्यामिश्र, अवघड गायकी पचायला काळ जावा लागला. यालाच ‘जयपूर घराणे’ म्हणू लागले. पुढे त्यांचा आवाज काही कारणाने बसला, त्यावर हार न मानता त्यांनी गायकीत आवाजानुरूप परिवर्तन घडवून आणले. त्यांचे बंधू हैदरखां हे उत्तम बोलतानेसाठी प्रसिद्ध झाले. भूर्जीखां, मंजीखां यांनीही ही गायकी जोपासली. अल्लादियांखांनी पं. मिल्लिकार्जुन मन्सूरांसारखे शिष्य तयार केले. अल्लादियांखांनी रागरूपांनाही आपल्या कल्पकतेनुसार वेगळी वळणे देऊन रसिकांना चकित केले. या गायकीत रचनासौंदर्यही प्रतीत होते. काव्याच्या प्रांतात जे ग्रेस या कवींचे आणि त्यांच्या काव्याचे स्थान, तसेच काहीसे जयपूर गायकीचे. त्यांच्या बुद्धिगम्य, वेगळ्या गायकीने रसिक थोडे चकित झाले आणि नंतर ही गायकी गूढ, परंतु सूक्ष्म आणि बुद्धिप्रधान म्हणून स्वीकारली गेली ती महाराष्ट्रातच.

त्यानंतर पु. ल. देशपांडे ज्यांच्या सुराचे वर्णन तिसरा तंबोरा म्हणून करतात ते पं. मिल्लिकार्जुन मन्सूर, वामनराव पै, निवृत्तीबुवा सरनाईक, वामनराव सडोलीकर अशांनी ही गायकी समृद्ध केली. स्त्री स्वविचाराने कणखर गायकी जोपासते हे दाखवून, विदुषी केसरबाईं केरकर यांनी जयपूर गायकीने महाराष्ट्र काही काळ दुमदुमून सोडला. त्यांच्या शिष्या धोंडुताई कुलकर्णी कसोशीने परंपरा जपत आल्या आहेत. धोंडुताईंच्या एका शिष्येने, नमिता देविदयाल हिने ’The Music Room' हे सुंदर पुस्तक लिहिले आहे. त्यात हिंदुस्तानी संगीत आणि धोंडुताईंची गायकी व व्यक्तित्व याचा सुंदर मेळ घातला आहे.
विसाव्या शतकाच्या पूर्वार्धापासून ते २००० सालापर्यंत गानतपस्विनी मोगुबाई कुर्डीकरांनी जयपूर गायकीची अक्षरश: तपश्र्चर्या करून ही गायकी फुलविली, त्यात नवीन बंदिशींची भर घातली आणि शिवाय मुक्त हस्ताने विद्यादान केले. त्यांनी पद्मा तळवलकर, माणिक भिडे, कौशल्या मंजेश्वर, सुशिला पटेल, वा. ह. देशपांडे असे अनेक शिष्य-शिष्या तयार केले.

विदुषी पद्मावती शाळीग्राम-गोखले जयपूरची गायकी उत्तम प्रस्तुत करतात. यांचे नाव महाराष्ट्रात फार प्रसिद्ध नाही, उल्लेख तुरळक आहे. आपल्या स्वतंत्र विचारांनुसार त्यांनी जयपूर गायकीत भर घातली. जयपूरमध्ये कधी न गायिलेली ठुमरी गाऊन, ठुमरीचे ख्यालावरचे ऋण त्या जाहीर करतात. ‘ठुमरीमुळे माझा ख्याल रसिला झाला’, असे म्हणतात. विदुषी मोगुबाई कुर्डीकरांच्या कन्या विदुषी किशोरी अमोणकरांनी तर स्वप्रतिभेने या गायकीला भावसौंदर्याचे परिमाण देऊन एक कळसच गाठला. आज त्यांच्या गायकीतील सौंदर्याचे निकष संगीतजगतात वर्चस्व राखून आहेत. त्यांनीही अनेक नवीन बंदिशींची निर्मिती केली. सुहासिनी मुळगावकर, अश्विनी-भिडे देशपांडे, रघुनंदन पणशीकर यांसारखे शिष्य तयार करून त्यांनी आपली गायकी संक्रमित केली. आज अश्विनी भिडे-देशपांडे समर्थतेने ही परंपरा चालविताना दिसतात. त्यांच्या स्वरचित बंदिशींचे पुस्तकही निघाले आहे. विदुषी श्रुती सडोलीकर-काटकर याही आपले स्वतंत्र विचार घेऊन जयपूर परंपरेचा आब राखून उत्तम गायकी पेश करतात. विदुषी देवकी पंडित याही किशोरी अमोणकरांकडे शिकल्या आहेत, आणि अत्यंत बुद्धिप्रधान आणि उपजेची गायकी त्या पेश करतात. विदुषी आरती अंकलीकर-टिकेकरही ख्याल उत्तम गातात. लय-तालावरचे त्यांचे प्रभुत्व वाखाणण्यासारखे आहे. त्यांची ठुमरीही रसिली आहे. पुण्याच्या मंजिरी कर्वे-आलेगावकर याही तयारीचे गाणे पेश करतात. त्यांना ‘कुमार गंधर्व पुरस्कारही’ मिळालेला आहे. तरुण पिढीच्या गायिका मंजिरी असनारे-केळकर या अप्पा कानिटकरांकडून उत्तम विद्या घेऊन अतिशय आत्मविश्र्वासाने जयपूर गायकी सादर करतात.
आग्रा व भेंडीबझार घराणे :
उस्ताद विलायत हुसैन खां, फैयाजखां यांनी लयीशी खेळणारी आणि रागशुद्धतेचा ध्यास असलेली जोरकस आग्रा गायकी पुढे आणली. पं. जगन्नाथबुवा पुरोहित यांनी आग्रा परंपरेत नवीन राग-बंदिशींची भर घातली. विदुषी अंजनीबाई यांची आग्रा-परंतु मुलायम गमक असलेल्या अशा-गायकीची दुर्दैवाने कुणीच दखल घेतली नाही. ठुमरीही त्या उत्तम पेश करीत. पं. जितेंद्र अभिषेकी आणि माणिक वर्मांनी जगन्नाथबुवा पुरोहितांकडून विद्या घेऊन आपली दर्जेदार, रसिली गायकी सादर केली. डॉ. ललित राव या आग्रा गायकी सादर करतात. मुंबईच्या शुभदा पराडकर ग्वाल्हेर-आग्राची लयप्रधान गायकी दमदारपणे सादर करतात. कोलकत्याच्या पूर्णिमा सेनही आग्रा - अत्रौली गायकी सादर करतात.

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मुंबईत भेंडीबझार वसाहतीत नझीर खां, अमानअली खां एक वेगळा सौंदर्यप्रवाह गायकीत आणत होते. सुरेल कणस्वरांनी, मेरखंड आलापींनी आणि लालित्यपूर्ण बंदिशींनी सजलेली ही गायकी ‘भेंडीबझार गायकी’ म्हणून ओळखली जाऊ लागली. मुंबईत विदुषी अंजनीबाई मालपेकर यांनी आपल्या अतीव सुरेल स्वरलगावाने आणि लयीच्या समझदारीतून ही गायकी पेश केली. अंजनीबाई फक्त गाण्याच्या मैफिली करून थांबल्या नाहीत. पं. कुमार गंधर्व, विदुषी किशोरी अमोणकर आणि अनेकांना त्यांनी मुक्तहस्ताने विद्यादान केले. त्यानंतर पं. त्रिंबकराव जानोरीकरांनी पुण्यात या गायकीचे दर्शन घडविले. डॉ. सुहासिनी कोरटकर याही ही गायकी पेश करतात. आकाशवाणीमध्ये त्यांनी प्रदीर्घकाळ नोकरीही केली. ती अधिकारपदे सांभाळून त्यांनी आपली गायकीही जपली.

अन्य घराणी व कलाकार :
पं. जसराज गेली अनेक दशके रसिकांच्या मनावर राज्य करीत आहेत. मेवाती घराण्याची गायकी ते मींडेने सजवून गातात. त्यांचे पुण्यातील शिष्य संजीव अभ्यंकर हेही तरुण वयातच मैफिली जिंकणारे गायक झाले आहेत. विदुषी शुभा मुद्गल या दिल्ली आणि मुंबई येथे विभागून काम करतात. पं. विनयचंद्र मौद्गल्य, पं. रामाश्रय झा, कुमार गंधर्व, विदुषी नैनादेवी अशांकडून संगीत शिकून त्यांनी आपल्या गायनाची स्वतंत्र शैली निर्माण केली आहे. विशेष म्हणजे त्यांच्या संगीतातील इतर प्रवाहांचा त्या ख्याल-ठुमरीगायनावर परिणाम होऊ देत नाहीत. या सर्व घराणेदार ख्यालगायकांच्या बरोबरीने विदुषी शोभा गुर्टूंनी महाराष्ट्रात आणि भारतभर, त्यांचा ठुमरीचा पुकार जागता आणि तेवता ठेवला. ठुमरीचे अकारण खालावलेले सामाजिक स्थान तर त्यांनी उंचावलेच, पण ठुमरी हा अस्तंगत होत चाललेला गान-प्रकार जिवंत केला. बनारस-पंजाब-पतियाळा ... असे मुक्त हस्ताने विद्यादान केले. आज शुभा जोशी, धनश्री पंडित या अस्सल बनारस बाजाची, आणि पंजाब- पतियाळाचे सुयोग्य मिश्रण असणारी शोभाताईंची ठुमरी उत्तम रीतीने पेश करतात. कै. सरला भिडे यांनीही ठुमरीचा सखोल अभ्यास करून, अनेक ठुमरी-दादरे ध्वनिमुद्रित करून ठेवले आहेत. पुण्याचे संजीव शेंडे, अश्विनी टिळक यांचा ठुमरीगायनाच्या संदर्भात आवर्जून उल्लेख करायला हवा. अमीर खांसाहेबांची आणि बडे गुलाम-अली खां यांच्या लालित्यपूर्ण गायकीचे महाराष्ट्रात स्वागत झाले.

सर्व घराण्यांतील स्वरलयनिष्ठ संगीत वेचून आपले वेगळे स्थान निर्माण केले ते पं. कुमार गंर्धव यांनी. ते देवासला (मध्य प्रदेश) राहिले, तरी त्यांची गायकी मर्मज्ञतेने पाहिली, ऐकली ती महाराष्ट्राने. अत्यंत चैतन्यपूर्ण आणि सखोल वैचारिक बैठक असलेली, तरीही भावसौंदर्याचा कळस गाठलेली अशी त्यांची ख्यालगायकी आहे. त्यांच्या गायकीवर एक सौंदर्य-कोश काढला तरी कमीच पडेल! ख्यालगायकीतील संगीतमूल्यांबरोबर भजन, भावगीतालाही कुमार गंधर्वांनी स्वप्रतिभेने वेगळे परिमाण दिले. अत्यंत आकर्षक, तरी पार्‍याप्रमाणे चपळ अशी त्यांची गायकी आणि विचार. आज पुण्याचे अत्यंत प्रसिद्धिपरान्मुख गायक पं. विजय सरदेशमुख, कुमारांचे विचार-दर्शन आपल्या गायकीतून समर्थतेने घडवीत आहेत. पं. कुमार गंधर्व, पंडित भीमसेनजी, किशोरी आमोणकर या व अशा कलाकारांवर एका लेखात काय आणि किती लिहिणार, मुळात संगीतासाठी शब्द तसे अपुरेच ठरतात.

नाट्यसंगीताचा वाटा :
महाराष्ट्रातील शास्त्रीय संगीतावर लिहिताना नाट्यसंगीताचा उल्लेख निश्र्चितच करायला हवा. प्रामुख्याने महाराष्ट्रात ही दोन क्षेत्रे परस्परांना पूरकच ठरली, ठरत आहेत. अण्णासाहेब किर्लोस्करांनी संगीत नाटकास व त्यायोगे संगीतास प्रतिष्ठा देण्याचे कार्य तळमळीने पार पाडले. नाटक व नाटकी-संगीत याला जनमानसात आदर मिळवून देणे हे मोठेच काम त्यांनी सुरू केले. समाजरंजनातून संगीत अधिक परिचयाचे होईल हे त्यांनी जाणले व त्यानंतर अनेक गायक-गायिका, नाट्यसंगीतकार उदयास आले. गोविंद बल्लाळ देवल हे त्यातील मोठे नाव. एक हकीकत अशी सांगतात की भास्करबुवा बखल्यांना एक पंजाबी टप्पा - ‘गोरिदा चित्त लगा चंबेदिये पारा’ - फार आवडला व तो 'संशयकल्लोळ' मध्ये चालीसाठी वापरावा असे त्यांचे मत पडले. देवलांना उडत्या, उच्छृंखल गाण्याचा राग होता. तरी मित्राचे मन मोडायचे नाही म्हणून त्यांनी ‘मजवरी तयांचे प्रेम खरे’ ही चाल त्यावरून थोडी बदलून घेतली.

पुढे नाट्यसंगीत महाराष्ट्राचे लाडके संगीत ठरले. श्रीपाद कृष्ण कोल्हटकरांसारखा नाटककार, बालगंधर्वांसारखे गायक, भास्करबुवा बखल्यांसारखे अत्यंत बुद्धिमान गायक व गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे यांसारखे कुशल वादक व रचनाकार यांनी संगीत-नाटकरंगभूमी कितीतरी दशके गाजवून सोडली. कुमार गंधर्वांनी बालगंधर्वांच्या गायकीचे अतिशय मनोज्ञ दर्शन ‘मला उमजलेले बालगंधर्व’ या उपक्रमातून घडविले. सुरेश हळदणकर, भालचंद्र पेंढारकर, सुहासिनी मुळगावकर, रामदास कामत, प्रभाकर कारेकर, फैयाज, आशा खाडिलकर, कुसुम शेंडे, जयमाला शिलेदार, कीर्ती शिलेदार, प्रभाकर कारेकर अशी असंख्य नावे नाट्यसंगीताच्या संदर्भात घेता येतील.

बालगंधर्वांची स्त्रैण, कमालीची उत्स्फूर्त आणि सर्जनशील गायकी-यासाठी तर एक स्वतंत्र लेखच लिहावा लागेल. बालगंधर्वांनी महाराष्ट्रात एक युगच घडविले. अगदी अलीकडे ‘कट्यार काळजात घुसली’, विद्याधर गोखल्यांची आधुनिक संगीत नाटके-अशी ही परंपरा चालत राहिली. पं. जितेंद्र अभिषेकींसारखा प्रतिभावंत रचनाकार आणि पं. वसंतराव देशपांडे यांच्यासारखे बुद्धिमान गायक आपल्याला मिळाले. सुशिक्षित समाजाने मानाचे पान देण्याच नाकारले ती ठुमरी, दादरा असे मागच्या दारातून, संगीत नाटकांच्या माध्यमातून पुढे आले. उघडपणे शृंगार नाकारणार्‍या महाराष्ट्राने गौहरजान व इतर अनेक समकालीन ठुमरी-गायिकांचे गायन व गायकी ऐकून त्या चाली नाट्यसंगीतासाठी उचलल्या. अगदी अलीकडील संगीत नाटके वगळल्यास नाट्यसंगीतातील बहुतांश चाली या जुन्या ठुमर्‍या व दादरे यांवर आधारित आहेत. पण एक मात्र झाले की सामान्य माणसाला ‘मम आत्मा गमला’ हा बिहाग राग आणि ‘नाथ हा माझा’ हा कल्याण राग हे कळू लागले. जनमानसात रागसंगीताचा परिचय सहज झाला आणि त्यात नाट्यसंगीताचा वाटा महत्त्वाचा आहेच.

नाट्यसंगीताविषयी लिहिताना कै. मा. दीनानाथ मंगेशकरांचा उल्लेख आवर्जून करावाच लागेल. ते जरी मराठी रंगभूमीतून पुढे आले असले, तरी ध्वनिमुद्रित गायन ऐकल्यावर आणि काही लिखाण पाहून त्यांची स्वतंत्र आणि सर्जनशील गायकी प्रत्ययास येते. अत्यंत तेजस्वी स्वर आणि कमालीचे चैतन्य व उपज असलेली ही गायकी वेगळी खूण उमटवून गेली. रंगभूमीवर गाताना ऐन वेळी गाण्याचा ताल बदलून गायची ताकद असलेले त्यांचे गाणे होते. पुढची पिढी हा सूर कसोशीने जपते आहे. नाट्यसंगीतास चाली देणार्‍या विदुषी हिराबाई पेडणेकरांचे आणि सुंदराबाई जाधवांचे नामोल्लेख फारसे आढळत नाहीत. त्यांचीही नोंद घेणे आवश्यक आहे.(नाट्यसंगीतावरील स्वंतत्र लेख 'संगीत' विभागात दिलेला आहे.)

संशोधन / समीक्षण -
महाराष्ट्र शास्त्रीय संगीत क्षेत्रातील संशोधनातही अग्रेसर राहिलेला आहे. पं. वि. ना. भातखंडे यांचे अतिप्रचंड संशोधन, त्यांची नोटेशन पद्धतीवरील व बंदिशींची पुस्तके, तसेच हिंदुस्तानी संगीत पद्धतीवरील पुस्तके प्रसिद्धच आहेत. अब्दुल करीमखांसाहेब देवलांबरोबर आपल्या गळ्यातून श्रुतिदर्शन, श्रवण करून दाखवीत. पुढे आचरेकरांनी श्रुतिदर्शन हा ग्रंथ लिहिला आणि श्रुती-पेटी पण तयार केली. या संशोधन-परंपरेत आजपर्यंत महाराष्ट्रातील अनेक नामवंत समीक्षक भर घालीत आले आहेत. गोविंदराव टेंबे, केशवराव भोळे अशांपासून ते अशोक रानडे, दत्ता मारूलकरांपर्यंत अनेक अभ्यासू लोकांनी महाराष्ट्रातील संगीत समृद्ध केले, रसिकांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.

महाराष्ट्रात संगीत-संस्था तर भरपूर निघाल्या. भारत गायन समाज, गोपाल गायन समाज, गांधर्व महाविद्यालयाच्या अनेक शाखा व उपशाखा आज कार्यरत आहेत. विद्यापीठांतूनही संगीत-विभाग झाले. शिक्षण - संस्थांबरोबर देवल क्लब, ट्रिनिटी क्लबसारख्या गान-प्रेमी संस्थाही निघाल्या. आज अशा शैक्षणिक, सांस्कृतिक संस्थांमध्ये भर पडतच आहे. आबासाहेब मुजुमदार, पु.ल.देशपांडे यांसारख्या महनीय व्यक्तींची घरेही संस्थानांप्रमाणे कलाकारांसाठी व्यासपीठे आणि आश्रयस्थाने ठरली.

संगीत-कलाविहारसारखे मासिक गेले अर्धशतक अव्याहतपणे चालू आहे. अशी इतरही अनेक साप्ताहिके व मासिके महाराष्ट्रात निघतात. संगीतविषयक ग्रंथसंपदेबद्दल तर महाराष्ट्राचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. कल्पना-संगीतसारखे आणि इतरही विपुल लिखाण व पुस्तकनिर्मिती गोविंदराव टेंबे यांनी केली. अस्ताई, अंतरा, आवाजाची दुनिया सारखे सकस लिखाण केशवराव भोळे यांच्याकडून झाले. ‘विश्रब्ध-शारदा’ सार‘या निर्मितीलाही एक पूर्ण खंड महाराष्ट्रातील संगीतावर काढावासा वाटला हे विशेष! वा. ह. देशपांडे यांचे ‘घरंदाज गायकी’, ‘आलापिनी’, ‘महाराष्ट्राचे संगीत’ हे ग्रंथ उत्तम आहेत. अशोक रानडे यांची संगीतसौंदर्य व लोकसंगीतविषयक पुस्तकेही वाचनीय आहेत. बंदिशींची तर असं‘य पुस्तके आहेत. ‘मुक्काम वाशी’, ‘आठवणींचा डोह’ अशी अनेक अलीकडील नावे घेता येतील. मौखिक परंपरेत या सर्व लिखितांनी भर घातली.

रसिकराज महाराष्ट्र :
या सगळ्याखेरीज सवाई गंधर्व महोत्सव, गुणिदास संमेलन, बाणगंगा महोत्सव यांसारखे महाराष्ट्रातील कित्येक संगीत महोत्सव तर रसिकांना संगीताची मेजवानीच ठरतात. याखेरीज परिसंवाद, चर्चासत्रे हे सर्व महाराष्ट्रातील अनेक संस्था नेहमीच आयोजित करीत असतात. त्यातून होतकरू, अभ्यासू कलाकार व रसिक या सर्वांनाच ज्ञान आणि आनंद मिळतो. श्राव्य माध्यमांचा यथायोग्य वापर करून महाराष्ट्राने राग-संगीताला समाजाभिमुख केले व त्याचबरोबर प्रतिष्ठाही मिळवून दिली. द्कश्राव्य माध्यम मात्र राग-संगीताबाबत तसे उदासीनच आहे. रसिकराज अशा महाराष्ट्राची संगीत परंपरा घडली ती रसिकांमुळे. भारतातील कोणत्याही प्रांतातील गायक-वादकास मराठी माणसाने कौतुक केल्याशिवाय आपली कला जोखल्याचे समाधान मिळत नाही. यातूनच महाराष्ट्रातल्या रसिकतेची, जिज्ञासू वृत्तीची व अभिरुचीची पारख होते. त्यामुळे संगीताच्या उत्क्रांतीत मराठी रसिकमनाचेही कलाकारांएवढेच महत्त्व आहे असे म्हणणे अतिशयोक्त ठरणार नाही. राग-संगीत हे एखाद्या पुरातन, पण सतत वाढत्या अजरामर वटवृक्षासारखे आहे. त्याला किती फांद्या आणि पारंब्या फुटत राहतील त्याला सीमा नाही.
मराठी भावसंगीत
शास्त्रीय व उपशास्त्रीय संगीतातून उगम पावलेली, तरीही शास्त्रीय संगीताकडे पूर्णतः न झुकलेली शब्दप्रधान गायकी ‘भावसंगीत’ या संज्ञेने ओळखली जाते. शब्द, सूर, ताल, लय, आणि काव्यानुसार व्यक्त होणार्‍या संमिश्र भावना यांचा सुंदर मिलाफ म्हणजे ‘भावसंगीत’ होय. संगीताचा हा प्रकार म्हणजे महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राचे अनोखेपण अधोरेखित करणारे वैशिष्ट्य आहे.

या वैशिष्ट्यपूर्ण आकृतीबंधात गायक कलाकारालाच नव्हे तर गीतकार, संगीतकार यांनाही अनेक प्रकारची कलात्मक व्यवधाने सांभाळावी लागतात. शब्दामागील स्वरांना किती स्पर्श करायचा, चालीतील दोन शब्दांतील अंतर, त्या शब्दांवर दिलेल्या विशिष्ट स्वरसंगती, स्वरसमूहातील अंतर आणि त्यामागील भावार्थ समजून काव्य तरल स्वरात मांडणे - हा भावसंगीताचा गाभा आहे. या गायकीसाठी गळ्याची वेगळी तयारी हवी, शब्दफेक तरल हवी, शब्द टाकण्याच्या पद्धतीत एक उत्कटता हवी, काव्यातलं ‘एक्स्प्रेशन’ गाण्यात मांडण्याची ताकद हवी, गाणार्‍याची तन्मय भाववृत्ती हवी -केवळ ताना, बोल ताना, सरगम घोटून हे येत नाही. हवा तो स्वर आवश्यक तितक्याच तीव्रतेने लागायला हवा. या सार्‍यांच्या जोडीला कलाकाराची वैयक्तिक प्रतिभा, शब्द आणि त्यांचे वाच्यार्थ, लक्ष्यार्थ, व्यंग्यार्थ शोधण्याची वृत्ती, संगीतकाराने सांगितलेली चाल आत्मसात करण्याची क्षमता आणि सादरीकरणातील मनःपूर्वकता - यांची नितांत आवश्यकता असते.

मुख्य म्हणजे शास्त्रीय संगीतात रियाज जसा आवश्यक आहे, तसा भावसंगीतातही रियाज आवश्यक आहे. भावसंगीतात ‘शब्दाचा म्हणून एक वेगळा रियाज’ आहे. त्या गीताचे भावनात्मक मूल्य काय आहे, त्यातील भावनांचे प्रकटीकरण कसे आणि किती प्रमाणात हवे हे कळण्यासाठी रियाज हवा. केरवा, दादरा, रूपक हे भावसंगीतातील प्रमुख ताल असले, तरी प्रत्येक गीताच्या काव्याच्या वजनाप्रमाणे ठेक्यांचे वजनही बदलते. तितक्याच मात्रा असलेला तोच ताल वेगवेगळ्या भावगीतांत विविध पद्धतीने वाजवला जातो, तो त्यामुळेच. कवितेला जसे वृत्त असते, तशीच भावसंगीत गायनाची एक वृत्ती जोपासावी लागते. त्यासाठी काव्याची उत्तम, तरल जाण लागते. भावसंगीत हा गीतकार, संगीतकार, वादक आणि गायक यांनी सजवलेला संगीतरथ असतो. शब्द जितके सुंदर, जितके नेमके, तितकी चाल, सूर सहज उमटतात. अनेकदा ते शब्दच सूर घेऊन येतात. त्यांना नटवण्याचे काम संगीतकाराची प्रतिभा करते. कवी आणि संगीतकार मिळून एक ‘म्यूझिकल फ्रेमवर्क’ तयार करतात. त्याचे कानेकोपरे सुरेल करून उजळण्याचे काम गायक करतात. प्रारंभी गजानन वाटवे आणि नंतर लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर आदी गायक-गायिकांनी या सार्‍याचा प्रत्यय आपल्या प्रत्येक गीतातून दिलेला दिसतो.

मराठी भावसंगीताचा विचार करताना शृंगार, विरह आणि भक्तिरसाचे प्राधान्य दिसते. पण कला ही आनंदनिर्मितीसाठी असल्याने सर्वांपेक्षा आनंदरस महत्त्वाचा असतो. मीलनाचे वा विरहाचे गीत असले, तरी ऐकणार्‍याला त्यातून आनंदाची अनुभूती येणे महत्त्वाचे असते. हे मराठी भावगीतातून घडते. शिवाय विशिष्ट भावनांसाठी विशिष्ट ठेका हवा, असे समीकरणही नसते. अन्यथा ‘शुक्र‘तारा मंद वारा’, ‘हात तुझा हातातून’ ही शृंगारीक गीते - संथ ठेक्यात - इतकी लोकप्रिय झालीच नसती. याउलट ‘भातुकलीच्या खेळामधली’ हे गीत करूणरसाचे असूनही ठेका जलद आहे, पण तरीही गीतातील मूड अबाधित आहे, हे दिसून येते.

भावसंगीतात चाल आधी की शब्द आधी, हा प्रश्नही उपस्थित केला जातो. मात्र मराठी भावगीतांत दोन्ही प्रकाराने गीतांची निर्मिती झाली आहे. अर्थात अधिक गीते निर्माण झाली आहेत, ती ‘आधी कविता आणि मग चाल’, याच पद्धतीनुसार. अंगाईगीत, निसर्गप्रेम, ईश्वरप्रेम, बालमनाची निरागसता, तारुण्यातील रम्य भावना, प्रौढपणातील प्रगल्भता, उतारवयातील अनुभवांचे शहाणपण...हे सारेच भावसंगीतातून व्यक्त झाले आहे. शास्त्रीय संगीतातील परंपरा व घराण्यांप्रमाणेच मराठी भावसंगीताच्या क्षेत्रातही काही परंपरा आणि घराणी निर्माण झाली.

चित्रपटसंगीत, नाट्यसंगीत, कीर्तन, भजन, गझल आणि लोककलांचे सारे प्रकार (तमाशा, लावणी, पोवाडे, गोंधळ, भारूड, वाघ्या-मुरळी, लळीत, खेळे, दशावतारी, बहुरूपी) हे सारे व्यापक अर्थाने भावसंगीताचेच वेगवेगळे प्रकार मानले जातात. लवचीकता व सर्वसमावेशकता ही मराठी भावसंगीताची प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. वरील सारे प्रकार आणि त्यांची असंख्य रूपे मराठी संस्कृतीत खोलवर रुजली आहेत. त्यांच्याही स्वतंत्र परंपरा निर्माण झाल्या आहेत.

महाराष्ट्रात १९३८ ते १९७० अशा प्रदीर्घ काळपर्यंत भावगीतांचे युग निर्माण करणारे, सर्वात मोठे योगदान देणारे बुजुर्ग कलावंत म्हणजे गजाननराव वाटवे. कवितेचे, गीताचे मंचीय सादरीकरण गजानन वाटवे यांनीच सुरू केले. ‘स्वतःच्या आवाजाच्या स्वभावधर्मानुसार भावगीतगायन’ हा वेगळा प्रकारच वाटवे यांनी नव्याने निर्माण केला. गगनी उगवला सायंतारा, वारा फोफावला, चंद्रावरती दोन गुलाब, राधे तुझा सैल अंबाडा, दोन ध्रुवावर दोघे आपण, गेला दर्यापार घरधनी, आई तुझी आठवण येते, गर्जा जयजयकार, ती पहा ती बापूजींची प्राणज्योती... या रचनांतून ‘वाटवे-युग’ निर्माण झाले, गाजले. वाटवे यांच्यापूर्वी गोविंदराव जोशी, जे. एल. रानडे, ज्योत्स्ना भोळे, केशवराव भोळे यांच्या काही ध्वनिमुद्रिका प्रसिद्ध झाल्या होत्या. त्यावरून प्रेरणा घेऊन वाटवे यांनी एक स्वतंत्र वाट निर्माण केली. उत्कट कविता सुंदर पण सोप्या चालीत ऐकणे लोकांना आवडले आणि हा प्रकार लोकप्रिय ठरला. १९४० च्या सुमारास त्यांच्या कविता-गायनाच्या ध्वनिमुद्रिका प्रकाशित होऊ लागल्या आणि हा प्रकार सर्वदूर पोहोचला.

गोविंद कुरवाळीकर, जी. एन. जोशी, विनोदिनी दीक्षित, सरस्वती राणे, ललिता देऊळकर, बबनराव नावडीकर, दत्ता वाळवेकर, राम पेठे, अशोक जोगळेकर, सुधीर फडके (बाबूजी), लता मंगेशकर, आशा भोसले, सुमन कल्याणपूर, हृदयनाथ मंगेशकर, माणिक वर्मा, मालती पांडे, मोहनतारा अजिंक्य, कुमुदिनी पेडणेकर, सरोज वेलिंगकर, सुमती टिकेकर, अरुण दाते, कृष्णा कल्ले, पुष्पा पागधरे, अनुराधा पौडवाल, सुरेश वाडकर अशा अनेक गायक -गायिकांनी मराठी भावसंगीताचे विश्व समृद्ध केले आहे. शुद्ध आणि स्पष्ट शब्दोच्चार, गायनातील सहजता, भावपूर्णता असे गुणविशेष या प्रत्येकाच्या गायनात होते, आहेत.

भा. रा. तांबे, बालकवी, केशवसुत, प्र. के. अत्रे, ग. दि. माडगुळकर, अनिल, कुसुमाग्रज, शांता शेळके, सुधीर मोघे अशा अनेक कवींच्या वेगवेगळ्या विषयांवरील कवितांनी भावगीताचे रूप घेतले. मराठी भाषेचे किंवा महाराष्ट्रातील संगीत क्षेत्राचे हे आणखी एक वेगळे वैशिष्ट्य होय. असंख्य कवींच्या उत्कृष्ट, भावगर्भ कविता भावगीतांच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचतात. ही परंपरा आजही सौमित्र, नितीन आखवे, अनिल कांबळे, संदीप खरे इत्यादी कवींच्या काळातही अखंडपणे सुरू आहे.

शास्त्रीय संगीताच्या क्षेत्रातील काही दिग्गजांनीही मराठी भावगीतांचा प्रांत आपलासा केलेला दिसतो. किशोरी आमोणकर यांची ‘हे शामसुंदर’, ‘जाईन विचारीत रानफुला’ ही गीते; कुमार गंधर्व यांची ‘आज अचानक गाठ पडे’, ‘अजुनी रुसून आहे’, ‘उठी उठी गोपाळा’, ‘ऋणानुबंधाच्या’, ‘प्रेम केले हा काय झाला गुन्हा’ ही गीते; भीमसेन जोशी यांचे ‘सखी मंद झाल्या तारका’ हे गीत, तसेच अभंगवाणी, वसंतराव देशपांडे यांनी गाजवलेली ‘वाटेवर काटे वेचीत चाललो’, ‘बगळ्यांची माळ फुले’ ही गीते; अभिषेकीबुवांची ‘शब्दावाचून कळले सारे’, ‘माझे जीवनगाणे’, ‘कशी तुज समजावू सांग’ ही गीते; ज्योत्स्ना भोळे यांची ‘आला खुशीत समींदर’, ‘माझिया माहेरा जा’, व अलीकडच्या काळातील आरती अंकलीकर यांची ‘मी राधिका’, ‘गगना गंध आला’ ही गीते. अशी अनेक उदाहरणे देता येतील.

लता मंगेशकर यांच्या आवाजात पी. सावळाराम आणि वसंत प्रभू या जोडीने अनेक भावगीते ध्वनिमुद्रित केली. तशीच रमेश आणावकर, योगेश्वर अभ्यंकर आणि वसंत प्रभू यांनी आशा भोसले यांच्या आवाजात शेकडो गाणी केली. सुमन कल्याणपूर यांचा आवाज दशरथ पुजारी, अशोक पत्की यांनी अधिक वापरला. ही गाणी आकाशवाणी तसेच ध्वनिमुद्रिकांच्या माध्यमातून घरोघरी पोहोचली.

भावगीतांच्या माध्यमातून कविता रुजवण्याचे कार्य घडले. सुधीर फडके, दशरथ पुजारी, दत्ता डावजेकर यांनी त्यातच पुढचा टप्पा गाठला. त्यानंतर श्रीनिवास खळे, यशवंत देव, हदयनाथ मंगेशकर, अरूण पौडवाल, अनिल मोहिले यांनी वाद्यवृंदाच्या बाबत नवे प्रयोग केले. यशवंत देव यांनी अरुण दाते यांचा आवाज सर्वाधिक वापरला. संगीतकार यशवंत देव यांनी भावगीतांच्या क्षेत्रात शब्दप्रधान गायकीचे महत्त्व रुजवले आणि एक वेगळी वाट निर्माण केली. प्रचलित आवाजांप्रमाणेच नव्या आवाजांचा शोध घेतला आणि त्यांना संधी दिली.

संतरचनांनीही मराठी भावसंगीताचे विश्व भक्तिरसात न्हाऊन निघालेले दिसते. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत नामदेव, संत कान्होपात्रा, संत एकनाथ, संत जनाबाई, सोहिरोबा, रामदास स्वामी, संत सावता माळी ...यांच्या असंख्य रचना सुरांचे लेणे लेवून मराठी मनात कायमच्या ठसल्या.

वाजवी पावा गोविंद, वाजवी मुरली शामसुंदरा, अमृताहूनी गोड, विठु माझा लेकुरवाळा, विठ्ठला समचरण तुझे धरिते, हरवले ते गवसले का, हले हा नंदाघरी पाळणा, नेऊ नको माधवा, लपविलास तू हिरवा चाफा, लाजली सीता स्वयंवराला, रानात सांग कानात, राधा गौळण करीते मंथन, राधा कृष्णावरी भाळली, रानावनात गेली बाई शीळ, रघुपती राघव गजरी गजरी, चांदण्या रात्रीतले ते ,पंढरीनाथा झडकरी आता, नका विचारू देव कसा, त्या सावळ्या तनूचे, त्या चित्तचोरट्याला का आपुले म्हणू मी,नंदाघरी नंदनवन फुलले, नदीकिनारी नदीकिनारी, झिमझिम पाऊस पडे सारखा, जो आवडतो सर्वांना, गोरी गोरी पान, घट डोईवर घट कमरेवर, गंगा यमुना डोळ्यात उभ्या का, नीज माझ्या नंदलाला, श्रावणात घन निळा बरसला, भावनांचा तू भुकेला, वादळाचा वेग घेऊन, जाहल्या काही चुका अन, केशवा माधवा, कुठे शोधिसी रामेश्वर अन्, कळेना अजुनी माझे मला....ही यादी आणखी कितीही वाढत जाईल.

भावसंगीताला लोकप्रियता मिळवून दिली ती आकाशवाणीने. गीतरामायणासारखा वर्षभर चालणारा उपक्र म केवळ आकाशवाणीच्या माध्यमातूनच सर्वदूर पोचला आणि त्याने इतिहास घडवला. तसेच रेकॉर्ड कंपन्यांचाही उल्लेख करावा लागेल. विशेषतः हिज मास्टर्स व्हाईस (एचएमव्ही) ने असंख्य गायकांच्या आवाजात उत्तमोत्तम भावगीते ध्वनिमुद्रित केली आणि रसिकांपर्यंत पोहोचवली. कलाकाराकडून प्रत्यक्ष भावगीते ऐकण्याची संधी मात्र निःसंशयपणे गणेशोत्सवातील मंडळांनी व विविध सांस्कृतिक संस्थांनी रसिकांना उपलब्ध करून दिली, याचीही नोंद घ्यायलाच हवी.

मराठी मनाचा एक कोपरा खास भावगीतांसाठी हळुवार होतो, हा इतिहास आहे, तसेच ते वर्तमान आहे, ते वास्तव आहे. अलीकडे दूरदर्शन वाहिनीवरील मराठी गीतविषयक ' स्पर्धांना ' उदंड प्रतिसाद मिळाल्याचे आपण पहिले. यामागे ' मराठी रसिकाचे भावगीतांवरील असीम प्रेम' हे एक महत्त्वाचे कारण आहे. काळानुरूप आता संगीत बदलले तशी कविताही बदलली आहे. वाद्यवृंदाचे आधिक्य वाढते आहे. तरीही अशोक पत्की, श्रीधर फडके, सलील कुलकर्णी, कौशल इनामदार, अवधूत गुप्ते, राहुल घोरपडे, नरेंद्र भिडे, जितेंद्र कुलकर्णी अशी नवी आश्वासक नावे मराठी भावसंगीताच्या क्षेत्रात वेगळे काही करू पाहत आहेत. नवा रसिकही त्यांना दाद देतो आहे. हे सांगीतिक बंध असेच दृढ राहोत, या सदिच्छा.


मराठी नाट्यसंगीत - एकमेवाद्वितीय परंपरा :
प्रस्तावना :
मराठी संगीत नाटक ही मराठी रंगभूमीने जागतिक रंगभूमीला दिलेली देणगी आहे, असे मानले जाते. विष्णुदास भावे यांनी मराठी रंगभूमीचा श्रीगणेशा केला तर संगीत नाटकाचा लौकिक अर्थाने प्रारंभ अण्णासाहेब किर्लोस्कर यांच्या संगीत शाकुंतल (१८८०) या नाटकाने झाला. त्यानंतर सौभद्र, रामराज्यवियोग, द्रौपदी, विद्याहरण, शारदा, स्वयंवर, मानापमान, संशयकल्लोळ, एकच प्याला ...अशा संगीत नाटकांची परंपराच निर्माण झाली. १८८० ते १९३० हा संगीत नाटकांच्या आणि पर्यायाने नाट्यसंगीताचा सर्व अर्थांनी सुवर्णकाळ होता. संगीत नाटकांच्या इतिहासातील काळाचे टप्पे हे समीक्षकांनी व अभ्यासकांनी पुढीलप्रमाणे मानले आहेत.
किर्लोस्कर, देवल काळ - १८८० -१९१०
खाडीलकर, बालगंधर्व काळ - १९१० - १९३०
अत्रे, रांगणेकर काळ - १९३० - १९६०
गोखले, कानेटकर काळ - १९६० - १९८०

नाटककार, संगीतकार, गायक-अभिनेते :
अण्णासाहेब किर्लोस्कर, गोविंद बल्लाऴ देवल, कृ. प्र. खाडीलकर, राम गणेश गडकरी, मामा वरेरकर,आप्पा टिपणीस, वीर वामनराव जोशी, वसंत शांताराम देसाई, प्र. के. अत्रे, गोविंदराव टेंबे, स्वातंत्र्यवीर सावरकर, श्री. कृ. कोल्हटकर, वि. सी. गुर्जर, विद्याधर गोखले, विश्राम बेडेकर, तात्यासाहेब केळकर, माधवराव पाटणकर, ह. ना. आपटे, माधवराव जोशी, मो. ग. रांगणेकर, वि. वा. शिरवाडकर, वसंत कानेटकर, नागेश जोशी, बाळ कोल्हटकर, पुरुषोत्तम दारव्हेकर असे अनेक नाटककार आणि पद्यरचनाकार संगीत नाटकांना विविध कालखंडात लाभले. १९६० नंतर शांता शेळके यांनी हे बंध रेशमाचे, धाडीला राम तिने का वनी, वासवदत्ता अशा काही संगीत नाटकांसाठी गीते लिहिली.

गायनाचार्य भास्करबुवा बखले, गोविंदराव टेंबे, मा. कृष्णराव, पं. राम मराठे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, केशवराव भोळे असे दिग्गज संगीतरचनाकार (संगीतकार) लाभल्याने मराठी नाट्यसंगीत समृद्ध झाले. यातील प्रत्येक संगीतरचनाकार स्वतः उत्तम गायक होते. हिंदुस्थानभर भ्रमण करून संगीताचे ज्ञान आणि संस्कार त्यांनी आत्मसात केल्याने, त्याचे प्रतिबिंब नाट्यसंगीतात पडणे स्वाभाविक होते. उदाहरणार्थ ‘मानापमान’ नाटकातील अनेक चाली बनारस, लखनौ तसेच पंजाब येथील उपशास्त्रीय गायनप्रकारांवर बेतलेल्या आहेत. तसेच ‘स्वयंवर’ मधील अनेक पदे मूळ बंदिशींवर आधारली आहेत.
नाट्यसंगीताचा विचार करताना काही बुजुर्ग गायक - कलाकारांचा उल्लेख अनिवार्य आहे. बालगंधर्व, भाऊराव कोल्हटकर, संगीतसूर्य केशवराव भोसले, मोरोबा वाघोलीकर, मा. दीनानाथ मंगेशकर, नानासाहेब जोगळेकर, शंकरराव सरनाईक, माधवराव वालावलकर, मा. अविनाश, छोटा गंधर्व, भालचंद्र पेंढारकर, वसंतराव देशपांडे, जयराम, जयमाला आणि कीर्ती शिलेदार, राम मराठे, प्रसाद सावकार, रामदास कामत, फैय्याज, प्रकाश घांग्रेकर, रजनी जोशी, मधुवंती दांडेकर, सुहासिनी मुळगावकर आदी कलाकारांनी आपल्या गायनाचे आणि अभिनयाचे अनेक रंग नाट्यसंगीताला दिले.

दरम्यान अभिजात शास्त्रीय संगीत गाणारे मोठे कलाकारही मैफिलीत नाट्यसंगीताचा समावेश करू लागले. उस्ताद अब्दुल करीम खॉं, सवाई गंधर्व, पं. भीमसेन जोशी, हिराबाई बडोदेकर, सरस्वती राणे, ज्योत्स्ना भोळे, पं. जितेंद्र अभिषेकी, छोटा गंधर्व, पं. राम मराठे, विनायकबुवा पटवर्धन, मा. कृष्णराव, निवृत्तीबुवा सरनाईक, मा. दीनानाथ मंगेशकर, मालिनी राजूरकर अशी अनेक शास्त्रीय गायकांची नावे सांगता येतील. नाट्यसंगीत सर्व स्तरांत लोकप्रिय करण्याचे काम या कलाकारांनी केले.
नाट्यसंगीताच्या क्षेत्रातील वादक साथीदारांचा उल्लेख करणेही गरजेचे आहे. ऑर्गन, हार्मोनियम, सारंगी, तबला, पखवाज, व्हायोलीन ही वाद्ये नाट्यसंगीतासाठी प्रामुख्याने उपयोगात आणली जातात. बालगंधर्वांच्या काळात उस्ताद कादरबक्ष (सारंगी), उस्ताद थिरखवॉं (तबला) हे साथीदार प्रसिद्ध होते.

विविध सांगीतिक आकृतिबंध :
भारतीय संगीत परंपरेतील विविध ससांगीतिक आकृतिबंध नाट्यसंगीतातून प्रत्ययास येतात. ध्रुवपद - धमारापासून ते गजल -कव्वालीपर्यंत आणि भावगीतापर्यंत हे वैविध्य दिसते. ख्याल, तराणा,ठुमरी, कजरी, होरी, चैती, गजल, कव्वाली, लावणी, साकी, दिंडी, आर्या, अभंग, स्त्रीगीते असे अनेक प्रकार नाट्यसंगीतातून मुक्तपणे वापरलेले दिसतात.
किर्लोस्करी नाटकांतील संगीतावर कर्नाटकातील यक्षगानाचा प्रभाव होता. महाराष्ट्रातील कीर्तनपरंपरेचे व लोकसंगीताचे अंश (दिंडी, साकी, लावणी), जयदेवांच्या गीतगोविंदाचे प्रतिबिंब, आणि शास्त्रीय संगीताच्या मैफिलीत गायला जाणारा टप्पा हा प्रकारही नाट्यगीतांत वापरलेला दिसतो.

नाट्यसंगीतामुळे वेगवेगळ्या रागांचा प्रसार झाला. नाथ हा माझा (यमन), आनंदे नटती (मल्हार), उगवला चंद्र पुनवेचा (मालकंस), कठीण कठीण किती, पुरुष हदय बाई (यमनकल्याण), कटु योजना ही विधीची (शंकरा), अनृतचि गोपाला (सूरदासी मल्हार), एकला नयनाला विषय तो झाला (पहाडी), कृष्ण माझी माता (बागेश्री), कोण अससी तू नकळे मजला (जोगकंस), खरा तो प्रेमा (पहाडी - मांड), गुरू सुरस गोकुळी (जयजयवंती), जय गंगे भागीरथी (कलावती), जय शंकरा गंगाधरा (अहिरभैरव), जयोस्तुते उषादेवते (देसकार), झणी दे कर या (अडाणा), तळमळ अति अंतरात (सोहनी) अशी कित्येक उदाहरणे सांगता येतील. याशिवाय अनेक संतरचना नाट्यसंगीत म्हणून वापरल्या गेल्या आणि विविध रागांत त्यांची अनेक रूपे रसिकांच्या मनात ठसली. अवघाची संसार सुखाचा करीन (धानी), अगा वैकुंठीच्या राया (भैरवी), अमृताहुनी गोड, देवा धरिले चरण (भीमपलास), देवा तुझा मी सोनार (जौनपुरी) या नाट्यगीतांचा उल्लेख या संदर्भात करता येईल.

नाट्यसंगीताचे अनेक प्रवाह विविध कालखंडांत निर्माण झाले, त्यांना रसिकाश्रय लाभला. किर्लोस्करी काळातील नाट्यसंगीतावर कीर्तन परंपरेचा प्रभाव होता. घरगुती पण वास्तववादी अशी ही नाटके होती. विषयही बहुधा पौराणिक असत. उदा. शाकुंतल, सौभद्र, द्रौपदी, सावित्री, मेनका, आशानिराशा, रामराज्यवियोग, विधिलिखित. त्यानंतर देवलांच्या ‘शारदा’ ने अतिशय सोपी, सहज पण प्रासादिक पदे नाट्यसंगीतात आणली. त्यात माधुर्य होते आणि जिव्हाळाही होता. शिवाय एक सामाजिक भानही या पदांमध्ये होते. उदा. शारदा, संशयकल्लोळ, मृच्छकटिक या नाटकांतील रचना. कृ. प्र. खाडिलकरांची पदे ओजोगुणयुक्त आणि आदर्शवादी आहेत. हे स्वयंवर, मानापमान, विद्याहरण, द्रौपदी, मेनका, त्रिदंडीसंन्यास यातील नाट्यपदे ऐकल्यानंतर लक्षात येते. सुभाषितांचे मोल यातील काही पदांना मिळाले, हेही एक वैशिष्ट्य मानावे लागेल. स्वकुलतारक सुता, मी अधना न शिवे भीती मना, शूरा मी वंदिले, प्रेमसेवा शरण, तव जाया नृपकन्या ही ‘सुभाषितांची’ उदाहरणे होत. किर्लोस्कर, खाडीलकर, देवल यांच्यापेक्षा निराळा बाज गडकरी, सावरकर, वरेरकर, जोशी, रांगणेकर यांनी नाट्यगीतांतून पुढे आणला. नाट्यपदांची रचना अधिक काव्यमय, सोपी, गायनानुकूल झाली. नाट्यपदांची संख्याही लक्षणीयरीत्या कमी झाली. हा बदल रसिकांनाही भावला.

गंधर्वोत्तर काळातील प्रतिभासंपन्न नाट्य-संगीतकार पं. जितेंद्र अभिषेकी यांनी मराठी संगीत नाटकातील संगीतात लक्षवेधक प्रयोग केले. नाट्यपदांची अ-विस्तारक्षमता (विस्ताराला अतिरेकी वाव नसणारी बांधीव रचना) आणि स्वतंत्र स्वररचना ( बंदिशींवर आधारीत नव्हे तर स्वतंत्र चाली बांधल्या) ही वैशिष्ट्ये जपत अभिषेकींनी नाट्यसंगीत आटोपशीर केले. भावगीतांचा सुंदर वापर (उदा. गर्द सभोती रानसाजणी, अर्थशून्य भासे मज हा कलह जीवनाचा, सर्वात्मका सर्वेश्वरा,) तसेच अनवट रागांचा वापर (उदा. सालगवराळी, धानी, बिहागडा) त्यांनी नाट्यसंगीतात केला. शहाशिवाजी, नेकजात मराठा, संन्यस्तखड्ग, कट्यार काळजात घुसली, मेघमल्हार, मदनाची मंजिरी, मंदारमाला, जय जय गौरीशंकर, पंडितराज जगन्नाथ, सुवर्णतुला, स्वरसम्राज्ञी - ही संगीत नाटकांची सूची पाहिली असता संगीतामुळे नाटक किती उत्कट व प्रभावी बनू शकते याचा प्रत्यय आपल्याला येतो.
अन्य माहिती :
काही वेळा संगीत नाटकापेक्षा त्यातील पदांच्या ध्वनिमुद्रिकांनी रसिकांचे लक्ष वेधून घेतले. उगवला चंद्र पुनवेचा (बकुळ पंडित), ऐसा महिमा प्रेमाचा (रतिलाल भावसार), काटा रुते कुणाला (अभिषेकीबुवा), गुलजार नार ही मधुबाला (वसंतराव देशपांडे), दान करी रे (रामदास कामत), मर्मबंधातली ठेव ही (प्रभाकर कारेकर), मधुमीलनात या विलोपले (आशा भोसले), मानसी राजहंस पोहतो (ज्योत्स्ना भोळे) अशा नाट्यपदांच्या ध्वनिमुद्रिका अतिशय लोकप्रिय झाल्या आणि आजही आहेत. लोकप्रिय ध्वनिमुद्रिकांची असंख्य उदाहरणे देता येतील.
शाकुंतल, सौभद्र या नाटकांच्या काळात नाटकांतील पदांची सं‘या भरघोस होती. त्यामुळे नाटके रात्रभर चालत असत. बोलपटांच्या आगमनाने दोन-तीन तासांची कमरणूक सहज उपलब्ध झाल्याने संगीत नाटकांची गरज कमी होत गेली. तसेच या काळात संगीत नाटकाने बदलत्या काळाशी जुळवून घेणे नाकारल्याने नाट्यसंगीतही मागे पडत गेले. ‘नाट्यमन्वंतर’ या नाट्यसंस्थेच्या कुलवधू, आंधळ्यांची शाळा, भूमिकन्या सीता आदी नाटकांनी १९४० च्या दशकात काही बदल करून आटोपशीर नाट्यसंगीत रसिकांसमोर आणले. त्यांना उत्तम प्रतिसादही मिळाला. पण बोलपटांचे आक्रमण इतके प्रभावी होते की जवळपास १९६० - ६५ पर्यंत नाट्यसंगीताला आणि संगीत नाटकाला डोकेही वर काढता आले नाही, ही वस्तुस्थिती आहे.या स्थितीतही संगीत नाटके सातत्याने सादर करणार्‍या काही निष्ठावान नाटक मंडळींचा उल्लेखही या क्षेत्राच्या इतिहासात होणे आवश्यक आहे. किर्लोस्कर नाटक मंडळी, गंधर्व नाटक कंपनी, ललितकला, नूतन संगीत मंडळी, मराठी रंगभूमी, नाट्यमन्वंतर, राजाराम संगीत मंडळी आदी नाटक मंडळींनी अनेकानेक संगीत नाटकांची निर्मिती केली, सर्वत्र या नाटकांचे प्रयोग केले, प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष करत संगीत नाटकांची व नाट्यसंगीताची परंपरा जपली.

नाट्यसंगीताच्या विचारात संयुक्त नाट्यप्रयोगांचा संदर्भही महत्वाचा आहे. ललितकलाचे केशवराव भोसले आणि गंधर्व नाटक कंपनीचे बालगंधर्व यांच्या ‘संयुक्त मानापमान’ चा प्रयोग टिळक स्वराज्य फंडासाठी मुंबईत दिनांक ८ जुलै, १९२१ रोजी झाला. सायंकाळी साडेसात ते पहाटे अडीचपर्यंत रंगलेल्या या प्रयोगाचे तिकिटाचे दर अडीच रुपयांपासून शंभरपर्यंत होते. चार तासांत सर्व तिकिटे संपली होती. या अभिनव प्रयोगाची तिकिट विक्री त्या काळात धारवाडपासून कोलकत्यापर्यंत तारेने झाली होती. पंधरा हजार तीनशे रुपये असे विक्रमी उत्पन्न या प्रयोगातून झाले. याच संचाचा संगीत सौभद्रचा संयुक्त प्रयोग दिनांक २२ जुलै, १९२१ या दिवशी झाला. त्याचे उत्पन्न नऊ हजार रुपये झाले. संगीतसूर्य केशवराव भोसले यांच्या अकाली निधनाने हे अभिनव प्रयोग बंद पडले.

गायन आणि अभिनय या दोन्हींत तयार असणारे कलाकार ही आदर्श संगीत नाटकाची गरज आहे. चांगले संगीत नाटक लिहिणारे लेखक पुढे येणे आवश्यक आहे. नाट्यसंगीताला एक परंपरागत असे व्यक्तिमत्त्व आहे. आधुनिकता कितीही आली, तरी हे व्यक्तिमत्त्व अबाधित राहायला हवे. कारण ती आपली एकमेवाद्वितीय अशी परंपरा आहे. नाट्यसंगीताचे व्यक्तिमत्त्व राखत, आजही अनेक नाट्यसंस्था, गायक-अभिनेते कलाकार या क्षेत्रात निष्ठेने कार्य करीत आहेत. नाट्यसंगीताला जगात तोड नाही.
नाट्यसंगीताच्या प्रवाहाने अनेक बदल अनुभवले. सारे संगीतप्रकार सामावून घेत, स्वतःचे रंग त्यात मिसळून, आधुनिक काळाची आव्हाने स्वीकारत संगीत नाटक आणि त्यातील नाट्यसंगीताची वाटचाल आजही सुरू आहे. निर्मितीचा वेग मंदावला असला, तरी नाट्यसंगीताची लोकप्रियता आजही टिकून आहे आणि टिकून राहील कारण त्याचा पाया अभिजात संगीताचा आहे.

संगीत रंगभूमीवरील काही महत्त्वाचे कलाकार व त्यांचा संक्षिप्त परिचय. :
गायनाचार्य भास्करबुवा बखले
- अभिजात संगीतातील सर्वसंचारी आणि श्रेष्ठ दर्जाचे गवई.
- ' स्वयंवर ' नाटकातील चालींमुळे नाट्यसंगीतातही अभिजात राग परिचित झाले.
- उठावदार मुखडा आणि आकर्षण बांधणीच्या दुर्मीळ चाली बुवांनी नाट्यसंगीतात आणल्या.
- नाथ हा माझा, स्वकुलतारकसुता, मम आत्मा गमला, सुजन कसा मन चोरी, मम सुखाची ठेव आदी पदे यमन, भूप, बिहाग, भीमपलास, बागेश्री, तिलककामोद आदी रागांत होती. त्यांनी श्रोत्यांची पकड घेतली, जी आजही कायम आहे.
- गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, मा. कृष्णराव ही नाट्यसंगीतातील कर्तृत्ववान शिष्यांची पिढी बुवांनी घडवली.

गोविंदराव टेंबे
- जन्म - १८८१, मृत्यू - १९५५
- प्रसिद्ध हार्मोनियमवादक, संगीतकार, नट, नाटककार, नाटकमंडळीचे मालक, पद्यकार...अशा अनेक भूमिकांतून परिचित व्यक्तिमत्त्व. पण हार्मोनियमवादक म्हणून सर्वाधिक प्रसिद्ध.
- मानापमान, विद्याहरण यातील पदांना वेगळ्या चाली योजून नाट्यसंगीतात त्यांनी क‘ांती घडवली.
- अभिजात संगीतात त्यांनी पूरबी अंगाचे संगीत मिसळले आणि ‘नाही मी बोलत’, ‘सवतची भासे मला’, ‘भाली चंद्र असे धरीला’, ‘मी अधना’ अशी उत्तमोत्तम नाट्यपदे जन्माला आली. त्यांची मोहिनी आजही टिकून आहे.
- उत्तम, रसाळ लेखन हेही त्यांचे वैशिष्टय होते. ‘माझा संगीतव्यासंग’ हे त्यांचे पुस्तक विशेष गाजले. त्यांनी उत्तम संगीतिका (ऑपेरा) लिहिल्या आणि बसवल्या.
मा. दीनानाथ मंगेशकर
- जन्म - २९ डिसेंबर, १९००, मृत्यू - २४ एप्रिल, १९४२
- केवळ ४२ वर्षांचे आयुष्य पण प्रचंड कर्तृत्व,
- गोव्याच्या भूमीत जन्मलेल्या दीनानाथांनी बाबा माशेलकर, रामकृष्णबुवा वझे, निसार हुसेन, बखलेबुवा, गणपतीबुवा भिलवडीकर, इस्माईलखॉं, अब्दुलखॉं अशा अनेकांचे मार्गदर्शन घेऊन स्वतःची गायकी घडवली आणि समृद्ध केली.
- त्यांनी प्रथम उर्दू नाटकातून भूमिका व पदे गाजवली. १९१८ ते १९४० या काळात त्यांनी कलाकारकीर्द गाजवली.

- १९१८ मध्ये बलवंत संगीत मंडळीची स्थापना केली. त्यांची लतिकेची भूमिका, तेजस्विनी, पद्मावती, सुलोचना या स्त्रीभूमिका विलक्षण गाजल्या. याशिवाय त्यांच्या अर्जुन, धैर्यधर, हिंमतराव, सदानंद आदी पुरुष भूमिकाही लोकप्रिय झाल्या.
- संगीत रंगभूमीवर त्यांनीच पंजाबी बाज आणला. गोडवा, तडफ, भिंगरीची तान, आक्रमकता यांना प्रतिभा आणि परिश्रमांची जोड देऊन स्वतंत्र गायकी निर्माण केली. बोलपटांच्या निर्मितीचाही प्रयत्न केला.

बालगंधर्व - नारायणराव राजहंस,
- जन्म - २६ जून, १८८८. मृत्यू - १५ जुलै, १९६७.
- १८९८ मध्ये ' बालगंधर्व ' ही पदवी लोकमान्य टिळक यांनी बहाल केली.
- २५ ऑक्टोबर, १९०५ या दिवशी किर्लोस्कर नाटक मंडळीत प्रवेश.
- एकूण विविध २४ नाटकांत भूमिका.
- १९२९ मध्ये नाट्यसंमेलनाचे अध्यक्ष.
- ‘प्रभात’ कंपनीशी करार करून धर्मात्मा या चित्रपटात संत एकनाथांची भूमिका.
- सुमारे २५ वर्षे संगीत रंगभूमीवर व महाराष्ट्रातील रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले.
- त्यांचा कालावधी ‘बालगंधर्व युग - सुवर्णयुग’ या नावानेच ओळखला जातो.

बापूराव पेंढारकर
- संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे शिष्य.
- ललितकलादर्शचे संचालक.
- वीररसाला पोषक आवाज होता.
- अनेक नव्या संगीत नाटकांची निर्मिती धाडसाने केली.

मा. कृष्णराव
- मृत्यू - १९७४
- गायनाचार्य भास्करबुवा बखले यांचे शिष्य.
- स्वतंत्र स्वररचना करून चाली देण्याची परंपरा निर्माण करण्याचे श्रेय मा. कृष्णरावांचे आहे.
- द्रौपदी, मेनका, सावित्री, नंदकुमार, विधिलिखित, आशानिराशा, अमृतसिद्धी, कान्होपात्रा, कुलवधू, एक होता म्हातारा ...अशी अनेक नाटके त्यांच्या संगीताने गाजली.
- चित्रपटसंगीताच्या क्षेत्रातही भरीव कामगिरी केली.

छोटा गंधर्व
- जाहिरात येताच तासाभरात संगीत नाटक हाऊसफुल, अशी ख्याती असणारे श्रेष्ठ गायक, अभिनेते आणि संगीतकार.
- रंगभूमीवरील प्रारंभ स्त्री-भूमिका करण्यातूनच झाला.
- अतिशय मधुर आवाज, जन्मजात प्रतिभा, गुरुमुखी विद्या मिळाल्याने समृद्ध ज्ञानभांडार.
- सौभद्रमधील कृष्ण, मृच्छकटिकमधील चारूदत्त आणि सुवर्णतुलामधील कृष्ण या भूमिका अतिशय लोकप्रिय होत्या.
- ‘देवमाणूस’ या नाटकाचे त्यांचे संगीत गाजले.

जयमाला शिलेदार
- मूळच्या प्रमिला जाधव, ‘वेषांतर’ नाटकापासून रंगभूमीवरील कारकीर्द सुरू झाली.
- बालगंधर्व हे दैवत मानून संगीत रंगभूमीवर सातत्याने ६० वर्षे कार्यरत.
- त्यांच्या कन्या कीर्ती आणि लता यांनाही संगीत रंगभूमीची धुरा सोपवून नाट्यसंगीताचे संस्कार दिले. सध्या कलाकारांची तिसरी पिढी घडवत आहेत.
- ‘मराठी रंगभूमी’ या संस्थेच्या माध्यमातून अनेकानेक संगीत नाटकांत भूमिका, अनेक नव्या नाटकांची निर्मिती, संगीत दिग्दर्शन, व नव्या पिढीला मार्गदर्शन.
- जयमाला-जयराम शिलेदारांसह ‘शिलेदार’ कुटुंबीयांचे नाट्यसंगीत व संगीत रंगभूमी क्षेत्रातील योगदान अतुलनीय अशा स्वरूपाचे आहे.
महत्त्वाचे योगदान देणारे निवडक नाटककार व त्यांच्या निवडक ‘संगीत’ नाटकांची सूची :

अण्णासाहेब उर्फ बळवंत किर्लोस्कर
नाटक सूची - 'संगीत शाकुंतल' या नाटकाद्वारे संगीत रंगभूमीची मुहूर्तमेढ रोवली.
संगीत सौभद्र, संगीत रामराज्यवियोग.

गोविंद बल्लाळ देवल
नाटक सूची - मृच्छकटिक, शापसंभ्रम,
संशयकल्लोळ, शारदा.

कृष्णाजी प्रभाकर खाडिलकर
नाटक सूची - संगीत मानापमान, संगीत स्वयंवर, द्रौपदी,
सावित्री, विद्याहरण, मेनका.

राम गणेश गडकरी
नाटक सूची - संगीत पुण्यप्रभाव, भावबंधन, एकच प्याला,
राजसंन्यास, प्रेमसंन्यास.

श्रीपाद कृष्ण कोल्हटकर
नाटक सूची - वीरतनय, प्रेमशोधन,
मूकनायक, वधूपरीक्षा.

भार्गव विठ्ठल वरेरकर (मामा)
नाटक सूची - कुंजविहारी, हाच मुलाचा बाप, जागती ज्योत,
संन्याशाचा संसार, लयाचा लय, स्वयंसेवक,
सत्तेचे गुलाम, तुरुंगाच्या दारात, सोन्याचा कळस,
भूमिकन्या सीता.

यशवंत नारायण टिपणीस
नाटक सूची - शहाशिवाजी, आशानिराशा, शिक्काकट्यार,
नेकजात मराठी.

गोविंदराव टेंबे
नाटक सूची - संगीत पट-वर्धन, तुळशीदास, वरवंचना, वेषांतर.

विठ्ठस सीताराम गुर्जर
नाटक सूची - संगीत नंदकुमार.

वामन मल्हार जोशी
नाटक सूची - संगीत रणदुंदुभी, राक्षसी महत्त्वाकांक्षा

आचार्य प्र. के. अत्रे
नाटक सूची - उद्याचा संसार, लग्नाची बेडी, वंदेमातरम्‌,
जग काय म्हणेल, पाणिग्रहण, प्रीतीसंगम,
अशी बायको हवी.

मो. ग. रांगणेकर
नाटक सूची - आशीर्वाद, कुलवधू, अलंकार, वहिनी,
तुझं नी माझं जमेना, एक होता म्हातारा, कोणे एके काळी.

नाटककार विद्याधर गोखले
नाटक सूची - सुवर्णतुला, मंदारमाला, पंडितराज जगन्नाथ,
जय जय गौरीशंकर, स्वरसम्राज्ञी, मदनाची मंजिरी,
मेघमल्हार, चमकला ध्रुवचा तारा.

वसंत कानेटकर
नाटक सूची - संगीत मत्स्यगंधा, मीरामधुरा.

पुरुषोत्तम दारव्हेकर
नाटक सूची - कट्यार काळजात घुसली, घनश्याम नयनी आला.

वि. वा. शिरवाडकर
नाटक सूची - ययाती-देवयानी, वीज म्हणाली धरतीला.

बाळ कोल्हटकर
नाटक सूची - देव दीनाघरी धावला, दुरितांचे तिमीर जावो, वाहतो ही दुर्वांची जुडी.

याशिवाय -

गोपाळ कृष्ण भोबे - धन्य ते गायनी कळा, योगिनी जोगळेकर - रंगात रंगला श्रीरंग,
रणजीत देसाई - हे बंध रेशमाचे, अशोक परांजपे - संत गोराकुंभार,
चिं. य. मराठे -होनाजी बाळा, नागेश जोशी - देवमाणूस,
विश्राम बेडेकर - ब्रह्मकुमारी, श्रीधर वर्तक - आंधळ्यांची शाळा,
ना. वि. कुलकर्णी - संत कान्होपात्रा, वसंत शांताराम देसाई - अमृतसिद्धी

अशा काही नाटकांचाही उल्लेख महत्वाचा आहे.

काही संदर्भग्रंथ
मराठी नाट्यकला आणि नाट्यवाङमय - श्री. ना. बनहट्टी
चंद्र चवथीचा - (एकच प्याला, भावबंधन, प्रेमसंन्यास, पुण्यप्रभाव) - म. वा. धोंड
खाडिलकरांचे नाट्यसुवर्ण - बलवंत देशमुख
मराठी नाट्यसंगीत - बाळ सामंत
मराठी नाट्यसृष्टी - गो. म. कुलकर्णी
संगीताने गाजलेली रंगभूमी - बाबुराव जोशी
माझा संगीतव्यासंग - गोविंदराव टेंबे
नाट्याचार्य देवल - श्री. ना. बनहट्टी
तुम्हा तो शंकर सुखकर हो - विद्याधर गोखले
नाट्यवेध - द. भि. कुलकर्णी
मराठीचा नाट्यसंसार - वि. स. खांडेकर
नाट्यसंगीत - ह. रा. महाजनी
 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district