श्रीगोंदा

प्रस्तावना :

लोककला हे महाराष्ट्रानं जतन केलेलं मौल्यवान ऐश्वर्य आहे. ग्रामीण महाराष्ट्रात मनोरंजनासाठी आणि प्रबोधनासाठी या लोककलांचा जन्म झाला. तशाच काही लोककला या धार्मिक व आध्यात्मिक श्रद्धांशीही निगडीत आहेत. आर्थिक व शैक्षणिकदृष्ट्या दुर्बल समाजाला जेव्हा शिक्षणाचा आधार नव्हता, तेव्हा या लोककलांनी त्यांचे प्रबोधन केले, आजारांवर झाडपाल्यांची औषधे सांगीतली आणि ईश्वराच्या आधाराने जगण्यावरची श्रद्धा वृद्धिंगत केली.

लोकश्रद्धेतून जन्मलेल्या व लोकशिक्षणासाठी अखंडपणे चालत आलेल्या या लोककला आजही ग्रामीण जीवनासाठीच नव्हे तर मराठी संस्कृतीपासून काहीशा दुरावत चाललेल्या शहरी संस्कृतीसाठीही गरजेच्या आहेत.

महाराष्ट्राची जडणघडण करण्यात या लोककलांचा मोठा वाटा आहे. प्रबोधनापासून ते मनोरंजनापर्यंत प्रत्येक पातळीवर समाजमनास आकार देण्याचा प्रामाणिक प्रयत्न लोककलांनी केला म्हणूनच आज आपण म्हणू शकतो की, महाराष्ट्र म्हणजे सप्तसुरांचा संगम आणि सप्तरंगांची उधळण आहे. इथे मनातला गुंता शेजारीण सोडवू शकत नाही, पण वर्षातून एकदा येणारी कडकलक्ष्मी सगळ्या रोगांवर औषध देऊन जाते. ज्वारीच्या शेतातून कुणी चालू लागला, तर कधी कडाक्याच भांडण होतं, पण मोरपिसाची टोपी घातलेल्या वासुदेवाच्या झोळीत सूपभर जोंधळे आनंदानं घातले जातात. कधी स्वत:च्या पणजोबाचं नावं आम्हाला माहिती नाही, पण वर्षातून एकदा येणारा हेळवी आमच्या पणजोबाचा खापर पणजोबा कुठे राहायचा हे पत्त्यासहीत सांगतो. खरा पोलीस गावात कधी येतो की नाही हे माहीत नाही, पण बहुरूपी आला की पोरं-सोरं डालग्यामागं गुडूप होतात. ब्रह्मदेवानं गाठ मारली म्हणून लग्न होतं, पण गोंधळ्यानं गोंधळ घातल्याशिवाय संसार सुरू होत नाही. आम्ही मूल व्हावं म्हणून नवस बोलतो, पण मूल झालं की ते देवाला सोडतो. आमचा अर्धा गाव कीर्तनात दंगलेला असतो, तर अर्धा गाव तमाशात रंगलेला असतो. गळ्यात माळ घालून काही लोक पंढरीची वाट चालतात, तर काही म्हसोबाला बोकड कापून स्वत:च त्यावर ताव मारतात. जसा आहे तसा, पण आपला महाराष्ट्र रंग-ढंगदार आणि नवरसपूर्ण आहे एवढं खरं!


१. वासुदेव

गोविंद रामा हो, गोपाळा रामा जी जी
केशवा रामा हो, माधवा रामा जी जी


सूर्यप्रकाश चंद्रप्रकाशात मिसळताना पक्षांची घरटी किलबिलू लागतात, त्यांच्यासोबत, तालासुरात, टाळ-चिपळ्यांच्या तालावर वासुदेव मनाचा ताबा घेतो आणि बाळ गोपाळांचा मेळा अंथरुणातून थेट अंगणात येतो.

डोक्यावर मोरपिसांनी सजविलेला शंकुच्या आकाराचा मुकुट, अंगात शुभ्र घोळदार झब्बा, सलवार आणि कमरेला बांधलेलं उपरणं. उपरण्यात खोवलेला पावा. एका हातात टाळ, एका हातात चिपळ्या आणि पहाटेचं वातावरण भारून टाकणार्‍या किनर्‍या आवाजाला पायात बांधलेल्या चाळांची साथ. पाहताक्षणी लहान-थोरांना भुरळ घालण्याची किमया त्याच्या - या वासुदेवाच्या - पेहरावात असते.

टाळ वाजवित, गात-नाचत येणार्‍या या वासुदेवाची वर्णनं महानुभव पंथाच्या साहित्यातही सापडतात. यावरून लोकजागृतीचा हा आदर्श वारसा सुमारे नऊशे ते हजार वर्षांपूर्वीचा तरी नक्की असावा असे अभ्यासक सांगतात.

कृष्णभक्ती हा वासुदेवाचा वसा आहे. हे त्याच्या पेहरावावरून सहज लक्षात येतं. डोक्यावरच्या मुकुटातली मोरपिसं आणि त्याचा पावा त्याच्या भक्तीचा केंद्रबिंदू दाखवितात. तर त्याच्या गीतातील गोविंद गोपालाचा उल्लेखही तेच दर्शवितो.

वासुदेव बनून गावोगावी फिरण्याबरोबरच काही वासुदेव शेतीही करतात. त्यांची वेगळ्या जातीत गणना होऊ लागली असली, तरी ते जातीने प्रामुख्याने मराठा या श्रेणीत मोडतात असे अभ्यासकांनी नमूद केले आहे.

मौखिक परंपरेनं चालत आलेली गाणी, अभंग, ओव्या, गवळणी आपल्या विशिष्ट लकबीत, तालबद्धरीत्या सादर करून लोकांच्या मनावर सकारात्मक संस्कार करण्याचा पहिला मान वासुदेवाचा. सकाळी पहिल्यांदा आपण जे गीत ऐकतो, ते दिवसभर आपल्या मनाभोवती रेंगाळत राहते. गावोगावी फिरणार्‍या वासुदेवाला याचं भान आहे. म्हणूनच तो दिवसाच्या आरंभालाच शुद्धाचरणाचा, नि:स्वार्थ दानाचा आणि हरिभजनाचा उपदेश करतो. समाजमनाची मशागत करताना जसा तो कमी पडत नाही, तसा तो स्वत:साठी दान मागतानाही कमीपणा वाटून घेत नाही. देणार्‍यालाही तो कधी भिक्षेकरी वाटत नाही.

‘बळीच्या वंशी जन्म घेतला, काळीचा धंदा सोडू नको.
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरि भजल्याविण राहू नको.’

असा हिताचा उपदेश करतानाच,
‘तुम्ही आया बायांनो द्या वासुदेवणीला चोळी
अहो, लहान मुलीच्या द्या अंगीची काचोळी.’

अशी स्वत:च्या संसाराला हातभार लावणारी मागणी मागतो.
समाजाची आध्यात्मिक, वैचारिक आणि सांस्कृतिक गरज भागविणारी ही समृद्ध परंपरा महाराष्ट्राच्या समाजजीवनातून कधीही वजा होऊ नये अशीच आहे. शहरीकरणाच्या, आधुनिकतेच्या विळख्यात गुरफटत चाललेला महाराष्ट्र अशा संस्कारक्षम परंपरांकडे पाहण्याचा दृष्टीकोन गढूळ होऊ देणार नाही अशी अपेक्षा. त्याच्या कर्तृत्वाचं मोल म्हणून त्याच्या झोळीत मूठ-पसा टाकला की, तो ‘दान पावलं, दान पावलं’ म्हणत आपल्या ओंजळीत पुण्याइचं दान टाकील आणि प्रबोधनाचा हा मंजूळ पावा महाराष्ट्राच्या संस्कारक्षम मनाला अखंड जागविताना सांगत राहील...

बळीच्या वंशी जन्म घेतला, काळीचा धंदा सोडू नको,
ऐक पराण्या, तुला सांगतो, हरि भजल्याविण राहू नको,
दिली देवानं धनसंपदा, गर्व मनामधि धरु नको,
चरत गायत्री शेती आली, तिच्या मुखावर मारु नको,
झाली म्हातारी गाय बापा, कसाबाला तू विकू नको,
मूल घातला साळमंदी, लाड त्याचा तू करू नको,
वडील बंधू बापापरमानं, मर्जी मोडून बोलू नको,
पित्याच्या वंशी जन्म घेतला, त्याच्या सेवेला चुकू नको,
आईच्या पोटी जन्म घेतला, वाईट वंगाळ बोलू नको,
दोघा भावांचा तंटा लागला, सरकारामधि जाऊ नको,




२. बहुरूपी

भर दुपारी उन्हातान्हात राबण्यापेक्षा थोडा विसावा घ्यावा म्हणून कुणी सोप्यात, ओसरीवर कलंडलेला असतो, तर घरातलं महिला मंडळ धान्य निवडण्यात किंवा इतर कामात मग्न असतं. ग्रामीण भागात दिसणारं हे नेहमीचं चित्र. पण वर्षातल्या एखाद्या दिवशी दुपारच्या या मंदावलेल्या वेळेची तारांबळा उडून जाते. ध्यानी मनी नसताना कानावर खणखणीत आवाज पडतो.

‘पाटील...कुठायत पाटील, असली करणी करून वर उन्हातान्हाचे सावलीत झोपता.

’पहिल्यांदा बाया-बापड्या गोंधळून जातात, पोरं घाबरून जातात. पण आवाज देणार्‍याचा अवतार बघून त्यांच्या लक्षात येतं की हा तर बहुरूपी आहे.

अंगात पोलिसाचा वेश, पण खिशाला लाल, काळा, हिरवा, निळा, खटक्याचा, मोडलेला असे दहा -बारा पेन अडकवलेले. डोक्यावर एक काच नसलेला काळ्या फ्रेमचा चष्मा. पायात फाटलेले बूट, बंदात अडकविलेली, कधीही न वाजणारी शिट्टी आणि काखेला जुनाट विटकी डायरी. अशा वेशातला बहुरूपी पोलीस वर्षातून एकदातरी गावात येतोच येतो. आला की ज्याच्या घरासमोर असेल, त्या घरच्या पुरुषावर वारंट बजावतो. त्याच्या बायकोला खरं गुपित सांगतो.

‘'वहिनी, तुम्ही काळजी करू नका पाटलानी पुण्याच्या शिटीत दुसरी बायको केली असली, तरी पोलीस खातं तिला टिकू देणार नाही. हा डिप्युटी चिप होमगार्ड आता पाटलांना घेऊन जाणार आणि तिसर्‍या लग्नाची शिक्षा देणार आहे. तुम्ही काळजीच करू नका.’'

खळखळून हसणार्‍या बाया-बापड्या क्षणभर कामाच्या रामरगाड्यातून बाहेर येतात. त्यांच्या या मोकळेपणानं हसण्याचं श्रेय घेतानाच हा बहुरूपी आपली खाकी पिशवी पुढं करतो. मग कुणी धान्य, कुणी वस्तू , तर कुणी पैसे देतात आणि पुढच्या दारावर नव सोंग घेऊन, नव्या उत्साहात तो निघून जातो.

महाराष्ट्राच्या ग्रामीणजीवनाची रचना ही एखाद्या गजबजलेल्या संपन्न कुटुंबासारखी आहे. एकमेकाला हातभार लावत सगळे सुखानं नांदत आहेत. शेतकर्‍याचा जीनक्रम बलुतेदारांवर, तर बलुतेदारांचा शेतकर्‍यांवर अवलंबून आहे. कष्ट, नैसर्गिक आपत्ती, मागासलेपणा, शिक्षणाचा अभाव, रोगराई अशा अनेक समस्यांनी भरडून निघणारा समाज बहुतेक वेळा वैतागलेला आणि चिंतेत राहणारा. पण यावरही ग्रामीणजीवनाला मनोरंजनाचा तोडगा मिळाला आहे. तो लोकरंजन करणार्‍या अस्वलवाला, नंदीबैलवाला, बहुरूपी अशा पात्रांच्या रूपानं. ग्रामीणजीवनाच्या पार्श्र्वभूमीवरती अशा कलाकारांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.

बहुरूपी ग्रामजीवनात येणार्‍या सर्व कलाकारांमध्ये अधिक प्रभावी वाटतो. अर्थात त्याचा वारसाही तेवढाच समृद्ध आहे. श्रीपती भट यांच्या ‘ज्योतिषरत्नमाला’ या आद्यग्रंथात त्याचा ‘बोहपी’ या नावाने उल्लेख आलेला आहे. समर्थ रामदास, संत एकनाथ आदींनी आपल्या काव्यरचनेत त्याची दखल घेतली आहे. समर्थ रामदासांनी तर देवालाच त्याची उपमा दिली आहे. अनेक अभ्यासकांनी आणि संतानी बहुरूपीचा उल्लेख वेगवेगळ्या नावाने झाल्याचे नमूद केले आहे. त्यात बोहपी, भोरपी, रामचंद, बहुरूपी अशा नावांचा समावेश होतो. पश्र्चिम महाराष्ट्रात ग्रामीण भागात त्याला भैरुपी असेही संबोधले जाते.

समाजातल्या विविध घटकांचं सूक्ष्म निरीक्षण आणि जन्मत:च मिळालेली अभिनयाची देणगी हे बहुरूप्यांचं वैशिष्ट्य. लोक कसे वागतात, पुढार्‍यांच्या लकबी, त्यांची खोटी आश्वासनं, त्रास देणारा नवरा अशा अनेक गोष्टींवर तो अचूकपणे बोट ठेवतो. एका दारी पुढारी होऊन रांगड्या भाषेत आश्वासन देणारा बहुरूपी पुढच्या दारी लगेच शहरी शुद्ध भटजी होऊन भविष्य कथन करू लागतो. आवाजातील चढ-उतार, त्या त्या रूपाशी तंतोतंत जुळणारा अभिनय पाहिला की स्टेजवरचे एकपात्री कलाकारही फिके वाटू लागतात. त्याला अभिनयासाठी कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही. ‘मागच्या वर्षी तुमच्या घरातून अर्धलीनं नेलेली चारी ढेकणं ताप येऊन देवाघरी गेली’, अशी दु:खद बातमी देऊन पुढच्या दारी लगेच तो तराळी होऊन येतो, आणि ‘चला ताई चला, तुम्ही लग्नाला चला...चिखलाची कढी, दगडाची वडी, मस्करीचं लोणचं, गाढवाची भजी...’ अशी लगबग करू लागतो. समाजाचं खरं रूप सर्वांना रुचेल अशा पद्धतीनं मांडणारा, विशेषत: ग‘ामीण महिलावर्गाला काही क्षणांची का असेना खळखळणारी उसंत देणारा हा जातिवंत विनोदवीर आपण जपायला हवा, नाहीतर त्याच्या काखेला असणार्‍या विटक्या डायरीत तो आपलं नाव लिहून घेईल आणि ते चित्रपगुप्ताला सांगण्याची धमकी आपल्याला देईल.



३. गोंधळ

महाराष्ट्रातील बहुतांश समाजांचा कुळधर्म-कुळाचार असणारी एक प्रबोधक, मनोरंजक आणि महत्त्वपूर्ण परंपरा म्हणजे गोंधळ. लग्न, मुंज किंवा इतर शुभकार्यावेळी घरी 'गोंधळ' घातला की आयुष्याचा गोंधळ होत नाही अशी धारणा आहे.

श्री रेणुका मातेचा किंवा श्री तुळजाभवानीचा आशीर्वाद लाभावा यासाठी भाविक-भक्त आपल्या पारंपरिक घराण्यातील गोंधळ्याला बोलावून देवीचा यथासांग गोंधळ घालतात. महाराष्ट्रात ज्या लोककलांना लोकजीवनाचा अविभाज्य घटक बनता आलं, त्यापैकी ही एक महत्त्वाची कला होय.

गोंधळाची उत्पत्ती ही परशुरामांनी केलेल्या मातृवंदनातून झाली असे सांगितले जाते. त्याबद्दल अशी कथा आहे की, परशुरामांनी बेटासूर नावाच्या दैत्याचा वध करून त्याचे शिर कापले. त्याच्याच शरीरातील शिरा (नसा) कापून, शिराच्या (कवटीच्या) ब्रह्म रंध्रात ओवून त्या वाद्याचा ‘तिंतृण तिंतृण’ असा आवाज करीत तो माता रेणुकेजवळ आला व तिला वंदन केले. या वंदनातूनच गोंधळाचा उगम झाला असे अभ्यासक लिहितात. तर गोंधळी लोक जमदग्नी ऋषी व रेणुका माता यांपासून आपली उत्पत्ती झाली आणि माहूर हे आपले मूळ स्थान आहे असे मानतात. काही संशोधकांनी गोंधळ ही कला भूतमाता व तिच्या भक्तांशी संबंधित असल्याचंही साधार स्पष्ट केलं आहे.

गोंधळाची प्राचीनता मांडताना संशोधकांनी- श्री. तुळजाभवानीची प्राचीनता ही इ. स. १००० पूर्वी जाते व रेणुका माता त्याहून प्राचीन आहेत, आणि गोंधळाची प्राचीनता रेणुका मातांच्या प्राचीनतेशी निगडीत आहे असे नमूद केले आहे. तर समर्थ रामदासांनी रचलेल्या, गोंधळात गायल्या जाणार्‍या आरतीत ‘कवडी' एक अर्पिता देसी हार मुक्ताफळा वो’ या ओळीतील कवडी या चलनाचा संदर्भ येतो. ‘कवडी' हे चलन पाचव्या शतकाच्या दरम्यान कर्नाटकात प्रचलित होते. त्या वेळचे कर्नाटकातील कदंब राजघराणे हे श्री तुळजाभवानीला आपली कुलदेवी मानत होते व उत्सव, गोंधळात सहभागी होत होते. यावरून गोंधळ प्रथा तेव्हापासून प्रचलित असावी असाही संदर्भ दिला जातो.

शतकानुशतके भक्तिभावाने घातल्या जाणार्‍या या गोंधळाचे स्वरूप बदलत्या काळासोबत सकारात्मक व नकारात्मकदृष्ट्याही बदलत आले आहे. भाविकाच्या घरी गोंधळ घालण्यासाठी येणार्‍या गोंधळ्यांच्या पिढ्या काळासोबत ज्ञानात वाढ व सादरीकरणात बदल करत राहिल्याने काही दशकांपूर्वीचा गोंधळ वेगळा होता असे वाटून जाते.

गोंधळाची रचना :
सभोवताली रांगोळी काढून मध्यभागी एक पाट ठेवला जातो. पाटावर कोरे वस्त्र अंथरले जाते. त्यावर तांदळाचा चौक करून त्यावर मध्यभागी कलश ठेवला जातो. विड्याची पाने, सुपारी, हळकुंड, खारीक इत्यादी पूजासाहित्य पाटावर मांडतात. पाटाच्या चारही कोपर्‍यांलगत झापाच्या आकारात कडब्याची ताटे किंवा उसाच्या कांडया बांधल्या जातात. त्या ताटांना कडकण्यांची माळ अडकवली जाते आणि दिवट्या पेटवून गोंधळाला सुरुवात केली जाते. (महाराष्टा्‌तील प्रत्येक भागात, किंबहुना प्रत्येक कुटुंबात (कुळात) याबाबतचा पद्धती, रचना, साहित्य यांमध्ये फरक आढळतो.)
गण : गोंधळाची सुरुवात गणाने होते. कोणत्याही शुभकार्याप्रमाणे गोंधळातल्या गणातही गणेशाला नमन केले जाते. अनेक पारंपरिक गणांसोबत संत तुकोबांनी लिहिलेला पुढील गण बहुतांश वेळा गायला जातो.

गणराया लौकर यावे, भेट सकळाला द्यावे।।धृ।।
आले गणपती नाचत, पायी घागर्‍या वाजत।।१।।
अंगी शेंदुराची उटी, केशर कस्तुरी लल्लाटी।।२।।
सोंड फिरवीतो गोमटी, नामलगावचा गणपती।।३।।
तुका म्हणे शोधुनी पाहे, विठ्ठल-गणपती दुजा नाही।।४।।

आवातणं : गण झाल्यानंतर तेहतीस कोटी देवांना गोंधळासाठी आवातणं (म्हणजे आमंत्रण) दिलं जातं. पारंपरिक आवातण्यांमध्ये पृथ्वी, आकाश, पाताळ येथील सर्व देवतांना गोंधळाच्या ठिकाणी येऊन भाविकांना आशीर्वाद देण्याची विनंती केली जाते.


‘‘आई अंबाबाईच्या नावानं... उदो उदो
मायेचा निजरूप आईचा गोंधुळ मांडला
उदे उदे ग अंबाबाई गोंधळा ये
मोरेश्र्वर गणा... गोंधळा ये
सातारची मंगळाई ... गोंधळा ये’’

असे सर्व देवतांना आमंत्रण दिले जाते व शेवटी,‘ राहिले साहिले गोंधळा यावे’ म्हणून हा आवातण्याचा कार्यक‘म आटोपता घेतला जातो. या आवातण्यानंतर देवीला वंदन केले जाते, तिची स्तुती केली जाते व त्यानंतर सुरू होतो कथांचा वर्षाव. प्रबोधन करणार्‍या कथा, देवीच्या माहात्म्याच्या कथा, मध्ये मध्ये उत्स्फूर्त काव्य. त्याला वैशिष्ट्यपूर्ण चालीत बसवून संबळ, तुणतुणं आणि झांजेच्या तालावर सादर करणं. अशा कथा-काव्य-संगीताच्या गोंधळाने ऐकणारा दंग होऊन जातो.

गार डोंगराची हवा अन्
बाईला सोसना गारवा।।
कुंकु, नारळ घेऊनी हाती
या अंबाबाईला विनवू किती...

अशी गोंधळगीते समाजात लोकप्रिय झाली आहेत. तर अलीकडे मागणी तसा पुरवठा या तत्त्वानुसार काही नवीन विनोदी गीतांचा भरणाही गोंधळात होऊ लागला आहे.

काय करू मी आता बाई, माझ्या नशिबाला
मला मिळाला नवरा मेला, नुसता म्हसोबा
किंवा
वाट लावलीया माझ्या संसाराची,
वढ माहेराची हीला वढ माहेराची
अशा गीतांनी हास्यक‘ोळ उडवला जातो.

सासू कशी असावी, सूनेनं कसं असावं, सासर्‍याला मान द्यावा, संसारासाठी तन-मन-धन अर्पावं अशी शिकवण देणार्‍या गीतांच्या व कथांच्या माध्यमातून गोंधळी दैनंदिन जीवनाचा, समाजाचा डोलारा सावरण्याचा प्रयत्न करतात. शिक्षित-अशिक्षित, गरीब-श्रीमंत सर्वांना समान मानून प्रत्येक घरात जाऊन प्रबोधनाचं, लोकशिक्षणाचं कार्य करणारे गोंधळी बहुश्रुततेतून, पारंपरिक ज्ञानातून आणि समाजाच सूक्ष्म निरीक्षण करून स्वत:ला ज्ञानदानासाठी पात्र बनवितात. इतर कोणत्याही माध्यमाचा विचार करता ग्रामीण किंवा शहरी भागातही गोंधळ हे माध्यम व्यापक व प्रभावी वाटते. बहुतांश समाजांमध्ये हा कुळाचार असल्याने त्याची व्यापकता मोठी आहे. मोजक्या लोकांसमोर प्रभावीपणे सादर केला जात असल्याने गोंधळाच्या वाट्याला मोठा प्रेक्षकसमूह क्‍वचितच येतो. विवाहसंस्था ही समाजजीवनातील एक अत्यंत महत्त्वाची संस्था आहे. सामाजिक नीती व शांतता या संस्थेवर आधारित आहे. अशा संस्थेला योग्य वळण देण्याचं, अनुभवातून आलेल्या ज्ञानाच्या आधारे भविष्यातल्या संकटांच्या जागा दाखविण्याचं काम करणारी गोंधळ ही परंपरा म्हणूनच गरजेची व महत्त्वाची आहे.



४. पोतराज

आलीया मरिबाई,
तिचा कळेना अनुभऊ
भल्या-भल्यांचा घेती जीवू,
आलीया मरिबाई.

वर्षभरात एकदातरी ढोलक्याचा तालबद्ध आवाज, त्यावर वाजणारी घुंगरं आणि आसुडाचे कडाडणारे फटके कानावर पडतातच. हा थोडासा उग‘, भयावह वाटणारा गोंधळ कानी आला की, गावातल्या आयाबाया हातात धान्याचं सूप किंवा खण-नारळ घेऊन लगबगीनं बाहेर येतात. मरिआईचं देणं चुकवलं की, भयंकर परिणामांना सामोरं जावं लागतं ही धारणा आजही तितकीच पक्की आहे. त्यामुळं पोतराज गावात आला की, महिला वर्ग न चुकता हळदी कुंकू वाहायला मरिआईच्या गाड्याभोवती जमा होतात. लहान मुलांना आजारातून बरं करण्यासाठी, जनावरांच्या रक्षणासाठी, घरात शांतता नांदण्यासाठी मरिआईला नवस बोलला जातो. ग्रामीण भागातल्या महिलांची या देवीवर गाढ श्रद्धा आहे. तिच्या सेवेत कमी पडल्यास, तिच्या देण्यात कसूर झाल्यास ती भक्ताला जीवघेणी शिक्षा देते, जीव घेण्यासही कमी करत नाही. एवढी ती कडक आहे असे मानले जाते. म्हणूनच तिला कडकलक्ष्मी असे संबोधले जाते. ती आपल्या भक्तांना नेहमी सुखात ठेवते, पण त्यासाठी पाळावयाची पथ्ये इतर देवी-देवतांच्या पथ्यांपेक्षा कडक आहेत.

मरिआई, कडकलक्ष्मी किंवा मरिबाई जेवढी कडक, उग्र आहे, तेवढाच तिचा भक्त पोतराजही कडक व उग‘ वाटतो. लांब वाढलेले, जटा झालेले केस, कपाळाला मळवट, चेहरा व त्वचा रापलेली, कमरेला विविध रंगांच्या कापडांचं बनविलेलं नेसणं (कमरेचं वस्त्र), त्यावर बांधलेली मोठ्या आकाराची घुंगरं, पायात चाळ आणि हातात आसूड असा त्याचा वेष असतो. त्याच्यासोबत असणारी बाई डोक्यावर मरिआईचा गाडा घेऊन हाताने ढोलकं वाजवीत असते. ढोलक्याच्या एका बाजूने विशिष्ट प्रकारचा, सलग ध्वनी निर्माण करत दुसर्‍या बाजूला ठेका वाजवला जातो. तो वैशिष्ट्यपूर्ण ध्वनी मनात वेगळंच, गूढ वातावरण तयार करतो. या तालावर नाचणारा पोतराज पायातल्या घुंगरांनी वातावरण भारून टाकतो आणि हातातल्या आसुडाने स्वत:वर फटक्यांचा वर्षाव करून मरिआईच्या कडक स्वभावाला साजेसा भक्तीचा आविष्कार दाखवत राहतो. खिळ्याने स्वत:ला जखमी करून घेणे, स्वत:चे मनगट जोरात चावणे असे आत्मक्लेश तो मरिआईच्या कृपेने सहज करतो अशी धारणा आहे.

मरिआई त्याच्या अंगात आल्यानंतर ती भक्तांच्या अडीअडचणींवर उपाय सांगते. एकेक बाई पुढं येऊन आजारी पडणार्‍या जनावरापासून ते लग्नापर्यंत सर्व प्रकारच्या शंका देवीला सांगते. त्यावर देवी उपाय सांगते व हे काम झाल्यास पुढच्या वेळी मी खणा-नारळाने ओटी भरीन असा नवस बोलते. तो नवस फेडण्यासाठी किंवा देवीला तक्रार सांगण्यासाठी पुढच्या वर्षापर्यंत पोतराजाची वाट पाहत राहते. एकूणच पोतराज ही न संपणारी व सातत्याने चालत राहणारी सामाजिक कि‘या बनली आहे. मरिआईच्या गाड्यासमोर बोललेला नवस सहसा मंदिरात जाऊन फेडला जात नाही. त्यासाठी वर्षभर थांबून पोतराज येण्याचीच वाट पाहिली जाते. मरिआई देवी कुटुंबाच्या कल्याणासाठी, रक्षणासाठी सदैव जागृत असणार्‍या भाबड्या गृहिणींची ‘कल्याणकर्ती’ आहे आणि पोतराज देवी आणि भक्त या दोघांमधला दुवा आहे. ‘दार उघड बया दार उघड’ म्हणत तो मरिआईला भक्ताच्या भेटीला घेऊन येतो. मरिआई ही मूळची दक्षिणेची; द्रविडांच्या ग्रामदेवींपैकी एक आहे. दक्षिणेत तिला मरिअम्मा या नावाने संबोधले जाते. महाराष्ट्रात तिचे मंदिर गाववेशीवर असते.

पोतराज या मराठी शब्दाचा मूळ द्रविड शब्द ‘पोत्तुराजु’ असा आहे. ‘पोत्तु’ म्हणजे रेडा किंवा बकरा. दक्षिणेत अशा प्राण्यांचा बळी देवीला प्रसन्न करण्यासाठी दिला जात असे. असा बळी देण्याचे काम करणारा जो, तो पोत्तुराजु म्हणजेच मराठीत पोतराज होय.

एकूणच पोतराज ही परंपरा पूर्णत: दैवी शक्तीच्या भीतीतून निर्माण झाली आहे व ती भीती आजही इतकी खोलवर आहे की, ही परंपरा शतकानुशतके कमी प्रमाणात का होईना पण अशीच सुरू राहील, असे मत अभ्यासक व्यक्त करतात. ग्रामीण भागातील लोकांच्या श्रद्धेला आधार देणारा हा पोतराज आता विरळ होत चालला आहे. पहिल्यासारखा तो भयावह प्रकार करत नाही. लोकांनाही आता तेवढी भीती वाटत नाही.

पण किती ठरवलं, तरी त्याच्या आसुडाचा आवाज अंगावर शहारे आणतोच आणतो. वृद्ध स्त्रियांची लगबग पाहिली की, मरिआईचा महिमा किंवा दहशत आणि पोतराजाचा प्रभाव या दोन्हींचा अंदाज येतो. डोक्यावर गाडा आणि गळ्यात ढोलकं घेऊन पोटासाठी मूठ-पसा मागणार्‍या त्या मरिआईच्या भक्तमाऊलीला व पोतराजाला मरिआई सौ‘य, समाधान आणि निरोगी जीवन देवो, ही प्रार्थना!




५. भुत्या

भवानी, मी तुझा भुत्या खरा।।धृ।।
अनुहात -चौंडके वाजत डुगडुग।
होतो घोष बरा।।१।।
बोधाची परडी, ज्ञानाचा संबळ।
अज्ञान तो पोत खरा।।२।।
एका जनार्दनी भुत्या मी जालों।
तुझे पायी मी खरा।।३।।

संत एकनाथांच्या या अभंगातून भुत्याची श्री जगदंबेवरची श्रद्धा किती गाढ आहे हे दिसून येते. भुत्यासाठी रेणुका माता आणि भवानी माता एकच आहे. या दोन्ही देवीत तो कोणताही भेद मानत नाही.

अंगात झगा, पायात विजार, डोक्यावर कवड्या गुंफलेली टोपी, गळ्यात कवड्यांची माळ आणि कमरेला कवड्यांचा पट्टा घातलेल्या भुत्याच्या एका हातात चिंध्यांनी बनविलेला मोठा पोत आणि दुसर्‍या हातात तुणतुणे असते. डाव्या खांद्यावरून बुधळी लोंबत असते, तर उजव्या खांद्याला झोळी असते. गळ्यात देवीचा टाक असतो. अनवाणी, मळकट कपड्यातला, कवड्यांनी सजलेला भुत्या मुखाने सदैव देवीच्या आरत्या, गीतं गात असतो, तर कधी आग‘ह केल्यास तो कथाही सांगतो.
घटस्थापनेच्या (नवरात्राच्या) कालावधीत हे भुत्ये गावोगाव फिरून देवीचा महिमा गातात. लोक या उपासकाच्या पोतावर तेल टाकतात आणि घटात टाकलेली दक्षिणाही त्याला देतात. हे भुत्ये सहसा मराठा किंवा ब्राह्मण जातीतील असतात. भुत्या होण्यासाठी एक विशिष्ट प्रकारचा विधी पार पाडावा लागतो. हा विधी भोपे पार पाडतात. या देवीभक्तांमध्ये भुत्या म्हणजे सेवक आणि भोपे म्हणजे राजे होत.

भुत्या होण्याच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. अखंड ब‘ह्मचारी राहून भुत्या होता येते आणि फक्त ठरावीक दिवशी जोगवा मागणारा व इतर दिवशी सर्वसामान्य जीवन जगणारा भुत्याही होता येते. बहुतांश लोक स्वखुशीने भुत्या होतात. स्वत: छत्रपती शिवाजी महाराज स्वत:ला देवीचा भक्त व सेवक समजत व कवड्यांची माळ धारण करीत असंत, असे उल्लेख इतिहासात आढळतात. भुत्याच्या या संपन्न परंपरेने मराठी साम्राज्यावर अनंत उपकार केले आहेत. शिवरायांच्या सैन्यातील हेरांनी भुत्याचा वेष घेऊन हेरगिरी केली आणि स्वराज्यस्थापनेत मोलाचा वाटा उचलला.
असा सामाजिक, आध्यात्मिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही भुत्या आदर्श आहे. भविष्यकाळात महाराष्ट्राच्या कुलदेवीचा हा भक्त तुणतुण्याच्या तालावर अंबेचे गोडवे गात राहायला हवा व प्रबोधनपर कथा-गीतांनी लोकजीवनाची गंगा अधिकाधिक पवित्र व्हायलाच हवी. ही संपूर्ण महाराष्ट्राची जबाबदारी आहे.



६. भराडी

कर्म वाईऽऽट,
वैतागी बांधला मठ

अशी डमरूच्या तालावर प्रबोधनाची वाणी फुलून येताना ज्यांनी सातत्याने पाहिली असेल, त्यांना भराडातल्या मार्मिकतेची जाणीव नक्कीच झाली असेल. ग्रामीण जीवनातील अनेक प्रश्नांना आपल्या गीतांमधून वाचा फोडणारा हा लोककलाकार आज खूपच विरळ झालेला आहे. आजच्या पिढीतल्या, विशेषत: ग्रामीण भागातील लोकांनाही भराडी कितपत माहिती आहे याबद्दल साशंकता आहे. एखादा कोणी पाल्हाळीक बोलत असेल तर म्हातारी माणसं ‘बंद कर तुझं भराड’ असं म्हणतात. त्यावरून भराड म्हणजे पाल्हाळ एवढाच अर्थ मनात येतो. पण ‘भराड’ हाही एक लोककलेचा प्रकार आहे, ही माहिती खूप कमी जणांना आहे. वासुदेव, पिंगळा, पोतराज, भुत्या, लावणी, शाहिरी, कीर्तन या कला आजही थोड्याबहूत फरकाने अधूनमधून का होईना पाहायला मिळतात. पण भराड ऐकायला मिळणे आजच्या घडीला किमान पश्चिम महाराष्ट्रात तरी दूरापास्तच आहे.

भैरवोपासक : भराडी हे श्री भैरवनाथाचे उपासक आहेत. नाथपंथाची दीक्षा घेऊन ते भैरवनाथाचे गुणगान करत भराड सांगत फिरतात. पूर्वी ते धोतरावरून नेसले जाणारे काचे बनवून उदरनिर्वाह करत. भराड्यांना डबरे गोसावी असेही संबोधले जाते.

वयाच्या दहाव्या ते बाराव्या वर्षी या समाजातील मुलांना दीक्षा दिली जाते. नाथपंथाची ही दीक्षा देण्याचा विशिष्ट विधी असतो. तो पूर्ण करण्यासाठी भराड्यांच्या साडेतीन गाद्यांपैकी कोणत्याही एका गादीचे गुरू किंवा समाजातील श्रेष्ठ व्यक्ती येते. या विधीला मुद्रा घालण्याचा विधी असेही म्हणतात. या वेळी विविध मंत्र म्हणून हा विधी पार पाडला जातो.


कंचन काया कफनी लाया,
निर्गुण सगुण चिरा दिया,
उन्मनि मुद्रा कान धराया,
शैली शृंगी सत्यजोगका माया,
ॐ नमो गुरुको आदेश आदेश आदेश।।


असे मंत्र म्हणून नंतर मुलाच्या कानात बाली घातली जाते.
भैरवनाथाची उपासना करणार्‍या या समाजाच्या धार्मिक व सामाजिक जाणिवेचा आढावा घेतल्यास आपल्या भराडांमधून त्यानी मांडलेले मार्मिक प्रश्न आपल्याला अंतर्मुख करून जातात. शेतकर्‍यांची दयनीय अवस्था कथन करण्यासाठी ते शंकर-पार्वती या दोघांमधल्या संवादाचा आधार घेतात.


शंकरासी पुसे पार्वती, कुणबी भुमिचा अधिकारी,
असे असता का हो शंकरा, सदा गरीबी कुणब्याच्या घरी?

हा प्रश्र्न खरंतर महाराष्ट्रातल्या कृषी जीवनाशी निगडीत असलेल्या प्रत्येकाला पडला आहे. पण याचं उत्तर देताना भराडी लोकसेवा, दानधर्माचा विसर या गोष्टींना कारणीभूत ठरवतो. त्याच्या कथा-गीतांत तो पुढे शंकर-पार्वतीला शेतकर्‍याकडे घेऊन जातो. भिकार्‍याच्या वेशात जाऊन शंकर शेतकर्‍याला दान मागतो, तर शेतकरी त्याचा अपमान करतो, त्याला बांधून ठेवतो. हे पाहून रागावलेली पार्वती शेतकर्‍याला शाप देते.


‘अस्सल माल दे जा उदम्याला
तू खा कोंडा मातेरं,
पार्वती म्हणे ऐक कुणब्या
दानधर्म हातानं कर रं’

असे अनेक मार्मिक प्रश्न मांडत भराड रंगत जाते. नवरात्राच्या काळात भैरवनाथाच्या मंदिरात नऊ दिवस हे भराड चालते. भराड्यांनी पूज्य मानलेल्या साडेतीन गाद्यांच्या ठिकाणी - म्हणजे काशी, सोनारी, रत्नागिरी आणि अर्धी गादी असलेल्या पारुंडे या ठिकाणी- भैरवनाथाच्या उत्सवात भराड ऐकण्याची पर्वणी असते.

भराड्यांनी तमाशा या लोककलेतही आपला ठसा उमटविलेला आहे. त्यांचे स्वत:चे तमाशाचे फडही आहेत. अशा इतर कामांसोबत विष उतरविण्याचे कामही ते करतात. साप चावलेल्या माणसाला श्री भैरवनाथाच्या मंदिरात आणून भराडी एक कथा सांगतो. ही कथा जसजशी संपते, तसे विष उतरत जाते अशी समजूत आहे.

भराडाची रचना गोंधळाप्रमाणेच असते. प्रथम गण, देवतांना आवाहन, त्यानंतर भैरवनाथाची स्तुती, कथा व शेवटी आरती करून भराडाची सांगता होते.

समाजजीवनाचे पावित्र्य जपण्यासाठी व आध्यात्मिक उन्नतीसाठी, लोकांच्या दोषांवर अचूक बोट ठेवण्याची कला या लोककलावंतानी जपली त्यामुळेच ग्रामीण भागात नीतीमूल्यांची इमारत अजूनही खंबीर आहे. भैरवनाथाची कृपा त्याच्यावर आहे याबद्दल तो निश्र्चिंत आहे. देवाविषयी सांगताना तो म्हणतो - ‘देव बहिरी , भक्तांचा कैवारी’
बहिरी ससाण्याप्रमाणे देवाची भक्तांवर व खुद्द भराड्यांवर नजर आहे. त्याच्या प्रत्येक गाण्यानंतर त्याला प्रोत्साहन देण्यासाठी, त्याला वंदन करण्यासाठी आपणही म्हणू या - ‘भैरवनाथाच्या नावान ऽऽऽ चांगभलं’’.


७. वाघ्या- मुरळी
महाराष्ट्राच्या आदर्श परंपरेत भर घालणार्‍या अनेक लोककला जनजीवनाचा अविभाज्य भाग बनलेल्या आहेत. पण या कलांमध्ये जेव्हा अंधश्रद्धेतून मानवी जीवनावर होणारा अन्याय डोकावतो, तेव्हा भारावून सोडणार्‍या काही कलांच्या मुळाशी असणारा अन्यायकारक विचार मनाला टोचू लागतो. ‘वाघ्या-मुरळी’ हे लोककलावंत मनात असेच प्रश्नांचा डोंगर उभा करतात.

वाघ्या आणि मुरळी ही जोडी खंडोबाची उपासना करण्यासाठी आयुष्य वेचते. नवलाख पायरीच्या वर असणार्‍या या जेजुरीच्या खंडोबाचं गुणगान गावोगावी घरोघरी भक्तिभावानं केलं जातं आणि याच भक्तीचा एक भाग म्हणून वाघ्या-मुरळीला बोलावून देवाचं जागरण घातलं जातं. महाराष्ट्रातल्या जवळजवळ सर्वच खेड्यांमध्ये हा कुळाचार पाळला जातो.

वाघ्या मुरळीचा जन्म -
लग्नानंतर लवकर अपत्य होत नसल्यास आई-वडील खंडोबाला अशी प्रार्थना करतात की, आम्हाला मूल झाल्यास पहिलं मूल आम्ही तुझ्या भक्तीसाठी अर्पण करू. हा नवस बोलून जर त्यांना मूल झालं, तर ते पहिलं मूल ते विधिवत देवाला सोडतात. (वास्तविक नवसाने मूल होत नाही आणि काही कारणानं मूल झालं, तरी आपल्या वांझपणाचा कलंक पुसण्यासाठी कोवळ्या जीवाच्या जीवनाशी खेळण्याचा अधिकार कोणालाही नाही.)

देवाला सोडलेला मुलगा वाघ्या होतो आणि मुलगी मुरळी होते.

वाघ्या किंवा मुरळी सोडण्याचा एक ठरावीक विधी असतो. नवस बोलणारे आई-वडील चैत्र महिन्यात नवस पूर्ण करण्याचा मनोदय विशिष्ट अशा देवस्थानाच्या गुरवाला (पुजार्‍याला) कळवतात. त्यानंतर एक तारीख व वेळ नक्की केली जाते, त्या दिवशी मुलाला / मुलीला वाजत-गाजत देवळात आणले जाते. खंडोबाच्या साक्षीने मुलाच्या गळ्यात वाघाच्या कातड्याची भंडार्‍याची पिशवी अडकविली जाते व देवाला त्या मुलाचा स्वीकार करण्यासाठी साकडं घातलं जातं. देव त्या मुलाचा स्वीकार करतो हे गुरवालाच कळते व त्यानंतर ते मूल आयुष्यभरासाठी खंडोबाच्या मालकीचं होतं. पण, दुर्दैवाने वास्तवात खंडोबाच्या या भक्तांवर धनदांडग्यांचीच मालकी राहते.

खांद्यावर घोंगडं, गळ्यात वाघाच्या कातड्याची पिशवी आणि हातात घंट्यांची जोडी म्हणजेच घोळ असलेला वाघ्या रुबाबदार वाटतो. तर नऊवारी नेसून खंडोबाच्या नावाचा भंडारा कपाळावर लावणार्‍या मुरळीची चपळाई कार्यक‘मात रंगत भरते. वाघ्या-मुरळीची जागरणं शुभकार्यानंतर घरोघरी आयोजित केली जातात. हे कार्यक‘म अगदी गोंधळासारखेच असतात. गोंधळात स्त्रिया नसतात आणि इथे मुरळी (स्त्री) असते हा एक महत्त्वाचा फरक आहे.

वाघ्यांचे दोन प्रकार आहेत एक घरवाघ्या आणि दुसरा दारवाघ्या. घरवाघ्या म्हणजे खंडोबाचा नवस फेडण्यासाठी काही ठरावीक दिवशी वाघ्याचा वेश धारण करून पाच घरी जाऊन वारी मागणारे, आणि दारवाघ्या म्हणजे कायमस्वरूपी वाघ्या होण्याची दीक्षा घेतलेले.

‘वाघ्या’ या पात्राविषयी आणि त्याच्या नावाविषयी अभ्यासकांमध्ये बरीच मतमतांतरे आहेत.
मुरळी तर प्रथमपासूनच टीकेचं लक्ष झाली आहे. अगदी संत एकनाथांनीही -
‘इच्छामुरळीस पाहूं नका, पडाल नरकद्वारी।।’

असा उपदेश केला आहे. म्हणजेच मुरळी हे मायाजालाचं प्रतीक म्हणून संबोधली गेली आहे.
संत शेख महंमद बाबा तर कोणताही आडपडदा न ठेवता पुढील काव्यातून आपले मत व्यक्त करतात.

‘पुण्य आचरण न ये मुरळीच्या चित्ता। भलत्याच्या होतील कांता।
त्यांचा हात भाळास लावितां। कोण तरला सांग बा।।’

मुळात मुरळी हे पात्रच असं आहे. तिच्या भक्तीची जातकुळी आणि तिचं देवाशी असणारं नातंच असं आहे की ऐकणार्‍याला व बघणार्‍याला ते विचित्र वाटावं. तिच्या भक्तीतली ओढ आणि तिची भूमिका मांडणारं हे गीत तिला अधिक स्पष्ट करतं -

वय सोळा, कोवळी काया, हूडपणात घुंगरु पाया,
लागे नाचाया, लागे नाचाया, लागे नाचाया,
पोर बावरी झाली पहा, जेजुरीला जाया।।
नव्या नव्या वार्‍याने, हिचे भारावले अंग,
या अशा वयांतच बदलू पाहे ढंग,
उतावीळ मल्हारीसंगे लगीन लावाया।।

एकूणच थोडीशी वेगळ्या धाटणीची वाटणारी ही भक्ती महाराष्ट्राच्या लोकजीवनातील चैतन्य होऊन राहिली आहे. हे चैतन्य काही अन्यायी विचारांच्या पायावर उभे आहे हे दुर्दैव! पण त्यातही सुधारणा होते आहे. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी प्रामुख्याने मुरळींबाबतच्या समस्या प्रथम समाजासमोर मांडल्या. सरकारने मुरळी होण्यावर बंदी घातली आहे. तुणतुणं, खंजिरी आणि घोळाच्या तालावर

मुख दाऊन बानू गेली ।
स्वारी देवाची ग वेडी झाली जी ।।


हा खंडोबाचा जागर ऐकत, कलेच्या निकोप दृष्टीने आपण ‘यळकोट यळकोट जय मल्हार’ म्हणत वाघ्या-मुरळीच्या गीतांना साद नक्कीच देऊ शकतो.


८. शाहिरी

तुणतुण्याला ताण देऊन डफावर थाप पडली की मराठी मन शहारून उठतं. नसानसातून शूरत्वाचा वारसा सळसळू लागतो. देदिप्यमान इतिहासाबद्दल अनन्यसाधारण अभिमान बाळगणारे मराठी मन पोवाड्यांमधील पराक‘मांच्या वर्णनाने भारावून जाते. शाहिरी ही संकल्पना जरी अन्य भााषेतून घेतली गेली असली, तरी तिचा गाभा मात्र मराठीपणाने रसरसलेला आहे. ही कला पूर्णत्वाने महाराष्ट्राच्या जीवनाशी एकरूप झालेली आहे. तिच्या अंतरंगातून महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांचा इतिहास उलगडत जातो. वीरांच्या गाथा मांडताना शाहिरांचा डफ जसा कडाडून उठतो, तसाच तो पळपुट्यांवर तुच्छतेनं हसतो देखील. पण त्याचं हसण किंवा त्याचं कडाडणं हे सर्वस्वी अवलंबून आहे ते मराठी माणसाच्या भावनांवर. मराठी मन जसा विचार करत असेल, तसाच पोवाडा बोलत राहतो.

संशोधकांना सापडलेला सर्वात जुना पोवाडा आहे अगिनदास ऊर्फ अज्ञानदास याने अफजलखान वध या प्रसंगावर लिहिलेला. यापेक्षा जुना पोवाडा सापडला नसल्याचे ज्येष्ठ अभ्यासक श्री. म. वर्दे यांनी नमूद केले आहे. शाहिरांमध्येही दोन संप्रदाय आहेत, पैकी एक कलगी व दुसरा तुर्रा. या दोन्ही संप्रदायांमध्ये जेव्हा सवाल -जबाबाचे फड रंगतात, तेव्हा यांच्यातील चुरस खर्‍या अर्थाने लक्षात येते. सर्वच शाहीर बावन्न वीरांना आवाहन करतात. प्रतिस्पर्ध्याला चीतपट करण्यासाठी वीरांना आवाहन करताना ते म्हणतात.


महावीरपर टोला मरीका, आया हुंदाडा भैरवका ।
नरसिंग झोटिंग अलग उडाऊ, पता लगेना शाहिरका।।
बावन वीर की गर्दन चाबू, तुटा कलीजा बजरंगका।।


वीराला आवाहन करून प्रतिपक्षाच्या शाहिराला चीतपट करण्याचा प्रयत्न शाहीर करत असतो. वीर किंवा बीर म्हणजेच यक्ष होय. अवघड प्रश्न विचारणारा, ज्ञानाने परिपूर्ण असणारा हा यक्ष प्रतिस्पर्ध्याची भंबेरी उडवून टाकतो अशी धारणा आहे.

काही अभ्यासकांच्या मते यादवकालीन राजा रामदेवरायाच्या पूर्वीपासून पोवाड्यांची किंवा शाहिरीची परंपरा आहे. पण मराठी शाहिरीचा इतिहास शिवकालापासूनच अधिक ठळकपणे जाणवू लागतो. शाहिरी किंवा पोवाडे ही कला तशी वीररसाने ओतप्रोत असणारी, पण समाजमनाच्या बदलानुसार ती बदलत गेली व तिने पराक‘मासोबतच सौंदर्याच्या वर्णनातही आपली कल्पकता व ताकद सिद्ध केली. पण, हे सर्व घडत असताना एखादी कला समृद्ध होण्यासाठी जे सामाजिक, सांस्कृतिक व राजकीय वातावरण भोवताली असणे आवश्यक असते, ते वातावरण मराठी शाहिरीच्या नशीबी नव्हते. त्यामुळे प्रगती आणि अधोगतीचा खेळ खेळत, पडत-उठत मराठी शाहिरी वाढत राहिली असे म्हणण्याची पाळी येते.

ग्रंथराज ज्ञानेश्र्वरीच्या रचनेनंतर व संत ज्ञानेश्र्वरांच्या संजीवन समाधीनंतर अवघ्या वीस वर्षांत मुघल आक्रमकांनी अवघा मराठी मुलूख काबीज केला आणि एकूणच मराठी साहित्याला उतरती कळा लागली. अधोगतीला निघालेला हा मराठी साहित्य प्रवाह काही संतांनी आपापल्या परीने वाचविण्याचा प्रयत्न केला, पण शाहिरीचा मागमूस मात्र या काळात फारसा लागत नाही. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. मराठी मनात एक आशेचा किरण निर्माण झाला. तेव्हापासून पुन्हा शाहिरांच्या वाणीला उधाण आले आणि त्यांनी मराठी प्रांताला, मावळ्यांना स्वराज्यासाठी शीर तळहातावर घेऊन लढण्याची प्रेरणा दिली. मराठ्यांच्या इतिहासाचा अभ्यास करणार्‍या अनेक संशोधकांना आज इतर कोणत्याही साधनापेक्षा पोवाडे आधिक विश्वासार्ह वाटू लागले आहेत ते यामुळेच. कारण पोवाडे हे मराठी मनाच्या चढउतारानुसार सहजपणे उमटलेले हुंकार आहेत. शिवरायांच्या पराक‘माने अवघी मराठी माती पावन झाली आणि स्वाभिमानाने भरून आलेल्या हिंदवी स्वराज्याचा उर पोवाड्यांनी उत्तेजीत होऊ लागला. स्वातंत्र्याच्या संग‘ामात जीवनाची आहुती देण्याचा विचार आणि धाडस अठरापगड जातींच्या मनात निर्माण करण्याचं महान कार्य पोवाड्यांनी (ते रचणार्‍या शाहिरांनी) केलं.

शिवरायांच्या अंतानंतर पुन्हा मराठी शाहिरीला उतरती कळा लागली ती अगदी छत्रपती शाहूंच्या राजवटीपर्यंत. छत्रपती शाहूंच्या राजवटीत शाहिरांना राजाश्रय मिळाला आणि पुन्हा डफ गर्जू लागले.

शाहू छत्रपतींच्या उत्तर काळात म्हणजे पहिल्या बाजीरावाच्या निधनानंतर पराक‘माचे पोवाडे बाजूला पडले आणि रंगेलपणाचा जोर वाढू लागला. पराक्रमापेक्षा शृंगाराला उधाण आले. प्रथम पोवाड्यात लावण्यांचा शिरकाव झाल्यानंतर त्याचा स्वीकार झाला नाही. पण नंतरच्या काळात पोवाड्याचे स्वरूप व उद्देशच बदलून गेला. एकूणच स्त्री-पुरुष संबंध, सौंदर्य, रंगबाजी अशा गोष्टींना लावण्यांनी पूज्यस्थानी नेऊन ठेवले. पेशवेकाळातील स्थैर्याचा हा विपरीत परिणाम समाजावर व समाजाचा पोवाड्यांवर झाला.

पेशवेकाळात घडलेली सर्वात दुर्दैवी गोष्ट म्हणजे या काळातल्या शाहिरांना शिवशाहीचा पूर्णत: विसर पडला. या गोष्टीवर अनेक अभ्यासकांनी आक्षेप घेतले. खरेतर बलिदानाचे पोवाडे गाऊन आजच्या पिढीला भवितव्यासाठी बलिदानाची शिकवण देणारे शाहीर! पण पुढील काळात शाहिरी काहीशी बेभान झाली ही गोष्ट खेदजनक आहे. आज जे काही पोवाडे सापडतात, ते बहुतांशी पेशवेकाळातीलच आहेत.

एकूणच, चढउतार करत आजपर्यंत शाहिरीने आपला प्रभाव आणि डौल राखण्यात यश मिळवलं आहे. पण आजकाल पोवाड्यांची चक्की मात्र खूपच कमी दिसते. गावा-गावातून आता दरवर्षी पोवाडे होत नाहीत.

तमाशा, ऑर्केस्ट्राशी तुलना केली तर निव्वळ महाराष्ट्राची भाषा बोलणारी ही मराठमोळी, रांगडी कला किती दुर्लक्षित होते आहे हे लक्षात येते.

रामजोशी, अनंत फंदी, होनाजी बाळा, प्रभाकर, परशराम, सगनभाऊ आणि इतर शाहिरांनी पोवाडे आणि लावण्यांच्या माध्यमातून शृंगारासोबत प्रबोधनही केले. शाहिरीला अध्यात्माचं वेड कमी आहे, पण प्रपंचाची ओढ मात्र सुरुवातीपासून आहे.

‘स्वरूपाची होईल माती। घडी ही लाखाची जाती।'
अशा ओळींमधून `आहे तो क्षण सत्कारणी लावण्याचा सल्ला' शाहीर देतो, तर शृंगार सांगताना वाह्यातपणा घडू नये म्हणून असा सावधानपणाचा सल्लाही शाहीर देतो. पेशवेकाळाचं वर्णन करताना
‘‘ब्राह्मणी राज्य जोरदार घोड्यावर स्वार होते शिपाई।
जबर सद्दी कैकांनी पाहिली शत्रु ठेविले नाही।।’’

अशा भाषेत ब्राह्मणी कलेची महती सांगतात.

इतिहासाचा मागोवा, पराक्रमाचा जयजयकार आणि प्रबोधनातून शूर जन्माला घालणारी ही कला येत्या पिढीला घडविण्याच्या कामी येऊ शकते व त्यासाठी तिचे संगोपन व संवर्धन करणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.



९. भारूड :
महाराष्ट्रातील लोककलांमध्ये ज्या लोककला आजही अखंडपणे व तेवढ्याच ताकदीने उभ्या आहेत, त्यापैकी भारूड ही एक महत्त्वाची कला. ग्रामीण महाराष्ट्रात तमाशाखालोखाल या कलेचे आकर्षण आहे. वार्षिक ज्ञानेश्र्वरी पारायण, तुकाराम गाथा पारायण, यात्रा किंवा इतर उत्सवांमध्ये भारूडाचे स्वतंत्रपणे आयोजन केले जाते.

लोकमानस जिंकण्याची ताकद असणारी ही कला जेवढी रंगतदार आहे तेवढीच ती प्रबोधकही आहे, नाट्य, वक्तृत्व आणि संगीताच्या मिलाफातून रंगत जाणारे हे भारूड अध्यात्माच्या प्रसाराचे एक महत्त्वाचे माध्यम आहे. संत एकनाथ हे या वैशिष्ट्यपूर्ण कलेचे जनक होत.

मध्यभागी बसलेला वीणेकरी त्याच्या एका बाजूला मृदंगवादक व दुसर्‍या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो व भोवताली पंधरा-वीस टाळकरी असतात. थोड्या-बहुत फरकाने कीर्तनासारखी भारुडाची बैठक बसते. सुरुवातीला ‘पुंडलिक वरदे हरी विठ्ठऽऽल श्री ज्ञानदेव तुकाराम’ असा गजर होतो आणि ‘विठोबा रखुमाई’ चे भजन सुरू होते. रंगतदार सुरुवातीसाठी बराच वेळ हे भजन उत्साहाने गायले जाते आणि शेवटी रंगात आलेल्या श्रोत्यांना सोबत घेऊन ‘पुंडलिक वरदे’ चा सभामंडप दुमदुमून टाकणारा जयघोष होतो.

उत्साह, लगबग, रंगतदार चाली, संगीत, खुसखुशीत निवेदन या भारुडाच्या जमेच्या बाजू असतात. भजन संपलं की निवेदक (भारूडकार) उभा राहतो आणि आपल्या श्रवणीय शैलीत लोकांच्या डोळ्यासमोर एक चित्र उभे करतो. भारुडाच्या सुरुवातीसाठी त्याला लोकांना-आपण एका गावात घडणारी नित्याची कथा ऐकतो आहोत याची-कल्पना द्यावी लागते. मग या गावाचा दिनक‘म पहाटेपासून सुरू होतो. सडा-रांगोळी होते. पक्षांचा किलबिलाट, गुरांचे हंबरणे आणि अशा तजेलदार वातावरणात जात्यावर ओव्या गाणार्‍या महिला सुरात गाऊ लागतात.

सुंदर माझं जातं ग,
फिरतं बहुत...
ओव्या गाऊ कौतुके तु,
ये रे बा विठ्ठला...

भारुडात मध्ये-मध्ये लोकसंस्कृतीतल्या अशा गीतांची पेरणी केली जाते. यानंतर निवेदकाचे ग‘ामवर्णन सुरू असते. एवढ्यात ‘दान पावलं, दान पावलं’ म्हणत वासुदेवाची स्वारी गाव जागवायला मंचकावर हजर होते. मोरपिसाची टोपी घातलेलं हे त्याचं रूप पाहून पहाट झाल्यासारखं वाटू लागत. अभंगामधून लोकांना रामनाम जपण्याचा उपदेश देऊन तो नाचत-नाचत निघून जातो. तेवढ्यात हातात काठी घेऊन जोशीबुवा हजर होतात. जोशीबुवा लोकांना चार उपदेश करतात आणि निघून जातात. एकामागे एक येणार्‍या या लोककलावंतांचा ठसा श्रोत्यांच्या मनावर उमटत जातो, तशी उत्सुकता वाढत जाते. आता कोण येणार म्हणून लोक इकडे तिकडे पाहू लागतात. एवढ्यात जोरजोरात आरोळ्या ठोकत, तोंडाने भयावह आवाज काढत, हातातल्या असुडाचे फटके अंगावर घेत मरीआईचा भक्त येतो. कडकलक्ष्मीचा तो अवतार पाहून मुलं आईला बिलगतात. सारा श्रोतृवर्ग कुतूहलाने तो रुद्र अवतार पाहू लागतो. ‘दार उघड बये दार उघड’ म्हणत, देवीला प्रश्र्न विचारले जातात. सहसा हे प्रश्र्न विनोदी ढंगाचे असतात, पण त्यातून प्रबोधनही करण्याचा प्रयत्न केला जातो.

अशा प्रकारे एकेक लोककलावंत आपली कला सादर करून जातो. ग्रामजीवनातील एकेक प्रश्न उलगडत जातो. संसारातला वैताग मांडला जातो, तसाच आनंदही मांडला जातो. निखळ लोकरंजन करताना भारूड सादर करणारी मंडळी श्रोत्यांवर असणारी आपली पकड कधीही सैल होऊ देत नाहीत. निवेदनासोबत संगीत आणि नाट्यमय प्रसंगांची पेरणी करत अगदी पहाटेपर्यंत भारूड रंगत जाते. मग त्यात ‘विंचू चावला’, ‘दादल्या नको ग बाई’ अशी रंगतदार भारुडे लोकांना पोटभर हसायला लावतात आणि संसारातली गुपितं उघडी करून जातात. भारूडांमध्ये वरवर पाहिले असता विनोद व मनोरंजन दिसते. पण ही गीते व अनुषंगाने येणार्‍या कथा या ‘रूपकात्मक’ (रूपक अलंकाराने युक्त) असतात. बहुतांश भारूडांमधून भौतिक सुखांचा उपभोग घेत असतानाच, उपभोगांवर मर्यादा ठेवून परमार्थ कसा साधावा, याबाबतचे आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते.

एकूणच भारूड ही लोककला महाराष्ट्राच्या लोकजीवनातली एक समृद्ध, प्रभावी आणि प्रबोधक कला आहे आणि ही कला जोपासण्याचं कार्य अनेक कीर्तनकार, भारूडकार, संशोधक, अभ्यासक व लेखक मोठ्या हिरीरीने करत आहेत. ही आशादायक आणि समाधानकारक बाब आहे.



१०. तमाशा :

तांबड्या फेट्यांचा हलता-डुलता सागर, शिट्ट्यांचा आवाज, हवेत तरंगणारे रुमाल आणि या सार्‍या वातावरणाला आपल्या ठेक्यात बांधून ठेवणारी ढोलकी, ढोलकीच्या तालावर थरथरणारी घुंगरं आणि घुंगरू बांधून नर्तन करणारी कलावंत - ‘या बसा मंचकी राया’ असे म्हणत महाराष्ट्राच्या मनामनातून डोलते आहे.

शेतात राबणार्‍या रांगड्या गड्याचा रंगेलपणा बघावा तो तमाशातच. बेभान होऊन डुलण्याचा असा मोका वर्षाच्या जत्रेशिवाय गावगाड्याला मिळत नाही. म्हणूनच तमाशा आपल्या अढळपदावरून हालत नाही. मराठी मन जसं अध्यात्माला आपल्या जीवनात अढळपद देतं, तसं ते रंगबाजीचे, मनोरंजनाचे दरवाजेही बंद करीत नाही. महाराष्ट्राच्या याच रंगेल मनाला उधाण येतं ते फक्त तमाशा - लावणीच्या फडासमोरच. शतकानुशतके चालत आलेली ही लोककला, लोकपरंपरा आजच्या पिढीलाही मोहविते याचं महत्त्वाचं कारण म्हणजे तमाशाने मराठी मनाची नेमकी गरज ओळखली आणि त्या पद्धतीनं या कलेची रचना केली गेली.

तमाशाचा उगम विधिनाट्यापासून झाला असे अभ्यासकांनी नमूद केले आहे. विधिनाट्य आणि तमाशाच्या रचनेतही साम्य आढळून येते.
विधिनाट्य तमाशा
देवाचा पूजाविधी रंगभूमीची पूजा
गणेश वंदन गण
आवाहन गौळण
देव देवतांचे स्तवन बतावणी
आख्यान वग
आरती मुजरा
विधिनाट्याच्या आणि तमाशाच्या या रचनांवरून दोन्हीमध्ये असणारे साम्य व तमाशाच्या उगमा- विषयीच्या अभ्यासाला पुष्टी मिळते. त्याचबरोबर सातवहनांच्या राजवटीत चालत असणार्‍या रतिनाट्याची रचना तमाशासारखीच वाटते, असेही काही अभ्यासकांनी नमूद केले आहे.

तमाशाची जडणघडण मांडत असताना अभ्यासकांनी महाराष्ट्रातल्या इतर लोककलांमधील एकेक गुण घेऊन तमाशाची बांधणी झाल्याचे मत मांडले आहे. पूर्वीपासून प्रचलित असणार्‍या गोंधळ, मुरकी, शाहीरी अशा लोककलांमधून एकेक वैशिष्ट्य उचलून तमाशा ही एक वेगळीच रंगतदार लोककला जन्माला आली. त्यासाठी शाहिरांनी आपल्या शृंगारिक लावण्या दिल्या, तर मुरकी, कोल्हाटीण अशा लोककलांनी तमाशाचं प्रमुख आकर्षण असणारी ‘नाची’ म्हणजेच नर्तकी तमाशाला दिली. नंदीवाल्याचा ढोल आणि कोल्हाटणीची ढोलकी या दोन्हींच्या मिश्रणातून तमाशाची ढोलकी तयार झाली. लोकमनाला भावलेली अशी एकेक अस्सल वस्तू जमा करत-करत बावनकशी तमाशा आकाराला आला आणि त्याने लोककलांच्या मांदियाळीचा लोकप्रियतेचा कळस गाठला.

गावोगावी भरणार्‍या जत्रांच्या निमित्ताने तमाशाच्या फडांचे आयोजन केले जाते. तमाशाच्या अतिश्रृंगारीक व इरसाल भाषेमुळे महिला वर्ग या कलेपासून चार हात लांब राहणेच पसंत करतो. पण तमासगीरांची भावना मात्र ‘आतुन कीर्तन वरून तमाशा’ अशीच असते. अस्सल ग्रामीण भाषेत काहीसे अश्लीलतेकडे झुकणारे, द्वि-अर्थी विनोद करून बोलणारी तमाशातली पात्रं रसिकांना हसता हसता लोळायला लावतात.

ढोलकीचा तमाशा आणि संगीत तमाशा असे तमाशाचे प्रमुख दोनच प्रकार असले तरी खानदेशी तमाशा, वायदेशी तमाशा, खडी गंमत, कोल्हाटणीचा तमाशा, त‘ती तमाशा असेही तमाशाचे प्रकार आहेत. प्रत्येकाची सादरीकरणाची पद्धत, बतावणी वेगवेगळी असते. तमाशाची मांडणी मात्र एकसारखी असते. ‘तमाशा’ चे सादरीकरण पुढील क्रमाने केले जाते.

गण -
रंगमंचाचं पूजन झाल्यानंतर सर्व कलाकार रंगमंचावर येऊन तमाशा रंगतदार व्हावा म्हणून श्रीगणेशाला साकडं घालतात.
आधी गणाला रणी आणा।
नाही तर रंग पुन्हा सुना-सुना ।।धृ।।
म्हणत गणरायाला प्रथम मान दिला जातो. ह्याचा आशीर्वाद नसेल, तर पुन्हा सारा रंग सुना होऊन जातो अशी धारणा या कलावंतांमध्ये आहे.

गवळण -
गणानंतर गवळणींचा मेळा येतो. सार्‍या गवळणी सजून-धजून मथुरेच्या बाजारला निघालेल्या असतात. त्यांच्या -बरोबर जुनी जाणती म्हणून एक मावशीही असते. मावशीचा वेश घेऊन वावरणारा हा कलावंत थोडीशी वेगळ्या धाटणीची भाषा बोलतो. त्यात तमाशाच्या मानाने सभ्य वाटणारे विनोद साधले जातात. बाजाराला जाणार्‍या या गौळणींच्या (गवळणींच्या) वाटेत पेंद्या आणि कृष्ण आडवा येतो. ‘गवळण’ म्हणून देवाची भक्ती करा, मगच तुमची वाट सोडू म्हणत पेंद्या त्यांना दम देतो आणि गवळणी सुरू होतात.

लावणी - रंगबाजी
तमाशातला हा सर्वात रंगतदार भाग. कुठल्यातरी गावचा मारखाऊ सरपंच गावच्या जत्रेसाठी तमाशा ठरवायला जातो. तिथं त्याची गाठ नायकीणीशी पडते आणि दोघांमधल्या संवादाने हास्याचा सागर उसळतो. त्यानंतर लावण्या सादर केल्या जातात. मध्ये मध्ये विनोदांची पेरणी, तमाशा ठरविण्यासाठी दरातली घासाघीस या सर्वांमध्ये प्रेक्षक दंग होऊन जातो.

वगनाट्य -
सत्य घटनांवर आधारित किंवा काल्पनिक कथांचं नाट्यरूपांतर म्हणजे वगनाट्य होय. ‘विष्णू बाळा’ हे एक त्यातलं गाजलेलं वगनाट्य. ‘गाढवाचं लग्न’ हे काल्पनिक वगनाट्यही लोकप्रियता मिळवून गेलं. ग्रामीण जीवनाशी संबंधित, नातेसंबंधावर आधारित, समकालीन राजकारणावर भाष्य करणारे - अशा विषयांवर बेतलेलं वगनाट्य रसिक जागा न सोडता पहाटेपर्यंत बघत राहतो व शेवटी मुजरा करून तमाशाची सांगता होते.

इतर काही लोककलांप्रमाणेच तमाशाचा बहराचा काळ म्हणजे पेशवाई . पेशवाईत अनेक शाहिरांनी व नर्तकींसह अन्य कलाकारांनी तमाशाला वैभवाला नेऊन ठेवलं. अनंत फंदी, रामजोशी, होनाजी बाळा, प्रभाकर, पठ्ठे बापुराव अशा अनेक शाहिरांनी आपल्या शृंगारीक लावण्यांनी मराठी मन बेहोश केलं आणि तमाशाला अढळपद प्राप्त करून दिलं. लोककलांमधील ही कळसाची शोभा अखंडपणे झळकत राहो.


११. कीर्तन :

‘कीर्तने वाचा पवित्र। कीर्तने होय सत्पात्र।
कीर्तने प्राणिमात्र। सुशील होती...।।

समर्थ रामदास स्वामींच्या या श्लोकातून कीर्तनाचा महिमा स्पष्ट होतो. महाराष्ट्र ही संत-महंतांची, वारकर्‍यांची भूमी आहे. या संस्कारमय ज्ञानतीर्थावर संत ज्ञानेश्र्वरांनी वारकरी संप्रदायाचा पाया घातला व भागवत धर्म प्रसारकांनी ही इमारत तेजस्वी बनविली. संत तुकोबांच्या रूपाने भक्तिमार्गाचा कळस आणखी तेजाने चमकू लागला. धर्मापासून ते नित्यक‘मांपर्यंत आणि सामाजिक प्रश्नांपासून ते मोक्षापर्यंत प्रत्येक गोष्टीत संत समाजाचे मार्गदर्शक झाले, आणि हे मार्गदर्शन करण्यासाठी ज्या साधनाचा सशक्त आधार त्यांना लाभला, ते म्हणजे कीर्तन.

संशोधकांच्या मते - ‘कीर्तनाचा उगम उपनिषद काळात झाला-असा उल्लेख आढळत असला, तरी पुराणकाळात ही संस्था उदय पावली असावी. तर काही अभ्यासक कीर्तन परंपरा वैदिक काळापासून आहे असेही सांगतात.

नाचु कीर्तनाचे रंगी।
ज्ञानदीप लावू जगी।

असे म्हणत विश्वाला ज्ञानाची कवाडे खुली करून देणारी ही कला एवढ्या दीर्घ काळानंतरही तेवढीच रसपूर्ण आहे. खेडोपाड्यातून आजही अखंड हरिनाम सप्ताह आयोजित केले जातात. या सप्ताहात महाराष्ट्रातले वेगवेगळे कीर्तनकार बोलवून प्रबोधनाचे कार्य केले जाते. रात्री होणार्‍या या भगवत भजनास पूर्ण गाव गोळा होतो.

वक्तृत्व, कथा-कथन, एकपात्री, काव्य, संगीत या सर्वांचा सुंदर मिलाफ असणारी ही कला अवगत करणे ही तशी अवघड बाब आहे. पण अनेक वर्षे अविश्रांत अभ्यास आणि साधना करून कीर्तनकार झालेले लोक आपल्या श्रोत्यांच्या मनावर आपल्या ज्ञानाचा व सादरीकरणाचा ठसा उमटविण्यात यशस्वी होतात.

संत ज्ञानेश्र्वर माउली, संत नामदेव, संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत चोखामेळा आदी संतांच्या अभंगांच्या अनुषंगाने भक्तिमार्ग सांगितला जातो, आध्यात्मिक मार्गदर्शन केले जाते, संसारापासून अ ‘लिप्त’ राहण्यास सांगितले जाते. संत नामदेव हे कीर्तन कलेचे प्रवर्तक मानले जातात, त्यांच्या या क्षेत्रातील अधिकार मोठा मानला जातो.

कीर्तनकारांचेही वेगवेगळे संप्रदाय आहेत व त्या-त्या संप्रदायाच्या नियमानुसार ते कीर्तन करत असतात. यामध्ये महाराष्ट्रातील सर्वात समृद्ध परंपरा म्हणजे वारकरी संप्रदाय.

वारकरी सांप्रदायिक कीर्तन -
मध्यभागी विणेकरी आणि त्याच्या शेजारी चोपदार उभा असतो. त्यांच्यामागे अर्धगोलाकारात टाळकरी उभे असतात. एका बाजूला मृदंगवादक तर दुसर्‍या बाजूला पेटीवादक (हार्मोनियमवादक) असतो.

प्रारंभी वीणेकरी (ज्याच्या गळ्यात वीणा आहे तो) ‘रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी’ हे नामसंकीर्तन सुरू करतो. मृदंगवादक भजनी ठेका धरतो आणि टाळकरी पदन्यास घेऊ लागतात. नामसंकीर्तनाची गती वाढत जाईल तसा वातावरणात उत्साह भरत जातो. त्यानंतर ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ हा ध्यानाचा अभंग होतो. अभंगानंतर ‘जय जय विठोब्बा रखुमाई’ चा गजर होतो. हा गजर सुरू असतानाच डोक्याला केशरी फेटा, अंगात नेहरू झब्बा, कमरेला धोतर, खांद्यावर उपरणं, कपाळाला अष्टगंध व बुक्क्याचा टिळा लावून कीर्तनकार व्यासपीठावर येतात. वीणेकर्‍याचं दर्शन घेऊन ते वीणा आपल्या गळ्यात घेतात. पुन्हा ‘रामकृष्ण हरी’ हे भजन होते. ‘रूप पाहता लोचनी’ हा रूपाचा अभंग होतो. पुन्हा ‘रामकृष्ण हरी’ भजन व त्यानंतर निरूपणासाठी घ्यावयाचा अभंग गायला जातो. यानंतर ‘विठोब्बा रखुमाई’ ह नामस्मरण घेऊन, वीणा दुसर्‍याकडे देऊन कीर्तनकार निरूपणाला सुरुवात करतात. दृष्टांत, कथा, विनोद, श्र्लोक, ओव्या, इतर अभंग अशा अनेक गोष्टींचा आधार घेऊन, त्या अभंगाचा अर्थ ते लोकांना उलगडून सांगतात.

वारकरी संप्रदायाबरोबरच कीर्तनकलेसाठी ओळखले जाणारे इतरही संप्रदाय आहेत. नारदीय कीर्तन, रामदासी कीर्तन, भराडी हरिकथा, कैकाडी सांप्रदायिक कीर्तन, संत गाडगेबाबा संप्रदायाचे कीर्तन-असे इतर अनेक संप्रदाय असून, त्यांच्याशी संबंधित ‘कीर्तनप्रकार’ आहेत. सर्व संप्रदायांतील कीर्तनांचा उद्देश एकच असतो, तो म्हणजे सामान्य जनांना लौकिक सुख-दु:खांचा सामना करण्यास सक्षम बनवणे व त्यांना आध्यात्मिक मार्गदर्शन करणे.

स्वातंत्र्यसंग्रामा दरम्यान लोकमान्य टिळकांनी कीर्तनाला राष्ट्रजागृतीचे साधन बनविले. कीर्तनातून समाज सुधारकांची, क्रांतिकारकांची चरित्रे गायली जाऊ लागली. लोकसंपर्क आणि प्रबोधनासाठी उपयुक्त अशा या कलेने स्वातंत्र्य समरातही आपले योगदान दिले. आजही ही कला आपले प्रबोधनाचे कार्य अखंडपणे करत आहे.

शतकानुशतके चालत आलेली ही कला मोक्षमार्गाचा, ज्ञानप्राप्तीचा, जनजागृतीचा प्रवाह बनून अखंड वाहत राहील यात शंका नाही.



१२. इतर लोककला

महाराष्ट्र हा अनेक सण आणि उत्सवांच्या गर्दीत स्वत:ला हरवून घेणारे, चैतन्याने रसरसलेल्या लोकसमूहाने बनलेला प्रदेश आहे. इथे उत्सवाला फार मोठे निमित्त असावेच लागते असे नाही. लोककलावंतांनी निर्माण केलेले प्रबोधनाचे व मनोरंजनाचे चैतन्यमय झरे अखंड वाहत आहेत.

महाराष्ट्रातील अशाच काही लोककलांची - ज्या आज फारशा चर्चेत दिसत नाहीत, प्रत्यक्षही दुर्मीळ झाल्या आहेत, पण एके काळी ज्यांनी महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा वाटा उचलला होता अशा कलांची-माहिती पुढे दिलेली आहे.

जोगती -जोगतीण :
यल्लम्माची परडी डोक्यावर घेऊन गावोगावी भक्तांना दिलासा देण्यासाठी जोगती आणि जोगतीण फिरत असतात. जोगतीण गाणी म्हणून भिक्षा मागते, तर जोगती चौंडक वाजवून तिला साथ देतो.

यल्लम्मा या देवीचं मूळ स्थान बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती हे आहे. यमाई या नावानेही या देवीला ओळखले जाते. ही देवी फार कडक आहे व तिची भक्ती न केल्यास ती रोगराई पसरविते असा समज आहे. या प्रकोपातून वाचण्यासाठी दारी आलेल्या जोगती-जोगतीणीला जमेल तसे दान दिले जाते.

भांडाचे भंडपुराण किंवा भांडपुराण :
भांड हा शब्द संस्कृतातील ‘भण्ड’ या धातूपासून बनलेला आहे. त्याचा अर्थ थट्टा करणे, विनोद करणे, अश्र्लिल बोलणे असा आहे.

वरील अर्थावरून भंडपुराणाची कल्पना येऊ शकते. थोडक्यात अचकट-विचकट, अश्र्लील बोलून लोकांचे रंजन करणारा एक लोककलावंत म्हणजे भांड आणि त्याचे बोलणे, कथन करणे म्हणजे भांडपुराण!
सहदेव भाडळी :
ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार प्रत्येक गोष्ट करणारा समाज यंदा पाऊसपाणी कसे होईल, येते वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी सहदेव भाडळीचा आधार घेतो. सहदेव भाडळी ही कला मूलत: पर्जन्यमानाच्या तर्काशी संबंधित आहे. त्याचबरोबर इतर भविष्यविषयक ज्ञानही यातून मिळते.
अशा काही लोककलांबरोबरच कल्याण आणि पहाटगाण, पांगुळ, नंदीबैलवाला, चित्रकथी आणि इतरही अनेक अज्ञात किंवा लुप्त पावलेल्या लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध होता.

लोककलांनी महाराष्ट्र समृद्ध होता असे म्हणण्यामागे आजचा बदलता काळ, बदलती जीवनशैली हे महत्त्वाचे कारण आहे. नंदीबैलाला विचारून पाऊस पडेल असे म्हणणे वेधशाळेच्या अंदाजावर नजर ठेवणारे आधुनिक समाजात हास्यास्पद वाटते. ऑर्केस्ट्रातल्या गाण्यांनी बेभान होणार्‍या तरुणाईला पोवाड्याची ओढ वाटणे कमी होत चालले आहे.

परिस्थिती गंभीर आहे, पण औषधोपचारासाठी मराठमोळा बाणा जपणारे लोक अजूनही पुढाकार घेताहेत. म्हणूनच पुन्हा लोककलांच्या समृद्धीचा काळ येईल अशी आशा बाळगायला हरकत नाही.


 
web counter
संकेतस्थळ भेट क्र.
Copyright © 2013. Ahmednagarjilha.tk All Rights Reserved

Welcome to Ahmednagar district